लष्कर – ए- तोयबाचे पाठीराखे
सौदी अरेबिया हा वहाब्बी इस्लामचा प्रसार करणारा देश आहे असे ब्रिटनने नुकतेच जाहीर केले. सौदी ब्रिटनमध्ये दहशतवाद पसरवत असल्याचे जॅक्सन अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. वहाब्बी इस्लाम भारत पाक मध्ये आक्रमकपणे लष्कर-ए-तोयबा प्रसार करत आहे. ही अत्यंत हिंस्र दहशतवादी टोळी फक्त भारताविरुद्ध लढण्यासाठी पाक आणि सौदीने निर्माण केल्याची मी मांडणी केली आहे. पुढील काळात इसिस लष्कर बरोबर भागीदारी करेल व भारतात प्रचंड हिंसाचार करेल असे भाकीत केले होते. अमेरिका या सर्व घडामोडीला छुपा पाठींबा देत राहिला आहे आणि देत राहील. मग तो आपला मित्र कसा हा प्रश्न मी अनेकदा उपस्थित केला आहे? दुसरीकडे आता इस्राईलला भेट देणारे पहिले पंतप्रधान म्हणून मोदिसाहेबांनी इतिहास घडवला. गेली ७० वर्ष वाजपेयी सकट भारताचा कुठलाही प्रधानमंत्री इस्राईलला गेला नाही. ते मूर्ख होते का? भारताच्या अनेक वर्षाच्या परराष्ट्र धोरणाला मोदिजी तिलांजली देत आहेत. देशाला दिशाहीन करीत आहेत.
भारताला धोका आपल्या अपरिपक्व नेतृत्वात आहे. नाहीतर भारतीय सैनिक आणि इस्राईल सैनिकांमध्ये काय फरक आहे. पाकिस्तानला आपण नष्ट करू शकत नाही केवळ कणाहीन नेतृत्वामुळे. मोदींना नवाज शरीफच्या वाढदिवसाला जाण्याची काय गरज होती? आणि इस्राईलला का गेले? ह्याचे कारण एकच आहे. इस्राईल अन पाकिस्तान अमेरिकेचे २ मुख्य चमचे आहेत. म्हणून अमेरिका भारतावर ह्या दोन देशाबरोबर मैत्री करण्यासाठी प्रचंड दबाव आणते. कारगिल युद्धात देखिल अमेरिकेने भारताला पाकवर हल्ला करू दिला नाही. मनमोहन सिंघ अर्थमंत्री झाल्यावर इस्राईलमध्ये भारताने दूतावास बनवला व आता मोदींना इस्राईलला भेट देण्यास भाग पाडले. इस्राईल हा भारताला अमेरिकन हत्यार विकणारा प्रमुख दलाल आहे. अमेरिका आणि इस्राईल दोघे दहशतवादाविरूद्ध लढण्याची भाषा करतात, पण पाकला समर्थन देतात आणि पाक हे मुख्य दहशतवादी राष्ट्र आहे.
पहिला पाकिस्तानी दहशतवादी गट १९८० ला अमेरिकेने पाक ISI ला निर्माण करायला लावला. त्यावेळेस,जगभरातून अफगाणिस्तानमधील कम्युनिस्ट रशियन सैन्याविरुद्ध लढण्यासाठी जिहादी गोळा झाले. आता जवळ जवळ २४ गट पाकमध्ये कार्यरत आहेत. त्यातील सर्वात भयानक गट म्हणजे लष्कर-ए-तोयबा. हा पूर्ण वाहब्बी/अहिले हदीत गट आहे. हे तालिबानच्या विरुद्ध आहेत. लष्कर हे पूर्णत: पाक isi ने बनवले. आज सुद्धा लाहोर जवळ मुर्दिके येथे मुक्तपणे वावरत आहे. तिथे त्यांचे हॉस्पिटल, विद्यापीठ, शाळा, कॉलेज आहे. तसेच पाकमध्ये अनेक ठिकाणी त्यांच्या शाळा कॉलेज आहेत. लष्कर-ए-तोयबाचा निर्माता हफ्फेझ सय्यद. याचे कुटूंब मूळ हिमाचल प्रदेश मधील. भारताच्या फाळणी वेळेस त्यांचे कुटुंबातील ३६ लोकांना हिंदू टोळ्यांनी कापून काढले. पंजाब विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर, सौदीमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. त्या दरम्यान तो वाहब्बी पंथात समाविष्ट झाला. १९८० च्या दशकात तो रशिया विरोधातील युद्धात शामिल झाला. तिथे तो ओसामा व त्याचा गुरु आझमचा शिष्य झाला. आजम हा पेशावरमध्ये जिहादचा मुख्य गुरु झाला. सौदी पैशावर त्याने पुर्ण अरब जगतातील युवक जिहादसाठी पेशावर येथे गोळा केले.
आझमने हाफिजला मरकज ए दवा अल इर्शाद (MDI) स्थापन करायला मदत केली. ही संघटना वाहब्बी /अहले हदीथ ह्या पंथाला संलग्न होती. त्याचे मुर्दीके मुख्यालयातील लक्ष इस्लामिक वातावरण निर्माण करणे हे होते. त्याने १९९० मध्ये लष्करची स्थापना अफगाणिस्तान मधील रशियन सैन्य गेल्यावर केली व भारताविरुद्ध जिहाद पुकारला. फेब्रु १९९३ मध्ये बाबरी मस्जिदनंतर त्याने पहिला हल्ला सैन्यावर केला. थोड्याच काळात त्यांने हजारो युवक प्रशिक्षित केले. भारतामध्ये देखिल वाहब्बी इस्लामचा प्रसार सुरु केला. ISI ने हाफिजला पुर्ण पाठींबा दिला व आज देखील लष्कर हे पाकचे प्रमुख लढाऊ सैन्य आहे. त्यांचे प्रशिक्षण केंद्र पाक व्याप्त काश्मिरमध्ये आहेत. आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त लोकांना त्यांनी प्रशिक्षित केले. त्यात अजमल कसाब व २६ नोव्हें. २००८ ला हल्ला करणारे सगळे दहशतवादी होते.
लष्करचे शिपाई हे सुशिक्षित बेरोजगार आहेत. लष्करने काश्मिरमध्ये हिंसाचाराला नविन वळण दिले भारताच्या सैन्यदलाविरुद्ध फिदायीन हल्ले सुरु केले. त्यामुळे हिंसाचारामध्ये प्रचंड वाढ झाली. लष्कर शहीद झालेल्या कुटुंबाची सगळी काळजी घेते. काश्मिरच नव्हे तर पुर्ण भारतावर कब्जा करायचा दावा करते व म्हणुनच मुंबई हल्ल्यापासून अनेक हल्ले भारतात केले आहेत. ३ डिसेंबर २००० ला लाल किल्ल्यावर हमला करून त्याने इतिहास घडवला. अमेरिकेवरील हल्ल्यानंतर, २००२ ला मुशर्रफने लष्करवर बंदी आणली. त्याच दरम्यान लष्करचे सगळे मुख्य अधिकारी काश्मिरमध्ये घुसले. पाकिस्तानमध्ये लष्करने जमाद्द उद दावा या नावाखाली काम करायला सुरुवात केली. पाक सरकारने थोडे दिवस हाफिजला तुरुंगात ठेवले पण नंतर सोडले व तो आता पुर्ण देशात फिरत आहे.
नव्याने आलेल्या माहितीनुसार आता लष्कर इसिस बरोबर काम करण्याची तयारी करत आहेत. त्याद्वारे भारतामधल्या तरुण मुलांना वाहब्बी इस्लाम स्विकारायला लाऊन जिहादमध्ये ओढण्याच काम चालू आहे. मुंबईपासून भारतातल्या अनेक शहरात अशा टोळ्या लष्करने बनवल्या आहेत. या गुप्त टोळ्या झपाट्याने वाढत आहेत. अनेक मुस्लिम कुटुंबाचे लोक सौदी अरबमध्ये नोकरी करत आहेत. त्यांना तिथे वाहब्बी इस्लाम स्विकारायला भाग पाडल जात आणि मग त्यातील निवडक लोकांना दहशतवादी बनविल जात. भारत सरकार व गुप्तहेर संघटना ह्या बाबतीत अनभिज्ञ आहेत. अनेक वर्ष झाकीर नाईकसारखे लोक व सौदी अरबमधले गब्बर लोक भारतात वाहब्बी इस्लामचा प्रसार करत आहेत त्या नावाखाली पैशाचे आमिष दाखवून लाखोच्या संख्येने वाहब्बी बनवले जात आहेत. जो वाहब्बी बनतो त्याला मग दहशतवादी बनवणे सोपे आहे. भारतातील मुस्लिम पंथ ह्या प्रक्रियेविरुद्ध बोलायला घाबरतात कारण त्यांना धमकी देण्यात येते.
अशा पद्धतीने लष्कर-ए-तोयबा भारतामध्ये लाखो दहशतवादी निर्माण करण्याचे काम करत आहे. जेणेकरून भारतात हिंदू-मुस्लिम यादवी युद्ध पेटवता येईल. तसेच लष्करचे नियोजन आहे कि, भारतीय सैन्य अन पोलीसांकडून मुसलमांनावर जास्तीत जास्त अत्याचार व्हावेत. त्याचबरोबर हिंदू संघटनाकडून देखील वाहब्बी इस्लामच्या विरोधातील मुसलमानांवर अत्याचार व्हावेत. जसे बीफ खाण्याच्या आरोपावरून भारतीय मुस्लिम मुलांना मारण्यात आले. गाय खाण्याच्या संशयावरून एका सैनिकांच्या वडिलांना मारण्यात आले, असे हिंदू अतेरेकी गट लष्करचे काम करत आहेत. कारण भारतात मुस्लिम सुरक्षित नाहीत, हे पाक आणि लष्करचे म्हणणे सिद्ध होते. जेणेकरून लष्करचे म्हणणे लोकांना पटावे व जास्तीत जास्त लोक वाहब्बी इस्लाममध्ये यावे.
म्हणून भारताला सर्वात मोठा धोका सौदी अरेबिया,पाकिस्तान यांच्या अघोरी युतीचा आहे. या दोन्ही राष्ट्रांना पुर्ण शक्ती देण्याचे काम अमेरिका करते. सौदी राजाचे संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेवर आहे आणि त्यांचे अंगरक्षक पकिस्तानी सैनिक आहेत. हे सगळे माहित असून मोदिसाहेब ट्रम्पला भेटताना ह्या वर एक शब्द ही बोलत नाही. मोदी साहेबांनी आपल्या राजवटीची सुरुवातच पाक पंतप्रधान नवाझ शरीफला शपथविधीला बोलावून केली. त्यांच्या वाढदिवसाला केक कापायला पाकिस्तानला गेले आणि इकडे सैनिकांच्या आणि पोलिसांच्या क्रूर हत्या वाढतच चालल्यात. कुठल्याही युद्धापेक्षा तिप्पट सैनिक दहशतवादात मारले गेले. भारताविरुद्ध ह्या सर्व कारस्थानाचा जनक अमेरिका आहे. तरी आम्ही स्वप्नविलासात रमलो आहोत. जर हिम्मत असेल तर मोदीसाहेब इंदिरा गांधी सारखे अमेरिकन राष्ट्रपतीला इशारा देवून आले पाहिजे होते कि पाकिस्तानचा नाद सोडा नाही तर आम्ही पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून गायब करून टाकू.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९