राष्ट्रीय ऐक्य_७.४.२०२२

युक्रेन मधील भारताची भूमिका सर्वश्रूत आहे. भारत तीव्रतेने युद्धाचा विरोधक आहे. भारताचा विश्वास आहे की, रक्त न सांडवता मार्ग काढता येतो.  असे श्री जयशंकर परराष्ट्र मंत्री यांनी लोकसभेमध्ये सांगितले. जे काय करायचं असेल त्यात सर्वात प्रथम राष्ट्रहित जोपासलेजाते. याच दृष्टिकोनातून भारताने युनोमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका सादर केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाची भूमिका म्हणजे एक नाटकच आहे. भारताने उघडपणे रशियाची बाजू घेतली आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी भारताची भूमिका लोकसभेमध्ये सादर केली.  त्यांनी स्पष्ट सांगितले की भारत हा रशियाबरोबर आपले चांगले संबंध ठेवणार हे राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. असे जरी असले तरी निरपराध नागरिकांची हत्या होत आहे.  त्याला भारताने विरोध केला आहे. ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

            रशियाची भागीदारी भारताला फार महत्त्वाची आहे.  कारण रशिया असा देश आहे, तिच्याबरोबर रुपयामध्ये व्यवहार होतात, डॉलरमध्ये होत नाहीत.  त्यामुळे लांबच्या पल्ल्याचा व्यापार भारताला अगदी स्वस्त पडतो. भारतीय सैन्याला लागणारे 60% हत्यार रशियाकडूनच येतात. अमेरिका किंवा इतर राष्ट्र आधुनिक हत्यार भारताला कधीच देत नाहीत. उलट पाकिस्तानला आधुनिक हत्यारे देतात. तेही डॉलर किंमतीवर देतात. त्यामुळे पश्चिम राष्ट्राकडून घेतलेली हत्यारेही अत्यंत महाग असतात. परराष्ट्रमंत्र्यांनी नमूद केलं की रुपयांमध्ये सर्व प्रकारचे व्यवहार अजून देखील चालू आहेत. अमेरिका आणि त्यांच्या सहयोगी देशांनी रशियावर पाबंदी घातल्यानंतर भारताने आपला व्यापार रशियाबरोबर चालू ठेवलेला आहे. त्याचा राग अमेरिकेला आलेलाच आहे.  तरीदेखील अमेरिका भारताच्या विरोधात काहीच करू शकत नाही. त्यामुळे भारताची आंतरीकशक्ती वाढलेली आहे. भारत हा अमेरिकेचा गुलाम नाही आणि आपली स्वतंत्र भूमिका आहे हे भारताने आता सिद्ध केलेले आहे. हत्यारा बरोबरच भारत मोठ्या प्रमाणात कोळसा आणि खते रशियाकडून आयात करते. जागतिकीकरण झालेल्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संबंध अत्यंत गुंतागुंतीचे झालेले आहेत. त्या परिस्थितीत इंधनाचा तुटवडा पडू नये याची खबरदारी भारत घेत आहे आणि म्हणूनच अमेरिकेच्या बंदीला धुडकावून भारत राष्ट्रहितासाठी रशियाकडे तेल, कोळसा, खते  व हत्यारे आयात करत राहिला आहे .

            भारतात आत्ताचे धोरण हे पहिल्यांदाच सर्वपक्षीय ऐक्यावर उभे राहिले आहे. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. नाहीतर अलीकडे प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसविले जाते. राजकीय पक्ष एकमेकाकडे शत्रू सारखे बघत राहिले.  पाकिस्तानचा असो, हत्यार खरेदीचा विषय असो, सर्जिकल स्ट्राइकचा विजय असो. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. इंदिरा गांधींच्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी व इतर नेते सुरक्षा या विषयावर एकसंघपणे काम करायचे. १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात अटलबिहारी वाजपेयीने इंदिरा गांधीला दुर्गाचा अवतार संबोधले होते. त्यामुळे राष्ट्र हित जोपासले जायचे. पण अलीकडे ती परंपरा नष्ट झाली होती. मात्र आता या युद्धामुळे भारताची परीक्षेची वेळ आली असताना सर्वपक्षीय लोकसभेमध्ये एकसंघपणे उभे राहिले आणि ही भूमिका भारताची जगजाहीर झाली आहे. मी सर्वपक्षीय ऐक यावर आधारित आहे. कारण त्याच्या बाजूने उभे राहणे म्हणजे अमेरिकेला विरोध करणे इतके स्पष्ट होते. त्याचबरोबर पहिल्यांदाच चीन, भारत आणि रशिया एकत्र आल्याचे दिसले. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक देश आपले राष्ट्रहीत जोपासतो आणि ह्या प्रक्रियेमध्ये शत्रू मित्र बनून जातो आणि मित्र शत्रू होऊन जातात. अशा परिस्थितीत जेव्हा स्थित्यंतराचे वेळ असतेव कुठलीतरी एक बाजू घ्यायची वेळ असते, त्यावेळी देशांतर्गत मतभेद असणे हे फार धोकादायक असते.  म्हणून आजच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाचे एक वळण घेत असताना सर्व पक्ष एकाच भूमिकेत उभे राहिले हे अत्यंत समाधानाची बाब आहे. तसेच राजकीय पोक्तपणाची जाणीव आहे. 

            हे सर्व होत असतानाच इडीने दुष्टपणे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आकसपूर्ण कारवाई केली. आरोप-प्रत्यारोपाच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एक व्हावे हा अत्यंत मोलाचा भाग आहे.  आंतरराष्ट्रीय भूमिकाही अशाच प्रकारची रहावी अशी भारतीय जनतेची इच्छा आहे. तसेच पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये जी अस्थिरता आली आहे, त्यामुळे त्याचा ताण भारतावर येत आहे. इमरान खान यांनी अमेरिकेच्या नाकावर टिच्चून रशियाला भेट दिली आणि अमेरिका भडकला.  इतके वर्ष अमेरिकेने पाकिस्तानचे सर्व चोचले पुरवले व पाकिस्तान अमेरिकेच्या विरोधात उभा राहतो की काय अशी शंका अमेरिकेला आली आणि म्हणून त्यांनी इमरान खानला सत्तेवरून उडवण्याचा डाव रचला व पाकिस्तानी सैन्यदेखील अमेरिकेच्या तालावर नाचू लागले व इम्रान खानचा पायउतार झाला. याच्या पाठीमागे डावपेच आहेत. पाकिस्तानचे राजकारण हे सैन्यदल ठरवते आणि सैन्यदल है अमेरिकेच्या आदेशावर चालते. त्यातूनच भारताविरोधात कट्टर भूमिका निर्माण होते. कारण भारत द्वेष हा पाकिस्तानी सैन्यात मुख्य अस्त्र आहे.  भारत द्वेष जर नसेल तर अमेरिकेच्या सैन्याला साथ देणारे पाकिस्तानी सैन्य याला काहीच अर्थ उरणार नाही. पाकिस्तानी सैन्यामध्ये आय.एस.आय. हे पूर्णपणे भारत द्वेषावर चालते. यातूनच दहशतवादी टोळ्यांना अनेक वर्षे पोसली गेली आहे. भारताविरोधात प्रत्यक्ष युद्ध न करता देखील भारतावर प्रचंड हल्ले चढवले जात आहेत. ह्याला एकच उत्तर आहे पाकिस्तानचे चार तुकडे करुनत्याचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. 

            केंव्हानकेव्हा तरी भारताला निर्णायक भूमिका घ्यावी लागणार आहे.पाकिस्तान भारत संघर्षामुळे व त्याच बरोबर चीनशी संघर्षामुळे भारताला प्रचंड प्रमाणात संरक्षण व्यवस्थेवर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भारताच्या सर्वांगीण विकासावर विपरीत परिणाम होत चाललेला आहे.   त्यामुळे आपली परराष्ट्र नीती हे संघर्ष मिटवण्यावर आधारित असले पाहिजे. त्यांना दोनच पर्याय आहेत. पहिला पर्याय पाकिस्तानच्या आक्रमक भूमिकेवर नियंत्रण करणे म्हणजे ISI चा दहशतवादी मुखवटा नष्ट करणे. आणि दूसरा पर्याय भारतातील अंतर्गत कलह निर्माण करण्याची क्षमता मिटवून टाकणे.  अंतर्गत कलह मिटवून टाकण्यासाठी जाती आणि धर्मावर जो द्वेष निर्माण करण्यात येत आहे तो राजकीय दृष्ट्या नष्ट करणे व एकीची भावना नागरिकांमध्ये निर्माण करून एकसंघपणे परकीय राष्ट्रांच्या कारस्थानाला मूठमाती देणे. हे शक्य होऊ शकते जर राजकीय पक्ष एकसंघ होऊन या दोन्ही गोष्टींना साध्य करतील.  आत्ताच्या सर्वपक्षीय भूमिकेचा विस्तार करून भारताचे सुरक्षा धोरण निर्माण करणे. 

            चीनच्याबाबत धोरण असताना राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींनी १९८० च्या दशकात चीनबरोबर संबंध सुधारण्याची जी भूमिका घेतली त्याची पूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे.  चीन बरोबर आपला वाद केवळ सीमा प्रश्नावर आहे. तो मिटवण्याची सर्वोतोपरी कृती झाली पाहिजे.  तसेच चीन आणि रशियामध्ये जो सिमावाद होता तो दोन्ही देशांनी मिटवला.  आणि आज एकत्र उभे राहण्याची भूमिका घेतली आहे.  त्याचप्रमाणे भारत–चीनने आपल्यामधील मतभेद मिटविण्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. हे दोन्ही देशाच्या हिताचे आहे.  तो साम्यजंसपणा दोन्ही देशांनी दाखवला आहे.  सीमेवर डोकलाम आणि गालवन या परिसरात संघर्ष झाला पण हत्याराचा उपयोग झाला नाही.  म्हणूनच पुढच्या काळामध्ये असे संघर्ष टाळून सीमाप्रश्न मिटवला पाहिजे.  कारण भारताला भविष्यात उंच उडी घ्यायची आहे.  त्यामुळे सर्व सर्व वादग्रस्त प्रश्न कमी करावे लागतील. म्हणूनच भावनिक प्रश्न निर्माण न करता राष्ट्र हिताच्या दृष्टीकोणातून व्यावहारिक प्रश्नावर भर दिली पाहिजे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS