राष्ट्रीय धोखा- 21 July 2017

२५ डिसेंबर २००३ ला रावळपिंडीत एक मिलेटरी काफिला चालला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ आपल्या वेगाने जाणाऱ्या मर्सिडिस गाडीतून पाहत होते. एक व्हॅन त्यांच्या काफिल्याकडे विरुद्ध दिशेने जोराने येत होती. एक पोलीस या गाडीला  थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याला चिरडून ती व्हॅन  काफिलाच्या शेवटच्या सुरक्षा गाडीला धडकली.  प्रचंड स्फोटात दोन्ही गाड्या उध्वस्त झाल्या.  मुशर्रफच्या चालकाने ब्रेक मारली.  मुशर्रफ ओरडले थांबू नको वेगाने जा. त्यांची गाडी १०० मीटर पुढे गेली, त्याच बरोबर दुसरी गाडी मुशर्रफच्या पाठीमागील गाडीवर धडकली व ४० किलो  बॉम्बचा स्फोट झाला.  मुशर्रफच्या गाडीचे ३ टायर उडाले.  वाहकाने एका टायरवरच गाडी पुढे नेली. मुशर्रफ वाचले.  ते म्हणाले, मृत्यू अत्यंत जवळ आला होता. तिसरा बॉम्बर वेळेवर पोहोचला नाही म्हणुन वाचलो. हा मुशर्रफवर २ आठवड्यातला दुसरा प्रयत्न होता. हे दोन्ही प्रयत्न  पाकिस्तानच्या  सैन्य मुख्यालयात  घडले. हा पाकिस्तान मधील सर्वात सुरक्षित भाग आहे. तिथे २  हल्ले व्हावेत ही प्रचंड आश्चर्याची गोष्ट होती. त्यातून स्पष्ट होते की पाकिस्तानने आपल्या धरतीमध्ये जे पेरले तेच उगवले.

आज जगात हिंसाचाराचा वणवा पेटला आहे. कुठलाही देश ह्या पासून मुक्त नाही. ह्या सर्वांचे मुळ हे पाकिस्तान आहे. आधुनिक दहशतवादचा उगम ह्याच शापित भूमीत झाला. पण त्याला जन्म देणारा  बाप अमेरिका आणि सौदी अरेबियाच आहे.  १९७९ ला तत्कालीन अफगाणिस्तानच्या कम्युनिस्ट सरकारने अफगाणी टोळ्यांचा बंड मोडून काढण्याची मोहीम सुरु केली. अफगाणिस्तानमध्ये अनेक  जमातीचे वेगवेगळ्या भागात राज्य आहे. त्यांनी केंद्र सरकारला कधीच जुमानले नाही. अफूच्या शेतीमुळे ह्या टोळ्या जगातील माफियाबरोबर जोडल्या गेल्या आणि टोळ्यांचे सरदार प्रचंड पैश्यांचे आणि हत्यारांचे मालक झाले. त्यातच अफगाणिस्तानधील कम्युनिस्ट सरकार अमेरिकेला सलत होते. त्याने पाकिस्तानला ह्या सरकारविरुद्ध उभे केले व अफगाण टोळ्यांना संघटीत केले. लगेच अफगाण सरकारने मदतीसाठी रशियन  सैन्याला पाचारण केले. त्याला शह देण्यासाठी अमेरिकेने सौदी अरेबियाला बरोबर घेऊन पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा पाया रोवला. जगभरातून दहशतवादी टोळ्या पाकिस्तानमध्ये गोळा केल्या.  इस्लामच्या नावावर अमेरिकेने ह्या टोळ्यां पेटवल्या व निधर्मी कम्युनिस्टाविरुद्ध  जिहाद पुकारला. अफगाणिस्तानला रशियन  सैन्यापासून मुक्त करण्यासाठी धर्मयुद्ध पेटले. हे युद्ध १९९१ पर्यंत चालले.  ह्या युद्धात जगातील अनेक राष्ट्रातील दहशतवादी टोळ्यांनी  भाग घेतला. त्यातच अल-कायदा,लष्कर- ए-तोयबा (LET), जम्मू काश्मिर लीब्र्सन फ्रंट (JKLF), जैश-ए-मोहंम्मद (JM), हिजबुल मुजाहिद्दीन (HM) अशा अनेक टोळ्या निर्माण झाल्या. पाकिस्तानमध्ये हत्यारांचा प्रचंड साठा सौदी अरेबियाच्या पैश्यावर अमेरिकेने जमा केला. अमेरिकन मिलेटरी उद्योग मालामाल झाला.

प्रथम दर्शनी हे धर्मयुद्ध अफगाणिस्तानमधील निधर्मी कामुनिस्ट रशियन सैन्याविरुद्ध होते. पण त्यातील दुसरे उद्दिष्ट भारताला रक्तबंबाळ करून भारताचे तुकडे पाडण्याचे  होते. अमेरिकेला आणि पाकिस्तानला १९७१च्या पराभवाचा सूड घ्यायचा होता. त्या काळात पंजाब, श्रीलंका, आसाम, काश्मिर पेटवण्यात आले भारतीय सैन्य त्या आगीमध्ये होरपळून निघाले. इथूनच भारतामध्ये दहशतवाद फोफावला. पण ह्यातून अमेरिका आणि युरोप देखील सुटले नाहीत.  पाकिस्तान तर जळतच आहे. ह्या सर्व हिंसाचाराचा परिणाम इसिसच्या जागतिक दहशतवादात दिसत आहे. त्यात भारताला प्रचंड धोका निर्माण झाला आहे. अलकायदा किंवा तालीबान यांनी भारताविरुद्ध कधीही लढण्याचा प्रयत्न केला नाही. पण इसिस अशी ज्वाला आहे की ती पूर्ण गैरमुस्लिम जमातींना आपले शत्रू समझते. भारताविरुद्ध लढणाऱ्या अनेक टोळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न इसिस करत आहे. अफगाणिस्तानमध्ये तर इसिसने तालिबान संपवण्याची मोहीम सुरु केली आहे. पाकिस्तानचा देखील ताबा  घेण्य्यास पुढे आला आहे. त्याचबरोबर भारतात सौदी अरेबियातून उगम झालेला वहाब्बी इस्लामचा प्रसार करण्यात येत आहे. भारतामध्ये तरुणांना आकर्षित करून त्यांना आतंकवादी बनवण्याचा सपाटा चालला आहे. ९९% मुस्लीम लोक ह्याला विरोध करत आहेत. पण देशात मुसलमानाविरुद्ध हिंदू आतंकवादी द्वेष भावना भडकावत आहेत. त्यामुळे सामान्य मुस्लिम दोन्हीकडून पिसला जात आहे. LET ने अनेक शहरात आपल्या वहाब्बी तुकड्या पेरल्या आहेत. हिंदू-मुस्लिम संघर्ष पेटवण्याचा हिंदू आणि LETसारखे आतंकवादी पाकिस्तानच्या पाठींब्यावर जोरात काम करत आहेत. LET इसिसबरोबर काम करत आहे. पूर्ण तयारी झाल्यावर दहशतवादाचा प्रचंड भडका उडवून देशाचे  अनेक तुकडे करण्याचा मनसुबा हाफिज सय्यदने जाहीर केला आहे.

पाकिस्तानचे भारताने १९७१ ला २ तुकडे केले तेव्हा भुत्तो म्हणाले होते की भारतावर आम्ही हजार वार करू, आम्ही गवत खाऊ पण अनुबॉम्ब तयार करू. सूड भावनेने पेटलेल्या पाकिस्तानी सैन्याला अमेरिका आणि सौदी अरेबियाने प्रचंड शक्ती दिली आहे. अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. पण पाकबाबतीत ते एकत्र आहेत. ह्या सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा  भारत शिकार झाला आहे. दुर्दैवाने भारताच्या राजकर्त्यांनी याला योग्यवेळी योग्य कृती न केल्यामुळे  भारत एकटा पडत आहे. चीनची समस्या आणखी गहन आहे. चीन-भारत हे स्वातंत्र्यानंतर मित्र झाले. भारत-चीन-रशिया जर एकत्र आले तर अमेरिकेचा पराभव निश्चित होता. म्हणून अमेरिकेने  भारतीय गुप्तहेर संघटनेला विकत घेतले. खोटे अहवाल देवून सीमावाद निर्माण केला.  राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची  कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले.

१९७७ ला राजीव गांधीनी आणि नंतर  वाजपेयींनी चीनबरोबर पुन्हा मैत्री करण्यास सुरुवात केली. सीमासंघर्ष  सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले. सीमावाद सोडला तर भारत चीनमध्ये  कुठलाच वाद नाही. मग पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे? तेच काम मनमोहन सिंघ व आता मोदी  करत आहेत. तेही अमेरिकेला खुश करण्यासाठी.  दक्षिण चीनी सागरात भारताचे काय काम आहे? तर आता अमेरिका, जपान व भारत एकत्र चीनविरुद्ध महाकाय सैनिकी नाविक सराव करत आहेत. त्यामुळे चीन आपल्याविरुद्ध पाकला आणखी मदत करत आहे.  सीमेवर भानगडी निर्माण करत आहे. ह्याचा सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. ज्या अमेरिकेने सातत्याने भारताला विकलांग करण्याचा प्रयत्न केला;त्या अमेरिकेसाठी चीनला अंगावर घेण्याचे काय कारण आहे?फक्त वृतपत्र आणि टी.व्ही.वर गर्जून  युद्ध जिंकता येत नाही. त्याला रक्त  द्यावे लागते. एका पाकला तुम्हाला नमवता येत नाही. मग गोऱ्या माणसाला  खुश करण्यासाठी तुम्ही देशाला संकटात का घालत आहात? त्यापेक्षा हिम्मत असेल तर,एकदाचा पाकचा कायमचा निकाल लावा आणि मग दुसरीकडे बघा.

——————————————————————————————————————–

 

टीप – भारता समोर काय आव्हाने आहेत आणि या दहशतवादाचा खरा चेहेरा काय आहे याचे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक विश्लेषण होणे गरजेचे आहे. दिसते ते कधीच खरे नसते व शब्द हा  केवळ वारा असतो. देश वरकरणी काय म्हणतात, याला काही अर्थ नसतो. त्यांच्या कृतीवरून त्यांचे मनसुबे ओळखले पाहिजेत. गुप्ततेच्या नावावर एक लोखंडी पडदा आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवहारावर सर्वच सरकार ओढतात. त्या पाठीमागील मानवतेला काळिमा लावणारे या प्रकारांचा पडदाफाश करण्याचा माझा प्रयत्न थर्ड आई द्वारा राहील .

 

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS