विषमुक्त अन्न – GMO हटाव_२०.५.२०२१

माणसाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाची गरज म्हणजे अन्न. अन्न चांगले नसले तर शरीर कमकुवत होते.  योग्य आणि गरजेचे पोषक अन्नातील तत्त्व न मिळाल्यामुळे वेगवेगळे आजार लवकर होतात.  शहरी जीवनात अनेक लोक वडापाव, मॅकडॉनल्ड बर्गरची संस्कृती वाढली आहे. फास्टफूड किंवा झटपट अन्न म्हणजे मृत्युला आमंत्रणच आहे.  अलीकडच्या शेती उत्पादनामध्ये नैसर्गिक बाबी मागे राहिल्या व रासायनिक बाबी पुढे आल्या.  त्याचे दुष्परिणाम आपण सर्व भोगत आहोत.  वाढत्या रसायनांच्या  उपयोगामुळे शरीरामध्ये विष भिनत चाललेले आहे. परिणमत: अनेक रोगांनी मानव त्रस्त झाला आहे. डायबिटीस, ब्लड प्रेशर, कॅन्सर, हृदयविकार असे अनेक रोग विषारी अन्नामुळे निर्माण झाले आहेत.

नव्याने कोरोनामुळे लाखो लोक मरण पावले आहेत आणि किती लोक मरणार आहेत याची आपल्याला माहिती नाही.  जगामध्ये कोरोनाची सर्वात जास्त लागण भारतात झाली आहे.   या विरुद्ध प्रतिकार करण्याची शक्ती मानवाच्या शरीरामधून नष्ट झाली आहे आणि म्हणून या नवीन रोगांचा परिणाम मानवी शरीरावर वाढत चाललेला आहे.  हे सर्व राहणीमानाचे रोग आहेत. अन्नामुळे शरीरामधील विटॅमीन ‘सी’, कॅल्शियम, हिमोग्लोबिन इ. कमी होत चालले आहे.   सूक्ष्म अन्नद्रव्य तर अदृश्यच झाली आहेत. म्हणून पैसा कितीही असो. लागतील ती अन्नद्रव्ये शरीरात जात नाहीत. यातला आदिवासी कुपोषणाचा भाग तर मोठ्या प्रमाणात आपल्या समोर आला आहे.  पण, सर्वच भारतीय जनता ही कुपोषित आहे.  अनेक रोग होतात त्यांना आपण औषधांनी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो. जसे डायबिटीस झाला तर त्याला औषध देऊन आपण त्याला नियंत्रित करतो. पण डायबीटीस पासून काही आपली सुटका होत नाही.  शरीर अशा रोगाने ग्रासल्यामुळे जीवन ही एक यातना होऊन जाते व आनंदी जीवनापासून आपण दूर जातो.

म्हणून शरीरामध्ये प्रतिकार शक्ती वाढवण्यावर भर दिला पाहिजे.  स्वतंत्र भारतामध्ये सुखसोयी वाढत गेल्या.  आमच्या लहानपणी एयर कंडीशन चुकूनच दिसायचा.  पण आता सर्व गाड्या एअरकंडीशन आहेत.  प्रत्येक घरामध्ये एअरकंडिशन लावलेले आहे.  एअर कंडीशनमुळे मानवावर विपरीत परिणाम होतोच, पण त्याहीपेक्षा भयानक परिणाम पर्यावरणावर होत चाललेला आहे. या सर्व गोष्टींकडे बघितल्यावर मानव प्रगती करतो, संशोधन करतो, तसेच वैज्ञानिक उपाय काढण्याचा प्रयत्न करतो.  यामुळे आयुष्य वाढत चाललेले आहे.  पण याचा दूरगामी विचार केला तर या सर्व संशोधनाचा आणि शास्त्राचा विपरीत परिणाम सुद्धा होत चाललेला आहे.  आयुष्य वाढले तरीही आजारामुळे आपले लांबलचक जीवन दुख:मय झाले आहे.   जगातला सर्वात मोठा शास्त्रीय शोध ‘बायो टेक्नॉलॉजी’.  ईश्वराने विश्वाला दिलेले साधन म्हणजे अॅटम किंवा अणू हा तोडता येत नाही. तोडला तर तो अॅटमबॉम्ब होतो. पूर्ण  जग हे अणूने बनलेले आहे.  तसेच आपल्या शरीरामध्ये जी काय गुणवत्ता आहे व दोष आहेत,  हे जीन मधून उपलब्ध होतात.  जेनेटिक प्रकार अनुवंशिकतेने माणसात येतात.  काळ्या रंगाच्या माणसांची मुले ही काळीच असतात.  जर केसाचा रंग लाल असेल, तर मुलाच्या केसाचा रंग सुद्धा लाल असण्याची शक्यता असते.  उंच माणसांची मुले उंच होतात. 

शास्त्रज्ञांनी अॅटम आणि जेनेटिक्स मध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला.  त्यात अमेरिकन शास्त्रज्ञांनी नवीन प्रकारचे पीक काढण्याचा प्रयत्न केला.  उदाहरणार्थ टोमॅटो मध्ये काही दोष असला तर टोमॅटोच्या जीन मधील दोष काढून एक नवीन टोमॅटो बनवला जातो.  बी.टी. कॉटनचे उदाहरण आहे.  कापसाला बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, कधी कधी या बोंड अळीमुळे संपूर्ण पिक उद्ध्वस्त होते. जीन मध्ये संशोधन करून यावर उपाय म्हणून  बी.टी. कॉटन हे बियाणे बनविण्यात आले. जेणेकरून या अळीचा उपद्रव नष्ट करण्यात आला, असे जाहीर झाले. सुरुवातीला हे बियाणे चांगले चालले पण गेल्या तीन-चार वर्षांमध्ये बीटी कॉटनच्या कापसाला मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव होऊ लागला व कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले.  त्यातच तणनाशक निर्माण करण्यात आले व वापरण्यात आले. त्यामुळे आणखी विपरीत परिणाम घडत आहेत.

ईश्वराने दिलेली व्यवस्था आपण बदलण्याचा प्रयत्न करतो.  पण मानव हा ईश्वर नव्हे, त्याला वाटेल ते करायला जमेल असे नाही. म्हणून ईश्वराने दिलेल्या व्यवस्थेमध्ये ढवळाढवळ करायला मानवाला कुठलाही अधिकार नाही.  उत्पादनाच्या व आरोग्याच्या नावाखाली बरेच काही बनवायचा प्रयत्न मानव करत आहे.  ते यशस्वी होत नाही. आता कल्पना करा की, माझ्या जीनमध्ये ढवळाढवळ करून माझ्यासारखा एक नवीन माणूस तयार करण्याचा प्रयत्न झाला.  जीन प्रक्रियेमध्ये बदल करून एक हजार सुधीर सावंत निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. असे हजार सुधीर सावंत तुम्ही पहिल्यांदा निर्माण केले तर कोण लंगडा असेल, कोण मुका असेल, कुणाचं कंबरडेच वाकलेल असेल.  पुढे तुम्ही आणखी हजार लोकांवर प्रयोग कराल, त्यातून असेच वेडेवाकडे सुधीर सावंत निर्माण होतील, अनेकदा प्रयोग केल्यानंतर कदाचित माझ्यासारखा एक सुधीर सावंत निर्माण होऊ शकेल.  त्याची ही मला खात्री नाही.  पण दरम्यानच्या काळात हजारो लोकांना तुम्ही वेडेवाकडे बनवाल तर ते मानवाच्या नितीमत्तेला धरून आहे का? हा प्रश्न आहे.  जी मानवाची गोष्ट आहे तीच कृषि आणि जनावरांची आहे. तुम्ही कुठल्याही जीवजंतुमध्ये बदल करू शकता, पण ते कितपत योग्य आहे, पोषक आहे हे कोण ठरवणार?  यामुळे जीनमध्ये ढवळाढवळ करून जीन बदलण्यास उभ्या जगाचा विरोध आहे.  असे जीनमध्ये ढवळाढवळ करून निर्माण केलेल्या पदार्थाला आपण ‘GMO’ म्हणतो.  म्हणजे ‘जेनेटिकली मॉडिफाइड ऑर्गनिझम’.

अमेरिकेतील कंपन्यांनी ते बनवल्यामुळे अमेरिकेत त्याला मान्यता आहे.  पण त्यात चूक झाल्यामुळे वेगळच काहीतरी निर्माण झाल्यावर अशा निर्मात्यांवर अमेरिकेतच कोट्यावधी रुपयाचा दंड बसलेला आहे.  भारतामध्ये अशा बियाण्याला बंदी आहे.  युरोपमध्ये ही बंदी आहे.  तरी देखील भारतात शेतकरी संघटनेचे नाव धारण करून काही लोक या महाकाय बहूराष्ट्रीय कंपनीची दलाली करत आहेत.  त्याचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारताच्या कायद्यांमध्ये बंदी असून देखील जर कोणी दलाल या विकृत तंत्राचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत असतील व कायदा मोडून त्याचा वापर करत असतील तर त्याला आम्ही कडाडून विरोध करणार.  गेल्या वर्षी काही लोकांनी बीटी वांगे व इतर पदार्थ वापरले आणि शेतकऱ्यांना विकले सुद्धा.  आम्ही फक्त त्यांना सल्ला दिला की असं करू नका, ज्या गोष्टीला भारतामध्ये विरोध आहे.  हा देशद्रोह आहे. तुम्हाला जर जी.एम.ओ.चा प्रसार करायचा असेल तर सरकारकडे मागणी करा आणि कायदेशीर परवानगी घ्या.  कायदा आपल्या हातात घ्यायचा अजिबात प्रयत्न करू नका आणि म्हणूनच मी हे प्रकरण कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांच्या निदर्शनास आणले आहे. तसेच आमचे सर्व सहकारी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हातील जिल्हा अधिकार्‍यांना निवेदन देणार आहेत. जर कोणी अशाप्रकारचं काम करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा.  

मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही महाराष्ट्रातील विविध भागात एच.टी.बी.टी. कापूस आणि बी.टी. वांगी याची बेकायदेशीर लागवड होतांना दिसत आहे. कोरोना आपत्तीचा फायदा घेऊन या बेकायदेशीर बियाणांची बांग्लादेश आणि इतर देशांतून भारतात आणून महाराष्ट्रात तस्करी मोठ्या प्रमाणावर होत आहे. हा सर्व व्यवहार बेकायदेशीर असल्याने कुठल्याच शेतकर्‍याला बियाण्याची पावती मिळत नाही, त्यामुळे त्यांची फसवणूक होत आहे.  जगातील बहुराष्ट्रीय कंपन्या व महाराष्ट्रातील एक मोठा व्यापारी गट जनुकीय परिवर्तीत बियाण्याचा प्रसार करण्यात अग्रेसर आहे. भरगोस उत्पादनाची लालूच दाखवून किंवा गावातील प्रतिष्ठित मंडळीकडून दबाव आणून या बेकायदेशीर बियाण्याची शेतकर्‍यांमार्फत लागवड केली जात आहे. शेतकर्‍यांना बियाणांच्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती नसल्याने त्यांची दिशाभूल होऊन ते यास बळी पडत आहेत.  GMO चा मोठा धोका आणि दुष्परिणाम हे सर्व जगाला माहिती आहे.  गुगलवर गेल्यावर याची पूर्ण माहिती आपल्याला मिळते. त्यातून अगदी स्पष्ट दिसत आहे की निसर्गाला धोक्यात टाकून नियमांची पायमल्ली होत आहे. 

            यंदा २०२०-२१ च्या हंगामात बी.टी.कापूस पिकविणार्‍या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. काहींना निम्मे तर काहींना त्याहीपेक्षा कमी उत्पादन मिळाले. तरीही महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेच्या संख्येत कमीच पण प्रभावशाली असलेला एक गट मान्यता नसलेल्या HTBT कापूस व अन्य GM बियाण्यांचे जाहीरपणे समर्थन व लागवड करतो, हे गट देशाविरुद्ध काम करत आहेत.  GMO लागवड ही बेकायदेशीर असल्याने व संभाव्य पर्यावरणीय धोके लक्षात घेऊन त्वरित उपाययोजना करून संबंधित बियाण्याचा साठा आणि लागवडीखालील असलेले क्षेत्र नष्ट करावे ही विनंती. सोबतच हे बेकायदेशीर आणि गैर काम करून शेतकर्‍यांची फसवणूक करणारे व निसर्गाला धोक्यात टाकणार्‍या गटाबद्दल योग्य कडक कारवाई करावी ही विनंती. अशा प्रकारचे आवाहन सर्व जिल्हाधिकार्‍यांना व पोलिस यंत्रणेला करत आहे.  या दृष्टांचा बीमोड करण्यासाठी सर्व शेतकर्‍यांनी आणि सैनिकांनी संघटित व्हावे व भारताला वाचवावे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS