राजकारणाची नविन दिशा_२९.९.२०२२

विधानसभेची निवडणूक झाली आणि राष्ट्रपती राजवट व कुठलेही सरकार बनले नाही, की बनवू दिले नाही.  अचानक ना भुतो, ना भविष्यतो देवेंद्र फडणवीस बरोबर अजित पवारांनी सरकार बनवले. त्यांना गद्दार ठरवण्यात आले. मग शरद पवारांनी त्यांनासन्मानाने परत सासरी बोलाविले आणि पलटवार करून शिवसेना काँग्रेसला आपल्या काखेत बांधले. शिवसेनेला जातीयवादी म्हणून हिणवले अनेक वर्ष. मग अशी अघोरी आघाडी करताना आपण जाहीर केलेली सर्व तत्त्व तुडवत आहोत अशी जाणीव कुणालाच झाली नाही का? की जनतेशी ज्यांनी तुम्हाला तुमच्या जाहीर तत्वामुळे मतदान केले तिला कुठल्या गद्दारीचे नाव बसते.

          खरेतर काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने निर्णायक आघाडी काँग्रेसवर घेतली आहे. शरद पवारांनी काँग्रेसला नामशेष करण्याची एकही संधि सोडली नाही. १९९९ पासून तोच प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यातून काँग्रेस समर्थकांचा पूर्ण नेतृत्व स्थापन करण्याचा व पुरोगामी  मतावर पूर्ण ताबा मिळवण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केला आहे. म्हणजेच मुस्लिम व अल्पसंख्याक लोकांचा आवाज फक्त राष्ट्रवादी आहे हे स्थापित करण्यात आता यशस्वी झाले आहेत.

‌          सोनिया गांधी अध्यक्ष झाल्या तेंव्हा मी त्यांचा सचिव झालो. पहिली गोष्ट त्यांना सांगितली की पवारसाहेब पुढच्या निवडणुकी आधी काँग्रेस तोडणार. त्यांचा विश्वास बसला नाही. पण मी तयारी केली. महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सोनियाजींची भेट करून दिली. त्यांना पुढील युद्धासाठी तयार केले. प्रतापराव भोसले यांना अध्यक्ष केले गेले. शरद पवार यांनी सोनिया गांधींवर परदेशी नागरिक असल्याचा दावा करून हल्ला चढवला. त्यावेळी मी एकट्यानेच त्यांना पक्षातून काढून टाका अशी जाहीर मागणी केली. काँग्रेस मुख्यालयाचा ताबा घेऊन अनेक ठिकाणी सुरक्षा दिली. पुढे कोणी येत नव्हते कारण सर्वांची समजूत होती की पुन्हा शरद पवार आपल्या डोक्यावर बसतील. त्यात राष्ट्रवादीची निर्मिती झाली. पृथ्वीराज चव्हाण एक महिन्यानंतर अवतरले.  पुढे जाऊन अजित पवारनी भाजपबरोबर सरकार बनवले. मग गद्दार कोण?

          ‌त्यानंतरच्या काळात आम्ही १९९९ साली, काँग्रेसला विजय मिळवून दिला. पण सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी बरोबर युती झाली आणि आमची मग पक्षाला अडचण झाली. निष्ठावंतांना दूर लोटण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी चालत आहे.  त्यात काँग्रेसचे नेतृत्व विकलांग करण्यात आले व शेवटी आता शरद पवार यांनी काँग्रेसची जागा घेतली. पुढील निवडणुकीत काँग्रेसला पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. आताचेकाँग्रेसचे अध्यक्ष हे भाजप मध्ये राहुन आले आहेत. मग कशाला दुसऱ्यांवर गद्दारीचा टप्पा मारता.

          आश्चर्याची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत काँग्रेस न लढताच हरली.  जिंकण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही.  लोकांनीच त्यांना ४४ जागा मिळवून दिल्या.  पुढच्या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांना काम करावे लागणार आहे.  शरद पवार हे अत्यंत चाणाक्ष आणि निडर नेतृत्व आहे.  राष्ट्रवादी पक्षातील अर्धे नेते भाजपात गेले. पण न डगमगता त्यांनी लोकांकडे न्याय मागितला.  त्यांच्या या आक्रमक भूमिकेला लोकांनी प्रतिसाद दिला.  म्हणूनच पराभव होऊन सुद्धा ते जिंकल्याचे वातावरण महाराष्ट्रात झाले.पुढची वाटचाल त्यांनी सर्व समावेशक पद्धतीने केली तर त्यांना भवितव्य चांगले आहे. पणतोड फोड त्यांचा नैसर्गिक स्वभाव आहे. म्हणून मला काही आशा वाटत नाही. 

          काँग्रेसच्या हायकमांडने चमच्यांना नेते म्हणून पुढे केले तर काँग्रेसचा नायनाट व्हायला लागला आहे. गेल्या १५ वर्षात काँग्रेसने निष्ठावंत कार्यकर्त्यांना ठोकारले. परिणामत: अनेक जिल्ह्यातून काँग्रेस नेस्तनाबूत झाले आहे. अनेक उमेदवारांच्या दारुण पराभवावरून स्पष्ट होते. आता काँग्रेस फुटीच्या मार्गावर आहे. अनेक निष्ठावंत दुसऱ्या पक्षाकडे आशेने बघत आहेत. त्यांना महाराष्ट्रामध्ये एकसंघ ठेवणारा नेता नाही.

        मागच्या  निवडणुकीचे निकाल असे लागले की प्रचंड गोंधळ निर्माण झाला व सत्ता कुणीही बनवू शकले नाही.  राष्ट्रपती शासन म्हणजे केंद्र सरकारचे शासन लागू झाले.  राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधी असतात हे माहीत नसण्याएवढे काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते दूधखुळे निश्चितच नाहीत.  त्यातल्या त्यात शरद पवार यांना परिणामाची पूर्ण जाणीव आहे.   शरद पवार यांनी भाजप सेनेच्या युतीला निर्णायकपणे संपवले.  त्यानंतर डाव त्यांच्या हातात आला.  शिवसेना पुर्णपणे त्यांच्यावर अवलंबून राहिली.   असे त्यांनी भासवले की शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा द्यायला तयार आहे, पण काँग्रेस विरोध करते म्हणून राष्ट्रवादीचा नाईलाज आहे.  दुसरीकडे काँग्रेसच्या गोटामध्ये गोंधळ निर्माण झाला.  आमदारांच्या शपथविधी शिवाय निवडणुका लागल्या तर आमदारांना धोका निर्माण होईल.  म्हणून बहुसंख्य काँग्रेसच्या आमदारांनी शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करण्याचा आग्रह धरला.  त्याचबरोबर राष्ट्रवादी मुख्यमंत्री असला तरच काँग्रेस सरकारला पाठिंबा देईल.  याचाच अर्थ शरद पवार यांना मुख्यमंत्री बनवावे.  हा या सगळ्या कारस्थानाचा मूळ हेतु  होता.  शिवसेना हे ऐकणार नाही म्हणून शिवसेनेला कात्रीत पकडून जास्तीत जास्त फायदा कसा करता येतो किंवा शिवेसेनेला सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद देऊन सुद्धा अल्पमतात कसे ठेवता येईल ही व्युह रचना करण्यात आली.  शिवसेनेमध्ये अशा खेळात अनुभवी लोकांची कमतरता आहे.  पण शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे  काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हातातले बाहुले बनण्याचा शिवसेनेने स्विकार केला. शरद पवार यांच्या मुत्सद्दीपणाचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.  फक्त ५५आमदार असताना सुद्धा सर्व पक्षांना झुलवत ठेऊन सत्तेची सूत्र आपल्या हातात ठेवली होती.   

          या सर्व खेळीला चोख उत्तर द्यायला भाजपचे नेते सक्षम आहेत.  राज्यपालांच्या अधिकारांमुळे निर्णयाचा हुकमी एक्का भाजपकडेच होता.  तसे पाहिले तर  राज्यपालांनी सरकार बनवण्याचे आमंत्रण पहिले भाजपला दिले होते.  भाजप सरकार बनवू शकले असते व विधानसभेत बहुमत प्रस्थापित करण्याची संधी त्यांना होती.  त्यासाठी त्यांना तोड फोडचे राजकारण करावे लागले असते.  त्यांनी अजित पवारांना बरोबर घेऊन तो प्रयोग केला.  तो फसल्यावर विरोधकांना सत्ता स्थापन करण्याची संधी देऊन उघडे पाडल्याचे राजकारण भाजपने केले आहे.त्यातून पुढे शिंदे सरकार स्थापन झाले व एक मजबूत धाडसी नेता मुख्यमंत्री झाला.  तळागाळातून पुढे आलेले नेते अत्यंत कर्त्यव्य दक्षतेने काम करत आहेत.  त्यांच्या पाठी प्रचंड जनसमुदाय ओढला जात आहे.  सामान्य माणसांना भेटून काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ते नावाजले आहेत.  राजकीय पक्षांनी वेगवेगळे डावपेच खेळून स्वत:चं लपवायचं आणि दुसऱ्यांना गद्दार म्हणायचं हे तंत्र सोडले पाहिजे व प्राप्त परिस्थितीला सामोरे जाऊन जनतेच्या कल्याणासाठी काम करावे असे स्पष्ट मत जनतेचे आहे.  हीच राजकारणाची नविन दिशा आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS