शरद पवार यांचे राजकारण (भाग-१)_27.7.2023

शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक वर्ष चाललेले आहे.  त्यावेळी १९६७ साली मी लहान असताना त्यांची माझी भेट झाली होती. माझे वडील आमदार सिताराम सावंत हे त्यावेळेला निवडून आले होते आणि शरद पवार देखील पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आले होते.  त्यावेळी वडिलांसमवेत शरद पवार यांची भेट झाली होती.  अत्यंत तरुण आणि धडाडीचे नेतृत्व समोर आले होते. माझ्या पहिल्याच भेटीत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आणि आत्मीयता माझ्यात निर्माण झाली होती आणि हे महाराष्ट्राचं खरं नेतृत्व पुढच्या काळात होईल याची मला खात्री होती.  मी सैन्यात दाखल झाल्यामुळे माझा काही राजकारणाशी तसा काही संबंध आला नाही.  पण वडील राजकारणात असल्यामुळे सगळ्या राजकारणाशी तशी माहिती होती.  त्याच वेळेला शरद पवार यांनी काँग्रेस फोडून सरकार बनवलं होतं  आणि मुख्यमंत्री झाले होते.  त्यावेळी काँग्रेसमध्ये काही वाटलं असेल, पण विरोधी पक्षाला फार आनंद झाला होता.  शेतकरी कामगार पक्षाला तर सरकारमध्ये येण्याची ती पहिलीच संधी होती.  त्यामुळे बरेच लोक आनंदी होते तसेच बरेच लोक दुःखी सुद्धा होते.  याची मला कल्पना आहे.

शरद पवारनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजिर खुपसला म्हणून बरीच चर्चा झाली.  उलट हा वाक्यप्रचार शरद पवार यांच्या नावानेच सुरू झाला.  आता तर त्यांच्या सोबतच ती घटना घडली आता शरद पवार यांच्या पाठीत खंजिर खुपसला असे म्हणतात.  त्याचबरोबर आपण जे काही दूष्कर्म करतो त्याचे परिणाम या जन्मात भोगावे लागतात, असे म्हटले जाते.  त्यामुळे राजकारणात काय होईल आणि कसे होईल त्याची कल्पना करणं आता तरी फारच कठीण दिसते.  आज राजकरणात लोक  वेगवेगळी दिशा घेत आहेत. पक्ष फुटत आहेत, नवीन आघाडी आणि युती होत आहेत. त्यात पुढे काय होईल हे आता सांगता येत नाही.  पण शरद पवार काय करतील याचा अंदाज मला तरी करता येतो. पण अजित पवार यांनी नवीन राष्ट्रवादी पक्ष बनवला  आणि आपल्या काकांना दूर ठेवले.  आता पुढे एकत्र कधी होतील हे सांगता येत नाही.  मागील २०१९ च्या इलेक्शननंतर फडणवीस यांनी मुख्यमंत्री व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.  पण भाजप सरकार बनू शकले नाही.  तो प्रयत्न बारगळला. पुढे जाऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे सरकार बनवायचा प्रयत्न चालवला होता.  त्यावेळी शिवसेनेच्या अनेक लोकांना फोन करून सांगितले होते कि, ही आघाडी करू नका, नाहीतर तुमचा पक्ष संपेल.   पण सत्तेच्या हव्यासापोटी वाटेल ते करून तात्त्विकदृष्ट्या एकमेकाच्या विरोधात असणारे पक्ष आणि लोक एकत्र येऊन सरकार बनवले.  ते सरकार कसे चालले हे लोकांनी बघितलेच आहे. साहजिकच शिवसेनेतील अनेक लोकांची कुचंबना झाली.  किंबहुना ते सरकार योग्यपणे चालतच नव्हते व शरद पवार यांनी पूर्ण सरकारवर कब्जा केला होता.   परिणामत:  एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला व शिवसेना पक्ष घेऊन उद्धव ठाकरे पासून वेगळे झाले.   प्रचंड प्रमाणात शिवसैनिक त्यांच्याबरोबर आले व शिवसेना पक्ष ते व्यवस्थित चालवू लागले  व आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष व्यवस्थित चालू आहे.

असो, १९८८ ला एक तरुण मुख्यमंत्री शरद पवार झाल्यानंतर त्यांनी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला.  कदाचित ते पहिले राजकीय व्यक्ती होते, जे महाराष्ट्राच्या तळागाळात पोचले आणि तोच त्यांच्या यशाचा आधार आहे.  महाराष्ट्राला पूर्णपणे ओळखणारे आणि असंख्य कार्यकर्त्यांना नावाने संबोधणारे असा कोण दुसरा राजकीय नेता असल्याचं मला तरी आठवत नाही.  पण तरीही ते राजकारणात यशस्वी होऊ शकले नाहीत, याला कारण त्यांच्या स्वभाव आहे.  यात सर्वात मोठा विषय आहे त्यांची विश्वासार्हता.  कारण असे अनेक प्रसंग घडले आहेत की, त्यांनी शब्द दिला त्याच्या उलटच केलेले आहे आणि म्हणूनच ते लोकनेते बनू शकले नाहीत.  माझ्याबरोबर घडलेली घटना ही अत्यंत बोलकी आहे.  १९८० ला इंदिरा गांधी परत भारताच्या पंतप्रधान झाल्या.  शरद पवार यांचं मंत्रिमंडळ कोसळले.  मग त्यांनी आपला वेगळा पक्ष समाजवादी काँग्रेस स्थापन करून राजकारण चालू ठेवले.  विरोधी पक्षाचा त्यांनी विश्वास कमवला होता.  शेतकरी कामगार पक्ष हा पूर्णपणे त्यांच्या आहारी गेला होता.  हे पाहून आमचे वडील त्यावेळेला समाजवादी काँग्रेसमध्ये शरद पवार बरोबर दाखल झाले.  त्यावेळेला आमच्या वडिलांनी आपल्या पक्ष सोडून समाजवादी काँग्रेसमध्ये जाताना शरद पवारनी त्यांना विश्वास दिला होता की, ते हा पक्ष कायम चालवणार आणि काँग्रेसमध्ये पुन्हा सामील होणार नाहीत.  पण झालं उलटच.  १९८६ ला राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली ते पुन्हा काँग्रेसमध्ये सामील झाले.  हे ठीक आहे.  पण ज्या लोकांना त्यांनी विश्वास दिला होता की समाजवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष म्हणून आपण चालवायचा आणि सत्तेवर यायचे, त्यांचा विश्वासघात झाला.  असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर पडले.  त्यातले एक म्हणजे माझे वडील होते.  यशवंतराव चव्हाण हे शरद पवार यांचे गुरु मानले जातात.  ज्यावेळेला यशवंतराव पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळेला शरद पवार हे तसे गेले नाही आणि हा विश्वासघातच होता.  त्यामुळे लोकांचा विश्वास शरद पवार कमवू शकले नाहीत.

मी सैन्यात असलो तरी माझी निष्ठा ही शरद पवार यांच्यावर होती आणि म्हणूनच हे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी अचानक महाराष्ट्र सदन मध्ये असताना त्यांना भेटण्यासाठी वेळ मागितली. ती लगेच त्यांनी दिली आणि जवळजवळ एक तास त्यांच्याबरोबर बसण्याची संधी मला मिळाली.  त्यावेळेस मला त्यांनी राजकारणाविषयी बरेच प्रबोधन केले.  राजापूर मतदार संघात उभे राहण्याचे सुद्धा विचार त्यावेळेला बळवला आणि त्यांनी मला पूर्ण मार्गदर्शन केले.  त्यांच्या मतदारसंघाविषयी अभ्यास बघून मी चक्रावून गेलो.  कारण त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती होती.  कुठल्या तालुक्यात कुठल्या जाती आहे, तिथले प्रश्न काय आहेत, हे सर्व मला समजावून त्यांनी मला पुढच्या इलेक्शनमध्ये उभे राहण्याविषयी सुद्धा सूचित केले.  असो त्यानंतर मी दिल्लीत असल्यामुळे राजकीय लोकांशी संबंध येतच गेला आणि गुप्तहेर खात्यात असल्यामुळे राजीव गांधी यांच्याशी सुद्धा संबंध आला व हळूहळू पुढच्या इलेक्शन मध्ये लोकसभेसाठी उभे राहण्याचे ठरवले.  आणि ती तयारी सुद्धा केली. अचानक मध्यवर्ती इलेक्शन लागले, राजीव गांधीनी मला तिकीट द्यायचं ठरवलं. मी सैन्याच्या राजीनामा दिला आणि नंतर शरद पवार यांना भेटण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण त्यांनी एकदाही भेट घेतली नाही. उलट शरद पवार यांनी राजापुर मतदार संघातल्या सर्व कार्यकर्त्यांना बोलून घेतले. सगळ्या नेत्यांना जाऊन मी चुकीचा माणूस आहे आणि दंडवते यांचा एजंट आहे म्हणून प्रचार केला.  आणि मला तिकीट देऊ नये म्हणून आग्रह धरला.  पण सुदैवाने इतर लोकांनी,  शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले या लोकांनी माझ्यासाठी शब्द टाकला आणि राजीव गांधींनी मला तिकीट दिले. हा इतिहास आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की माझ्यासारख्या त्यांच्या कार्यकर्त्याच्या मुलाशी असा खेळ पवार साहेब खेळू शकतात आणि म्हणूनच त्यांची विश्वासार्हता राहिली नाहीये आणि ते लोकनेते बनू शकले नाही.

अर्थात त्यानंतर मी निवडून आलो.  शेवटच्या टप्प्यात श्री. शरद पवार यांनी प्रचार ही आमचा केला.  राजीव गांधीची हत्या झाल्यानंतर काँग्रेसला विजयाचे चिन्ह दिसू लागले. त्यानंतर लोकसभेत गेल्यावर आम्ही इमानी ईदबारे काम करू लागलो.  पण शरद पवार यांनी विरोधच केला.  त्यानंतर १९९५ च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचे अनेक उमेदवार आले, पण बहुमत मिळत नव्हते.  म्हणून तत्कालीन पंतप्रधान नरसिंहरावनी महाराष्ट्रातल्या सहा नेत्यांची बैठक बोलावली.  अनेक अपक्ष निवडून आल्यामुळे सरकार बनवायचं की नाही या विषयावर चर्चा झाली.  मी सरकार बनवू नये असे मत मांडले. बहुमत आपल्याला मिळालेले नाही,  आपण जर सरकार बनवलं तर शिवसेना महाराष्ट्राला आग लावेल.  पण शरद पवारांना सरकार बनवायला सांगायचा निर्णय झाला.  तो यशस्वी झाला नाही.  कारण अनेक काँग्रेसचे बंडखोर आमदार हे ठाकरे साहेबांकडे गेले.  ती गोष्ट मी नंतर सांगेन.  त्यानंतर मी सोनिया गांधीचा सचिव झालो.  त्या काळात शरद पवार यांनी सोनिया गांधीला परदेशी म्हणून जाहीर केलं आणि त्या पक्षाच्या अध्यक्ष होऊ शकत नाही असा प्रचार केल्यामुळे त्यांनी पक्ष तोडला. त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपची सत्ता होती आणि अशा परिस्थितीत पक्ष तोडणे म्हणजे पक्षावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याची त्यांनी चिंता केली नाही.  पण अर्थात काँग्रेसने आपली मूठ बांधली.  आम्ही त्यावेळेला जबरदस्त प्रचार केला.  जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये जाऊन  ८४ जागा आमदारकीच्या निवडून आल्या आणि सत्ता स्थापनेची वेळ आली.  पुन्हा राष्ट्रवादीबरोबर सत्ता स्थापन करण्यात आली.  (उर्वरित भाग -२)

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS