शिवराज्याचा खरा इतिहास_१४.७.२०२२

शिक्षण व्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा इतिहास चुकूनच दिसतो. छत्रपती शिवराय, संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराराणी यांनी महाराष्ट्र निर्माण केला व  महाराष्ट्राला स्वतंत्र केले. १६८० साली  छत्रपती शिवराय गेल्यानंतर पुढचा  इतिहास महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेतून अदृश्य झाला आहे. खऱ्या अर्थाने तो इतिहास ही महाराष्ट्राची आणि  भारताची गौरवशाली परंपरा आहे. अनेक वर्ष परकीय आक्रमणांना तोंड देत असताना परकीय लोकांची गुलामी स्विकारून अनेक राजे राजवाडे सत्तेचा उपभोग घेत होते. हे राजे राजवाडे मोगल शक्ती समोर पूर्णपणे लोटांगण घालून मौजमजा करत होते. स्वातंत्र्याची ज्योत पेटवण्याचा विचार अतिशय दुर्मिळ होत होता. त्यातच शहाजी महाराज आणि जिजामाता यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व ते साकार करण्यासाठी शिवबांना तयार केले, हे कसे केले याचा इतिहास लोकांना माहीत नाही. शिवरायांनी मावळ्यांना जमा करून सैन्य बनवण्यास सुरुवात केली व गनिमी काव्याची निर्मिती केली. गनिमी कावा काय आहे हे कोणाला माहित नाही. शिवरायांनी असंख्य लढाया केल्या त्यांची इतिहासने दखल घेतली नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवराज्य काय आहे? आणि त्यांनी कुठल्या प्रकारचे राज्य निर्माण केले याची सविस्तर माहिती लोकांना दिली पाहिजे. कारण त्याचा आजच्या राज्याची सुद्धा संबंध आहे. शिवरायांचे नाव घेऊन अनेक लोक उत्सव साजरे करतात. पण त्यांनी प्रस्थापित केले एक शिवराज. ज्याच्यामध्ये सर्व धर्म समभाव, चतुरवर्णाचा अंत. फक्त स्त्रियांचाच नव्हे तर शत्रूच्या स्त्रियांचाही सन्मान केला. असा राजा तर जगाच्या इतिहासात कुठे झाला नाही. रयतेच राज्य म्हणजे शिवराज्य. हे कुठेतरी लोकशाहीला धरून बसते. त्याची कल्पना आपल्या मुलांना देण्यात येत नाही. म्हणून शिवरायांच्या नावे जे धर्मद्वेष आणि जातीद्वेष निर्माण करू पाहत आहेत त्यांना केवळ शिवरायांचा खरा इतिहास उत्तर देऊ शकतो. म्हणून आज जिवंत इतिहास लोकांसमोर आणणे हे अत्यंत गरजेचे आहे. हा खरा इतिहास बदलण्याचे कार्य अनेक लोकांनी केले आहे आणि आज देखील करत आहे. असे करून आपले राजकीय उद्देश साध्य करण्याचा प्रयत्न चालू आहे. बऱ्याच अंशी तो साध्य झाला आहे. म्हणून शिवरायांचा खरा इतिहास पुढे येणे गरजेचे आहे.

            सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की, शिवरायांचा दक्षिण दिग्विजय  कुणालाच माहीत नाही. शिवरायांनी दक्षिणेत जाऊन जिंजी आणि वेल्लोर असे किल्ले सर केले नसते. व दक्षिणेतल्या नायकांना स्वातंत्र्याची गोडी लावून दिली नसती तर मराठा साम्राज्य हे सुरू व्हायच्या आधीच नष्ट झाले असते. शिवरायांनी संभाजी महाराजांना सुद्धा आपल्या युद्धनीतीत, राजकीय नितीत, अर्थनीतीत पारंगत केले नसते तर त्यांना सुद्धा औरंगजेबाला छातीवर घेऊन नऊ वर्ष लढा देता आला नसता. पण संभाजी महाराजांचा थोर पराक्रम आणि त्यांची राजकारण करण्याची पद्धत, लोकांशी असलेल नातं व छत्रपती शिवरायांची न्यायनिष्ठा यावर कुठेच काही लिहिलेलं नाही. म्हणून कधी कधी वाटतं की महाराष्ट्रात इतके मोठे नेते होऊन गेले आणि आता सरकार देखील आहे त्याने शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आपल्या लोकांना परिचित करण्यासाठी का काम केले नाही?

            महाराष्ट्रातल्या इतिहासातील सर्वात दुःखद घटना म्हणजे संभाजी महाराजांचा केलेला खून. अत्यंत हाल हाल करून त्यांना मारण्यात आले. इथे माझ्या मुस्लिम बांधवांना मला विनंती करायची आहे की, औरंगजेब यांनी कुरांनावर शपथ घेतली आणि आपल्या बंधूंचा घात करून त्यांचा खून केला. आपल्या वडिलांना तुरुंगात डामले. रयतेला भीकेला लावलं. २७ वर्ष महाराष्ट्रावर कब्जा करण्यासाठी प्रचंड संघर्ष केला अतोनात लोकांचा छळ केला. स्वतःला भारताचा शहेनशहा म्हणत होता. पण महाराष्ट्रात आल्यावर त्याला दिल्ली पुन्हा कधीच दिसली नाही. अहमदनगरला राहून तो जर या देशाचे नेतृत्व करत असेल तर त्यांनी कशा प्रकारे नेतृत्व केले असेल याची कल्पना करावी. त्याच्या काळामध्ये जनतेचे फार हाल झाले ही वस्तुस्थिती आहे. म्हणून अशा पापी, क्रूर आणि कुरणवर शपथ घेऊन देखील आपल्या भावाची हत्या करणाऱ्याच्या नावासाठी कुणी देखील तडमडू नये.  मी पुरोगामी विचाराचा आहे आणि सर्व जाती धर्मामध्ये बंधुभाव असावा असे मानणारा आहे. म्हणून औरंगबाद चे नाव संभाजीनगर ठेवले असेल तर सर्वांनी स्विकारावे अशी माझी नम्र विनंती आहे.

            छत्रपती संभाजी महाराज यांनी औरंगजेबला महाराष्ट्रात पाय रोवू दिला नाही. संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केले हे सर्वांना प्रेरणादायी आहे. संभाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला. कुणाला काय करायचे हे कळेना. त्यात संभाजीराजांच्या पत्नी येसूबाई यांनी, राजाराम महाराजांना छत्रपती केले. यावेळी औरंगजेब रायगडाला वेडा घालण्याच्या तयारीत होता. सर्व राजघराणे एकाच ठिकाणी सापडू नये म्हणून येसूबाईंनी राजाराम महाराजांना गड उतार करून जिंजीकडे पाठवले. जिंजीचा किल्ला आज देखील चेन्नई आणि पॉंडिचेरीच्या जवळ दिमाखाने उभा आहे. शिवरायांनी चेन्नई पर्यंत आपले साम्राज्य वाढवले होते हे कुणालाच माहीत नाही. ते करत असताना त्यांची दूरदृष्टी होती. त्याना माहित होतं की औरंगजेब लाखोच सैन्य घेऊन महाराष्ट्रात येणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र पासून तामिळनाडू पर्यंत एक रणांगण तयार केले. औरंगजेबला खाली खेचून त्याच्या सैन्याचे तुकडे तुकडे केले. आणि एवढा भव्य प्रदेशावर याला युद्ध करायला लावले. घोडदालने वाटेत हल्ले करत शत्रूला बेजार केले.ज्यावेळेला राजाराम महाराज जिंजीला पोहोचले तिथे ते आठ वर्ष मोगलाच्या  भव्य सैन्याला लढत देत होते. आणि या परिसरात संताजी धनाजी मोगलाना अक्षरशः पळता भुई थोडी करत होते. या पराक्रमी मराठ्यांचा इतिहास माहीत असण्याची गरज सरकारला वाटत नाही का? जसे तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे हे पोवाड्यांचे विषय झाले. त्याच प्रमाणे संताजी, धनाजी, नेमाजी शिंदे यांचे नाव का येत नाही कारण अनेक  वीर पुरुषांचे वंश महाराष्ट्रात आजही वावरत आहेत. 

            गनिमी काव्याचे खरे दर्शन या काळात होते. अनेक मोगली बलाढ्य सेनानीना पळता भुई होईल असे कर्तुत्व केलेल्या संताजीचा इतिहास सगळ्यानाच कळला पाहिजे. संताजीचे शौर्य आणि त्यांचा खून होणे ही महाराष्ट्राच्या इतिहासाची अत्यंत दुर्दैवी घटना आहे. त्याचा इतिहास, त्यांचे शौर्य अत्यंत प्रेरणादायक असताना ते आपल्या मुलांना काही कळू नये ही खबरदारी कुणी घेतली? राजाराम महाराज गेल्यानंतर एक पंचवीस वर्षाची विधवा स्त्री ताराराणी घोड्यावर बसून तलवार घेऊन थेट औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करणारी योद्धा या जगात कुठे झाली नाही. पण तिचे नाव इतिहासातून पुसून टाकण्यात आलेले आहे. अशी क्रूर चेष्टा फक्त भारतात घडू शकते. हा प्रश्न लोकसभेत पूर्ण खासदारांना मी विचारला होता. भारतीय स्त्री आब्ला नाही, पण तिला संधी देण्यात येत नाही. म्हणून त्यांना सैन्यात घेतले पाहिजे अशी मागणी मी केली होती. तेव्हा सर्वांनी पाठिंबा दिला. १९९२ पासून मुली सैन्यात येवू लागल्या. त्यातील एक पूनम सावंत माझ्या गावातील होती. ताराराणीने कशी हाल हाल करून औरंगजेबची दयनीय स्थिती केली आणि त्याला महाराष्ट्रातच कसा गाडला ही रोमांचकारी घटना गुप्त का ठेण्यात आली आहे. हा सर्व इतिहास भारताला  प्रेरणा देणारा आहे. पूर्ण भारताच्या इतिहासातील गौरवशाली इतिहास लपवून शिवराज्याला नगण्य गणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला आहे. ह्या दुष्ट कारस्थानाला गाडून टाकू. शिवराज्य हा आपला आदर्श ठेवून तसाच महाराष्ट्र निर्माण करू ही जिद्द बाळगून माझ्या मावळ्यांनो संघर्ष करा.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS