युद्ध का बुद्ध ?_१८.६.२०२०

चीन भारत संघर्ष जुनाच आहे. पण आतापर्यंत १९७५ नंतर कधीच कोणाचे प्राण गेले नाहीत किंवा गोळीबार ही झाला नाही. आता देखील अत्यंत तणावाच्या परिस्थितीत बंदुकीचा वापर झाला नाही. दोन्ही देशांनी अत्यंत सय्यम अनेक वर्ष दाखवला आहे. पण आता ही परिस्थिती बदलली आहे. खरे तर चीनी काही करायचे झाले तर नेहमी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत असतात. त्यातल्या त्यात चीनी सैन्याला युद्ध सोडून कुठलीही कारवाई करायला परवानगी असते. गेल्या काही महिन्यात लढाकी लोकांनी अनेकदा चीनी घुसखोरी बद्दल सरकारला कल्पना दिली होती. अनेक महिने चीनी सैन्य पुढे पुढे येत होते. नियंत्रण रेषा  पार केली नाही, तरी नियंत्रण रेषेजवळ येणे म्हणजेच पुढे येणे ही धोक्याची घंटा वाजवण्यासारखे आहे.  पूर्वी नियंत्रण रेषेपासून दूर दोन्ही सेना रहात असत.  नियंत्रण रेषेपासून चीनी सैन्य दिसत पण नव्हते.  मी स्वत: भारत चीन सीमेवर अनेक ठिकाणी पाहणी केली आहे.  अनेक ठिकाणी सीमापार चीनी सैन्याच चिन्ह सुद्धा दिसत नाही.  फक्त काही ठिकाणी जसे नथुला क्षेत्रात दोन्ही सेना अत्यंत जवळ आहेत. पाक नियंत्रण रेषेवर वेगळी परिस्थिती आहे. अगदी ५० मीटरजवळ  सैन्य अनेक ठिकाणी आहे.

म्हणूनच जेव्हा नेहमीच्या जागा सोडून चीनी सैन्य जवळ येते आणि राहते तो चिंतेचा विषय बनतो. अलिकडे तसेच झाले. तंबू लावणे, सुरक्षा खंदक बनविणे, रस्ते बनविणे हे काम चालूच होते. अलिकडेच पॅंगॉग तलाव क्षेत्रात चीनी जवान आपल्या क्षेत्रात आल्यामुळे प्रचंड मारामारी झाली. त्यात ७२ सैनिक जखमी झाले. त्यानंतर दोन्ही देशात चर्चा झाली दोन्ही सैन्याने मागे घेण्याचे ठरवले. सरसेनापती जंगल नरवणे यांनी पण जाहीर केले कि आपण चर्चेतून मार्ग काढू. त्यामुळे शांतता पुन्हा येईल असे सर्वांना वाटले. ह्या सीमेवर कधीच गोळीबार न झाल्यामुळे कधी असे काही होईल हे कुणालाच वाटले नाही. पण झाले उलटेच. चीनी सैन्यानेबर्‍याचशाभागावर कब्जा केला होता.  घालवण नदीच्या पलिकडे भारताची हद्द होती. चीनी सैन्य परत गेले का? बघायला आपले सैनिक गेले, पण चीनी सैन्य परत गेले नव्हते.  हातघाईवर दोन्ही सैन्य आले.  हत्याराचा वापर कुठल्याही परिस्थिती करायचं नाही हे ठरल्यामुळे मारामारी सुरू झाली.  त्यात काही सैनिक घालवण नदीत पडले व शहीद झाले.  भारत आणि चीन दोघांनी कुमक मागवली.  जितके असेल तितके सैन्य दोन्हीकडून आले आणि जोरदार हाणामारी सुरू झाली.  त्यामध्ये भारताचे २० सैनिक शहीद झाले आणि चीनचे ४० च्या वर मारले गेले, सूत्रांकडून असे कळविण्यात आले की भारताचे ३० सैनिक कैद झाले. नंतर त्यांना सोडण्यात आले.  या मारमारीत बिहार बटालीयनचे प्रमुख कर्नल संतोष बाबू पण शहीद झाले.  त्याचा प्रचंड राग सैनिकांना आला आणि म्हणून ते चीनी सैन्यावर तुटून पडले.  भारतीय सैन्याच्या इतिहासात असा प्रकार कधीच घडला नाही. या प्रकराला कसे हाताळणार हे सरकार ठरवेलच, पण या घटनेमध्ये आपण आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. 

चीन कुठलीही गोष्ट अचानक करत नाही.  पूर्ण नियोजन करून करतो आणि जेथे चीनी येतात तेथून ते सहज मागे जात नाहीत.  आता जिथे जिथे चीनी सैन्य घुसले असेल तेथून चर्चा करून ते मागे गेले तर बरे, नाहीतर समोर दोन पर्याय आहेत पहिला म्हणजे जिथे चीनी सैन्य घुसले असेल तेथे हल्ला करून चीनी सैन्याला नेस्तनाबुत करणे किंवा दुसरीकडे कुठेतरी चीनच्या प्रदेशावर कब्जा करणे. दोन्ही पर्यायात युद्ध पेटण्याची भीती आहे.  आतापर्यंत इतके लोक मारले जाऊन सुद्धा शस्त्रास्त्रांचा उपयोग झाला नाही ही जमेची बाजू आहे.  पण तो पुढे होणार नाही हे सांगता येत नाही.  युद्ध पेटले तर दोन्ही देशांची प्रचंड हानी होणार आहे. तिकडे अमेरिका भारताला उकसवत आहे.  तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है | असे म्हणतो पण दुसरीकडे आताच प्रकाशात आलं की अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी चीनच्या राष्ट्रपतींकडे निवडणुकीसाठी मदत मागितली.  अमेरिकन राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये चीनने ट्रम्पला अमेरिकन शेतकर्‍यांचा माल विकत घेऊन मदत करावी.  तर अमेरिकेच्या ग्रामीण भागातील मते डोनाल्ड ट्रम्पला पडणार.

भारतात काही हौशी कलाकार आहेत. ज्यांना वाटत की अमेरिका भारताला मदत करेल. चीन विरुद्ध भारताला भडकावायला अमेरिका आणि पाकिस्तान नेहमीच प्रयत्न करत आहेत. भारतात होणार्‍या दहशतवादाला जितका पाकिस्तान जबाबदार आहे, त्यापेक्षा १० पट जबाबदार अमेरिका आहे आणि प्रत्यके प्रसंगात अमेरिकेने भारताला विरोधच केला आहे.  त्यामुळे हौशी कलाकारांनी समजून घ्यावे की चीन विरुद्ध भारताला कुणीही मदत करणार नाही. भारताला आपली लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणीही कायमचा शत्रू किंवा मित्र राहत नाही. आपल्या राष्ट्रीय हितासाठी प्रत्येक देश आपली भूमिका ठरवतो.  पण चीन विरुद्ध आपल्याला सर्जिकल स्ट्राईक किंवा हवाई हल्ला करता येत नाही. त्याला चीन किंमतही देणार नाही.  म्हणून सरकारने विचारपूर्वक ठोस निर्णय घ्यावा. 

अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. पण पाक बाबतीत ते एकत्र आहेत. ह्या सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा  भारत शिकार झाला आहे. दुर्दैवाने  भारताच्या राजकर्त्यांनी ह्याला योग्यवेळी योग्य कृती न केल्यामुळे  भारत एकटा पडत आहे. चीनची समस्या आणखी गहन आहे. चीन-भारत हे स्वातंत्र्यानंतर मित्र झाले. भारत-चीन-रशिया जर एकत्र आले तर अमेरिकेचा पराभव निश्चित होता. म्हणून अमेरिकेने  भारतीय गुप्तहेर संघटनेला विकत घेतले. Intelligence Bureau (IB) ने खोटे अहवाल देऊन सीमावाद निर्माण केला. IB चे प्रमुख मुलिक हे पंडित नेहरूंचे सुरक्षा सल्लागार होते. हिंदी चीनी भाई भाईचे वातावरण त्याकाळी निर्माण झाले. म्हणूनच अमेरिकेने मुलीक यांना वापरून भारत चीनमध्ये मुलीकद्वारा संघर्ष पेटवला. राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची  कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले. आमचे अनेक सैनिक मारले गेले अनेक कैदी झाले. चीनने आमचा बराच भाग कब्जा केला. ह्या विध्वसाचे प्रमुख शिल्पकार मात्र नामानिराळे राहिले. युद्धात यश मिळाल्यावर चीनने आपले सैन्य मागे घेतले. ह्यावरून स्पष्ट झाले कि चीनला पुढे जाऊन भारताशी मैत्री करायची आहे.

अनेक वर्ष तणावात गेली. १९७७ ला राजीव गांधीनी आणि नंतर  वाजपेयींनी चीनबरोबर पुन्हा मैत्री करण्यास सुरुवात केली. सीमा संघर्ष  सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले. सीमावाद सोडला तर भारत चीन कुठलाच वाद नाही. चीन भारत युद्ध म्हणजे दोन्ही देशांचे अगणित नुकसान आणि गोर्‍या माणसांचा फायदा. हीच अमेरिकन चाल आपण ओळखली पाहिजे. आता मात्र डोक्लाम प्रकरणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आली होती. मिडीयामध्ये लोक डरकाळ्या फोडू लागले. चीनला धडा शिकवण्याची भाषा करू लागले. पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे. तेच काम मनमोहन सिंघ व आता मोदी करत आहेत. तेही अमेरिकेला खुश करण्यासाठी.  चीन विरुद्ध कारवाईमुळे  सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. ज्या अमेरिकेने सातत्याने भारताला विकलांग करण्याचा प्रयत्न केला; त्या अमेरिकेसाठी चीनला अंगावर घेण्याचे काय कारण आहे? गठबंधन टिकवण्यासाठी डोक्लाम प्रकरणात चीनने माघार घेतली. आपले सैन्य मागे घेतले. दोन्ही देशांनी शहाणपणा दाखवला. भावनात्मक विरोध न करता; सत्य परिस्थितीवर निर्णय घेतला.

भारत चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. दोन तृतीयांश जगातील लोक ह्या दोन देशात राहतात. त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध हे दोन देशासाठीच नाही तर मानवतेसाठी महत्वाचे आहेत. ज्यांग जमीन हे चीनचे तत्कालीन राष्ट्रपती मला म्हणाले होते याची मला आज आठवण झाली. पूर्वी चीन आंतरराष्ट्रीय नियमांना जुमानत नव्हता. पण त्याला बदलावे लागले आहे. चीनचा आर्थिक उदय आणि भारत तसेच जगाशी व्यापारी संबंध चीनला त्यांच्या आक्रमकतेपासून दूर नेत आहेत.  चीन पाक संबंध यामुळे धोक्यात आले आहेत. पण तो धोका स्विकारण्याची तयारी चीनने दाखवली आहे. आता याचा फायदा घेऊन भारताने पाक-चीन संबंधावर कायमचा घणाघाती हल्ला करावा लागेल. शेवटी पाक आपला घोषित शत्रू आहे. रोज या संघर्षात आपले लोक मारले जात आहेत.  शहीद सैनिकाना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्याला युद्ध पाहिजे की बुद्ध पाहिजे हे ठरवावे लागेल. भारतीय सेना युद्ध करण्यासाठी सज्ज आहे, पण त्यात दोन्ही देशांचे प्रचंड नुकसान होऊ शकते. तेच अमेरिका आणि पाकिस्तानला पाहिजे आहे.  म्हणून ही वेळ भावनेने भडकून काम करण्याची नाही. तर भारताच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याची आहे. ही जाणीव आपल्या नेत्यांना असेल असे समजून ते जो निर्णय घेतली त्याला आपण पूर्ण पाठिंबा देऊ.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS