संस्कृती व धर्म_१७.३.२०२२

माझ्या शाळेचे नाव ‘सेंट अँथनी’ अर्थात ही कॉन्व्हेंट शाळा होती. त्यावेळी मुलींना बांगड्या व केसात रिबीन बांधण्यापासून परावृत्त करण्यात आले. त्यावेळी हा विषय माझे वडील आमदार सावंत यांच्याकडे गेला. माझे वडील शिक्षण तज्ञ होते, त्यांनी सर्वांना समजावले की हा विषय शाळेच्या नियमाप्रमाणे कार्यरत असला पाहिजे.  कारण त्यांनी त्यांच्या शाळेत सुद्धा अशाच प्रकारचे नियम लावले होते. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की धर्माचे विषय वेगळे असतात आणि संस्कृतीचे विषय वेगळे असतात. ज्याप्रमाणे देश असतो त्याप्रमाणे पोषाख असतात आणि भाषा असतात.  यावरूनच माझी विचारसरणी बनली आहे.

राजस्थान मध्ये गेलो तर मी बघितले की सर्व स्त्रिया या हिंदू असून देत किंवा मुस्लिम, या सर्व घुंगट मध्ये असायच्या. महाराष्ट्रात देखील सर्व पदर घेऊनच वावरतात. ती त्या त्या समाजाची संस्कृती असते. त्याप्रमाणे त्यांचा पोषाख असतो. त्यामुळे कुणीही कुणावर आपल्या पोशाख बाबत सक्ती करू नये. अर्थात एका प्रांतातील लोकांनी एक प्रकारचे पोशाख घालावेत असे मला वाटते. त्याचे कारण असे आहे की एकाच भागातल्या लोकांमध्ये दुजाभाव असू नये. आपण सर्व जन्माला आलो तेव्हा आपला पोशाख व जीवन पद्धती ठरली होती. साधारणत: महाराष्ट्रात जन्मलेल्या लोकांनी मराठीत बोलावे असे संकेत आहे. मी लहान असताना महाराष्ट्रातल्या बहुतेक भागात मुंबई सोडून सर्व धर्माचे लोक एकाच प्रकारचे कपडे घालायचे व मराठीत बोलायचे. पण अलिकडे कट्टरवाद वाढत चालला आणि त्याबरोबर वेशभूषा सुद्धा बदलत चालली. 

लहान असताना शेजारचं गाव हरकुळ येथे बरेच मुस्लिम धर्मीय होते. त्यांचे नाव पटेल आम्ही सावंत पटेल. म्हणजे एकाच घरातले आम्ही लोक पण वेगळा धर्म स्विकारला. पण पोशाख एकच होता सर्व स्त्रिया साडी घालायच्या व बुरखा कोणी घालत नसे.  पुरुषांचा पेहराव सुद्धा सारखाच असायचा. काही हिंदू व मुस्लिम दाढी वाढवायचे. आम्ही सणसुद सर्व एकत्र साजरे करायचो. दिवाळी दसऱ्या मध्ये मुस्लिम लोक सामील व्हायचे व आम्ही पण त्यांच्याबरोबर ईद एकत्र साजरी करत होतो. १९८०च्या दशकात सैन्यामध्ये गेलो व त्यानंतर १९९१ला खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी गावी आलो. त्यावेळी सगळेच बदलले होते. कट्टर वाद प्रचंड प्रमाणात वाढला होता. हिंदू मुसलमानांमध्ये वैमनस्य निर्माण झालं होतं. एकत्र गुण्यागोविंदाने राहणारे लोक केवळ धर्माच्या नावावर विभक्त झाले होते व द्वेष भावना पसरत होती.

कुठल्याही धर्माचे आपण असाल, कुठल्याही जातीचे आपण असाल, पण तुम्ही जर स्वतःला भारतीय मानत असाल तर तुमच्यामध्ये देशाचे नागरिक म्हणून जो संबंध आहे त्याच्यापेक्षा मोठा संबंध असू शकत नाही. सत्तर वर्षांमध्ये पूर्ण जगामध्ये जाती-धर्माच्या नावावर लोक विखुरले गेले आणि  समूहामध्ये वेगळी भावना निर्माण झाली. असे का झाले? ह्याचे कारण जगातील राजकारणात शोधले पाहिजे. १९४५ नंतर जग दुभंगले गेले. बहुतेक राष्ट्र समाजवादी व साम्यवादी विचारसरणीने वागू लागली. अमेरिका आणि पश्चिम युरोप या राष्ट्राच्या प्रभावाखाली अनेक राष्ट्र आली. ती भांडवलशाही विचारसरणीची होती. या दोन तत्त्वज्ञानामध्ये जगाचे संघर्ष दडलेले आहे. त्याचाच भाग धार्मिक कट्टरवाद आहे.

आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी आणि सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी समाजवादी विचारसरणी निर्माण झाली. पण ह्या विचारसरणीने सर्व माणसांना एक समान लेखले. हे अमेरिका आणि पश्चिम युरोपच्या राष्ट्रांना मान्य नव्हते. श्रीमंतांना श्रीमंत करणे व गरिबांना गरीब करणे हे या लोकांचे धोरण. समाजवादी राष्ट्रांवर अमेरिकेने विजय मिळवला आणि त्यांनी आपले तत्त्वज्ञान पूर्ण जगावर लागू करण्यासाठी आर्थिक धोरण निर्माण केले. १९९१ला मनमोहन सिंग जागतिक बँकेतून भारतात आले. जागतिक बँक ही अमेरिकेच्या मालकीची बँक आहे. म्हणून मनमोहन सिंग यांनी भारतावर अमेरिकेची अर्थव्यवस्था लादली. त्यालाच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) म्हणतात. तेव्हापासून सर्वच पक्षांनी आज पर्यंत हेच धोरण राबवले आहे.

मी खासदार असताना व नंतर या खाउजा धोरणाला प्रचंड विरोध केला. त्यावेळेस राजकीय पक्षांनी आणि अमेरिकेने हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा प्रचंड प्रयत्न केला. हा विरोधाचा विरोध मोडून काढण्यासाठी बाबरी मस्जिद पाडण्यात आली व देशभर दंगे निर्माण करण्यात आले. त्याचे नेतृत्व अनेक पक्षाच्या नेत्यांनी केले. त्यात तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी बाबरी मस्जिदला वाचविण्यासाठी काही केले नाही. उलट खाउजाचा विरोध मोडून काढण्यासाठी बाबरी मस्जिद पाडून धार्मिक दंगे घडवण्यासाठी त्यांनी परिस्थिती तशी घडवून आणली. त्या काळापासून आजपर्यंत भारतात हिंदू-मुस्लिम संघर्ष तेवत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नंतर इलेक्शनच्या आधी काहीना काही विवाद घडवून हिंदू-मुस्लिम प्रश्नाला खूंखार मारण्यात येते व इलेक्शनचे परिणाम बदलण्यात येतात. 

जसे लोकसभेच्या इलेक्शनच्या आधी ४० सीआरपीसी जवानांना मारण्यात आले आणि कुठेतरी लुटूपुटूची कारवाई केल्याचे नागरिकांना दाखवण्यात आले आणि इलेक्शन जिंकण्यात आले. यूपी इलेक्शनच्या आधी हिजब पेटवण्यात आलं. महिलांनी अंग झाकून घ्यावं, चेहरा झाकून घ्यावा, असं कुराणमध्ये कुठेही लिहिलेलं नाही हे सर्वांना माहीत आहे.  पण तरी देखील त्याचा बाऊ करण्यात येतो. वास्तविक कोणी काय घातलं याच्याशी लोकांचा संबंध नसतो.  ह्या वेळेला ते प्रकरण कोर्टात गेले त्यामुळे ते गाजलं. भारत देशातले पोशाख हे भारत देशवासियांसाठी आहे आणि इस्लाम मध्ये कुठेही लिहिलं नाही की कुठल्या प्रकारचा पोशाख घातला पाहिजे. फक्त सभ्य पोशाख घातला पाहिजे असे सर्व धर्मात म्हटले आहे.

हिंदू धर्मात देखील अनेक प्रथा सांस्कृतिक बाबी मध्ये सोडण्यात आले. महिलांनी सती जावे, महिलांनी अभ्यास करू नये, म्हणून सावित्रीबाई फुले यांच्यावर चिखल मारण्यात आला. शिवरायांनी ह्या सगळ्या रूढी-परंपरा बदलून टाकल्या. त्यांनी महिलांना योद्धा बनविले. त्यांनी दलिताच्या हातात तलवार दिली, त्यांना हृदयाशी कवटाळले व महिलांना पुरुषासारखे समान स्थान देण्याचा पाया रोवला. हीच परंपरा महात्मा फुले, छत्रपती शाहू,  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जोपासली व महिलांना समान स्थान घटनेमध्ये देण्यात आले. त्यामुळे अनेक महिला शिकल्या व महत्त्वाच्या स्थानावर बसल्या. याच तत्त्वावर जाऊन मी १९९१ला लोकसभेत विषय मांडला व महिलांना सैन्यात घेतले पाहिजे अशी मागणी केली.  हे मान्य झाले आणि आज अनेक महिला सैन्यामध्ये दाखल झाल्या आहेत. त्यात मुस्लिम महिलांना सुद्धा संधी आहे व अनेक मुस्लिम मुली सैन्यात अधिकारी झाले आहेत. आता कुराणमध्ये नसलेला विषय हिजाब हा पेटून परत धार्मिक कट्टरवाद्यांना तुम्ही संधी देत आहात. म्हणून मुस्लिम सत्यशोधक चळवळ जोपासली पाहिजे. इस्लामचा खरा चेहरा जो कल्याणकारी आहे तो अंमलात आणला पाहिजे. ज्यावेळी हिंदू मुलींची लग्न लहानपणी आणि जबरदस्तीने करण्यात येत होती. त्यावेळी इस्लाम मध्ये लग्न करण्यासाठी मुलींचा होकार असला पाहिजे अशा प्रकारचा इस्लामिक कायदा सुद्धा बनला. हे अतिशय प्रगतीचे पाऊल आहे. त्यामुळे कुठलाही धर्म असो हा वाईट प्रथाच्या परिणामांना भीक घालत नाही. पण धर्म मार्तंड,  पुजारी लोक मग ते पुजारी हिंदू धर्मातले पुजारी असू दे, ख्रिश्चन धर्मातील फादर असू दे किंवा मुस्लिम धर्मातील मौलाना असू देत हे आपल्या मनाला येईल तसा धर्माचा अर्थ काढतात आणि मानवाच्या खऱ्या प्रथांना व खऱ्या धर्माला गाडून टाकतात. कारण मानवाचा खरा धर्म हा एकमेकावर प्रेम करण्याचा आहे. तो सोडून राजकीय धर्ममार्तंड आपली पोळी भाजून घेण्यासाठी आपली राजकीय ताकद वाढवण्यासाठी धर्माचा दुरुपयोग करतात आणि लोकांच्या मनामध्ये द्वेष उत्पन्न करतात व कल्याणकारी राज्याच्या व्यवस्थेला सुरुंग लावून बरबाद करून टाकतात.   त्यामुळेच १ टक्के लोकांच्या हाती ९९ टक्के संपत्ती आहे आणि ९९टक्के लोकांच्या हाती १ टक्का संपत्ती आहे. या धार्मिक कट्टरवादाच्या पाठी खाजगीकरण आहे. भारतीय नागरिकांच्या मालकीचे सर्व कारखाने खाजगीकरण करून नष्ट करून टाकत आहेत. सर्व सरकारी नोकऱ्या खाजगी करत आहेत. जेणेकरून भविष्यामध्ये कुणाला सरकारी नोकरी मिळणार नाही. दुसरीकडे आरक्षणासाठी लढे उभारले जात आहेत आणि आरक्षणातून मिळणाऱ्या नोकऱ्या संपुष्टात आणल्या जात आहेत. हे भांडवलशाही कपट लोकांच्या लक्षात येत नाही म्हणून माझ्या हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख बांधवांना विनंती करतो की आपल्या समाजाला द्वेषापासून दूर करा.  एकमेकांचा सन्मान करायला लोकांना शिकवा आणि मानवतेचे कल्याण करण्यासाठी धर्म झालेले आहेत ही परंपरा रुजू करा आणि संस्कृतीला आपल्या मनासारखं वेगळे होऊ देऊ नका.  कारण आपण सगळे एक आहोत, आपण भारतीय नागरिक आहोत आणि आपण भारतासाठी लढलं पाहिजे.  भारताला समृद्ध आणि आनंदी बनवला पाहिजे,  हा एकच धर्म मानून आपण सर्वांनी काम करूया, ही मी विनंती करतो आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS