विचित्र सरकार _२८.११.२०१९

ठाकरे सरकार स्थापन झाले. निवडणुकी आधी असे सरकार महाराष्ट्राला मिळेल याची कल्पना कुणालाही नसेल. इंग्रजीत एक म्हण आहे.“Politics makes strange bed fellows” (राजकारण विचित्र लोकांना एकाच अंथरुणावर आणते). म्हणून ठाकरे सरकार एक विचित्र सरकार आले आहे. कुणी कल्पना करू शकत नव्हते कि हिंदुत्ववादी शिवसेना ही कॉंग्रेस बरोबर राज्य करू शकेल.  राजकारण हे तत्त्वहीन असल्याचे सिद्ध होते. पूर्वी तत्वावर आधारित पक्ष असायचे व त्यांची धोरणे देखिल त्या तत्त्वावर आधारीत असायची. पण १९९१ ला हे सगळं बदललं.  समाजवादी कॉंग्रेसने आपली अर्थनीती भांडवलशाहीवर आधारीत भाजप शिवसेनेशी सलग्न अर्थनीती स्विकारली. त्यामुळे तत्त्वहीन राजकारणाला अधिकृत सुरुवात झाली. त्या अगोदर कॉंग्रेस विरोधी राजकारणात भाजप, जनता दल, कम्युनिस्ट पक्ष एकत्र आले आणि १९८८ चे व्ही. पी. सिंग सरकार बनले. सरकार बनविण्यात भारतीय राजकारणात लवचिकता नेहमीच राहिली आहे. पण ती कॉंग्रेस विरोधात होती. आता काळ बदलला आहे व भाजप विरोधात राजकारण अस्तित्वात आले आहे. त्याचाच परिणाम म्हणजे ठाकरे सरकार. 

पण लोक म्हणत आहेत, “काही का असेना सरकार झाले आणि बरे झाले कि भाजपला धडा शिकवला”. रसातळाला गेलेली कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पुन्हा जिवंत झाली आणि जणू काही त्यांनी निवडणूक जिंकल्याचे वातावरण बनले.  हे विचित्र सरकार शक्य कसे झाले? मी त्याचे श्रेय उद्धव ठाकरेंना देईन. उद्धव ठाकरेंचा सौम्य स्वभाव, सर्वांशी चांगली वर्तणूक, विरोधकांमध्ये विश्वास निर्माण करते. जनतेमध्ये देखिल उद्धव ठाकरेंबद्दल मत चांगलेच आहे. शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्याला उद्धव ठाकरेंच व्यक्तिमत्व पुर्णपणे वेगळ आहे.  म्हणूनच कॉंग्रेसच्या आमदारांनी त्यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळात सामील होण्याचा आग्रह धरला.  कॉंग्रेसच्या पारंपारिक राजकारणाला कलाटणी देऊन कॉंग्रेस शिवसेनेबरोबर संसार करायला तयार होणे म्हणजे नवलच आहे. सोनिया गांधी आणि त्यांचे सल्लागार ह्या मिलनाला तयारच नव्हते. सर्वधर्मसमभाव सोडून जातीयवादाला जवळ करणे म्हणजे धर्मसंकटच होते. पण हाय कमांडला झुकावे लागले. सुरुवातीला बाहेरून पाठींबा देण्याचे ठरले होते. पण आमदारांचे आणि महाराष्ट्रातील नेत्यांचे मत वेगळे होते.  पाठिंबाच द्यायचा असेल तर सरकारमध्ये सामिल झाले पाहिजे.  हा आग्रह सर्वांचाच होता. हे स्विकारले नाहीतर कॉंग्रेस पक्ष फुटणार हे निश्चित होते. भाजप त्याचीच वाट बघत होता.

एकीकडे आड, शिवसेनेबरोबर गेल्यामुळे भारतात मुस्लिम मतदार कॉंग्रेसपासून दूर पळेल. आधीच विकलांग झालेल्या कॉंग्रेसवर नेस्तनाबूत होण्याची पाळी आली आहे. त्यात भाजपची सत्ता आली तर महाराष्ट्रात कॉंग्रेसचे भविष्य काही आशादायक नव्हते. खरेतर महाराष्ट्रात कॉंग्रेसही नेतृत्वहीन आहे. तिला परत उभी करायची क्षमता नेतृत्वात नाही. दुसरीकडे, कॉंग्रेसची जुनी खोड गेलेली नाही. हाय कमांड हा प्राणी असा वागतो जणू काही कॉंग्रेसकडे ३०० हून अधिक खासदार आहेत. निवडणुकीत, तिकिटाचा घोळ इतका केला कि अनेक शक्तिशाली लोकांना कॉंग्रेसने पक्षात घेण्याचा प्रयत्न केला नाहीच पण पक्षात कुणीच येऊ नये असा प्रयत्न झाला. विकलांग नेतृत्वाने लोकाभिमुख कार्यकर्त्याना दूर ठेवले आणि चमच्यांना पुढे केले. ज्यांच्याकडे एकही कार्यकर्ता नाही आणि कधीच निवडून येवू शकत नाहीत ते पदाधिकारी म्हणून वावरत आहेत. जोतिरदत्त शिंदिया सारख्या लोकांना महाराष्ट्रात प्रभारी करा ह्या मागणीला कोणी भिक घालत नाहीत.  दिल्लीचे नेते महाराष्ट्रातील नेत्यांना विचारतच नाहीत. त्यामुळेच कॉंग्रेस नेतृत्त्वहीन झाली.  नाहीतर आणखी ५० आमदार जिंकायला कॉंग्रेसला शक्य होते.  पण त्यांची जिंकायची मानसिकता नव्हती.  परिणामत: कॉंग्रेसची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे.  सरकारमध्ये सामील होऊन कॉंग्रेस आता थोडीतरी सावरली आहे.  या संधीचा फायदा घेऊन कॉंग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात चमच्यांना बाजूला करून सक्षम नेतृत्व उभे केले पाहिजे. 

निवडणुकी आधी राष्ट्रवादी कॉंग्रेसला भगदाड पडले होते.  उदयनराजे भोसले, मोहिते पाटील, शिवेंद्र भोसले, पदमसिंह पाटील आणि त्यांचा गट यांनी भाजपकडे पलायन केले होते.  त्यात विखे पाटील सकट अनेक लोक कॉंग्रेस सोडून भाजप गोटात सामील झाले होते.  असे वातावरण बनले की राष्ट्रवादी कॉंग्रेस संपत चालली आहे.  पण शरद पवार यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसला देखिल सावरले व परिस्थितीत सुधारणा केली.  म्हणूनच शिवसेना भाजपमध्ये बिघाड झाल्यावर विचित्र सरकार बनू शकले.  त्यातच युवराज अजित पवार यांच्या बंडोबाला थंडोबा करण्याची संधी शरद पवार यांना मिळाली.  मी याला संधी म्हणतो कारण हे विचित्र सरकार आपल्यामुळे आहे हे सांगण्याची संधी शरद पवार यांनी पुर्णपणे उचलली व शरद पवार यांची मलीन झालेली प्रतिमा उजळून आली.  राजकारणामध्ये शरद पवार यांचा हात धरणारा भारतात कुणीच नाही. हे त्यांनी सिद्ध केले.  चाणक्याचा वारसा सांगणारे मोदी / शहा हे निष्प्रभ झाले.  महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांनी चांगल्या वाईट घटना घडवल्या त्यामुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी यांना ४० आमदारांच्या खाली याव लागलं.  ही दुरगतीची परिसीमा होती.  विचित्र सरकारमुळे आपली प्रतिमा लोकाभिमुख करून स्वत:ला सावरले आहे.  पुढच्या काळात हे कसे वागतात त्यावरून त्यांचे भवितव्य ठरेल.  प्रामाणिकपणे भांडवलदाराला प्राधान्य देण्याचे सोडून शेतकरी आणि कामगारांना उभे करण्याचे काम शरद पवार यांनी करावे, अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे.

प्रचंड घमेंड, १०५ जागा जिंकुन देखिल भाजपचा पराभव झाला.  ‘मी पुन्हा येणार आणि बरोबर कुणालाच नाही घेणार’ या फडणविसाच्या नार्‍याने त्यांचा घात केला.  ‘दिल्लीत नरेंद्र आणि आणि महाराष्ट्रात देवेन्द्र’ ही मोदीची घोषणा पोकळ ठरली.  उद्धव ठाकरेच्या निर्धाराला त्यांनी कमी लेखले.  राजकारणात दुसर्‍याचा सन्मान केला पाहिजे, हे फडणविस विसरले.  दुसरीकडे भाजपातील विरोधकांना आणि नेत्यांना संपविण्याचे कुटील कारस्थान केले.  खडसे सारख्या नेत्याला कारण नसताना अपमानीत केले.  अंजली दमानियाला बरोबर घेऊन खडसेना बदनाम केले.  एवढेच नव्हे तर त्यांचे तिकीट नाकारले आणि मुलीलाही पाडले.  नितिन गडकरी सारख्या नेत्याला अपमानीत करायची एकही संधी सोडली नाही.  असे करून एक हाती सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न फडणविस आणि त्यांच्या गटांनी केला.  परिणामत: फडणविस यांचा वैयक्तिक पराभव झाला.  शिवसेनेला २ वर्ष सत्ता दिली असती आणि युती राखली असती तर फडणविसांचा प्रचंड विजय झाला असता.  पण फडणविसानी ती संधी घालवली.  राजकारणामध्ये पुन्हा संधी मिळत नाही.  फडणविस तुम्ही पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाही.

विचित्र परिस्थितीत विचित्र सरकार आज महाराष्ट्रभर राज्य करेल.  बर्‍याच उद्योगपतींनी हे सरकार बनविण्यासाठी प्रयत्न केले.  ते परत आपला हिस्सा मागणारच.  सामान्य माणस आणि कार्यकर्ते हे कुठल्याही पक्षाला मोठे करतात. पण सत्तेच्या राजकारणात ते नगण्य ठरतात.  गावात-खेड्यात राहणारा कार्यकर्ता आमदार बनतो.  पण नंतर पैशाची गुलामगिरी करतो.  या विचित्र समिकरणात सामान्य माणसे बाजूला पडतात.  ठाकरे सरकार त्याला अपवाद होईल का? कारण सरकार चालवताना पाठीमागे एक महा मुत्सद्दी रिमोट कंट्रोल निर्माण झाला आहे.  शरद पवार हे विध्वंसक राजकारणासाठी जाणले जातात.  म्हणून त्यांना सांभाळण्याची तारेवरची कसरत उद्धव ठाकरेंना करावी लागेल.  त्याचबरोबर कॉंग्रेसचे अस्तित्व नष्ट होऊ नये म्हणून कॉंग्रेसला काळजी घ्यावी लागेल.  शरद पवार यांनी त्यांच्या पुढे असलेल्या कॉंग्रेसला मागे आणले.  आपले पूर्ण प्रभुत्व महाराष्ट्रावर स्थापन करायला प्रत्येक पक्ष प्रयत्न करेलच. त्याला शरद पवार पण अपवाद नाही.  म्हणून सत्ता चालवत असताना अंतर्गत स्पर्धा ही वाढतच राहणार आहे  आणि मध्यावधी निवडणूक येण्याची शक्यता या परस्पराविरोधामध्ये दडलेली आहे.  ते काही असो पण कुठेतरी सामान्य जनतेला न्याय मिळेल अशी आशा करूया.   नविन सरकारला शुभेच्छा देऊया.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS