युद्ध – जगातील सर्वात जुनी लोकशाही_५.११.२०२०

जगातील सर्वात जुनी लोकशाही अमेरिकेमध्ये राष्ट्रपतीची निवडणूक चालू आहे. अमेरिकेत राज्यांना महत्त्व भारतापेक्षा जास्त आहे.  म्हणून निवडणूक निकाल मत कुणाला जास्त मिळतात त्यावर अवलंबून नाही. २०१६ ला ट्रम्प, श्रीमती क्लिंटन विरोधात निवडून आले,  क्लिंटनला २० लाख जास्त मते मिळाली होती. तरी ट्रम्प निवडून आले. त्याचे कारण म्हणजे निवडणूक राज्यामध्ये होते. जसे न्यूयॉर्क मध्ये जास्त मते ट्रम्पला मिळाली तर ते राज्य ट्रम्पला गेले.  त्यात प्रत्येक राज्याला गुण दिले आहेत. जसे कॅलिफोर्निया राज्याला सर्वात जास्त म्हणजे ५६ गुण आहेत. तसेच लास वेगासचे नेवाडा राज्याला ६ गुण, जॉर्जिया राज्याला १६ गुण. फ्लोरिडा राज्याला २६ गुण. हे गुण लोकसंख्येच्या आधारावर वेळोवेळी ठरवले जातात. जसे भारतात प्रत्येक १० वर्षाला मतदारसंघ बदलतात. त्यामुळे जितकी राज्ये एक उमेदवार जिंकतो त्या राज्याची मते त्याला मिळतात. उदा. कॅलिफोर्निया यावेळी डेमॉक्रॅटिक पक्षाला मिळाले. म्हणून डेमॉक्रॅटिक पक्षाला ५६ गुण मिळाले.

            असे प्रत्येक राज्यात जिंकल्यावर त्या राज्यांची मते त्या पक्षाला किंवा उमेदवाराला मिळतात. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीला एकदमच मतदान केले जाते. राष्ट्रपती उपराष्ट्रपती ना एकच मत असते. त्यामुळे राष्ट्रपती निवडून आला की उपराष्ट्रपती देखील त्याच पक्षाचा निवडून येतो.  ह्यावेळी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राष्ट्रपती ट्रम्प आणि उपराष्ट्रपती पेन  आहेत. हे दोघे २०१६ ला क्लिंटन विरुद्ध निवडून आले होते. आता ते पुन्हा उभे आहेत.  डेमॉक्रॅटिक पक्षाचे उमेदवार पूर्व उपराष्ट्रपती जो-बाईडन आहेत आणि उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय मुळाच्या कमला हॅरिस आहेत. हा लेख लिहित असताना डेमॉक्रॅटिक पक्षाचे बाईडन यांना राज्याची २५३ मते मिळाली आहेत आणि ट्रम्पला २१३ मते मिळाली आहेत. अजून ४ राज्यात मतमोजणी चालू आहे. त्यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. ज्याला सर्व राज्यातून २७० मते मिळतील तो निवडून येईल. सध्या बाईडन, अरीजोना आणि नेवाडा मध्ये पुढे आहे. तर पेन्सलविनिया आणि जॉर्जिया राज्यात ट्रम्प पुढे आहे. तरी या राज्यात रश्शीखेच सुरू आहे.   निवडून यायला एका उमेदवाराला २७० सर्व राज्याची मते लागतात.  

            अशी व्यवस्था निर्माण होण्यासाठी अमेरिकेचा इतिहास कारणीभूत आहे. अमेरिकेवर भारतासारख्या इंग्रजांचे राज्य होते.  त्यावेळी पूर्ण जगातून वेगवेगळे लोक निर्वासित म्हणून गेले.  अर्थात सर्वात जास्त लोक युरोप मधून गेले.  या निर्वासितांनी तेथील स्थानिक लोकांना मारून त्यांच्या जमिनीवर कब्जा केला आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळी राज्ये निर्माण होऊ लागली.  जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध सुरू झाले. इंग्रजांना युद्धामध्ये हरवून अमेरिकेला स्वतंत्र करण्यात आले. १७८५ च्या दरम्यान अमेरिकेची घटना बनविण्यात आली.  त्यावेळी काही राज्ये एकत्रित आली आणि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका (USA) हे राष्ट्र अस्तित्वात आले.  त्यात लोकशाही पद्धत जगामध्ये पहिल्यांदाच स्विकारली गेली.  महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेत सुरुवातीपासूनच लोकशाही प्रस्थापित झाली.  भारताप्रमाणे संविधान बनले आणि राज्य करण्याची राष्ट्रपती पद्धत निर्माण झाली.  त्यात राज्यांना प्रचंड अधिकार आहेत राज्याचा प्रमुख गव्हर्नर असतो आणि सर्व राज्ये मिळून राष्ट्रपती बनतो. 

            अमेरिकेचा पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन झाले  एका व्यक्तिला दोनदाच राष्ट्रपतीची निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे.  त्यामुळे घराणेशाही नाही.  पण वर्णवाद टोकाचा आहे.  काळ्या लोकांना त्यात भारतीय देखिल आले, १९६० पर्यंत त्यांना मतदानाचा अधिकार नव्हता.  अमेरिकेचा मुख्य व्यवसाय शेती होता.  कापूस हे मुख्य पिक होते. शेतीसाठी गोर्‍या शेतकर्‍यांनी आफ्रिकेतून मोठ्या प्रमाणात गुलाम म्हणून आणले.  ते जास्त करून अमेरिकेच्या दक्षिण भागात होते.  त्यात अब्राहम लिंकनने गुलामगिरी नष्ट करण्याचा कायदा आणला.  त्या विरोधात दक्षिण राज्यांनी बंड केले आणि USA मधून बाहेर पडले.  पण अब्राहम लिंकनने अमेरिकेला एकसंघ ठेवण्याचा निर्धार केला.  म्हणून १८६१  पासून  ५ वर्ष यादवी युद्ध झाले.  त्यात हजारो लोक मारले गेले.  अब्राहम लिंकनचा विजय झाला आणि अमेरिका एकसंघ राहिली.  पण या युद्धामुळे सर्व राज्य आपल्या अधिकाराला जपतात आणि केंद्र सरकार विरोधात बराच वेळा एकत्रित सुद्धा होतात.  पण कालांतराने अमेरिकन लोकशाही स्थिर होत गेली आहे. 

            अमेरिकेमध्ये काही विषय फार महत्त्वाचे आहेत.  गुलामगिरी विरोधात प्रचंड हिंसाचार झाला.  त्यावेळी गोर्‍या लोकांचे प्रभुत्व राखण्यासाठी काही हिंसक संघटना बनल्या त्यात कु क्लक्स क्लॅन ही सर्वात मोठी संघटना आहे. त्यांचा धंदा काळ्या लोकांना मारण्याचा आहे.  तो आतापर्यंत चालूच आहे.  वर्णद्वेष हा अमेरिकन राजकारणाचा सर्वात मोठा भाग आहे.  जसे भारतामध्ये हिंदुत्व आहे.  त्यामुळे कुठल्याही पक्षाने कसेही राज्य केले, तरीही वर्णद्वेषावर मतदान होते.  ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार आहे.  त्याला गोर्‍याचे श्रेष्ठत्व मानणार्‍या सर्व लोकांचे समर्थन आहे. त्याविरुद्ध डेमॉक्रॅटिक पक्ष हा काही प्रमाणात कॉग्रेस सारखा आहे. त्याला काळ्या अल्पसंख्यक आणि समाजवादी विचारांचे समर्थन आहे.  काळ्या लोकांमध्ये भारतीय लोक सुद्धा समाविष्ट आहेत.  म्हणून अनेकदा गोर्‍या वर्णवादी लोकांनी भारतीय लोकांना मारले  आहे. “आपल्या देशात परत जा. आमच्या नोकर्‍या खाऊ नका.”  असे गोरे लोक काळ्या आणि भारतीय लोकांना सांगतात.   वर्णवाद, जातीवाद हा फरक सोडला तर दोन्ही पक्ष हे श्रीमंतांचेच पक्ष आहेत. कारण दोन्ही पक्ष वैयक्तिक स्वातंत्र्याला महत्त्व देतात. 

            वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे उद्योग आणि उत्पादन हे पुर्णपणे खाजगी मालकांच्या हातात असले पाहिजे.  सरकारी उद्योग असू नयेत. हाच मंत्र अमेरिकेने जगभर पसरविण्याचा प्रयत्न केला.  अमेरिकेने महाकाय बहुराष्ट्रीय उद्योग उभे केले आणि त्या माध्यमातून पूर्ण जगावर आपली आर्थिक महासत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.  म्हणून आपण अनेक बहुराष्ट्रीय उद्योग भारतात बघत आहोत.  त्यात सौंदर्य प्रसाधने, मॅकडोनाल्ड, जीन्स, टीशर्ट्स असे अनेक उद्योग आपण भारतात बघत आहोत.  त्यात युद्धजन्य सामुग्री आणि हत्यारे प्रामुख्याने जगभर विकली जातात.  याचा परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात झाला आहे. इंदिरा गांधीच्या आर्थिक व्यवस्थेला तिलांजली देऊन मनमोहन सिंग यांना सरकारमध्ये घेण्यात आले. ते ही जागतिक बँकेच्या दबावामुळे.  जागतिक बँक ही पुर्णपणे अमेरिकन मालकीची आहे. जगातील राष्ट्रांना कर्ज देऊन त्यांना कर्जबाजारी करायचे आणि आपले गुलाम करून टाकायचे. या जागतिक बँकेचे अध्यक्ष मनमोहन सिंग होते.  हे भारत सरकार मध्ये अर्थमंत्री म्हणून आले. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाऊजा) धोरण भारतात त्यांनी आणले.  त्यामुळे कॉग्रेस तर बदललीच पण भारताची अर्थव्यवस्था सुद्धा बदलली.  भाजपने सुद्धा हीच अर्थव्यवस्था जोराने राबविली. एकीकडे अंबानी जगातील श्रीमंत माणसांमध्ये गणला जातो आणि भारतातील शेतकरी आत्महत्या करतो आणि तिसरीकडे दाऊद इब्राहीमची संपत्ती ७ बिलियन डॉलर म्हणजे ५०००० कोटी गणली जाते. म्हणून अमेरिकन अर्थव्यवस्था जी आज भारताची पण झाली आहे. ती आर्थिक विषमता प्रचंड वाढवते.  कोविड काळामध्ये मोठे उद्योग नष्ट झाल्यामुळे लोक भिकेला लागले.  अन्न, वस्त्र, निवार्‍यासाठी दरदर  भटकू लागले.  दोन्ही प्रमुख राष्ट्रीय पक्ष अमेरिकेत आणि भारतात अमेरिकन अर्थव्यवस्था जोरात राबवत आहेत.  दुसरीकडे लोकांना मूर्ख बनविण्यासाठी लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी वर्ण द्वेष, धार्मिक द्वेष आणि जातीयवाद वाढवला जातो. 

            अमेरिका हे जगातील सर्वात जुने लोकशाही राष्ट्र आहे आणि भारत जगातील सर्वात मोठे लोकशाही  राष्ट्र आहे. पण ह्या लोकशाहीमध्ये सामान्य माणसाला व गरीबाला न्याय मिळतो का? हा प्रमुख प्रश्न आहे. तो या निवडणुकीमध्ये अदृश्य होताना दिसतो.  श्रीमंत लोक आणि गुन्हेगारांच्या हातात राजकीय पक्ष अडकलेले आहेत.  आजच्या निवडणुकांसाठी प्रचंड पैसा लागतो.  म्हणून राजकीय पक्ष उद्योगपतीचे आणि माफियाचे काम करतात.  त्यांचे लोक पक्षात घेऊन आमदार, खासदार करतात.  श्रीमंतांच्या आणि माफियाच्या महत्वाकांक्षेचे प्रतिक लोकशाही झालेली आहे. त्याला बदलण्यासाठी एक नवीन लोकाभिमुख २१ व्या शतकातील लोकशाही निर्माण होण्याची गरज आहे.  इथे प्रत्येक नागरिकाला अनुभव मिळायला पाहिजे की हे राष्ट्र माझे आहे. या राष्ट्रावर मी राज्य करत आहे. असा अनुभव सर्वांना अनुभवायला मिळाल्याशिवाय लोकशाहीला काही अर्थ नाही.

                                                                                    लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

                                                                  वेबसाईट : www.sudhirsawant.com

                                                    मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS