मुस्लिम राष्ट्रांची यादवी_३०.०१.२०२०

            मेजर जनरल कासीम सुलेमानी, हे बगदाद विमानातळावर उतरला. त्याला घेण्यासाठी इराकी अर्धसैनिक दलाचे प्रमुख अल मुहान्डीस विमानातळवर पोहोचले.  मुहान्डीस इराकच्या खासीब हिज्बुल्ला या गटाचे निर्माते होते. हे दोघे अमेरिकेचे कट्टर विरोधक होते आणि शिय्या समुदायाचे नेते होते.  बगदाद विमानातळच्या बाहेर आल्याबरोबर अमेरिकन क्षेपणास्त्रानी त्यांना उद्ध्वस्त केले. डोनाल्ड ट्रम्पच्या थेट आदेशावरून त्यांच्यावर क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला.  सुलेमानी हा इराण मधील सर्वात मोठा लोकप्रिय सैनिक होता. त्यामुळे इराण आणि मुस्लिम राष्ट्रातील इराण समर्थकात संतापाची लाट पसरली.  पण ह्या हत्येला सौदीअरबियाचे समर्थन होते आणि बहुतेक सुन्नी मुस्लिम समुदायाचा पाठींबा होता.  मुस्लिम राष्ट्रामध्ये शक्तिशाली दोन गट आहेत. सुन्नी मुसलमानांचा गट सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखाली काम करतो.  त्यामध्ये पाकिस्तान, इजिप्त, जॉर्डन हे प्रमुख देश आहेत.  दूसरा गट इराणच्या नेतृत्वाखाली काम करतो.  त्यात इराण, सिरिया हे प्रमुख देश आहेत.   इराकची विचित्र परिस्थिती आहे.  तिथे बहुसंख्य शिय्या आणि सुन्नी सद्दाम हुसेनच्या नेतृत्वाखाली गुण्यागोविंदाने नांदत होते.  २००३ ला अमेरिकेने विनाकारण त्यांच्यावर हल्ला केला व सद्दाम हुसेनला मारले.  इंग्रजाने जसे भारतामध्ये हिंदू – मुस्लिमांना फोडून अनेक वर्ष राज्य केले, तसेच अमेरिकेने इराकमधील शिय्या सुन्नीना तोडून राज्य करत आहेत.  त्यामुळे इराकमध्ये शिय्या-सुन्नीचा संघर्ष वाढतच आहे. 

            मध्येच इसिसच उदय झाला, त्यात त्यांनी इराक आणि सिरियाचा मोठ्या प्रदेशावर कब्जा केला आणि प्रचंड क्रूर हिंसाचार केला.  इसिस विरुद्ध सगळे एक झाले.  रशिया सिरियाबरोबर मिळून इसिस विरुद्ध लढत होती.  दुसरीकडे अमेरिका सिरियाच्या बंडखोर सेनेला सिरिया विरुद्ध लढायला मदत करत होती.  ते पण इसिस विरुद्ध लढाईत सामील झाले आणि दुसरीकडे इराणची सेना सुलेमान यांच्या नेतृत्वाखाली इराकी सैन्य आणि सिरियाच्या सैन्याला प्रशिक्षण देऊन मदत करत होते.  यासर्वांनी मिळून घनघोर युद्ध करून इसिसला संपविले.   इसिसचा पराभव झाल्यावर इराण, इराक आणि सिरियाचे सैन्य अमेरिकन सैन्य आणि दहशतवाद्याविरुद्ध एकत्र झाले.   या सर्वांना एकत्र करण्याचे काम सुलेमानी यांनी केले.  म्हणून तो अमेरिकेला सलत होता.  शुल्लक कारणावरून डोनाल्ड ट्रम्पने त्याची हत्या केली. 

            अमेरिकेने शीत युद्धात मुस्लिम राष्ट्रांमध्ये भांडण लावून त्यांना उभे चिरले आणि एकमेकाविरुद्ध लढायला लावून तेलावर आपला ताबा ठेवला. त्यानुसार १९९१ च्या सोविएत संघाच्या अस्था आधी मुस्लिम राष्ट्र सोविएत संघाबरोबर होती किंवा अमेरिकेबरोबर होती. त्यांचे वैशिष्ट असे कि, कट्टरवादी राष्ट्र अमेरिकेच्या बाजूला तर सेक्युलर राष्ट्र रशियाच्या बाजूला होती, हे आताही असेच चालू राहिले आहे. सुलेमानीची हत्या ही अमेरिकेसाठी फार महाग पडेल.  इराण, इराक, सिरिया ह्या देशात आणि जगभर अनेक ठिकाणी लाखो लोक रस्त्यावर आले आणि अमेरिके विरुद्ध सुद उगवण्याच्या घोषणा देऊ लागले.  सुलेमानी हा भारताच्या बाजूने नेहमी उभा राहिला होता. पाकिस्तानचा कर्दनकाळ म्हणून इराणी त्याला ओळखत होते. इसिसचा शत्रू आणि तालिबानचा विरोधक अशी त्याची कीर्ती जगभर होती.  लाखो लोक रस्त्यावर आले त्यांची एकच मागणी होती, अमेरिकेला नष्ट करा. इराणी लोकांना वाटते कि सुलेमानीची हत्या म्हणजे जाहीर युद्ध.  त्याप्रमाणे इराणने सुद्धा इराकमधील अमेरिकन तळावर सांगून हल्ला केला.  त्यामुळे जगामध्ये तिसरे महायुद्ध पेटते की काय अशी भीती फोफावली. 

            सुलेमान हा कुड्स दलाचा प्रमुख होता. कुड्स दल हे इराणी सैन्याचा एक भाग आहे.  इसिसचा पराभव करण्यासाठी प्रामुख्याने सुलेमानी आणि त्यांच्या दलानी कामगिरी केली होती.  कुड्स दलाने इराणच्या मित्रांना भरपूर सैनिकी मदत केली.  त्याने सिरीयाच्या सैन्याला अमेरिकेविरुद्ध आधार दिला.  सुलेमानीने अमेरिकन दहशतवादी संघटनाना विरोध केला.  सुलेमानी मॉस्कोला जाऊन रशियाचे अध्यक्ष पुतीनला भेटले व सिरियाला मदत करण्याची भूमिका पटवली.  सिरिया हे एकमेव अरब राष्ट्र आहे, जे इराणला मदत करते.  या दोघांच्यामध्ये इराक आहे.  अमेरिकेने सद्दाम हुसेनला इराणवर हल्ला करायला लावला होता.  ८ वर्ष हे युद्ध ८० च्या दशकात पेटले.  त्यावेळी १९८० ला सुलेमानी हा एका गरीब शेतकर्‍याचा मुलगा लढाईत सामील झाला होता.  या युद्धात त्याचे शौर्य उठून दिसले.  त्यानंतर अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी सिरियन सैन्याला मदत केली.  लेबानन मधील हिजबुल्ला ह्या गटाला प्रशिक्षित करण्यामध्ये कुड्स दलाचा मुख्य सहभाग होता.  इज्राईलने लेबाननवर जेव्हा हल्ला केला, तो हल्ला परतावण्यामध्ये हिजबुल्लाचे यशाचे श्रेय सुलेमानी आणि कुड्स या संघटनेला मिळाले.

            पण सुलेमानची मुख्य कामगिरी इसिसला संपविण्याची आहे.  नाहीतर बगदाद सुद्धा इसिसच्या हातात गेला असता.  इराकचे अर्धसैनिक दल त्याचे प्रशिक्षण इराणन सैन्याने केले होते.  इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल मेहदी यांनी लोकसभेत म्हटले की सुलेमानी बगदादला इराकच्या आमंत्रणावरून आला होता.  त्यामुळे अमेरिकेने त्यांची हत्या केल्याबद्दल निषेध व्यक्त केला.  तसे बघितले तर इराण आणि इराक हे शत्रूच होते.  पण सुलेमानीला मारल्यामुळे ते आणखी जवळ आले.  इराण विरोधातील इराकी लोकांनी आता इराण विरोध संपवला आहे. इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनेई यांनी सुलेमानीला शहीद जाहीर केले व त्यांच्या मृत्युचा सूड घेण्याचे निर्धार केला. सुलेमानीची हत्या हा अमेरिकेचा आंतकवाद असल्याचे म्हणाले.  इराकी लोकसभेने एकमुखांनी अमेरिकेचा निषेध केला व अमेरिकन सैन्याला इराकमधून जाण्यास सांगितले व युनोमध्ये अमेरिकेविरुद्ध तक्रार सुद्धा केली.   सुलेमानीच्या हत्येनंतर अमेरिकन परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तान सैन्याचा प्रमुख जनरल कॉमार भाजवाला फोन केला आणि पाक विरोधातील सर्व निर्बंध संपवले.  ट्रम्पने जाहीर केले की पाकिस्तान अमेरिकेचा अत्यंत महत्त्वाचा मित्र आहे.  त्याउलट अमेरिकेने भारताविरुद्ध निर्बंध लावले आणि भारताला इराणकडून तेल घेण्यावर बंदी केली.  त्याचे आपल्या देशाला प्रचंड नुकसान झाले आहे. 

            वास्तविक इराणची जनता ही सरकार विरुद्ध आंदोलन करायला लागली होती.  कारण अमेरिकन निर्बंधांमुळे जनतेचे प्रचंड हाल होत होते.  तसे पाहिले तर अमेरिकेचा अफगाणिस्तान आणि इराकवरील हल्ला इराणच्या पथ्यावर पडला आहे. कारण अफगाणिस्तान, इराक, लेबानन आणि सिरियामधील इराणप्रेमी लोकांशी जवळचे संबंध बनविता आले.  या सर्वात सुलेमानी यांनी प्रमुख भूमिका केली.   तसेच या भागातील बहुसंख्य लोक अमेरिका विरोधात संघटित झाले.  इराण बाहेर जवळ जवळ दीड लाख योद्धे इराकमध्ये निर्माण झाले आहेत.  सुलेमानचा सहकारी हा सुलेमानच्या जागी नेमण्यात आला आहे.  यामुळे अमेरिकन हल्ल्याचा फायदा इराणलाच झाला आहे.  त्यातच इराणला चीन आणि रशियाची मदत आहे.  अमेरिकन सैन्याचा दहशतवाद हा त्यांच्या विरुद्ध उलटत आहे.  अमेरिकेचे सर्वात जवळचे राष्ट्र सौदी अरेबिया हे इराणला आपले शत्रू मानते.  सौदी अरेबियाचे सर्वात जवळचे राष्ट्र पाकिस्तान आहे.  पाकिस्तानचे सैन्य हे सौदी राजघराण्याचे संरक्षण करते  आणि पाकिस्तानी सेना हे सौदी अरेबियाच्या सैन्याचा भाग म्हणून काम करते.  इराण हा अनेक वर्ष भारताचा मित्र असून देखील अमेरिकन दबावामुळे भारत इराणला विरोध करत आहे.  त्याचे प्रचंड नुकसान आपल्याला भोगावे लागते आणि लागणार आहे.  इराण आणि भारत एक असले तर पाकिस्तानला मध्ये घेऊन चिरडून टाकता येईल.  याच्या उलट मोदी सरकार का भूमिका घेत आहे? हे आमच्या समजण्यापलीकडे आहे.  सर्वात प्रथम आपल्या राष्ट्राचे हित जोपासले पाहिजे.  म्हणून अमेरिकेच्या पाठीमागे वाहत जाण्यात काहीच अर्थ नाही.  अमेरिकेने नेहमीच आपल्याला दगा दिला आहे आणि पाकिस्तानला मदत केलेली आहे.  तरी भारताने विशेषत: मुस्लिम राष्ट्रात आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे ओळखले पाहिजे आणि केवळ राष्ट्रहितासाठी काम केले पाहिजे. 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS