संरक्षण उत्पादन क्षमतेच संरक्षण करा-१९.९.२०१९

भारतीय सैनिकाचे कर्तव्य शत्रू बरोबर झुंज देणे. सैनिकाचे शौर्य, त्याग आणि युद्ध कौशल्य याला पर्याय नाही.  तरी सैनिकाच्या हातातले शस्त्र-अस्त्र युद्धाच्या मैदानामध्ये  शत्रूवर मात करण्यासाठी निर्णायक ठरतात.  शत्रूकडे मशिनगण असेल आणि आपल्याकडे रायफल असेल तर आपण कितीही शूरवीर असो, आपला पराभव निश्चित आहे.म्हणूनच जगामध्ये आधुनिक शस्त्रास्त्रांसाठी शर्यत लागलेली असते.

पहिल्या महायुद्धामध्ये खंदकाची लढाई झाली.  एका बाजूला जर्मन सैन्य होत व दुसर्‍या बाजूला इंग्लंड आणि फ्रान्स सैन्य होत.  दोन्ही सैन्याकडे मशीनगण होते.  दोन खंदकांचे आमने-सामने जाळे होते.  त्याच्यासमोर काटेरी तारेचे अडथळे होते.  खंदकामध्ये मशीनगण उभ्या ठाकल्या होत्या.  एका बाजूने हल्ला केला तर दुसर्‍या बाजूने मशीनगणचा भडिमार व्हायचा आणि हल्ला करणारे नेस्तनाबूत व्हायचे.  त्यामुळे युद्ध भूमी स्थिरावली.  कुणी पुढे जात नव्हतं कुणी मागे येत नव्हतं. प्रचंड मनुष्यहानी झाली.  युद्धाच्या शेवटी फ्रान्स-इंग्लंडकडून रणगाडे मैदानात उतरले  आणि खंदक मशीनगणवरून हल्ला केला व युद्धात विजयी झाले. याचाच अर्थ असा की शौर्य आणि त्याग कितीही असो पण तंत्रज्ञान युक्त आधुनिक हत्यारे शूर सैनिकांच्या हातात पडले तर विजय निश्चित आहे.  त्यामुळेच सर्व देश हत्यारांच्या संशोधनावर प्रचंड खर्च करतात. दुसर्‍या महायुद्धाचा शेवट जपानवर हिरोशिमा व नागसाकीवर अॅटमबॉम्ब टाकून झाला.

स्वातंत्र्यानंतर आपल्या सैन्याकडे दुसर्‍या महायुद्धातील हत्यारे होती.  त्यातच चीन विरुद्ध युद्धाला सामोरे जावे लागले.  चीनच्या सैन्याकडे स्वयंचलीत हत्यारे होती आणि आपल्याकडे ३०३ रायफल होती.  बर्फात जिवंत राहण्यासाठी कपडे नव्हते, बूट नव्हते, त्याउलट चीनच्या सैन्याकडे गरम कपडे, बूट, मुबलक होते.  भारतीय सैनिक शौर्यात,त्यागात आणि कौशल्यात कुठेच कमी पडले नाहीत,  पण हत्यारात आणि युद्ध सामुग्रीत तोकडे पडले.  लोकसभेत भारतीय नेत्यांनी मोठ मोठी भाषणे केली, वल्गना केल्या. “आखरी गोली.. आखरी जवान तक.. लढेंगे” असे म्हणाले.  त्यांच्या बापाच काय जात होत.   खरच सैनिकांच्या गोळ्या संपल्या आणि शेवटच्या जवान पर्यन्त लढले, मारले गेले  आणि आपण गाण म्हणत बसलो –  जरा याद करो कुरबानी…  किती लोकांनी कुरबानी याद केली किंवा करतात हे मला माहीत नाही.  पण राजकीय निर्णयामुळे असंख्य जवान मारले गेले, काही अपंग झाले व अनेक कैदी झाले.  अपुर्‍या तयारीनीशी युद्ध करणे म्हणजे आत्महत्या आहे.  त्याचबरोबर चुकीचा राजकीय निर्णय सैनिकाना मृत्युच्या खाईत ढकलून देतो. जसे कारगिल युद्धात झाले.  पाकिस्तानने हल्ला करून लढाख क्षेत्रात कारगिल पर्यन्त खोलवर धडक मारली.  सैन्याने पाकिस्तानला हुसकावून लावण्यासाठी सीमापार हल्ला करण्याची परवानगी मागितली, पण वाजपेयी सरकारने ती परवानगी दिली नाही.  उंच टेकड्यांवर समोरून हल्ला करायला भारतीय सैन्याला आदेश देण्यात आले.  सैन्याने कुठलीही तक्रार न करता आदेशाचे पालन केले.  पण जीवितहानी प्रचंड झाली. अमेरिकेने भारताला सीमा पार न करण्याचा भारताला आदेश दिला होता.   प्रश्न असा पडतो की आपण अमेरिकेच्या आदेशाचे पालन करणार की राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून स्वत:चा निर्णय घेणार.  अमेरिका नेहमी पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली आहे.  तेव्हा युद्धाच्या बाबतीत भारत सरकारने राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातूनच निर्णय घेतला पाहिजे.

आज त्याची गरज फारच मोठी आहे.  त्यामध्ये हत्यारांच्या आणि साधन सामुग्रीच्या बाबतीमध्ये भारताने स्वावलंबी झाले पाहिजे. आपण जवळ जवळ ७० ते ८० टक्के हत्यार व युद्ध सामुग्री परदेशातून आणतो.  अब्दुल कलाम यांनी बजावले होते की ७० टक्के पेक्षा जास्त हत्यार व युद्ध सामुग्री २०२० पर्यन्त भारतात बनली पाहिजे.  याबाबतीत सर्व सरकारे अपयशी ठरली आहेत.  आज 70 हत्यारे परदेशातून आयात करण्यात येतात परदेशातून हत्यारे विकत घेतल्यास पैसे खायला रान मोकळे होते. म्हणून खाजगीकरणाच्या गडग्यात भारतीय संरक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे.  संरक्षण उत्पादनात भारत स्वावलंबी रहावा म्हणून १७७५ मध्ये ४१ भारतीय ORDINAN FACTORY बनविण्यात आल्या.  स्वातंत्र्यानंतर सुद्धा ह्या ४१ कारखान्यांनी भारतीय सैन्याची गरज पुरी केली. रणगाडे, रायफल, तोफापसून पोषाखापर्यंत सर्व गोष्टींचा पुरवठा केला.   आजपर्यंतची सर्व विमाने भारतात बनविण्यात आली.  त्याला अपवाद राफेल आहे.  सुरूवातीला १२६ राफेल पैकी १०८ भारतात उत्पादीत करायची होती.  पण मोदी सरकारने तो निर्णय रद्द केला आणि ३६ तयार राफेल सरळ आयात करण्यात आली.  परिणामत: भारतात १०८ राफेल बनविण्याची संधी हुकली.  अशाच प्रमाणे जर आपण हत्यार परदेशातून आयात करत राहिलो आणि भारतात सरकारी कंपन्या बनविणे बंद केल तर भारताची सुरक्षा व्यवस्था संकटात येईल आणि स्वावलंबांनाची भाषा बंद होईल.

या देशातील मोठे उद्योगपती सरकारी कारखाने बंद करून कवडीमोल भावामध्ये गिळंकृत करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे करताना भारतीय उद्योग परदेशातील बहुराष्ट्रीय उद्योगांची दलाली करतात.  भारतीय उद्योगपती सरकारी कारखाने विकत घेतात व नंतर परदेश कंपंनींना विकून टाकतात. परदेशी कंपनीने पुढच्या काळात संरक्षण उत्पादनाचे कारखाने अशाच प्रकारे भारतीय उद्योगपतीकडून विकत घेतल्यास आपली संरक्षण व्यवस्था गुलामगिरीकडे जाईल. चीन किंवा अमेरिका त्यांच्या संरक्षण उत्पादनात १ पीन सुद्धा परदेशी कारखान्यांना बनवू देत नाहीत.  त्याउलट भारतातील सर्वच कारखाने विदेशी कंपनीच्या घशात घालण्याचे कारस्थान आखले जात आहे.   मोदींच्या पाहिल्याच सरकारमध्ये संरक्षणातील २७५ युद्ध सामुग्री खाजगी कंपन्यांना दिली.  याचा अर्थ ४१ सरकारी संरक्षण कारखान्यामध्ये त्यांचे उत्पादन हळूहळू बंद झाले.  आता खाजगीकरणापासून आणखी सरकारी कंपन्या बंद करण्याचा प्रयत्न होत आहे.  त्यात ८२,००० कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड पोहचू शकते.  या विरुद्ध RSS च्या भारतीय मजदूर संघासकट सर्व पक्षाच्या कामगार संघटनांनी आंदोलन केले आहे.

२०१८-१९ च्या काळात या ४१ कारखान्यांनी रू.१०,९०० कोटी इतका माल सैन्याला पुरवला.  त्याच्या आदल्या वर्षी रू.१३,६०० कोटी एवढा माल पुरवला होता.  भारतीय गृह खात्याने १,२६० कोटी रुपयाचा तेथील माल घेतला होता.  संरक्षण कारखाने आपला माल सैन्य दलाला पुरवते त्याची किंमत सरकार ठरवते.  म्हणून हे भारतीय कारखाने फायद्यासाठी कार्यरत नाहीत, तर युद्धात मुबलक हत्यार आणि युद्ध सामुग्री मिळण्यासाठी बनविले आहेत.  मागील संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर व त्या अगोदरचे अनेक संरक्षक मंत्र्यांनी हे कारखाने खाजगीकरण करण्यात येऊ नये असे निक्षून सांगितले होते.  पर्रिकरने उत्पादन वाढावे आणि आयात कमी करावी असे धोरण जाहीर केले होते.  खाजगी कारखाने विक्री करण्यासाठी व फायद्यासाठी माल बनवतात.  युद्धासाठी लागणारा राखीव माल बनवत नाहीत. त्यामुळे युद्ध व युद्ध सामुग्री हत्यारे ही पुर्णपणे सरकारी काम आहे.  या खाजगी उद्योगांना व परदेशी उद्योगांना कधीही जास्त माहिती देऊ नये, असे आमचे स्पष्ट मत आहे.  चंद्रयानच्या अपयशानंतर मोदी साहेबांनी शास्त्रज्ञांना धीर दिला, मिठया मारल्या हे चांगले आहे. पण दुसरीकडे भारताची संरक्षण क्षमता बनविणार्‍या कारखान्यांना अशा क्रूरपणे का वागवत आहेत.  आताच राजनाथ सिंग यांना भारतात बनलेलं तेजस लढाऊ विमान उद्घाटन करताना आपण बघत आहोत.  हे तेजस विमान होऊ नये म्हणून भारतीय आणि परदेशी खाजगी कंपन्यांनी अनेक वर्ष प्रयत्न केले पण शेवटी भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले.  हे विमान कार्यरत झाल्यास भारताचा प्रचंड पैसा वाचेल व भारत सर्व प्रकारच्या विमान उत्पादनात जगामध्ये अग्रेसर होईल. सैन्य आणि सैन्यदलाला हत्यार व युद्ध सामुग्री पुरवठा करणारी यंत्रणा ही देशाला सर्वात महत्त्वाची व्यवस्था आहे.  तिच्याशी खेळू नका. सैनिकाना सर्वात उत्तम हत्यारे द्या. उत्तम आहार आणि उत्तम युद्ध सामुग्री द्या. त्याचबरोबर योग्य निर्णय घ्या, नाहीतर तुम्ही देशद्रोही ठराल.  हे होऊ नये असे भारतीय जनतेची किमान इच्छा आहे.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट: www.sudhirsawant.com

मोबा९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS