सामुहिक संकल्प

 

सामूहिक संकल्प

आजकाल   सकाळी कुठलेही दैनिक उघडले तर बलात्कार किंवा स्त्री शोषणाची बातमी ठळक  मथळ्यात दिसलीच पाहिजे असा जणू नियमच झाला आहे. आज लग्न संस्था धोक्यात आहेत, घटस्फोट वाढत  आहेत. विषारी रासायनिक अन्नामुळे नपूसंकता वाढत चालली. त्यामुळे शारिरीक सुख मिळवण्यास लोक असमर्थ आहेत. त्यातूनच क्रूरता वाढत चालली आहे. परिणामत: अत्यंत हिंस्र बलात्कार आणि हत्या होत आहेत. वैज्ञानिक प्रगतीचा दुष्परिणाम विकृत सेक्समध्ये होत आहे. इंटरनेटमुळे लहान मुले सुद्धा विकृत सेक्स; त्यातल्या त्यात, सामुहिक बलात्काराचे चित्रण बघतात.  यालाच जोडून शराब आणि इतर अनेक प्रकारची नशा.  सेक्स  आणि शराब हे आजचा स्त्रीच्या  अत्याचाराचे मूळ आहे. आमच्या बालपणातील भारत काहीं निराळाच होता. म्हणूनच राहून राहून वाटते बालपणाचे दिवस सुखाचे, आठवती घडी घडी. पालकांचा, शिक्षकांचा आदर हा नैसर्गिकच वाटत असे. दारू पिण्याचे डोक्यात देखिल नव्हते.  तर आज मुलांच्या पार्ट्या दारू पिल्याशिवाय पूर्ण होत नाही.  दारूच्या नशेत आई-बहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखे बघू लागतात.  मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागतात व भगिनींच्या अब्रुचे धिंडवडे उडवू लागतात, असे अनेक प्रकार भारतभर फोफाऊ लागले.

पण या स्थितीला जबाबदार सरकार आणि पोलीस तर आहेतच, पण समाजसुद्धा आहे. मला हे स्पष्टपणे यवतमाळ  येथील मुलींवरील पोलीस अत्याचारात दिसले. पोलीस हे स्त्रियांचे रक्षणकर्ते नसून भक्षणकर्ते असल्याचे स्पष्ट जाणवले. त्याला सरकार ही काहीच करू शकत नाही हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दाखविले.  सृष्टी प्रवीण दिवटे, वय-२१, यवतमाळ येथील रहिवासी. २७/०८/२०१६ रोजी प्रवीण दत्तूजी दिवटे, तिचे दिवंगत वडील यांचा  बंटी उर्फ आनंद जयस्वाल, विशाल दुबे, विक्की राय व अनेक लोकांनी  डोळ्यात मिर्ची पावडर टाकून धारधार शस्त्राने तसेच ४ गोळ्या घालून अतिशय क्रूरपणे खून केला आहे.  या सर्व घटनेची सृष्टी प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्यानंतर पोलिसांनी सृष्टीच्या कुटुंबास त्रास देण्यास सुरुवात केली. आई आणि दोन बहिणच कुटुंबात आहेत. त्यांच्यावर  ३०७ सारखे खोटे गुन्हे दाखल केले. वास्तविक जखम असल्याशिवाय ३०७ कलम लावता येत नाही. तरी  १७ वर्षाच्या श्वेताने पिस्तुल दाखविले म्हणून पोलिसांनी आरोपीच्या साथीदारांच्या तक्रारीवरून ३०७ चे कलम त्यांच्यावर लावले.  तिच्याकडे पिस्तुलच नाही.  पोलीस वेळो-वेळी आरोपींना मदत करत होते.  मुली बाहेर गेल्या  की गाडीला अडविणे, धमकावणे, घरासमोर येऊन शिट्या मारणे, उचलून घेऊन जाण्याची धमकी देणे, तुमचा कोपर्डी करू अशाप्रकारे मुलींवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. परंतु त्यांची तक्रारच पोलीस घेत नाहीत. त्यांना कोणाचाच आधार नाही.  सर्व गुंड उत्तर भारतीय आहेत आणि भाजपचे लोक आहेत. शेवटी मुलींनी मला फोन केला. मी या मुलींना किंवा त्यांच्या कुटुंबियांना ओळखत देखील नव्हतो. पण शिवरायांचा मावळा असल्यामुळे; कुणीही भगिनींने हाक मारली तर धावून जातो.

११/०७/२०१७ रोजी मी त्यांच्या घरी गेलो. माझ्या लक्षात आले की हे परप्रांतीय लोक मुलीचा घात करू शकतात. म्हणून  तक्रार निवेदन घेऊन पोलीस अधिक्षक,यवतमाळ यांचेकडे गेलो व  बोलणे केले, त्यानंतर पोलीस अधीक्षक यांनी मला सांगितले की, मुलीबरोबर खाजगी बोलायचे आहे. वास्तविक महिला पोलीस बरोबर असल्याशिवाय पोलिसांनी एकांतात मुलीबरोबर बोलायचे नसते. हा गुन्हा आहे. तरी देखिल चांगल्या भावनेने मी बाहेर गेलो. २ बहिणीना  तिथेच बसवून घेतले व पोलीस अधिक्षकाने  अर्वाच्य भाषेत मुलींना धमकावले.  तुम्ही शांत बसा, नाहीतर मी तुम्हा दोघींना जेलमध्ये पाठवेन, त्या आरोपीच्या नादाला लागू नका, ते लोक तुम्हाला जीवे मारतील अशा भाषेत मुलींचा  अपमान केला व आरोपींची भीती दाखवली. एका  IPS अधिकार्‍याने पोलिसांच्या वर्दीचा अपमान केला. युपीचा पूर्ण गुंडाराज यवतमाळमध्ये उत्तर भारतीयांनी स्थापन केला आहे. मराठी माणूस मात्र घाबरून बसला आहे. आरोपींचा  दारूचा व्यवसाय आहे.  मी मुलींना घेऊन गृह राज्यमंत्री केसरकर आणि मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि मुलींना सुरक्षा देणे व पोलीस आणि अधिक्षकावर कडक कारवाई करण्यास आग्रह धरला आहे. तसेच तपास C.B.I मार्फत करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तक्रार निवेदन सादर करून देखिल काहीं कारवाई न झाल्यास आरोपी मुजोर होतील व मुलींच्या  जीवितास व अब्रूस धोका निर्माण करतील हे देखिल मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे.  तरी आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी  कुठलेच पावूल उचलले नाही. यावरून त्यांची महिला विषयीची मानसिकता स्पष्ट होते. म्हणून  ६ ऑगस्टला यवतमाळ येथे  पुढची दिशा ठरवण्यासाठी मी जात आहे.

निर्भया हत्याकांडानंतर, कायदा कडक केला पण कोपर्डीसारखे प्रकार वाढतच आहेत.  हात पाय कलम करणारा शिवराय पुन्हा केव्हा निर्माण होणार याची वाट सर्व अबला बघत असतील.  पण तो कधीच निर्माण होणार नाही हे लक्षात ठेवा.  आपले सरंक्षण आपणच करायचे. आपणच आपल्या मुलींचे सामुहीक सरंक्षण केले पाहिजे.   कुणाचीही मुलगी किंवा स्त्री उचलावी अन उपभोग घ्यावा, असे  आज जंगल राज स्थापन झाले आहे.   मनमोहन सिंग, शरद पवार, मोदी, सोनिया गांधी, मायावती  किंवा उद्धव ठाकरेंनी, स्त्री अत्याचारावर काही म्हटल्याचे किंवा केल्याचे मला तरी आठवत नाही.  सर्व प्रश्नापेक्षा हाच प्रश्न आज समाजाला भेडसावत आहे.  भयभीत करत आहे.  पण शासन दुसरीकडे बघत आहे. श्रुती दिवटे आणि कुटुंब आज पोलिसांकडे जावूच शकत नाही. कारण पोलीस कायद्याचे नाही तर गुंडांचे काम करत आहेत. संपूर्ण समाजाच्या भावना आता या ज्वलंत प्रश्नाशी जोडल्या गेल्या आहेत. स्त्री अत्याचार  या देशाला कलंक  आहे.  हा संपूर्ण स्त्रीजातीचा प्रश्न आहे, कोण जाती जमातीचा नाही.त्यामुळे सर्व समाजाने एकसंघ प्रतिकार केला पाहिजे.

असे का होते?  त्याचे कारण आजची आजची विकृत व्यवस्था आहे.   अमेरिकन भांडवलशाहीने एक नविन संस्कृती निर्माण केली.  सेक्स आणि शराबची.  भांडवलशाहीने उपभोगवादाला जन्म दिला.  ओरबडून खायचे.  शरीराची भूक भागवण्यासाठी जगायचे. नीतीमुल्य हे शब्दकोशातून हद्दपार झालेत. वाटेल ते करा पण नफा झालाच पाहिजे.  ही आजची संस्कृती.  भारताची संस्कृती काय?  साधी राहणी उच्च विचारसरणी, अशी होती.   तिचे समूळ उच्चाटन करून सनी लिओनला मान्यता देऊन पैशासाठी सेक्स करण्याला प्रतिष्ठा दिली.  तिच्या सेक्स करताना अनेक फिल्म, क्लिप प्रसारीत झाल्या आहेत.     अशा अवस्थेत भारतीय समाज विध्वंसाकडे झपाट्याने चालला आहे.  कोण रोखणार?  सरकार? अजिबात नाही.  कायदा हया गोष्टी रोखू शकत नाही.  तर समाजालाच हा उठाव करावा लागेल.  सिनेमातील विकृत चित्रण आधी बंद केले पाहिजे.  सेन्सॉर बोर्ड तर मनमोहन/मोदींच्या राज्यात नसल्यासारखाच आहे.  हे सिनेमा जनतेने बंद पाडले पाहिजेत.  सभ्यता अशी काही गोष्ट अस्तित्वात आहे हे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना संस्कारित केली पाहिजे.   गावागावात महिला सुरक्षा दल स्थापन केले पाहिजे.  एकंदरीत भारताच्या संस्कृतीत जीवनाची पूर्नबांधणी झाली पाहिजे.  हे सोपे नाही, पण अशक्य देखिल नाही. यासाठी महिलांनाच पुढाकार घ्यावा लागेल. सर्व समाजातील संघटनांना  माझे आवाहन आहे की, स्त्री सुरक्षा आणि सन्मान हेच एकमेव उद्दिष्ठ ठेवा.  जिजाऊ, ताराराणी, सावित्रीबाई, अहिल्याबाई, रमाबाई  यांचा आदर्श बाळगून स्त्री सन्मानाचे नविन पर्व भारतात आणू.  ६ ऑगस्ट २०१७ ला  यवतमाळ येथे स्त्री सन्मानाचा सामूहिक संकल्प करू.

लेखक :  ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं.   ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS