शिवराय आणि लोकशाही_१६.२.२०२३

छत्रपती शिवरायांचा काळ हा सरंजामदारीचा होता. शिवराय सुद्धा त्यातीलच एक भाग होते. पण शिवरायांना रयतेचा राजाचा किताब मिळाला. लोकांमध्ये व लोकांच्या हृदयामध्ये त्यांना एक असे स्थान मिळाले, जे देशात कुणालाच मिळाले नाही. आज साडेतीनशे वर्षे झाल्यानंतर सुद्धा शिवराय लोकांच्या मनामध्ये ठसले आहेत, हृदयामध्ये कोरलेले आहेत. आज देखील आमचे जवान शत्रूवर हल्ला करताना शेवटचे दोनशे मीटरवर जातात, तेव्हा त्यांच्याबरोबर कोणीच नसते, कुठलाच आधार नसतो आणि समोर मृत्यू असतो. शत्रूच्या मशीनगणच्या गोळ्या अंगावर झेलत शेवटचे दोनशे मीटर जेव्हा हल्ला करतात, तेव्हा ती युद्ध गर्जना बरोबर असते “बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय!” शिवरायांची आठवण करत शिवरायांच्या प्रेरणेने रणांगणात उतरणारे आज देखील जवान आपले प्राण आपल्या देशासाठी देत आहेत आणि शिवरायांच्या काळात देखील अनेकांनी हसत हसत आपले प्राण शिवरायांसाठी आणि स्वराज्यासाठी दिले. काही गद्दार मराठे होतेच, पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्त हजारो पटीने शिवराय भक्त होते. ते शिवराय गेल्यानंतर सुद्धा सत्तावीस वर्ष लढले. छत्रपती संभाजी, छत्रपती राजाराम महाराज आणि ताराराणी यांनी २७ वर्ष औरंगजेब जो जगातील सर्वात बलाढ्य सम्राट होता, त्याच्याबरोबर निकराची झुंज दिली आणि मराठा साम्राज्य आबादित ठेवले. एवढेच नव्हे पूर्ण भारतावर सत्ता गाजवणारे मराठे शिवरायांनी निर्माण केले. शिवरायांनी औरंगजेबाबरोबर युद्धाची तयारी आपण हयात असतानाच केली. आपण गेल्यानंतर सुद्धा हे स्वराज्य टिकले पाहिजे म्हणून त्यांनी अशी काही युद्धनीती बनवली. औरंगजेबसाठी सापळा रचला की शेवटी त्याला आपले प्राण या मातीतच महाराष्ट्रातच सोडावे लागले.
अशी कोणती जादू होती? अशी कोणती शक्ती होती? जिने स्वराज्य बनवलं आणि आबादही ठेवले. आणि पूर्ण भारतावर राज्य करण्याची प्रेरणा आणि ताकद निर्माण केली. त्याचे एकच कारण आहे की लोकांना शिवराय आणि त्याच्यानंतरचे शिवरायांचे कुटुंब हे आपले वाटत होतं, हे राज्य आपलं वाटत होतं. त्याच्या पूर्वी जमीनदारी होती, जी सरंजामशाही होती ती लोकांना आपलीशी वाटत नव्हती. सरदार आणि जमीनदारांचा लोकांशी जरी थेट संबंध होता. तरीही तो संबंध जुलमाचा होता, जबरदस्तीचा होता, प्रेमाचा नव्हता. शेतकऱ्यांनी आयुष्यभर राबत रहावे, कष्ट करावे आणि त्यांचे उत्पादन मात्र तो जमीनदार पळवून नेत होता. शेतकऱ्याला मृत्यूच्या खाईमध्ये सतत जगावे लागत होते. पण शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले, स्वराज्य निर्माण केले. त्यांनी प्रत्येक माणसाला सुरक्षा दिली, त्यांनी प्रत्येक माणसाला सन्मान दिला, राजासाठी, स्वराज्यसाठी मर मिटण्याची भावना त्यांच्या हृदयात निर्माण केली आणि सरते शेवटी एका छोट्या राज्याची निर्मिती करता करता राज्याचा विस्तार होत गेला आणि अटकेपार झेंडा लागला.
रयतेचे राज्य म्हणजे आधुनिक लोकशाही. आज राजासाठी मर मिटण्याची भावना निर्माण का होत नाही? लोकशाही असून देखील लोकांना आपले राज्य का वाटत नाही? त्याचे कारण म्हणजे राजामध्ये आणि जनतेमध्ये संबंध राहिला नाही. लोकांना न्याय मिळत नाही, लोकांना सन्मान मिळत नाही. या लोकशाहीतले अधिकारी प्रशासन हे लोकांना कस्पटासारखे समजतात. लोकांना लुबाडण्याची भूमिका आज देखील तितकीच जागृत आहे, जशी त्या काळामध्ये मोगलाई मध्ये होती.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपतींचे आणि आजच्या लोकशाहीची सांगड घालता येणार नाही. १६४९ साली इंग्लंडमध्ये क्रांती झाली. लोकसभेच्या सैन्याने इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याचा युद्धामध्ये पराभव केला. त्याला कैद केलं आणि त्याला लंडनमध्ये फाशीवर चढवले. शिवरायांनी याचा रास्त अभ्यास केला असणार कारण इंग्रजांनी या घटनेबद्दल शिवरायांना सांगितलेच असणार. म्हणून शिवरायांना त्या काळात सरंजामदारी विरोधात उभे राहणारी जनता दिसली असणार. त्यामुळे शिवरायांनी स्वराज्यातील राजे राजवाडे नष्ट केले व एक लोकशाहीभिमुख असे राज्य निर्माण केले असे म्हटले तर काय चुकीचे होणार नाही. सरंजामदारी ही त्याकाळची राज्य करण्याची पद्धत होती. जिथे राजा आपल्या सरदारांना वतन द्यायचा आणि त्या वतनावर हुकूमत त्या जागीरदाराची चालायची. ती अत्याचारीच असायची, हुकुमशाहीच असायची. न्यायाचे राज्य अजिबात नव्हते. सरंजामदारीच्या व जागीरदाराच्या मर्जीप्रमाणे राज्य चालत होते. कायदे कानून काहीच नव्हते. त्या काळात एका घटनेने हे सर्व बदलून टाकले. रांजाच्या पाटलांनी एका सामान्य मुलीवर बलात्कार केला. ही तर त्या राज्याची प्रथा परंपराच होती. जमीनदार मनात येईल त्या मुलीवर अत्याचार करायचे, त्यामुळे जनता त्रस्त होती. नेहमीच भयभीत असायची. कुणी राजा, कोणी जागीरदार किंवा त्यांचे नोकर येऊन आपल्यावर बलात्कार तरी करणार नाही? या भावनेत भयभित होते. शिवरायांनी ज्या वेळेला रांजाच्या पाटलाला मुसक्या बांधून समोर आणले. जिजामाताची आज्ञा प्रमाण मानून रांजाच्या पाटलाचा चौरंग केला. अशा घटना काही वैयक्तिक नसतात. या घटनांचा परिणाम पूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगभर झाला. त्यावेळेला महाराजांची कीर्ती फोफावत गेली. जनतेला हा सुखद धक्का होता. कुठलाही हुकूमशा वाटेल ते करू शकतो या भूमिकेला छेद पडला आणि हळूहळू महाराष्ट्रातील जनता भयमुक्त व्हायला लागली. जसजसे शिवरायाची ताकद वाढत गेली, तसतसे जनतेला शिवरायांच्या स्वराज्याचे रयतेच्या राज्याचे परिणाम बघायला मिळाले आणि त्यातूनच निर्माण झाली स्वराज्याची आस, स्वराज्य टिकवण्यासाठी लढण्याची जिद्द.
हुकूमशाहीची जबरदस्तीची राज्य करण्याची पद्धत बदलू लागली आणि जनतेला न्याय मिळू शकतो हा विश्वास लोकांमध्ये निर्माण होऊ लागला. त्यातच शिवरायांनी आणखी एक धक्का दिला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता येणार नाही, असा आदेश शिवरायांनी काढला. त्यापूर्वी शेतकऱ्यांचा अनुभव असा होता की प्रचंड मोठे घोडदळ यायचे आणि ते शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचा नाश करायची. कारण उर्मटपणा, दादागिरी, माफियागिरी ही त्या काळात ही प्रचंड होती. आज देखील अर्धा भारत गुंडांच्या ताब्यात आहे. १९९३ च्या दंगलीनंतर निर्माण झालेल्या व्होरा समितीने म्हटलेच आहे. आज भारतावर राज्य माफिया, भ्रष्ट राज्यकर्ते आणि भ्रष्ट नोकरशाही यांचे आहे. ही एक पर्यायी गुंडांची राज्यव्यवस्था चालू आहे. त्याला उत्तर एकच आहे, शिवरायांनी चौरंग केले तसेच चौरंग ह्या गुंडांचे, बदमाशांचे केले पाहिजे. तरच रयतेला वाटू लागेल की हे राज्य माझे आहे. जमीनदारी तर शिवरायांनी नष्ट केली, पण त्याबरोबरच एक पर्यायी शासन आणि प्रशासन व्यवस्था निर्माण केली. अष्टप्रधान मंडळ प्रस्थापित करून एक आधुनिक प्रशासन व्यवस्था काम करू लागली. ती आज देखील जिवंत आहे. यालाच तर आपण लोकशाही म्हणतो. म्हणून त्यावेळी शिवरायांनी जी व्यवस्था निर्माण केली ती लोकशाहीच्या तत्त्वावर उभी राहिली. शब्दछल करायचं झालं तर आपण काही बोलू शकतो. पण लोकांवर होणारा परिणाम हा बोलका असतो. शिवरायांनी न्यायाधीश नेमले होते, त्यामुळे कुणाला वाटेल ते करायला मोकळीक नव्हती. सर्वांना कायद्या प्रमाणेच वागावे लागायचे आणि वागले नाही तर कठोर शिक्षा केली जायची. शिवरायांची राज्यव्यवस्था ही काही आजच्या लोकशाहीच्या मूर्त स्वरूपात जरी नसली तरी ती जनतेच्या उपयोगाची होती. आत्ताची लोकशाही ही जनतेच्या दृष्टीने उपयोगाची राहिली नाही.
सिंहगड सर करताना तानाजी मालुसरे गरजले होते कि, “आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे” असे म्हणत सर्व काही सोडून जिद्दीने त्यांनी कोंडाणा सर केला, त्यात आपले प्राण दिले. म्हणूनच शिवरायांनी म्हटलं की “गड आला पण सिंह गेला”. शिवराय पन्हाळ्यावर वेढ्यात अडकले असता शिवा काशिद पुढे आला आणि शत्रूच्या तावडीत सापडला. त्याने देखील आपले प्राण शिवरायांसाठी दिले. बाजीप्रभू आणि ३०० मावळ्यांनी घोडखिंड लढवली आणि आपले प्राण हसत हसत शिवरायांसाठी दिले. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा सुरक्षित राहिला पाहिजे, या तत्त्वावर मावळे लढले. बर हा असीम त्याग केवळ शिवरायांसाठीच मावळ्यांनी केला नाही. तर शिवराय गेल्यानंतरही जे या शिवराज्याचे प्रमुख राहिले त्यांच्यासाठी केला. संताजी-धनाजी यांनी तर उघड मैदानात औरंगजेब मरेपर्यंत शत्रूला हैराण करून सोडले. ज्यांनी राजाराम महाराजांना आश्रय दिला त्या दक्षिणेतल्या राणी चंदाम्मा, नायकांनी स्वराज्यासाठी लढा दिला. चित्रदुर्गच्या लढाईत जवळ जवळ पन्नास हजार मोघलांना संताजीने नेस्तनाबूत केले. अशाप्रकारे शिवराय गेल्यानंतरही त्यांची स्मृती, त्यांची प्रेरणा हृदयाशी बाळगून १६८० ते १७०७ मराठे लढले आणि स्वराज्य कायम केले. औरंगजेबला याच मातीत गाडून टाकले. या देशात अनेक राजे होऊन गेले, पण शिवरायांसारखा कुणीही नव्हता. त्याचप्रमाणे आजचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे हे तळागाळातील जावळीच्या घनदाट खोऱ्यातून निर्माण झाले. त्यांनाही शिवरायांची स्मृती प्रेरणा देत राहील, अशी आशा आम्ही बाळगतो.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS