संघर्षाशिवाय पर्याय नाही

संघर्षाशिवाय पर्याय नाही

भारतात सर्वात मोठे आव्हान शेतकऱ्यांचे व शेतमजुरांचे उध्वस्त जीवनमान आहे. त्यावर उपाययोजना करण्यात सरकार मग ते सापनाथ कॉंग्रेस आघाडी  असो का नागनाथ भाजप आघाडी पूर्णपणे अपयशी ठरली आहे. मोदीशेठने अनेक वल्गना मारल्या, वचने दिली, पण कृतीशुन्य प्रवास चालू आहे. दिशाहीन राष्ट्र आपल्या नागरिकांचा घात कसा करते हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जसे ४० शेतकऱ्यांनी आपले प्राण यवतमाळमध्ये गमावले. त्यांनी केवळ रासायनिक खते आणि किटकनाशके  वापरली त्यांची फवारणी केली. म्हणजे ही किटकनाशके  किती भयानक आहेत हे सिद्ध झाले. ४० शेतकऱ्यांनी प्राण गमावले आणि असंख्य शेतकरी हळूहळू मरत आहेत. त्यांच्या शरीरात रोज विष भिनत चालले आहे. तसेच अन्न-धान्यामध्ये, भाजी-पाल्यामध्ये रासायनिक खते आणि किटकनाशकाचा  वापर वाढत चालला आहे. आज भारतात आपण सर्वच शहरी आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या मनुष्याला विषारी अन्न खावे लागत आहे. नपुसंकता, कॅन्सर, मधुमेह, हृदयरोग माणसाला पछाडत आहेत. भारतीय नागरिकांचे आजारपणात सर्वस्व उध्वस्त होत आहे. डॉक्टरचे बिल भरता भरता कर्जबाजारी माणूस आपले जीवन संपवत आहे. हे  कृषी क्षेत्रातील अरिष्ट भारतासमोरील सर्वात मोठे संकट आहे.

ह्या संकटाला सामोरे जायला भारत सरकार आणि राज्य सरकार अपयशी का झाले? त्याला एकच कारण आहे. राजकीय इच्छाशक्तीचा पूर्णपणे अभाव. धंद्याच्या सारीपाठात पैसा सर्वश्रेष्ठ असतो. माणूस नाही. म्हणूनच मनमोहन/मोदीशेठ  यांना परदेशी पैसा सर्वात श्रेष्ठ वाटतो. परदेशी पैसा भारतात गुंतवणूक करणे हे ह्यांच्या आर्थिक नितीचा पाया आहे.  म्हणूनच मोदीशेठ  जगभर पैसा आणण्यासाठी भटकले. बहुराष्ट्रीय उद्योगांना वाटेल त्या सवलती दिल्या. ह्या सर्व राजकीय नेत्यांच्या दृष्टीक्षेपात फक्त उद्योग आणि सेवा क्षेत्रात पैसा गुंतवणूक, हे समृद्धीचे एकमेव साधन दिसते. सर्व चोर/लुटारूना समाजात मोठे स्थान मिळते. कारण ते सुटबुट/ मर्सिडिस गाडीत फिरतात. शेतकरी दरिद्री,फाटके कपडे घातलेला, शरीर म्हणजे  हाडाचा सापळा उरलेला माणूस. हाच शेतकरी आपल्या मुलाला सैन्यात पाठवतो. कोणी बिर्ला-अंबानी-अडाणी नाही. कोणी आमदार-खासदार नाही. माझ्या आयुष्यात एकही आमदाराचा/खासदाराचा मुलगा सैन्यात बघितला नाही. मी एकटाच आमदाराचा मुलगा सैन्यात दाखल झालो. ह्याचे मला आजदेखील आश्चर्य वाटते. सर्वांचा पोशिंदा आणि सर्वांचा रक्षणकर्ता आज भिकाऱ्याचे जीवन जगत आहे आणि मोदीशेठ श्रीमंत समुदायासाठी बुलेट ट्रेन आणत आहेत. उद्योजगांचे  लाखो कोटीचे थकीत कर्ज वसूल करण्याचे नाव मोदीशेठ घेत नाही. तर दुसरीकडे  शेतकरी आत्महत्या करतात हे कटू सत्य ते बघून काहीच करत नाहीत. फक्त घोषणा म्हणजे हवा देतात. खत कारखानदारांना शेतकऱ्यांच्या नावाने  ८०००० कोटी रु. सरकार अनुदान म्हणून  देते.  पण कर्ज माफ  करण्यासाठी ह्यांच्याकडे पैसे नाहीत. हे अनुदान थेट शेतकऱ्यांना का देत नाहीत? कारण स्पष्ट आहे. खत कारखाने अनुदान घेतात अन टक्केवारी अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना देतात.

शेतकऱ्यांनो ह्या कारखानदारांना आणि भ्रष्ट सरकारला धडा शिकवता येतो. खतावर, किटकनाशकांवर बहिष्कार घाला. हे कारखानदार गुडग्यावर येतील.  आज सुभाष पाळेकरांचे नैसर्गिक शेतीचे शास्त्र पुर्ण विकसित आहे. शेतीतील नवीन शास्त्र म्हणून आंध्रप्रदेश सरकारने जागतिक पातळीवर प्रस्तावित केले. अनेक विद्यापीठांनी त्याचा पुरस्कार केला. पण महाराष्ट्र सरकार तिकडे अजिबात लक्ष देत नाही. मी स्वत: आता नैसर्गिक शेती करतो. प्रचंड उत्पादन वाढ  झाली. विषमुक्त अन्न तयार झाले. आता माझी मुले नैसर्गिक शेतीतून निर्माण झालेले अन्न खातात. भारतात आज सर्वजणच विषारी अन्न खात आहेत. शेतकरी मरत आहेत किंवा आजारी पडत आहेत. पण सरकार  निर्लजपणे   रासायनिक खते आणि किटकनाशके पुरस्कृत करत आहे. कारण सरकारचे मालक भांडवलदार तेल कंपन्यांना खुश ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना विष पाजत आहेत. त्यांचे खुनी मंत्र्यांना ३०२ खाली तुरुंगात डांबले  पाहिजे.

म्हणून मी खासदार  नाना पाटोळेचे अभिनंदन करतो. पक्षाची गुलामगिरी न करता नाना शेतकऱ्यांच्या  बाजूने उभा राहिला. नाना सारखे लोकप्रतिनिधी आज चुकून दिसतात. मी पण तसेच आमदारकीचा राजीनामा देऊन सापनाथ कॉंग्रेस सोडले. कॉंग्रेस राष्ट्रावादीनी जागतिकीकरण खाजगीकरण करून गरीबांना मारले आणि अंबानी  अडाणीना मालामाल केले. नागनाथ भाजप तेच करत आहे, हे नाना पाटोळेनी सिद्ध केले.

सरकारने पूर्ण शेती व्यवस्था रासायनिक मालावर उभी केली आहे. त्यालाच पोषक कृषी शिक्षण व्यवस्था, सरकारी प्रशासन. मध्येच जैविक शेतीचे फ्याड  सुरु केले. सेंद्रिय शेती  तर प्रचंड महाग. कंपनीचा माल सरकार शेतकर्‍यांना घेण्यास जबरदस्ती करते. म्हणूनच नैसर्गिक शेतीकडे सरकार जात नाही. मी कृषी मंत्री फुंडकर यांना विनंती केली कि नैसर्गिक शेतीच्या  शास्त्राचे संशोधन करा. पण आजपर्यंत ही माणसे नैसर्गिक शेतीकडे ढुंकून बघायला तयार नाहीत. मग नाना पाटोळेने घरचा आहेर दिला तर वाईट का वाटते. मुख्यमंत्री तर मूग गिळून गप्प बसले. थापा ठोकून फार वेळ लोकांना फसवता येत  नाही. शेवटी तुम्ही उघडे पडालच. कर्जमाफीचे नाटक तुम्ही वठवले. शेतकरी मूर्ख बनले. पाताळयंत्रीपणाची अंतिम सीमा सरकारने गाठली. ४० शेतकरी मारले गेले. नाना पाटोळे म्हणतात त्याप्रमाणे ह्या हत्याकांडाची जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही.

दुर्दैव हे कि सर्व  राजकीय पक्ष पुढच्या निवडणुकीपर्यंतच विचार करतात.  लोकांना भूलथापानी मुर्ख बनवतात. अमित शाहचा सिद्धांत आहे कि निवडणुकीत खोटे बोलायचे. ते म्हणाले कि  निवडणुकीतील वचने चुनावी जुमला असतात. सर्वच खोटे मग मत कोणाला द्यायचे? पण देशासाठी तातडीने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवला पाहिजे. शेतकर्‍यांनो, रासायनिक आणि सेंद्रीय शेतीवर बहिष्कार टाका. फक्त नैसर्गिक शेती करा. शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. कारण ७०% खर्च कमी होतो. कर्ज घ्यावे लागत नाही. मग कर्जबाजारी कसे होणार? ही फक्त शेती करण्याची पद्धत समजू नका. तर ही क्रांती आहे. मेहनतीने कमावलेला पैसा गावाबाहेर का घालता? आपल्या गरजेच्या, वस्तू, गावाच्या/ जिल्ह्याच्या बाहेरून घेवू नका. नैसर्गिक साधनांवर एक जीवन पध्दती उभी करा. पापड, लोणचे, साबण, दंतमंजन, मसाला, भाजीपाला अशा अनेक गोष्टी आपण गावातच उत्पादन केले पाहिजे. बाहेरून  बियाणे, खते, किटकनाशके आणू नका. सर्व गावात निर्माण करा.   थोडी मेहनत जास्त  घ्यावी लागेल. पण शास्वत जीवन जगाल. गावातला पैसा गावात राहील. पूर्वी हे शक्य नव्हते. आता इंटरनेटमुळे सर्व प्रशिक्षण तुमच्या गावात  मिळू शकते. समृद्ध गावासाठी स्वयंपूर्ण  गाव बनवा. तुमच्या पैशावर अंबानी सारखे उद्योगपती श्रीमंत झाले ते थांबवा. तुम्ही एक कोको कोला पिता, तेव्हा रू. ४  अमेरिकेला जातात. कोलगेट  घेतले तर पैसा देशाबाहेर जातो आणि आपण भिकारी बनतो.

ग्रामस्वराज्य यालाच म्हणतात. मुख्य विषय राजकीय नाही. तर आर्थिक आहे.  ह्या देशाच्या घटनेत समता हे सर्वात प्रथम तत्व आहे. भारत असा देश बनेल जिथे आर्थिक विषमता नसेल असे स्वातंत्र्यानंतर लोकांनी स्वप्न बघितले. पण आता श्रीमंत आणि गरीबातील दरी वाढतच आहे. म्हणून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी बॉम्बब्लास्ट केला जातो. जातीय आणि धार्मिक युद्ध निर्माण केले जाते. आता कर्नल पुरोहितला हिरो बनवायला सरकारने सुरु केले. मी पण मिलिटरी  गुप्तहेर  खात्यात होतो जिथे कर्नल पुरोहित काम करत होता. असे कुठलेही काम एका कर्नलला दिले जात नाही जे थोतांड लोकांपुढे  मांडण्यात येत आहे. हेमंत करकरेने मोठ्या हिंमतीने मालेगाव  बॉम्बब्लास्ट उघडकीस आणला. त्यात कर्नल पुरोहित ह्यांच्या विरुद्ध पूर्ण पुरावे मिळाले. चित्रफिती सुद्धा मिळाली. ते पुरावे नष्ट केले जात आहेत. कुठेतरी काल्पनिक दहशतवादी गटाविरुद्ध काम केल्याचे दाखवले जात आहे. हे सैन्यदलाच्या रेकॉर्ड वर असते. भारतीय सैन्य एवढे कमकुवत नाही कि आपल्या अधिकार्‍याला फसवू देईल. हे प्रकरण दाबण्यासाठीच करकरेचा खून झाला. पण षंड कॉंग्रेस सरकारने ते दाबून टाकले. शेतकऱ्यांनो, कामगारानो, माझ्या देशवासीयांनो मुळ मुद्दा आर्थिक समृद्धीचा आहे.  द्वेषभावना भडकवण्याच्या राजकीय षड्यंत्रात अडकू नका. आर्थिक समता स्थापना करण्यासाठी शेतकरी कामगारांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी व्यवस्थेला वाटणीवर आणा. हे करण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही.

 

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS