राजकारणाची ऐसी तैसी-१०.१०.२०१९

२०१९ चे निवडणूक वर्ष हे राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचा व उपयोगीतेचा अंत ठरू शकेल. कारण पक्षाला अर्थच उरला नाही. एका पक्षाचे नेते दुसर्‍याच पक्षात दिसतात, तेथून ते तिसर्‍याच पक्षाकडे जातात. आजचा मुख्य पक्ष भाजप आहे. त्यांनी तत्वज्ञानाला तिलांजली दिली आणि घोडेबाजार मांडला. जिंकण्यासाठी वाटेल ते, असे म्हणत आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना लाथाडून, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे आणि कुणाचेही उमेदवार घेऊन निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचंड संख्येने भाजप-सेनेकडे धाव घेत आहेत. उदयन राजे तर आत्ताच निवडणूक जिंकले. अशी काय परिस्थिती आली की खासदारकीचा राजीनामा देऊन त्यांनी भाजप प्रवेश केला व आता पुन्हा निवडणुकीला उभे आहेत. पश्चिम महाराष्ट्र तर फुले-शाहू-आंबेडकर विचाराचा पाया. ज्यांनी अनेक वर्ष ह्या विचारांच्या नावावर सत्ता भोगली, ते आता पूर्ण विरोधी विचार घेऊन, तोच विचार गाडायला रणांगणात उतरले आहेत. हिंदुत्वाचे वस्त्र परिधान करताना, त्या असंख्य हिंदू शेतकऱ्याचे खून पडले, ते विसरून  केवळ सत्तेच्या मृगजळामागे धावत सुटले.
लोकशाहीमध्ये राजकीय संघटना किंवा पक्ष लोकांचे राज्य स्थापन करण्यासाठीचे एक माध्यम आहे. पण त्यासाठी पक्षांतर्गत लोकशाहीची सुद्धा तेवढीच गरज आहे. ह्यासाठी पक्ष चालवणारे लोक पक्षांतर्गत निवडून आले पाहिजेत, पण दुर्दैवाने सगळे पक्ष प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या झाल्या आहेत. यात पक्षांतर्गत कधीच चर्चा होत नाही. फक्त हुकूम चालतात. सर्व पक्षांच्या मालकांना आपल्या मनाविरुद्ध बोलणारी लोक नको असतात. त्यातून कर्तुत्ववान आणि विचारवंत कार्यकर्ते हे कुणालाच नको असतात. सगळ्यांना चमचे पाहिजे असतात आणि म्हणूनच अनेक वर्षाच्या या संस्कृतीने राजकीय पक्ष हे चमच्यांचे पक्ष झाले. परिणामत: राजकारणातून वैचारिक बैठक नष्ट झाली व बाजार भुलग्यांचे पक्ष झाले. राजकारणात सेटिंग करणार्‍यांचे महत्त्व वाढले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राजनैतिक संस्कृती ही चोरांची संस्कृती झाली आणि कुणाच्या शब्दाला किंमतच उरली नाही.
यामुळे निवडणुकीत सहज मोठे नेते व कार्यकर्ते निर्लज्जपणे एका पक्षातून दुसर्‍या पक्षात पळतात. त्याचबरोबर तिकीट मिळाले नाही तर प्रचंड बंडखोरी होते. यवतमाळमध्ये भाजपचे पालकमंत्री मदन येरावार विरोधात शिवसेनेचे संतोष ढवळे, मिरज येथील संतोष खाडे यांच्या विरोधात भाजपच्या शुभांगी देवमाने, बांद्रा पुर्व येथे आमदार तृप्ती सावंत अशा अनेक लोकांनी बंडखोरी केली आहे. सर्वात मोठी गंमत आहे की भाजप सेनेमध्ये युती झाली, पण कणकवली येथे भाजपचे नितेश राणे विरुद्ध शिवसेनेने अधिकृतपणे सतीश सावंतला तिकीट दिले आहे. त्याचबरोबर इतर दोन मतदार संघात देखील भाजपने शिवसेने विरुद्ध भाजपच्या उमेदवारांना उभे केले आहे. भाजपला तरी ही अवदसा का सुचली? नितेश राणेला उमेदवारी देताना जाणीवपूर्वक उद्धव ठाकरेला चिडवण्याचे काम का केले आणि राणेचे असे कुठले महत्त्व आहे की भाजपने उद्धव ठाकरेला अपमानित करून ही जागा दिली? शेवटी राणेचा एकच उमेदवार कोकणातून निवडून येत होता आणि आता देखील भाजपने दूसरा कुठलाही उमेदवार दिला असता तरी काय मोठा फरक पडणार होता? उलट सिंधुदुर्ग जिल्ह्यात युतीमध्ये बेबनाव झाला नसता तर सर्व जागा निवडून आल्या असत्या. या कारणास्तव एक चांगला पक्ष असण्याचा टेंभा मिरवणार्‍या भाजपचे खरे स्वरूप समोर आले आहे. शेवटी या अनिश्चतेमुळे युती होणार नाही, असे वातावरण सर्वत्र पोहचले. दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना सगळ्या मतदार संघात तयारी करायला सांगितली होती. परिणाम असा झाला की कार्यकर्त्यांनी प्रत्येक मतदार संघात तयारी केली आणि शेवटी हातात पडला भोपळा. लोकांसमोर झाली नाचक्की. साहजिकच अनेकांनी बंड केले.
इकडे काँग्रेसचा प्रकार तर अजबच आहे. भाजप सेनेला पर्याय देण्यासाठी एक महाआघाडी बनवण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. पण दोन्ही कम्युनिस्ट पक्षांना काँग्रेस नेत्यांनी जागाच सोडल्या नाहीत. तसेच शेतकरी कामगार पक्षाला देखील जागा सोडली नाही. सगळ्या पक्षांचा घात झाला आणि महाआघाडीचे महाबेदलीत परिवर्तन झाले. काँग्रेसचे नेते पूर्वीच्या थाटात वावरत होते. कार्यकर्त्यांना भेटायचे नाही. दिल्ली हाय कमांडमध्ये बसलेल्या नेत्यांना हाताशी धरून आपापल्या माणसांना तिकीट वाटण्याच काम करत होते. पक्ष जिंकण्याकडे कुणाचेच लक्ष दिसले नाही. अनेक लोक भाजप शिवसेनेमधून काँग्रेसकडे तिकीट मागत होते. पण कुणालाच पक्षात घेण्याचा प्रयत्न काँग्रेसचे नेते टाळत होते. कारण पक्षात मोठे नेते आले तर स्वत:ची जागा जाईल या भीतीने काँग्रेस नेते ग्रासले होते. ओसाड गावचा राजा बनण्याची मानसिकता स्पष्टपणे दिसली. दुसरीकडे काँग्रेसच्या सहयोगी पक्षांची तारांबळ उडाली आणि कुठेतरी उमेदवार उभे केले. शिवसेना-भाजपशी लढण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही. पक्षनिष्ठा ही नावापुरतीच राहिली आहे. स्वार्थ हे राजकारणाचे एकमेव उद्दीष्ट आहे. त्यागाची भूमिका ही राजकीय पक्षापासून कोसो दूर आहे आणि म्हणूनच सर्व पक्षांची आधोगती ठरलेली आहे.
सर्वच पक्ष नेतृत्वाच्या घोटाळ्यात अडकलेले आहेत. काँग्रेस पक्षाचा नेतृत्वातील घोळ चालूच आहे. राहुल गांधीने नेतृत्वातून माघार घेतल्यानंतर नवीन नेतृत्व पुढे आलेच नाही. त्याशिवाय राहुल गांधी प्रचारात कुठेपर्यंत भाग घेतील हे अजून स्पष्ट नाही. इकडे भाजपामध्ये फडणविसानी एकनाथ खडसे, विनोद तावडे यांची तिकेटे कापली व स्वत:ला स्पर्धक राहू नये म्हणून स्वत: ला निष्ठावंत नसणार्‍या कार्यकर्त्यांचा बळी घेतला व पक्ष पुर्णपणे आपल्या मुठीत ठेवण्यासाठी सर्वकाही केले. त्याचा परिणाम निवडणुकीत दिसणारच आहे. पण लांबच्या राजकारणात हे गटबाजीचे राजकारण भाजपला गोत्यात आणणारच आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीत अजित पवार शेती करायला निघाले, राजकारण सोडले, पण एका दिवसातच शेती सोडली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेतृत्वात संघर्ष उफाळून आला. शिवसेनेत तर आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्यासाठी पुढे सरसावले. ५ वर्षापूर्वी युतीतील मोठा पक्ष असल्याचे स्थान कमावले आता बरोबरीचे स्थानही मिळवता आले नाही. महाराष्ट्रात युतीचा फायदा शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त मिळत गेलेला आहे. त्यामुळे १९९५ युती शासनात मुख्यमंत्री शिवसेनेचा होता. पण गेल्या ५ वर्षात भाजपने शिवसेनेचे दमन केले. तसेच शिवसेनेत कुणालाही मोठा नेता करायचा नाही, हे धोरण स्पष्टपणे पुढे आले आहे. याला छगन भुजबळ आणि नारायण राणे यांची बंडखोरी कारणीभूत आहे. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी कठीण परिस्थितीत पक्षाला सांभाळले. पण शिवसेनेचे भाजपवरील प्रभुत्व राखता आले नाही. त्यामुळे फक्त ठाकरे घराण्याच्या ताब्यात ठेवण्यासाठी आदित्य ठाकरेला पुढे करण्यात आले आहे. ठाकरे कुटुंबातील पहिला ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. त्यापाठी खंबीर नेतृत्व निर्माण करण्याची भूमिका दिसते. पक्षातील नेत्यांवर वचक नसेल किंवा नेतृत्वाचा प्रभाव नसेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससारखे नेते कधी वाहून जातात हे कळणे कठीण आहे व पक्षातील कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे नेतृत्व नसेल तर पक्षाची वाताहत व्हायला वेळ लागत नाही. आदित्य ठाकरे, राहुल गांधी, प्रियांका गांधी, अजित पवार, सुप्रिया सुळे, यांची अशीच गत झाली आहे. नवीन नेतृत्व आल की जूने नेतृत्व असुरक्षित होते आणि नव्या नेतृत्वाविरोधात कटकारस्थान सुरू होते. काँग्रेसला सक्षम करण्याचा राहुल गांधीच्या प्रयत्नाला जुन्या नेतृत्वाने प्रचंड विरोध केला. याचे परिणाम आपल्याला दिसलेच आहेत. एकंदरीत सर्वच पक्षांना आपल्या अस्तित्वासाठी तरुण मतदारांना सामोरे जाण्याची आणि आधुनिक भारताचे जटिल प्रश्न टाळण्यासाठी कल्पक आणि कर्तुत्ववान नेतृत्वाची आणि कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यामुळेच सर्व पक्षांनी अशा कार्यकर्त्यांची हत्या करून चमच्यांची आणि बाजार भुलग्यांचे नेतृत्व सामान्य कार्यकर्त्यावर आणि लोकांवर सोपविण्याचे बंद केले पाहिजे. काँग्रेसने त्याचे परिणाम भोगले आहेत. आता शिवसेना आणि भाजपने त्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि स्वत:ला सावराव नाहीतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखी गत तुमची होईल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट: www.sudhirsawant.com
मोबा९९८७७१४९२९.

Please follow and like us:
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%90%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%88%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a5%a7%e0%a5%a6-%e0%a5%a7%e0%a5%a6/

ब्रिगेडियर सुधीर सावंत

  • Call – 998 771 4929

For Appointment – Pankaj Pawar (8806979848)

You can send him message by clicking here

शून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)

कृषी विज्ञान केंद्र, किर्लोस

केंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान

सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते.  .. Read More

छ शिवाजी म कृषी विद्यालय

छ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More

संयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ

या मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते

मुंबई फेस्टिव्हल फाउंडेशन

संस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे

बाल शिवाजी हायस्कूल

कणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष

मिलिटरी स्कूलअंबोली

Demo Content

Brig. Sudhir Sawant Says…

We, the soldiers of Indian Constitution, solemnly resolve to implement the constitution in letter and spirit.

We resolve to integrate at all cost, religious and ethnic groups to create true Indian society & to eliminate inequalities in Indian Society. It is imperative to defeat Sapnath & Nagnath of Indian politics & bring Swaraj of Common Man, similar to Swarajya of Chhatrapati Shivaji Maharaj

My Facebook Page

Unable to display Facebook posts.
Show error

Error: The 'manage_pages' permission must be granted before impersonating a user's page.
Type: OAuthException
Code: 190
Please refer to our Error Message Reference.
Copyright © 2020 Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)
RSS
Follow by Email
Facebook
Facebook
Google+
http://sudhirsawant.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%90%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A6-%E0%A5%A7%E0%A5%A6