मानवाच्या उत्क्रांतीमध्ये अनेक उलथापालथी झाल्या. सुरुवातीला रानटी मानव भूतलावर कुठेही फिरायचा, कुठेही राहायचा. उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे शिकार, मासे पकडणे, फळफळावळ गोळा करणे. जे मिळेल ते वाटून खाणे. दहा हजार वर्षापूर्वी कुठेतरी इराकच्या परिसरात कुणीतरी जमिनीवर बिया पेरल्या, त्यातून हजारो बिया निर्माण झाल्या, ही शेतीची सुरुवात. कृषि तंत्रज्ञानामुळे मानवाच्या जीवनात पहिली क्रांती झाली. म्हणजेच यामुळे भटका मानव एके ठिकाणी स्थिरावला, शेती करू लागला. कृषि संस्कृतीचा उगम झाला. त्यानंतर हजारो वर्षांनी म्हणजे सोळाव्या शतकात औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली व एक नवीन पहाट मानवाच्या जीवनात आली. १६४९ मध्ये या क्रांतीची सुरुवात झाली असे मी म्हणतो. कारण त्यावर्षी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज १९ वर्षाचे होते. लंडनच्या भर चौकात लोकसभेने इंग्लंडचा राजा चार्ल्स १ला फासावर लटकवले. मानवाच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा उलथापालथ झाली. नव्याने मानव आपले जीवन जगू लागला. त्यानंतर आज तेच घडत आहे. कॉम्प्युटरच्या निर्मितीमुळे मानवाच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा एक नवीन पहाट निर्माण झाली आहे. याला मी ज्ञान संस्कृती म्हणतो. आपले पूर्ण राहणीमान, राजकारण, उद्योग, कायदे, शिक्षण सर्व काही बदलत आहे. मानव कुणीकडे जाऊ लागला हे कळेनासे झाले. एकीकडे अंबानीसारखे लोक प्रचंड श्रीमंत झाले तर दुसरीकडे कष्टकरी शेतकरी, सैनिक हे सर्व अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत आहेत.
औद्योगिक संस्कृतीसंस्क्रूतीमध्ये राज्य करण्याची पद्धत राजेशाहीकडून लोकशाहीकडे परिवर्तीत होताना दिसते. पण खरी लोकशाही काय अजून आली नाही. कारण सामान्य माणसाला आज राज्यकारभारामध्ये काहीच महत्त्व नाही. याबाबत पुढच्या भागात चर्चा करू. औद्योगिक क्रांतीमध्ये पैशाला प्रचंड महत्त्व आले आहे. राजे भिकेकंगाल झाले व उद्योगपती प्रचंड श्रीमंत होत गेले, म्हणून उद्योगपतीने लोकशाहीचा पुरस्कार केला व राजेशाही उखडून टाकली. पण सत्तेची सर्व केंद्र ही श्रीमंतांनी आपल्या हातात ठेवली या प्रवृत्ती विरुद्ध बंड करण्यासाठी अलिकडच्या काळामध्ये लोक उठाव करू लागले आहेत. इंटरनेटचा उपयोग करून प्रभावीपणे लोकमत बदलण्यासाठी झटू लागले, म्हणून पुढील जग कसे होईल याचा अंदाज आपल्याला सर्वाना नाही. नवीन जग निर्माण होत आहे याचा सर्वांना फायदा कसा होईल? लोकांना संपन्नता कशी मिळेल? व आनंदमय जीवन कसे होईल? याचा विचार करणे आवश्यक आहे.
एक नवीन संस्कृती उदयास येत आहे. ही नवीन संस्कृती आपल्याबरोबर कुटुंबाची एक नवीन व्यवस्था आणत आहे. काम करण्याची पद्धत बदलली आहे. प्रेम करण्याची आणि जगण्याची सुद्धा पद्धत बदलली आहे. एक नवीन अर्थव्यवस्था, नवीन राजकीय व्यवस्था निर्माण होत आहे आणि त्याच बरोबर आपला जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन सुद्धा बदलत चाललेला आहे. जसे समलिंगी विवाह म्हणजे गुन्हा ठरवला जात असे, पण आता जगामध्ये अनेक ठिकाणी समलिंगी विवाह स्विकारले गेले आहेत. त्याचबरोबर ‘लिव्हिंग इन रिलेशन’ लग्न न करता नवरा-बायको सारखे एकत्र राहणे, ही आता बर्याच ठिकाणी एक पद्धत झाली आहे. लाखो लोक आता या नवीन जीवनपद्धतीच्या तालावर नाचू लागले आहेत. तर बरेच लोक भयभीत झाले आहेत आणि या बदलांच्या विरोधात प्रचंड प्रमाणात युद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. मृतावस्थेत जाणार्या जगाला पुन्हा जन्म देण्याचा प्रयत्न करत आहेत. या नवीन जगात तरुण मुलांनी आई-वडिलांना सोडून जाण्याची पद्धतच निर्माण झाली आहे. या नवीन संस्कृतीची पहाट एक वेगळेच जग आपल्यासमोर घेऊन येत आहे. कुठे ही नवीन संस्कृती येणार्या काळाबद्दल विचार करायला आपल्याला भाग पाडत आहे. जुन्या औद्योगिक संस्कृतीच्या नियमांचे आपण गुलाम झालो होतो. पण आता मानवाला पुढे प्रचंड झेप घ्यायची एक संधी निर्माण झाली आहे. पुढच्या काळात आणि आज देखील प्रचंड, अत्यंत खोलवर सामाजिक उलथापालथ होणार आहे. सर्व जीवनाचे पुर्नघटन होणार आहे, आपण सर्व एक नवीन संस्कृती जमिनीपासून वर बांधण्याच्या आता जवळ आलेले आहोत.
आत्तापर्यंत मानवाने कृषि आणि औद्योगिक संस्कृतीच्या दोन लाटेचा अनुभव घेतलेला आहे. पूर्वीच्या जीवन पद्धतीला नविन संस्कृती पालटून टाकत असे. एक नवीन जीवनाची पद्धत निर्माण करत असे, आता सुद्धा तिसर्या लाटेमध्ये हेच होणार आहे. इतिहासाला पाठीमागे टाकून एक अत्यंत नवीन जीवन पद्धती एक नवीन जग निर्माण करत आहे. कुटुंब व्यवस्थेला फाडून टाकत आहे. अर्थव्यवस्थेला उलथून टाकत आहे. राजकीय व्यवस्थेला जखडून टाकत आहे. सगळीकडे सगळं बदलत आहे. जुन्या सत्तेच्या संबंधाना, जुन्या सत्तेच्या घराणेशाहीला, मोठमोठ्या उच्चभ्रू समाजाला पूर्णपणे बदलून टाकणार आहे. प्रचंड सत्तेसाठी संघर्ष होणार आहे, ही नवीन संस्कृती नवीन तत्त्वावर उभी असणार आहे. नवीन कायदे असणार आहेत. नवीन नियम असणार आहेत.
राजकीय व्यवस्था तर बदलली जाणारच आहे, पण त्याचबरोबर समाज व्यवस्था ही बदलली जाणार आहे. राष्ट्राचे महत्त्व सुद्धा कमी होणार आहे. आताची बरबटलेली नोकरशाही पद्धती टिकू शकणार नाही. सरकारी साधी पद्धत जन्माला येणार आहे आणि ती निर्णायक असणार आहे. लोकशाहीचा प्रसार आणखी वाढणार आहे. ही संस्कृती जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणार आहे. जगाची विभागणी आता आर्थिक व्यवस्थेत झाली आहे. कुणी उत्पादन करतो आणि तर दूसरा फक्त करून खातो, हे बदलणार. कुणी श्रीमंत आणि कुणी गरीब ही दरी भरून निघणार आहे आणि समतेचा एक नवा अध्याय मानवाच्या जीवनामध्ये सुरू होणार आहे. असा बदल सहजासहजी होईल असं मला तरी वाटत नाही. पुढचा काळ हा संघर्षाचा आहे, कारण जुने लोक जी व्यवस्था आहे तिला धरून राहतात. ती राजकीय असो, आर्थिक असो किंवा सामाजिक असो, जुने लोक बदलाला विरोध करतात. जसे दुसऱ्या औद्योगिक संस्कृतीच्यावेळी राजे- राजवाड्यांनी बदलाला विरोध केला. इंग्लंडने अमेरिकेवरील आपले राज्य पुर्णपणे मजबूत करण्याचा प्रयत्न केला, त्याला अमेरिकन लोकांनी विरोध केला व अमेरिकन क्रांतीतून एक नविन राष्ट्र निर्माण झाले. त्याने राजेशाहीला उखडून काढले. अमेरिकेतील उद्योगपती आणि श्रीमंत शेतकर्यांनी लोकशाही सदृष्य राजवट निर्माण केली. फ्रान्समध्ये सुद्धा त्याचवेळी १७८९ मध्ये प्रचंड क्रांती झाली. संतापलेले लोक रस्त्यावर आले. आणि राजघराण्याला व पुजार्याला रस्त्यावर फरफटत नेऊन त्यांची मुंडकी छाटली. तसेच रशियामध्ये सुद्धा संतापलेल्या लोकांनी राजघराण्याला नष्ट करून टाकले व लोकांचे राज्य निर्माण केले.
लोकांनी जुनी व्यवस्था उलथून टाकली व नवीन व्यवस्था स्थापन केली. क्रांतीतून एक नविन संस्कृती जन्माला येत आहे. त्यामध्ये सर्वांना भरडुन निघावं लागेल. जर सत्ताधाऱ्यांनी आणि श्रीमंतांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर लोक उखडून टाकतील आणि नवीन समाज निर्माण होईल. अलिकडच्या काळात आपण बघितलं आहे की हिंसाचार प्रचंड वाढला आहे. अमेरिकेमध्ये गोरे काळ्यांना मारत आहेत. हिंदू-मुस्लिम दंगली पेटत आहेत. आतंकवाद या जमान्यात इतका वाढला की अमेरिकेच्या पेंटागॉनवर सुद्धा हल्ला केला. वर्ल्डट्रेड सेंटर सकट ४ विमानांनी ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेची शान उद्धवस्थ केली. जगातील सर्वात शक्तीशाली राष्ट्रावर एका गुहेत राहून ओसामा बिन लादेनने अमेरिकेच्या इज्जतीची चिरफाड केली. पुढे जाऊन लंडन, पॅरिस, मॅड्रिड अशा अनेक शहरात बिन लादेन आणि इसिस सारख्या टोळ्यांनी मोठे हल्ले केले. आपण त्यातून सुटलो नाही. मुंबईचे बॉम्बब्लास्ट, २००८ चा हल्ला, लोकसभेवरील हल्ला असे अनेक हल्ले जगभर होत आहेत. औद्योगिक संस्कृतीची व्यवस्था जर या हल्ल्यांकडे नेहमीप्रमाणे बघत आहे. या हल्ल्यांना दहशतवादी हल्ले असे संबोधित आहे. मग गडचिरोलीत, नागालँड, मिझोराम, मणीपुर मध्ये असे हल्ले का होत आहेत? दाऊद इब्राहीम सारख्या गुन्हेगारी टोळ्या जगावर राज्य का करत आहेत? याचे उत्तर सरळ आहे. या जगातील जनता संतप्त आहे आणि कुठले ना कुठले कारण घेऊन एकसंघ होत आहेत. कुणी हत्यारे हातात घेत आहे. कुणी आंदोलन करत आहेत. जसे काळ्या लोकांवरील हल्ल्याविरुद्ध जगातील सर्वच शहरामध्ये प्रचंड आंदोलन झाले आणि होत आहे. ही जी नविन संस्कृती निर्माण होत आहे त्यात जुनी व्यवस्था अडसर होत आहे. म्हणून लोकांना जो पर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत संघर्ष अटळ आहे. औद्योगिक संस्कृती निर्माण होताना जवळजवळ ५ कोटी लोक मारले गेले. त्याची पुनरावृती आता होऊ नये म्हणून जगातील व्यवस्थेने वेळीच बोध घ्यावा व होणार्या बदलाचे स्वागत करावे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.