सुदृढ भारत_२६.१२.२०१९

कुपोषणावर अनेक वाद विवाद झाले.पण सत्य हेच आहे की भारत कुपोषित आहे. एकंदरीत अन्न मिळते पण ते विषारी असते.  कुपोषण बरोबर विष पण शरीरात पसरत जाते. त्यामुळे अनेक आजाराने भारतीय जनता हैराण झाली आहे. कॅन्सर, मधुमेह, हृदय विकाराने भारतीय जनता ग्रासलेली आहे. आपल्या मुलांचे हाल तर बेहाल आहेत. अकाली वृद्धत्व, नपुसंकता, तणाव, अनेक रोग आपल्याला जीवनातील आनंदापासून दूर ढकलून टाकतात. ‌सोबतीला डॉक्टर लोक आपल्याला अशी जालीम औषधे देतात की शरीराचे अंतरंग जळून जाते. एकंदरीत कुपोषण हे गरिबालाच नाही तर श्रीमंत कुटुंबात सुद्धा पेप्सी, पिझ्झा, बर्गरमुळे शरीर विकलांग होऊन जाते. भारताच्या इतिहासात भारतावर सर्वात मोठे संकट आज आहारापासून निर्माण झाले आहे. मागील काळामध्ये अन्नधान्याचा तुटवढा असल्यामुळे अन्न पिकविण्याची नवीन पद्धत सुरू झाली त्यालाच ‘हरितक्रांती’ म्हणतात.  रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला.  भारताची पारंपारिक शेती आपण विसरलो व पाच्छीमात्य पद्धतीने शेती करू लागलो. अर्थात, आपल्या आहारात रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अवशेष सामील झाले. 

            कुठलाही शेतकरी युरिया आणि फॉस्फेट सरळ खात नाही.  कारण ते विषारी असते, पण अन्न पिकविण्यासाठी आपण त्याचा वापर करतो व अप्रत्यक्षरित्या या रासायनिक पदार्थांचे अवशेष आपल्या शरीरात जातात व कालांतराने कॅन्सर, मधुमेह, हृदयविकार निर्माण होतात.  म्हणूनच आजकाल २५ वर्षाच्या तरुणांनाही हे रोग व्हायला लागले आहेत.  त्यामुळे भारतीय जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.  जपानसारखे करोडो लोक वृद्धकाळापर्यन्त आजारी राहिले तर वाढत्या आजारी लोकसंखेच्या आरोग्यासाठी किती करोडो रुपये लागतील याची कल्पना सुद्धा करवत नाही.  त्यामुळे हया आजारी लोकसंख्येचे प्रमाण कमीत कमी करायला पाहिजे.  हे सरकारचे प्रथम लक्ष पाहिजे. 

            ते करण्यासाठी लोक आजारीच पडू नयेत यासाठी काय करता येईल हे पाहणे आवश्यक आहे.  त्यावर सरकारने प्राधान्याने काम केले पाहिजे.  हे करण्यासाठी मुख्यत: जनतेच्या आहारावर आपल्याला लक्ष दिले पाहिजे.  अन्नामुळे जनतेच्या शरीरात प्रसार होणारे विष बंद केले पाहिजे.  लोकांना ती जाणीव झाली आहे.  सरकारला ते कळत आहे.  पण यावर काय उपाय योजना करायची हे कळत नाही.  दुर्दैवाने आपली कृषि शास्त्रज्ञांनी हरित क्रांती नंतर शेती करण्याच्या नवीन पद्धतीचा विचारच केला नाही व फक्त गोर्‍या लोकांचे अनुकरण करायला बघितले.  भारत हा शेती प्रधान देश आहे.  हे काय गोर्‍या लोकांच्या शास्त्रामुळे नव्हे.  तर शेती हा भारताची प्राचीन संस्कृतीचा पाया आहे.  आपण १० हजार वर्षे शेती करत आहोत.  तर युरोप आणि अमेरिकेत शेती हे नवीन शास्त्र आहे.  इंग्लंड, अमेरिका सारख्या अनेक देशात बटाट्याशिवाय काही पिकत नव्हते, म्हणून हे देश मांसाहारी होते.  ते तर पाणी सुद्धा पित नव्हते.  कारण त्यांचा समज होता पाण्यातूनच प्लेग होतो.  म्हणून त्यांची संस्कृती दारू आणि वाईन पिण्यावर अवलंबून होती.  त्यामानाने भारत अत्यंत प्रगतीशील होता.  मुबलक अन्नधान्य होते.  त्यावरच एक सुदृढ आणि समृद्ध समाज उभा राहिला.  म्हणूनच भारताची समृद्धी लुटायला आपल्या देशावर अनेक आक्रमणे झाली.  आजही वेगळ्या स्वरुपात तेच चालू आहे. 

            अन्नातील विष काढून टाकण्यासाठी रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा वापर बंद झाला पाहिजे.  या विचाराला विरोध करणारे लोक आणि संघटना बर्‍याच आहेत.  जगातील ५ महाकाय उद्योग आपले प्रभुत्व जगाच्या शेती व्यवसायात ठेवण्यासाठी प्रत्येक सरकारला ताब्यात ठेवण्यासाठी त्यांचे दलाल प्रत्येक देशात काम करत आहेत.  या महाकाय कंपन्या नविन नविन औषधे, कीटकनाशके, शेती शास्त्र निर्माण करतात व आपली प्रचार यंत्रणा वापरुन आपले शास्त्र जिवंत ठेवतात.  पद्मश्री पाळेकर गुरुजींनी पर्यायी शास्त्र उभे केले.  त्याकडे कृषि विद्यापीठाने व भारतीय अनुसंधान परिषदेने लक्ष का घालू नये? व फक्त गोरा माणूस जे शास्त्र निर्माण करतो, त्याच्यावरच अवलंबून का रहावे? या मानसिक गुलामगिरीनेच भारताच्या अर्थव्यवस्थेची वाताहात केली आहे.  सुदैवाने पाळेकर गुरुजीसोबत सतत काम करणार्‍या आमच्या सारख्या अनेक लोकांनी सरकारी दरबारी त्याची नोंद घ्यायला लावली व नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव यांच्यामुळे केंद्र सरकारने नैसर्गिक शेतीला मान्यता दिली व निधि सुद्धा या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला. 

            या चळवळीचे यश केवळ सरकारवर अवलंबून मिळणार नाही तर जन चळवळ उभी राहिली पाहिजे.  ज्या पद्धतीने गोर्‍या माणसांनी आपल्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बाबींमध्ये घुसून त्याचा कब्जा केला त्याप्रमाणेच आपल्याला गावागावात याचा प्रसार करावा लागणार व परिवर्तन घडवून आणावे लागेल.  म्हणून परिवर्तनाचा अर्थ समजून घेणे अति महत्त्वाचे आहे.  कुठल्याही समाजाचे आणि देशाचे उद्दीष्ट आपल्या देशाला समृद्ध आणि आनंदी करण्याचे असले पाहिजे.  जो सुदृढ आहे तोच आनंदी असू शकतो.  नाहीतर कॅन्सर असलेला माणूस जरी करोडोपती असला तरी दु:खाच्या खाईमध्ये लोटला जातो.  म्हणून आरोग्य सुदृढ बनवण्याची चळवळ गावागावात उभी राहिली पाहिजे. त्यासाठी लागणारा पैसा व यंत्रणा आपल्याकडे आहे पण मानसिकता नाही व अज्ञान आहे.  जरी सरकारने नैसर्गिक शेतीला अधिकृतपणे स्विकारले असेल तरी विद्यापीठे आणि कृषि अनुसंधान परिषद  यावर काम करायला तयार नाही.  म्हणून आम्ही सुरुवात ही गावातून केली.  प्रत्येक गावात आधी शाळांना एकत्र केले व शाळेमध्ये विद्यार्थाकरवी परसबाग निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.  ग्रामपंचायत, शेतकरी, आमच्या संस्था व शाळा यांना एकत्रितपणे हा कार्यक्रम हातात घ्यायला विनंती केली आहे.  नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिक क्षेत्र निर्माण केले आहे. 

            विषमुक्त अन्न निर्माण करण्याबरोबर पोषक आहार निर्माण करणे याला प्राथमिकता देण्याची गरज आहे. त्यात पोषक भाज्या व डाळी त्याचबरोबर फळफळावळचे उत्पादन शेतकर्‍यांनी स्वत:च्या वापरासाठी केले पाहिजे.  त्यामुळे देशाचे लक्ष नुसते अन्नाचे उत्पादन वाढवून चालणार नाही.  तर अन्नाचा दर्जा वाढवला पाहिजे व अन्न पोषक पाहिजे.  दुसरीकडे आरोग्य केवळ अन्नावरच अवलंबून नाही तर व्यायाम आणि शारीरिक कष्ट तितकेच महत्त्वाचे आहे.  सांस्कृतिक व सामाजिक बंधनामुळे आपल्या स्त्रिया या शारीरिक व्यायामापासून वंचित राहतात.  या भारतभूमीतच योग अभ्यासाची निर्मिती झाली पण त्याचा वापर फार कमी लोकात होत आहे.  मी माझ्या सैनिकी सवयीप्रमाणे सकाळी लवकर उठून जिथे असेन तिथे व्यायामाला बाहेर पडतो.  पण कुठल्याही शहरात गेलो तरी व्यायाम करणारी मंडळी ही मध्यमवयाचे व जेष्ठ नागरिक दिसतात.  युवा पिढी क्वचितच दिसते.  ही अलिकडील पिढीतील कमतरता आहे.  या देशातील एकमेव संघेटनेतील सर्व माणसे सकाळी ६.३० ला देशभर व्यायाम करताना दिसतील ते म्हणजे भारतीय सैन्य. सैन्याप्रमाणेच सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये, गावागावामध्ये, गल्लीगल्लीमध्ये सकाळी ६.३० ला भारत रस्त्यावर दिसला पाहिजे.  सामाजिक, राजकीय, कार्यकर्त्यांनी, सेवाभावी संघटनेने, सर्व ग्रामपंचायतीनी व्यायामाची संस्कृती निर्माण केली पाहिजे. त्यात विशेषत: स्त्रियांनी पुढाकार घेतला पाहिजे.  ज्या देशातील माता सुदृढ असतील, तोच देश सुदृढ राहील. भारतीय परंपरेने महिलांना सकाळी दौड घालण्यापासून बंधन घातले आहे.  या देशात २५ वर्षाची विधवा स्त्री ताराराणी घोड्यावर बसून थेट औरंगजेबावर हल्ला करायची. तिचे इतिहासातून नामोनिशाण मिटवून टाकले. मनुवादी संस्कृतीत स्त्रियांचे काम फक्त चूल आणि मूल आहे.  त्या पाशातून आजची स्त्री मुक्त होत आहे.  म्हणून मुलींनी आणि स्त्रियांनी खेळामध्ये आणि व्यायामामध्ये  स्वत:ला झोकून दिले पाहिजे.  कारण स्त्री ही माता असते आणि सुदृढ स्त्रीच एका सुदृढ बालकाला जन्म देऊ शकते.   भारतातील ७०% स्त्रिया या कुपोषित आहेत आणि अॅनमिक आहेत.  सुदृढ भारत निर्माण करण्यासाठी स्त्रियांना सुदृढ व्हावे लागेल व त्यासाठी व्यायाम, खेळ आणि आहार याच्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि राष्ट्र उद्दिष्टाचा तो प्रथम भाग असेल.  पण याची सुरुवात प्रत्येक गावातून करावी लागेल.  या चळवळीचे आपण सर्व कार्यकर्ते बनू आणि देशाला सुदृढ करू.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS