सापनाथ नागनाथांचा इंटेलिजन्स ब्युरो

सापनाथ नागनाथांचा इंटेलिजन्स ब्युरो

मी मिलिटरी इंटेलिजन्स (MI) मध्ये असतानाच राजीव गांधीनी मला राजकारणात आणले. मी १९९१ ला खासदार झालो पण राजीव गांधींची हत्या झाली. त्यावेळी इंटेलिजन्स ब्युरो (IB) चे जॉईन्ट डायरेक्टर धर यांच्या घरात बाबरी मस्जिद पाडायचे षडयंत्र चालू होते. मालोय कृष्ण धर हे IB मध्ये ३० वर्ष होते. त्यांनी ‘ओपन सिक्रेट्स’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याने भारतीय गुप्तहेर खात्यांचा आणि त्यांच्या राजकीय मालकांचा पर्दाफाश केला आहे. एवढया मोठ्या दर्ज्याच्या अधिकाऱ्याने IB चे सत्य लोकांसमोर आणून व्यवस्थेला हादराच दिला आहे. पण निर्लज्ज राजकारणी लोकांनी त्याबद्दल काहींच केले नाही. गुप्तहेर खात्यांच्या कारवाया अनेकदा देश विरोधी असतात. त्यांच्या खोटेपणाचे शिकार भारतीय नागरिक असतात. धर म्हणतो “राजकीय व्यवस्थेने गुप्तहेर खात्यांचा दूरूपयोग अनेक वर्ष केला आहे. निवडून आलेल्या सरकारमध्ये हस्तक्षेप करणे, त्यांना उलथवून लावणे, सर्व नागरिकांवर पाळत ठेवणे, न्यायाधीश, अधिकारी, पत्रकार, प्राध्यापक या सर्वांवर सतत पाळत ठेवणे. अशा पूर्णपणे बेकायदेशीर कृत्यांचा सिलसिला धर ने लोकांसमोर ठेवला आहे. राष्ट्रीय  सुरक्षेला बाधक असे अनेक पैलू धर ने उघड केले. सरकार सुरक्षा आणि लोकांमध्ये एक लोखंडी पडदा उभा करते. त्यामागील सरकारची भयानक कारस्थाने लोकांना दिसत नाहीत.

भारतीय लोकशाहीत सर्वात घातक कार्य गुप्तहेर  संघटना कसे करते ते धर ने दाखवले आहे.  त्यांचे कार्य लोकशाही संस्थांच्या नियंत्रणात चालले पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. तो कॉंग्रेस विरोधी होता. त्याने इंदिरा गांधींसाठी अनेक अनैतिक  कामे केली. भाजप  सरकार हे चांगले काम करेल अशी त्याची अपेक्षा होती. म्हणून त्याची गोविंदाचार्य बरोबर घनिष्ट मैत्री होती. पण ९० च्या दशकात त्याचा भ्रमनिरास झाला. संघ परीवारने बाबरी मस्जिद पाडण्यासाठी घातकी पध्दतीचा वापर केलेला त्याने पहिला. कॉंग्रेस आणि नंतर भाजपचे घाणेरडे राजकारण त्याने पाहिले. धर ने इंदिरा गांधीनी कसे संजय गांधीवर पाळत ठेवण्याचे काम IB ला दिले, चंद्रशेखर सरकारची माहिती राजीव गांधीला कशी दिली. चंद्रशेखर यांच्या सचिवाच्या टेलिफोनमध्ये मायक्रोफोन कसे लावले. झैल सिंघांच्या ऑफिसमध्ये माहिती मिळवण्यासाठी कशी उपकरणे लावली. याने दहशतवाद्यात आणि सरकारमध्ये बोलणी करून आणली. भिन्द्रन्वाल्यांच्या पुतण्या रोडला सुवर्ण मंदिरात त्याने हथियार फळांच्या टोपल्यात पुरवले. आपले अनैतिक आणि बेकायदेशीर काम लपवण्याचा प्रयत्न धर करत नाहीत. अनेक वर्षानंतर गुप्तहेर विभागाला सरकारच्या कचाट्यातून मुक्त करून ती देशाच्या सेवेला लागावी ही अपेक्षा धर करतो. नाहीतर काहीं हेर सैनिकांबरोबर  मिळून भारताचा ताबाच घेतील. असे तो म्हणतो.

IB चे काम अंतर्गत  सुरक्षेचे आहे. बहुतेक IB प्रमुख हे प्रधानमंत्र्यांचे सुरक्षा सल्लागार असतात. जसे आज डोवल आहेत. डोवल हे IB चे माजी प्रमुख आहेत. IB  चा जन्म ब्रिटीश IB मधून झाला. त्याचे पहिले प्रमुख  पिल्लई. १९४५ ला दुसऱ्या महायुद्धानंतर शीत युद्ध सुरु झाले. एकीकडे अमेरिका ब्रिटनचे गठबंधन. त्यात सर्व पश्चिम युरोपियन देश होते; तर दुसरीकडे, सोविएत संघ (रशिया). भारत स्वतंत्र  होणार होता. भारत  जर सोविएत संघाच्या बाजूने गेला तर अमेरिकन पराभव निश्चित होता. म्हणून भारताची फाळणी करण्याचा निर्णय ब्रिटन अमेरिकेने घेतला. ब्रिटीश IB ला ते काम देण्यात आले. भारतात हिंदु – मुस्लिम दंगली ब्रिटीश IB ने घडवून देशाची फाळणी केली. हा इतिहास आता उघड होत आहे. ह्याच ब्रिटीश IB मध्ये काम करणारे लोक स्वातंत्र्यानंतर भारतीय IB चे प्रमुख झाले. ते पूर्ण ब्रिटीश / अमेरिकन मानसिकतेचे होते. IB प्रमुख पिल्लईने अमेरिकन गुप्तहेर संघटनांबरोबर संधान बांधले. पुढे जावून IB ही अमेरिकन CIA ची शाखाच झाली. ही गोष्ट सरकारला माहीत नव्हती. पुढे जावून IB  चे दुसरे प्रमुख मुळीक यांनी हेच धोरण चालवले. जनतेपासून IB चे अस्तित्व लपवून ठेवण्यात आले होते. बाबासाहेब आंबेडकर, डांगे, पंजाबराव देशमुख, लोहिया सकट अनेक नेत्यांवर IB पाळत ठेवत होती. चीन, रशिया समर्थक नेत्यांची पूर्ण यादी ते अमेरिकेला पुरवत होती.

भारताबरोबर चीन सुद्धा स्वतंत्र झाला. भारत-चीन घनिष्ट मैत्री होऊ लागली. ‘हिंदी चीनी भाई भाई’ हा नारा बुलंद झाला. ह्याचा धसका अमेरिकेने घेतला. त्याच दरम्यान पंडित नेहरू / सरदार पटेलना न  विचारता मुळीक वॉशिंगटनला अनेकदा गेले व अमेरिकन गुप्तहेर खाते CIA बरोबर चीन विरुद्ध संधान बांधले. सरकारची परवानगी न घेता असे आपल्या मर्जीने घातकी काम करण्याची IB ची परंपरा आता देखील चालू आहे. लोकनियुक्त सरकारला हे मूर्ख समजतात व आपलेच धोरण राबवतात.  मुळीकला भारत-चीन संघर्ष घडवून आणण्याचे काम अमेरिकेने दिले. सर्व खोटे अहवाल देवून पंडित नेहरुना व विरोधी पक्षांना पेटवून टाकण्यात आले. वृतपत्रातून चीन द्वेषाचा प्रचार करण्यात आला. संसदेत भाषणे झाली. शेवटची गोळी आणि शेवटच्या माणसापर्यंत लढण्याची भाषा देश करू लागला. कुठलीही तयारी नसताना सैन्याला लढाईत  ढकलण्यात आले. त्यात भारताचा भयानक पराभव झाला. अनेक सैनिक मारले गेले. अनेक कैद झाले. पण अमेरिकेचा उद्देश साध्य झाला. भारत-चीन शत्रू झाले.  ही कारस्थाने ज्याने  केली त्या IB ला मात्र काही झाले नाही.

पुढे जावून इंदिरा गांधीना हया कारस्थानांची माहिती झाली. त्यांनी IB ला तोडून टाकले. त्यातून raw (Research and Analysis Wing) निर्माण केली. raw ला परदेशात काम करण्याचे काम दिले व IB ला अंतर्गत सुरक्षेचे काम दिले. २००८ ला raw ने IB ला ४ दिवस आधी माहिती दिली होती की कसाब आणि टोळी मुंबईवर हल्ला करायला निघाली आहे. पण IB ने ही माहिती लपवून ठेवली. मुंबई पोलिसांना कळवली नाही किंवा नवदलाला कळवली नाही. जर IB ने वेळीच कळविले असते तर मुंबईचा हल्ला झाला नसता. हा हल्ला करकरे अन कामते / साळसकरांना मारण्यासाठी झाला असे अनेक लोकांनी मत मांडले. करकरेंची हत्या झाली म्हणून आज साधवी आणि कर्नल पुरोहित सुटले हा काही योगायोग नव्हे. त्यातून इतका गलथानपणा होवून देखील एकाही अधिकाऱ्याला शिक्षा झाली नाही. कॉंग्रेस सरकारनी हे प्रकरण दाबून टाकले. म्हणजेच कॉंग्रेसचे हया हल्ल्याला मूक समर्थन होते असे मी मनमोहन सिंघना पत्र लिहून सांगितले. फक्त विलासराव आणि आर. आर. पाटीलचा राजीनामा घेतला.  हे दोषीच नव्हते.

देशाच्या बाहेरून जेंव्हा हल्ला होतो त्याला महाराष्ट्र पोलीस काय करणार? ते प्रामुख्याने RAW चे काम आहे. RAW ने आपले काम केले पण IB ने देशद्रोह केला. पण शिक्षा कुणालाच नाही. बर माजी मुख्यमंत्री आणि तत्कालीन खासदार अंतुलेनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला तर त्यांचे तोंड बंद करण्यात आहे. साधी चौकशीसुद्धा कॉंग्रेस सरकारने केंद्र शासनाद्वारे लावली नाही. करकरे सकट निरपराध लोकांची हत्या कॉंग्रेस सरकारने दाबून टाकली. दोष राज्याला देवून मोकळे. म्हणून मी त्यांना सापनाथ म्हणतो. भाजप त्यांचा छोटा भाऊ नागनाथ आणखी जोरात आहे. भाजपने साधी चौकाशीची मागणी तर केलीच नाही तर आता करकरेचे काम नविन भूत NIA ला पुढे करून खोटे ठरवत आहेत. त्यामुळे कॉंग्रेस/भाजप हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत हे स्पष्ट होते.

इथे धर ने कबुल केले की बाबरी मस्जिद पाडायचे काम त्यांच्या घरातून सुरु झाले.  जागतिक आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा  भाग होता आणि नरसिंह रावांना पूर्ण माहिती होती. त्याचबरोबर राजीव गांधीचा खून देखील सिंगापूर मधून झाला. पण या दोन्ही घटनांचा शोध लावण्याचे काम कॉंग्रेस सरकारने हाणून पाडले. सोनिया गांधीनी देखील खरे अपराधी शोधून काढण्याचा प्रयत्न हाणून पडला. अनेकदा प्रयत्न करून देखील मनमोहन सिंघानी या कुठल्याच घटनेची माहित लोकांना मिळू नये याची खबरदारी घेतली. म्हणूनच मी आमदारकीचा राजीनामा देवून कॉंग्रेस पक्ष सोडला. आता वृत्तपत्रात छापून आणण्यात येत आहे की कॉंग्रेसमध्ये परत हजर होत आहे. हा मोठा विनोद आहे. अनेक राज्यात कॉंग्रेस संपली. महाराष्ट्रात तर त्यांची शेवटची घरघर ऐकू येत आहे, मग मी काय ओसाड गावचा राजा होण्यासाठी तिथे जाणार आहे का. सापनाथ कॉंग्रेस आणि नागनाथ भाजप एकच  आहेत. त्यांना दोघांना तडीपार केल्याशिवाय भारताला वाचवता येणार नाही. म्हणून मला जाहीर करायला भाग पाडले की कॉंग्रेस आणि भाजप विरहित आघाडीची बांधणी मी सुरु केली आहे. त्याला महाराष्ट्राच्या जनतेने साथ द्यावी.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट: www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS