विषमुक्त शेतीकडे वाटचाल _५.३.२०२०

ऑगस्ट २०१९ मध्ये Transformation of Indian Agriculture (भारतीय कृषिचे परिवर्तन) या समितीची बैठक झाली.  फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्या बैठकीत होते.  बैठकीत निर्णय झाला GM या पिकांबद्दल राज्यांची मते घेतली जातील व उत्पादन वाढीसाठी GM पिकांची उपयुक्तता पाहिली जाईल.   GM उद्योगांच्या स्वत:च्या माहितीप्रमाणे अनेक देशामध्ये GM  पिकाचे उत्पादन होत होते.  त्यांनी GM पिकांवर बंदी घातली आहे.  ३८ देशापैकी १४ देशांनी GM पिकांचे उत्पादन थांबवले आहे.  आता फक्त २४ देशामध्ये GM पिकांचे उत्पादन होते.  युरोप मध्ये GM पिकांवर बंदी आहे. 

            भारत सरकारच्या अहवालाप्रमाणे भारतात Bt Cotton (बीटी) चे उत्पादन २००४-०५ मध्ये अधिक वाढले.  यावेळी पूर्ण कापूस उत्पादनाच्या ६ टक्के कापूस हा Bt कॉटन होता.  त्यानंतर उत्पादनात कुठलीही वाढ झाली नाही.   बीटी कॉटन या पिकावर कीटकांचा उपद्रव होत नाही हा दावा फोल ठरला.  पण हे अपयश लपविण्याचा प्रयत्न GM उद्योगाचे दलाल करत आहेत.  स्वत:ला शेतकरी नेते म्हणवणारे लोक GM उद्योगाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहेत. GM कापूस आल्यापासुन शेतकरी आत्महत्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे.  आता अनेक शेतकरी बीटी कॉटन ऐवजी दुसर्‍या बियाणांची मागणी करत आहेत.  पण सरकारला बियाणे पुरविण्यात अपयश आले आहे. त्या संबंधात मी एका शिष्टमंडळसह राज्यपालांना भेटलो  आणि मागणी केली आहे की सर्व कुलगुरू आणि कृषि खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक लावण्यात यावी.  याबाबतीत योग्य निर्णय घ्यावा आणि केंद्र सरकारला आपले मत कळवावे. 

            बीटी कॉटनमुळे उत्पादन वाढले नाहीच पण सरकारी आकड्याप्रमाणे रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला.  त्यामुळे कापूस उत्पादनाचा खर्च वाढला.  २०१४-१५ मध्ये सरासरी प्रती हेक्टरी रु.६,३१८/- चे नुकसान झाले.  याचवेळी भारतात ९०% कापूस उत्पादन बीटी कॉटन वर अवलंबून होते.  हिच परिस्थिती अमेरिका आणि ब्राझीलमध्ये आहे.  बीटी कॉटन वापरणारे हे जगातील पहिले दोन देश आहेत.  कापूस उत्पादनात भारताचा नंबर ३५ वा आहे.  भारताच्या वर २४ देश आहेत.  जे बीटी कॉटनचा वापर करत नाहीत.  अमेरिकेमध्ये जिथे सर्वात जास्त GM पिकांचा वापर झाला तेथे देखील उत्पादनात वाढ झालेली नाही.  असा अमेरिकन सरकारचा अहवाल आहे. 

            बीटी कॉटनमुळे भारतातील कापूस उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले.  कारण सरकारने महाकाय बहुराष्ट्रीय उद्योगांच्या दबावाखाली भारतीय कापूस जातींना संपवून टाकले.  GM उद्योगावर संशोधन करणार्‍या संस्थामध्ये हे आढळून आले की बीटी कॉटनच्या शेतातील चाचणीमुळे देशी जातींमध्ये भेसळ झाली. म्हणून GM बियाण्यांची चाचणी देखील देशी बियाण्यांना घातक आहे.  अलिकडे निदर्शनास आले आहे की हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रात सोयाबीन आणि वांग्याची बेकायदेशीर चाचणी झाली.  चाचणी करणारे लोक अर्थात बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दलाल आहेत.  अशा चाचण्या सरकारने ताबडतोब थांबवल्या पाहिजेत.  अशा चाचण्यामुळे अनेक देश आपल्या शेती मालावर बंदी घालतील.  जसे २०१२ ला भारतीय बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली.   देशी बियाणे GM बियांण्यामुळे खराब होण्याचे परिणाम लांब पल्ल्याचे असतात.  जसे कॅनडाच्या गव्हावर जपान आणि द. कोरियाने बंदी घातली.  यात कॅनडाचे ७,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले.  GM बियाण्यामुळे होणारे नुकसान अनेक शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.  जसे बीटी कॉटन गाईना खायला दिल्यामुळे दूध उत्पादन देखील कमी झाले.  तज्ञांच्या समितीने सर्वोच्च न्यायालयात असा अहवाल सादर केला.  मुख्य भारतीय माहिती अधिकार्‍यांनी गेली ३ वर्षे GM मोहरीवरील माहिती दिली नाही.  या सर्व GM बियाण्यावरील परवानगी आणि प्रसारावर संसदीय समितीने ताषेरे ओढले आहेत आणि कायदा आणखी कडक करण्याची शिफारस केली आहे. 

            बीटी कॉटन वर उपाय म्हणून अमरावतीचे श्री. अभिजीत देशमुख आणि अनेक नैसर्गिक शेतकर्‍यांनी एक अभिनव उपक्रम केला आहे.  परभणी विद्यापीठाने निर्माण केलेले Non BT NH-635 चा वापर केला.  २८ मि.मी पासून ३४ मि.मी. पर्यन्त धाग्याचा तंतु असणारे बियाणे वापरल्यामुळे बाजारभावापेक्षा २०%जास्त भाव मिळाला.  त्यातून त्यांनी धागा बनवून कपडा बनवला त्या कपड्याची मागणी बाजारेपेठेमध्ये प्रचंड आहे.  त्यात त्यांनी सौर चरख्याचा वापर अत्यंत शिताफीने केला.   त्यांनी ११६ गावात महिला बचत गटांना बियाणे  देऊन सूत कातण्याचे काम सुद्धा या महिलांना दिले.   आता हा उपक्रम पूर्ण विदर्भात करण्यासाठी श्री. अभिजीत देशमुख आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत आहे.  असे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात करून शेतीचा कायापालट करण्यासाठी नैसर्गिक शेती करणारे शेतकरी आघाडीवर आहेत.  यात सर्व शेतकर्‍यांनी भाग घ्यावा.  मुंबई, पुणे, नागपूरमध्ये शेतीमाल विक्री करण्यासाठी शेतकरी मित्र गटांची स्थापना झाली आहे.  त्यांचे प्रदर्शन वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई येथे जगातील मोठ्या ग्राहकांची ग्राहकांबरोबर चर्चा झाली आहे.  अशाप्रकारे शेतकर्‍यांनी नैसर्गिक शेती झाले व  आधारित शेती करावी व शेतकरी मित्र गटांनी शेतीमाल शहरात विक्री करावा.  ही व्यवस्था स्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे.  त्या दिशेने आम्ही सर्व वाटचाल करत आहोत. 

            जगामध्ये ९६ देशात सोयाबीन उत्पादनात भारत ७३व्या क्रमांकावर आहे.  त्यात फक्त ८ देशामध्ये  GM बियाणे वापरले जाते. ५३ देशामध्ये साधारण बिया वापरुन GM पेक्षा जास्त उत्पादन होते.   पाश्चात्य तंत्रज्ञानानी भारतीय शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान केले आहे. पारंपारिक भारतीय शेती पद्धती ही पोषण आहाराच्या दृष्टीकोनातून नेहमीच यशस्वी राहिली आहे.  रासायनिक खते आणि कीटकनाशके भारतात येण्याअगोदर कॅन्सर, हृदयविकार, मधुमेह असे आजार क्वचितच दिसत होते.  पण रासायनिक खते आल्यापासुन त्यांचे प्रमाण प्रचंड वाढले.  जसेजसे कीटकनाशके वाढत गेली त्यांचा प्रभाव कमी होत गेला आणि कीटकनाशकांचे प्रमाण वाढवावे लागले.  त्यामुळे शेतीमध्ये रसायनाचे प्रमाण वाढत गेले.  सुरूवातीला हरितक्रांतीमध्ये उत्पादन वाढले, पण नंतर उत्पादन स्थिर झाले व आता उत्पादनात वाढ होण्याची शक्यता शून्य झाली आहे.  त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला वाढीव अन्नधान्य पुरविण्याचे उद्दीष्ट पुरे होऊ शकत नाही.  याला पर्याय म्हणून पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी निर्माण केलेले ‘नैसर्गिक शेती तंत्रज्ञान’ हे यशस्वी ठरत आहे.  त्याचप्रमाणे अनेक पर्यायी तंत्रज्ञान निर्माण झाले आहे.  भारत सरकार आणि राज्य सरकारने अशा तंत्रज्ञानाना चालना देऊन भारतीय शेतीला एक नवीन दिशा दिली आहे.   अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे व वाढत आहे.  उत्पादनाची मोठ्या प्रमाणात वाढ आणि विषमुक्त अन्न निर्मिती व पोषक आहाराला प्रचंड चालना मिळाली आहे. 

            भारत जगामध्ये नैसर्गिक शेतीचे केंद्र बनले पाहिजे.  नैसर्गिक शेती आणि GM शेती यात मेळ कधीच बसणार नाही.  त्याचबरोबर शेतमालाच्या निर्यातीवर विपरीत परिणाम होणार.  जगामध्ये आणि भारतात अनेक संशोधन झाले आहे.   रासायनिक खते आणि कीटकनाशके विरहित शेती उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढवू शकते हे सिद्ध झाले आहे. भारतातील अनेक राज्यामध्ये हे यशस्वी झाले आहे.  त्याचबरोबर भारतातील गुप्तहेर संघटनानी महाकाय बहुराष्ट्रीय कंपन्यांची चौकशी सुरू केली आहे.  त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे.  मी स्वत: नैसर्गिक शेतीचा शेतकरी म्हणून या चळवळीत भाग घेत आहे.  आमची ‘जय जवान… जय किसान संघटना’ ही चळवळ पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहे.  त्यात सर्व सहकार्य करतील ही अपेक्षा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS