श्रीमंतांची अर्थनीती  (भाग – १)_१२.५.२०२२

जगाच्या इतिहासात बहुतेक राजवटी  श्रीमंतांना अती श्रीमंत करण्यासाठी धडपडत होत्या. राजे राजवाड्यांनी संपत्तीचे एकत्रीकरण केले. ही संपत्ती निर्माण करण्यासाठी दोन हत्यारे वापरली. त्यात पहिले म्हणजे सैन्य. सैन्यदलाच्या प्रभावाखाली लोकांना आणून त्यांच्याकडून प्रचंड पैसा वसूल केला. त्यात  दुसरे हत्यार म्हणजे पुजारी आणि सावकार. देवस्थानं निर्माण करण्यात आली आणि त्यात जो प्रचंड पैसा आला तो पुजाऱ्यांनी आणि राजाने वाटून खाल्ला. त्याच बरोबर सावकार आणि गरिबांना लुटून प्रचंड पैसा कमावला त्यातला काही भाग राजाला दिला. मानवाची ही दशा सरंजामी राज्य पद्धतीत चालली. त्यात गरिबांचे प्रचंड शोषण  झाले. सर्वात जास्त शेतकऱ्यांना नागडे करण्यात आले. औद्योगिक क्रांतीनंतर मोठ्या प्रमाणात उत्पादन शहरांमधील उद्योगात होऊ लागले आणि त्यातून निर्माण होणारा पैसा श्रीमंतांकडे म्हणजे भांडवलदारांकडे जाऊ लागला. त्यातूनच जगामध्ये प्रचंड श्रीमंत माणसं निर्माण झाली. इथे देखील गरीब मारला गेला.

            या काळात कामगारांचे लढे सुरू झाले आणि समाजवादी तत्वज्ञानांने मानवाला पेटवून टाकले. आर्थिक समता हे चळवळीचे केंद्र बनले. आर्थिक समता मधूनच सामाजिक समता सुद्धा निर्माण होईल असे विचार पूर्ण जगात पसरू लागले. पण अमेरिकेतल्या अति श्रीमंत लोकांनी याला कडाडून विरोध केला. अशा समाजवादी विचारसरणी विरुद्ध लढण्यासाठी जगातले  अनेक श्रीमंत देश  बरोबर घेतले आणि हे तत्त्वज्ञान नष्ट करण्यासाठी  वेगवेगळे अस्त्र वापरले.

            कामगार शेतकरी आणि समाजवादी चळवळ मोडून काढण्यासाठी पहिले महायुद्ध घडवण्यात आले. त्यामध्ये श्रीमंत राष्ट्रांमध्ये युद्ध भावना निर्माण करून राष्ट्रप्रेमाचा आगडोंब उसळला. त्याच्या पाठीमागे ह्या श्रीमंत भांडवलदारांनी प्रचंड पैसा कमावला आणि समाजवादी चळवळ हे लोकांच्या मनातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला. पण जिथे युद्धामध्ये अपयश आले तेथे लोक चिडले आणि रशिया मध्ये समाजवादाची एक प्रचंड मोठी क्रांती झाली. राजांची राजवट नष्ट झाली आणि लोकांची राजवट आली. एक नवीन राष्ट्र उभे राहिले. खाजगी संपत्ती नष्ट करण्यात आली. रशिया मध्ये सर्व संपत्ती, जमिनी हे लोकांच्या मालकीचे झाले. आणि कोणी गरीब नाही आणि कोणी श्रीमंत नाही अशा प्रकारची राजवट पहिल्यांदाच इतिहासात सुरू झाली. तेवढ्यात दुसरे महायुद्ध झाले आणि परत चळवळीला विराम मिळाला. हिटलरने हल्ला करून जवळ जवळ अर्धा रशियाचा सुद्धा कब्जा केला होता.  पण त्याला उलटवून लावण्याचे काम समाजवादी विचारसरणीने भारावलेल्या  रशियाच्या जनता करत होती. आणि अंतिम  हिटलरचा पराभव झाला, त्यानंतर जग पुन्हा दुभंगल गेले.  एकाबाजूला अमेरिकेच्या नेतृत्वाखाली सर्व श्रीमंत आणि भांडवलदारी राष्ट्र एकत्रित झाली त्यात पूर्ण पश्चिम युरोप जपान होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पाकिस्तान सुद्धा अमेरिकेचा चमचा झाला. दुसऱ्या बाजूला समाजवादी गट निर्माण झाला त्याचे नेतृत्व रशियाने केले आणि या दोन गटांमध्ये १९४५ पासून १९९१ पर्यंत शीत युद्ध झाले. त्यात अमेरिकेचा विजय झाला आणि सोवियत संघ म्हणजे रशियाचे चौदा तुकडे झाले. त्यातील युक्रेन आणि रशिया हे दोन तुकडे.

            १९९१ नंतर पूर्ण जगावर आपली पकड घट्ट करण्यासाठी अमेरिकेने प्रत्येक देशामध्ये आपले चमचे पाठवले. ह्याच बरोबर शीत युद्धामध्ये अमेरिकेने शत्रु राष्ट्रांना त्रास देण्यासाठी त्या देशात गुंडांची ताकद वाढवली. भारताला अमेरिकेने नेहमीच शत्रू मानलेले आहे. पाकिस्तान ला आपला मित्र मानलेला  आहे. त्या दृष्टिकोनातून भारता मध्ये गुंडाराज स्थापन करण्याचा अमेरिकेने प्रयत्न केला. गुंडाराज बरोबरच दहशतवाद्यांचा राज्य निर्माण करण्याचा बऱ्याच अंशी प्रयत्न यशस्वी झाला. कुठल्याही देशांमध्ये अराजकता माजवावी असेल तर त्या देशांमधील लोकांमध्ये बेदिली निर्माण केली पाहिजे. हिंदू-मुस्लीम द्वेष, जातीय संघर्ष, भाषेचा संघर्ष, नक्षलवादी संघर्ष असे  संघर्ष भारतात निर्माण करून भारतामध्ये यादवी युद्ध करण्याचा प्रयत्न अमेरिका पाकिस्तानच्या मदतीने करत आहे त्याची जाणीव आणि भान आजच्या राज्यकर्त्यांना नाही आणि ते अमेरिकेच्या तावडीत सहज सापडले आहेत. ह्याचा परिणाम भारतावर झाला आहे.

            १९९१ पासून मनमोहन सिंग यांनी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाऊजा) धोरण देशात आणले. तेव्हापासून अर्थसंकल्पाची दिशा पूर्ण बदलली. समाजवादी व्यवस्थेचा प्रभाव अर्थसंकल्पावर असायचा.  गरीबी हटावचा नारा इंदिरा गांधीनी दिला होता. नंतर १९९१ पासून संकल्प आणि अर्थव्यवस्था हे बाजारपेठेवर आधारित करण्यात आले.  याचा अर्थ असा होतो की लोकांचे कल्याण करणे ही सरकारची जबाबदारी नाही, पण बाजारपेठेची जबाबदारी आहे.  म्हणजे कुणाचीच नाही.  गेल्या ३० वर्षांमध्ये श्रीमंतांचा पूर्ण दबाव अर्थनितीवर राहिला आहे.  नव्हे  अर्थनिती बडे श्रीमंत बनवत आहेत.

            मनमोहन सिंगने देशाची वाट तर लावलीच,  पण काँग्रेस पक्षाचीही वाट लावली.  स्वातंत्र्या पासूनचे  काँग्रेस धोरण जाळून टाकले आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे धोरण जागतिक बँकेतून ते भारतात घेवून आले. ते जागतिक बँकेत नोकरी करत होते. जागतिक बँक ही अमेरिकेच्या मालकीची आहे आणि जागतिक बँकेचे पूर्ण धोरण हे अमेरिकेला श्रीमंत करत जाण्याचे आहे.  त्या अर्थी मनमोहन सिंग हे अमेरिकेचे नोकर होते आणि भारताचे पंतप्रधान बनवून भारतात अमेरिकेचा पंतप्रधान झाल्यासारखे झाले.  मी खासदार म्हणून आणि नंतर काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणून मी प्रचंड विरोध केला आणि काँग्रेसच्या बहुतेक लोकांनी विरोध केला. पण भांडवलदारांचा सरकारवर इतका पगडा होता.  मनमोहन सिंग यांनी भारतात अमेरिकेचे धोरण राबवले.  पुन्हा ते भाजप सरकारने आणखी जोरात राबवले आणि त्याचा भयानक वेग आता मोदी सरकारमध्ये आहे.  त्यामुळे कुठल्याही पक्षाने याला विरोध केला तरी सत्तेत असताना सर्वच राजकीय पक्ष हे अमेरिकेच्या भांडवलशाही धोरणाचा पुरस्कार करतात हे स्पष्ट होत आहे.  त्यामुळे गेल्या ३० वर्षाचे अर्थसंकल्प, अर्थनीती ही श्रीमंताची अर्थनीती आहे.  त्यात गरीब भरडला गेला आहे.  हे आजच्या शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आणि सैनिकांच्या दुरदशेवरून स्पष्ट होत आहे.

            या ३० वर्षांमध्ये भारतात पैसा प्रचंड आला यात वाद नाही.  पण तो मूठभर लोकांच्या हातात गेला.  अंबानी पहिला १० श्रीमंत लोकांमध्ये आला. त्याची साथ दाऊद – इब्राहिम देत आहे.  १२६ भांडवलदारांकडे इतकी प्रचंड संपत्ती आहे  की ती पूर्ण अर्थसंकल्पापेक्षा जास्त आहे.  यातून हेच स्पष्ट होतं, काय झालं तरी श्रीमंतांच काही वाकड होत नाही.  श्रीमंत आणखी श्रीमंत होत गेले आणि गरीब देशोधडीला लागले, हे कोरोना काळात दिसले. त्यामुळे आता अर्थव्यवस्थेचा मूळ मुद्दा आणि राजकारणाचा मूळ मुद्दा हा आर्थिक विषमता आहे.  याकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून ह्या लोकांनी रामावर राजकारण केलं.  म्हणजे धर्मावर राजकारण केले.  १९९१ ला मी पण खासदार होतो आणि हे सर्व माझ्या डोळ्यादेखत घडलेले आहे.  काँग्रेसचे खासदार असून आम्ही अनेकांनी ह्या धोरणाला प्रचंड विरोध केला होता. याचा परिणाम म्हणून बाबरी मस्जिद पाडण्यात आली.  पूर्ण देशाचे लक्ष हिंदू-मुस्लिम दंगलीवर वळवण्यात आले व  सरकारने खाउजा धोरण लोकांच्या माथ्यावर मारले.  त्याचे प्रचंड नुकसान भारताला व भारतीय जनतेला झाले आहे.  पण यावर कुणाचं लक्ष नाही कारण आपण सर्व जाती आणि धर्माच्या राजकारणात बुडलो  आहोत.  हे श्रीमंताचे हत्यार असते. मुळ मुद्द्यापासून आपल्याला सर्वांना जातीपातीच्या धर्मात गुंडाळून टाकलेले आहे. ह्यातून बाहेर निघण्यासाठी रोटी, कपडा, मकान, नोकरी व  समृद्ध शेती यावर जनतेला आणावे लागेल. व जातीवाद, धार्मिक कट्टरवादाच्या सापळ्यातून आपल्याला  मुक्त व्हावे लागेल. यासाठी देश बांधवानो  सज्ज व्हा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS