शापित पाकिस्तान ३ मे २०१७

पाकिस्तानी सैनिकांनी भारतावर परत सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैनिकांचे शीर कलम करून नेले. दुसरीकडे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले आणि रायफल नेल्या. दिवसेंदिवस पाकची आणि त्यांच्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची हालचाल वाढत चालली आहे.  मी २८ फेब्रुवारी २०१३ ला आर्मी सोडली तेव्हा शांत काश्मीर सोडून गेलो होतो. पण ह्यासाठी आम्ही १९९१ पासून काम केले होते. २५०० दहशतवाद्यांची मने जिंकून त्यांना भारतात परत आणले. पुढे कारगिल युद्धानंतर त्यांना सैन्यात घेतले. ८००० काश्मिरी युवक सैन्यात आणले. गाव गावातून १०-२० युवक  सैन्यात घेवून दहशतवाद्यांना गाव बंधू केले. काश्मिरात परत शांतता प्रस्थापित झाली. पर्यटन वाढले. काश्मिरी मुले भारतात अन्यत्र शिकू लागली. नोकरी करू लागली. निवडणूकी शांततेत झाल्या आणि मुफ्ती भाजप सरकार आले. ह्या सरकारने सैनिकांविरुद्ध भूमिका घ्यायला सुरु केले. आज भाजप मेहबुबाच्या अघोरी सरकारने पुन्हा दहशतवाद सुरु केला. कारण मेहबुबा पूर्णपणे दहशतवाद्यांच्यावर अवलंबून आहे. त्यात मोदी सरकारचे फोकनाड धोरण आहे. अमेरिकेचा पाकिस्तानला काश्मीरमध्ये पूर्ण पाठींबा आहे व पाकिस्तान त्याचा पूर्ण फायदा उचलते.

पाकिस्तान हे  जन्मताच शापित राष्ट्र आहे. कायदे  आझम  मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानचे संस्थापक. पंडित नेहरू आणि जिन्ना ब्रिटिशांच्या  सापळ्यात अडकले किंवा स्वत:ला अडकवून घेतले असेल, पण परिणाम हा देशाच्या फाळणीत झाला. म्हणूनच आज विकासापेक्षा आपण  सुरक्षेवर जास्त पैसा खर्च करत आहोत. पाकिस्तान तर भिके कंगाल झाला. फाळणीचा परिणाम कुणाच्या फायद्यात झाला? तर फक्त अमेरिकन मिलिटरी औद्योगिक समूहाच्या. त्यांना श्रीमंत करण्यासाठी आपण एकमेकाचे खून पाडत आहोत. आपण दोघेही गोऱ्यांच्या हातातले बाहुले आहोत. ते नाचवतात तसे आपण नाचतो.

पाकिस्तानची ४ मुख्य राज्य आहेत. पंजाबी लोकांचा पंजाब, सिंधींचा सिंध, बलुचीचा  बलुचिस्तान आणि पठाणांचा नॉर्थ वेस्ट फ्रोनटायर  प्रोवान्स  (NWFP).  अफगाण सीमेवर Federally Administered Tribal Area (FATA)  असा स्वतंत्र भाग आहे. सिंधमध्ये भारतीय मूळचे लोक मोठ्या प्रमाणात आहेत. पाकिस्तानी अत्याचाराला कंटाळून त्यांनी मोहजीर कौमी चळवळ उभी केली आहे.  पाकिस्तान हे लोकसंख्येत २० कोटी लोकांसह जगातील सहावे मोठे राष्ट्र आहे. पाकिस्तानला १०४६ किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे. म्हणून पाकिस्तानला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. चीनला पाकिस्तानचे ग्वादर बंदर पाहिजे, जेणेकरून पाक व्याप्त काश्मीरमधून तो अरबी समुद्रात पोहचू शकतो. तसा सिंकींग भागातून ग्वादर बंदरापर्यंत, गील्गीत मार्गे तो रस्ता काढतच आहे. अमेरिका, रशियाला, चीनला  मध्य आशिया, दक्षिण आशिया आणि पश्चिम आशिया वर नियंत्रण ठेवण्यास अरबी समुद्र आणि पाकिस्तान अत्यंत महत्वाचे आहे. अमेरिकेने पाकिस्तानचा उपयोग अफगाणिस्तान, इराण विरुद्ध पूर्णपणे केला आहे. त्याचबरोबर मध्य आशिया आणि रशिया विरुद्ध  पाकिस्तानला पूर्णपणे वापरले आहे. म्हणूनच सुरुवातीपासून अमेरिकेने पाकला आपले आघाडीचे राष्ट्र बनवले. १९७१ च्या भारत पाक युद्धात तर पाकच्या बाजूने भारतावर हल्ला करायला अमेरिकन सेना आली.

पाकिस्तान अधिकृतपणे १९५९ पासून अमेरिकेचा मिलिटरी भागीदार आहे. भारताला दाबण्यासाठीही अमेरिकेने पाकिस्तानचा अनेक वेळा वापर केला आहे. भविष्यात भारताने अमेरिकेची   कितीही चमचेगिरी केली तरी अमेरिका पाकच्या बाजूनेच राहणार. कारण अफगाणिस्तानच्या दहशतवादाला तोंड देण्यासाठी व इराण विरुद्ध वापरण्यासाठी पाकचे अमेरिकेला प्रचंड महत्व आहे. इस्राईल प्रमाणेच पाकिस्तान हे राष्ट्र  मुसलमानासाठी निर्माण करण्यात आले. पण इस्लाम तिला एकसंघ ठेवू शकला नाही. अनेक जाती, पंथामध्ये विभागल्यामुळे पाकिस्तान अंतर्गत कायम संघर्ष आहे. पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी तर पाकिस्तानला झिडकारले व बांग्लादेश निर्माण केला. आता सिंध, बलुच आणि पठाण तर पाक विरुद्ध बंड  करून उठले आहेत.  फाटातील आदिवासी पठाण तर रोजच पाक वर हल्ले करत आहेत. पाकचे सैन्य हे जगातील आठवे  मोठे सैन्य आहे.  पाक हा एकमेव इस्लामिक  अनुअस्त्रधारक देश आहे. म्हणूनच मुस्लीम जगतात विशेषत: सौदी अरेबियाला पाकिस्तान एक अत्यंत महत्वाचा देश वाटतो. पाकिस्तानी सैन्य हे सौदी अरेबियाच्या सैन्याला प्रशिक्षण देते आणि राज घराण्याचे संरक्षण देखील करते. स्वाभाविक सौदी अरेबिया हे भारताविरुद्ध पाकला नेहमीच मदत करत राहिले आहे.

जगात पाकिस्तानचे सैन्यदल ६,१७,०००  सैन्य आहे. त्याचबरोबर ५,१३,००० राखीव  सैन्य आहे. पाकचे  महत्वाचे निर्णय विशेषत: संरक्षण, परराष्ट्र धोरण  हे  सैन्यदल ठरवते. म्हणून ह्या विषयावर जगातील महत्वाची राष्ट्रे सैन्य दलाशीच बोलते. भारताला ती मुभा नाही. अमेरिकन CIA चा पूर्ण विळखा पाक सैन्यावर आहे. पाक हा पूर्णपणे अमेरीकेवर हत्यारांसाठी अवलंबून आहे. सैन्यदलातील सर्व अधिकाऱ्यांची मुले. अमेरिकेत शिकतात. सैन्याचे पाकवर नियंत्रण ठेवण्याचे साधन म्हणजे पाक ISI. सर्व राजकीय नेते ISI कडून आदेश घेतात. प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या ह्या ISI च्या आदेशावरून होतात. रावलपिंडी येथे एक सैनिकी जिल्हा निर्माण करण्यात आला आहे. तेथून सैन्यदल आपला आदेश देते.  ते सैन्यदलाचे मुख्यालय आहे.

पाकच्या अफगाणिस्तान सेमेवर चकमकी होत राहिल्या आहेत.  १९७९ ला रशियन सैन्य अफगाण कॅमुनिस्ट सरकारच्या विनंतीवरून अफगाणिस्तान मध्ये आले. त्याला विरोध म्हणून अमेरिकेने पाकमध्ये सौदी अराबियाच्या  मदतीने वहाब्बी कट्टरवादी टोळ्या जमवल्या. अफगाणिस्तान विरुद्ध जिहाद पुकारला. त्यावेळेपासून पाक हे जागतिक दहशतवादाचे केंद्र झाले. दहशतवादाला पैसा पुरविण्यासाठी ड्रग स्मगलिंग ह्या व्यवसायाला  अमेरिकन cia ने  चालना दिली. तेव्हापासून  आजपर्यंत ड्रग स्मगलिंग हा दहशतवादी  टोळ्यांचा धंदा झाला. १९९१ मध्ये रशियाचा  पराभव झाला तेथील कॅमुनिस्ट समर्थकांची कत्तल झाली व यादवी युद्ध थांबले. पण दुसरे यादवी युद्ध सुरु झाले. ते मात्र टोळी युद्ध होते.  पाकने त्यावेळी वेगवेगळ्या टोळ्यांना मदत केली.  ह्या सर्व बाबीत ISI ने अमेरिकन सौदी साहित्याचे, हत्यारांचे आणि पैशाचे व्यवस्थापन केले. १९८०च्य दशकातील हे अमेरिकन पाप आज पूर्ण जगाला भेडसावीत आहे.  ह्याच काळात अमेरिकेने पाकिस्तानमध्ये निर्माण केलेला ओसामा बिन लादेनने २००१ मध्ये अमेरिकेवर हल्ला केला. तेव्हाच प्रशिक्षित झालेले दहशतवादी आज इसिसचे नेतृत्व करत आहेत व जगभर आतंक पसरवित आहेत. हे सर्व थांबवायचे असेल तर पाकचे ४ तुकडे करावे लागतील. पाक मधील जनता तयार आहे. आतापर्यंत ७००० भारतीय सैनिक मारण्यात आले आणि हे असेच घडत राहणार. मोदिसाहेब नुसत्या वल्गना नको. हिंमत असेल तर पाकला नष्ट करा.

Please follow and like us:

Author: admin