पुलवामा येथील एका आत्मघातकी दहशतवाद्याने CRPF च्या गाडीवर हल्ला केला. त्यात ४४ CRPF चे जवान मारले गेले. ही भयानक घटना ऐकून देश हळहळला. पेटुन सूड घेण्याची मागणी होऊ लागली. वायूदलाने दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर ठीकठिकाणी हल्ला केला. त्यात ‘मिराज २०००’ विमाने वापरण्यात आली. हवेतून माहिती गोळा करणारे विमान ‘नेत्र’ वापरण्यात आले, अत्यंत आधुनिक उपकरणे असणारे हे विमान भारतातच HAL ने बनवलेले आहे. त्याचबरोबर मिराज २००० चे संरक्षण करणारे विमान विरोधी विमाने वापरण्यात आली. प्रचंड जन प्रक्षोभ झाल्यामुळे विरोधी पक्षांनी सुद्धा एकसंघ पाठींबा दिला वायुदलाने बालकोट, मुजफराबाद आणि चकोटी येथे दहशतवादी केंद्रावर हल्ला केला. १२ मिराज २००० विमानाने प्रत्यक्ष PRECISION GUIDED बॉम्बने हल्ला केला. हजार किलो बॉम्ब अचूकपणे आपल्या निशाणावर पोहचले. वायूदलाला या कारवाईत नेत्रदीपक यश मिळाले. दहशतवाद्यांच्या ठाण्यांची अचूक माहिती आपल्या गुप्तहेर खात्याने मिळविली होती.
प्रतिकार म्हणून पाकिस्तानने देखील आपली विमाने भारतीय हद्दीत घुसविली. त्यांना परतवून लावण्यासाठी आपली MIG-२१ विमान पुढे सरकवली व त्यांना पिटाळून लावले. त्यात आपले १ वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात गेला. सरहद्दीच्या दोन्ही बाजूला सैन्याची जमवाजमव झाली आणि तोफांचा भडीमार करू लागली. युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली. आता पुढे काय होणार? एकीकडे इम्रान खानने सलोख्याची भूमिका घेतली. तर दुसरीकडे भारताने सुद्धा हे हल्ले पाकिस्तान विरुद्ध नसून दहशतवाद्यांच्या विरोधात आहेत असे जाहीर केले. त्यामुळे हा हल्ला मर्यादित स्वरूपाचा आहे असे वातावरण निर्माण झाले. सोबतच जगातल्या सर्व देशांचे समर्थन मिळविण्यात भारत यशस्वी झाला. अमेरिकेने चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर चीनने सुद्धा दोन्ही देशांना संयम पाळायचा सल्ला दिला. हे सर्व जरी खरे असेल तरी पाकीस्तान बाहेरच्या दबावाला अजिबात विचारत नाहीत, याचे कारण पाकिस्तान हा अमेरिकेचा लाडका देश आहे. आज अमेरिकेला अफगाणीस्तानमधून सैन्य काढून घ्यायचे आहे. १५ वर्ष तालीबानविरुद्ध लढून अमेरिकेच्या हाथी काही लागले नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये अमेरिकेला पाकिस्तानची प्रचंड गरज आहे. वरवर काही बोलले तरी अमेरिका पाकिस्तानला प्रचंड मदत करणार किंबहुना पाकिस्तानमध्ये दहशतवादी टोळ्यांची मूळ पेरणी अमेरिकेनेच केली आहे. उसामा-बिन-लादेन पासून हाफिज सय्यद पर्यंत सर्व दहशतवादी टोळ्या अमेरिकन CIA ने पाकिस्तानमध्ये आणल्या व पाकिस्तान आय-एस-आय-च्या ताब्यात दिल्या. त्याबरोबर पाकिस्तानने काही दहशतवादी टोळ्या भारताविरुद्ध लढण्यासाठी निर्माण केल्या, ह्या सर्व युद्धाला सौदीअरेबियाने सगळा पैसा दिला. त्याचबरोबर अफूची शेती करणारे व तस्करी करणाऱ्या अफगाण टोळ्या दहशतवाद्यांना मिळाल्या व आंतरराष्ट्रीय माफिया दहशतवाद्यांचा वापर करू लागला. हत्याराच्या बदल्यात ड्रग्स असा आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु झाला.
पाकिस्तानने ८० च्या दशकात सिख, श्रीलंकेतील लिट्टे आणि काश्मिरमधील दहशतवादी गटांना हाताशी धरले. भारतात हिंसाचाराचा आगडोंब उसळला. भारतीय सैन्याची त्रेधा तिरपिट झाली. त्यामुळे ११९१ नंतर शांतता प्रस्थापित करण्यामध्ये शंकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रयत्न सुरु झाले. श्रीनगर मध्ये २५०० दहशतवादी यांना आत्मसमर्पण करायला आम्ही सर्वांनी काम केले. पंजाब, आसाम शांत करण्यात आला. काश्मिरमध्ये ११९५ ला शांततापूर्वक निवडणुका घेण्यात आल्या. आम्ही आत्मसमर्पित दहशतवाद्यांना भारतीय सैन्यात घेण्यासाठी आग्रह धरला. त्याप्रमाणे २००३ – २००६ मध्ये ८००० काश्मिर तरुणांचे आणि दहशतवाद्यांचे सैन्य उभारण्यात आले व हळूहळू दहशतवाद संपुष्टात आला. २०१४ पर्यंत पूर्ण शांतता प्रस्थापित करण्यात आली. त्यातच २०१४ नंतर अत्यंत शांततापूर्वक निवडणुका काश्मिरमध्ये घेण्यात आल्या व मुफ्ती महम्मद-भाजपा सरकार स्थापन झाले. मुफ्ती महम्मदचा पक्ष म्हणजे दहशतवाद्यांचा पक्ष साहजिकच पुन्हा दहशतवाद उसळला तो थेट उरी हल्ला ते पुलवामा पर्यंत आला. या पूर्ण इतिहासात एक गोष्ट स्पष्ट होते कि सैन्याने लोकांना आपल्या सारखे करण्यामध्ये प्रचंड यश मिळवली. पण २०१४ पासून परिस्थिती बिघडत गेली.
या पूर्ण काळामध्ये जवळ जवळ १०००० सैनिक मारले गेले. एवढे सैनिक कुठल्या युद्धामध्ये सुद्धा मारले जात नाहीत. त्यामुळे प्रश्न असा पडतो कि केव्हा पर्यंत आपण हे सहन करणार? काश्मिरमध्ये हे लुटूपुटूचे खेळ बंद करून कायमचा तोडगा काढण्यासाठी काय केले पाहिजे? माझ्या मते दोनच पर्याय आहेत. एक म्हणजे पूर्ण शांतता प्रस्थापित करणे व ते जमत नसेल तर युद्ध करणे मग पाकिस्तानचा कायमचा निकाल लागेल. गेल्या ४० वर्षात शांतता प्रस्थापित करण्यामध्ये भारत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. मग पर्याय एकच उरतो ते म्हणजे युद्ध. पाकिस्तानभर बंड चालू आहे. भारताने जर युद्ध करण्याचे धाडस दाखवले तर पाकिस्तानचे चार तुकडे होतील. दहशतवादामध्ये आणखी लोक मरण्यापेक्षा एकदाचा कायमचा निकाल काढला पाहिजे. कारगिल युद्धामध्ये ही संधी चालून आली होती. वाजपेयीजी नवाज शरीफला मिठ्या मारत होते त्याचवेळी मुशरफने भारतात सैन्य घुसवले व कारगिल भागात कब्जा केला. अनेक प्रयत्न करून देखील उंच डोंगरावर असलेल्या पाकिस्तानच्या चौक्यावर आपण कब्जा करू शकत नव्हतो. म्हणून भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसण्याची परवानगी मागितली. पण सरकारने परवानगी दिली नाही. कारण वाजपेयीवर अमेरिकेचा दबाव होता. आज देखील तोच दबाव भारतावर आहे. अणुवस्त्रधारी देशांनी युद्ध करायचे नाही हा एक प्रवाद आहे पण संयम फक्त भारताने राखायचा आणि पाकिस्तानने वाटेल ते करायचं असे कधीपर्यंत चालणार? भारत सरकार भारताच्या राष्ट्रहिताचे निर्णय घेणार, की अमेरिकेच्या दबावाखाली नमणार हे आव्हान भारत सरकार आणि मोदींसमोर आहे.
कुठलाही देश लोखंडाने, रक्ताने घडतो. अस्सीम त्यागाच्या परंपरा असलेल्या भारतीय सैन्याने कधीही देशाला निराश केले नाही. प्रत्येक क्षेत्रात देशाची शेवटची शक्ती म्हणून कणखरपणे उभे राहिले आहे. हे सैनिक ३२-३३ व्या वर्षी निवृत्त होतात. नंतर नोकरीसाठी वणवण भटकतात. तरीही काहीच तक्रार करत नाहीत. कुठल्याही सरकारने विचार केला नाही कि यांना पण ५८ वर्षापर्यंत नोकरी दिली पाहिजे. पोलिसात घेतले पाहिजे. फक्त कुणी शहीद झाला तर राजकर्ते मगरीचे अश्रू ढाळतात. या प्रश्नावर मी विस्तृतपणे लिहिणारच आहे. पण तूर्त जनतेला जाणीव करून देण्यासाठी हा विषय मी मांडला आहे. प्राप्त परिस्थितीत काश्मिरमध्ये कायमचा तोडगा काढण्यासाठी सैन्यदल मागे हटणार नाही. आता तुम्ही मागे हटू नका हीच अपेक्षा.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९