हिंदी-चीनी भाई भाई …. ?
पाकिस्तानचे भारताने १९७१ ला २ तुकडे केले तेव्हा भुत्तो म्हणाले होते कि, भारतावर आम्ही हजार वार करू, आम्ही गवत खाऊ पण अनुबॉम्ब तयार करू. सूड भावनेने पेटलेल्या पाकिस्तानी सैन्याला अमेरिका आणि सौदी अरेबियाने प्रचंड शक्ती दिली आहे. अमेरिका आणि चीन एकमेकांच्या विरोधात दिसत आहेत. पण पाक बाबतीत ते एकत्र आहेत. ह्या सर्व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भारत शिकार झाला आहे. दुर्दैवाने भारताच्या राजकर्त्यांनी ह्याला योग्यवेळी योग्य कृती न केल्यामुळे भारत एकटा पडत आहे. चीनची समस्या आणखी गहन आहे. चीन-भारत हे स्वातंत्र्यानंतर मित्र झाले. भारत-चीन-रशिया जर एकत्र आले तर अमेरिकेचा पराभव निश्चित होता. म्हणून अमेरिकेने भारतीय गुप्तहेर संघटनेला विकत घेतले. Intelligence Beuro (IB)खोटे अहवाल देवून सीमावाद निर्माण केला.IB चे प्रमुख मुलिक हे पंडित नेहरूंचे सुरक्षा सल्लागार होते. हिंदी चीनी भाई भाईचे वातावरण त्याकाळी निर्माण झाले. म्हणूनच अमेरिकेने मुलीक यांना वापरून भारत चीन मध्ये मुलीक द्वारा संघर्ष पेटवला. राजकीय अपरिपक्वतेमुळे नेहरूंनी भारतीय सैन्याची कुठलीही तयारी नसताना युद्धात लोटले. आमचे अनेक सैनिक मारले गेले अनेक कैदी झाले. चीनने आमचा बराच भाग कब्जा केला. ह्या विध्वसाचे प्रमुख शिल्पकार मात्र नामानिराळे राहिले. युद्धात यश मिळाल्यावर चीनने आपले सैन्य मागे घेतले. ह्यावरून स्पष्ट झाले कि चीनला पुढे जाऊन भारताशी मैत्री करायची आहे.
अनेक वर्ष तणावात गेली. १९७७ ला राजीव गांधीनी आणि नंतर वाजपेयींनी चीन बरोबर पुन्हा मैत्री करण्यास सुरुवात केली. सीमासंघर्ष सोडवण्यासाठी ठोस पाऊल उचलले. सीमावाद सोडला तर भारत चीन कुठलाच वाद नाही. चीन भाषा करू लागले. चीन भारत युद्ध म्हणजे दोन्ही देशांचे अगणित नुकसान आणि गोर्या माणसांचा फायदा. हिच अमेरिकन चाल आपण ओळखली पाहिजे. १९६७ सोडले तर चीनी सीमेवर कधी गोळीबार झाला नाही. आता मात्र डोक्लाम प्रकरणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण करण्यात आली. मिडीयामध्ये लोक डरकाळ्या फोडू लागले. चीनला धडा शिकवण्याची भाषा करू लागले.
पाकिस्तानला नष्ट करण्याचे धोरण सोडून चीनला अंगावर घेण्याची काय गरज आहे. तेच काम मनमोहन सिंघ व आता मोदी करत होते. तेही अमेरिकेला खुश करण्यासाठी. दक्षिण चीनी सागरात भारताचे काय काम आहे? तर आता अमेरिका-जपान-भारत एकत्र चीनविरुद्ध महाकाय सैनिकी नाविक सराव करत आहे. त्यामुळे चीन आपल्याविरुद्ध पाकला आणखी मदत करत आहे. सीमेवर भानगडी निर्माण करत आहे. ह्याचा सर्वात जास्त फायदा पाकला होत आहे. भारताने आपले हित बघावे. ज्या अमेरिकेने सातत्याने भारताला विकलांग करण्याचा प्रयत्न केला; त्या अमेरिकेसाठी चीनला अंगावर घेण्याचे काय कारण आहे? फक्त वृतपत्र आणि टि.व्ही वर गर्जून युद्ध जिंकता येत नाही. त्याला रक्त द्यावे लागते.
म्हणूनच ४सेप्टेंबरच्या ब्रिक्स शिखर ठरावावर जो निर्णय झालात्याचे स्वागतकेले पाहिजे.मोदीजी पिंगच्या संवादात दोन्ही देशांनी ढोकलाम प्रकरण मागे टाकूनआपापसात संबंध चांगले करण्याचा निर्णय जाहीर केला. हा भारताला एक जबरदस्त पाठींबा आहे. ब्रिक्स किंवा BRICS म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चीन, साऊथआफ्रिका. ह्या ५ मोठ्या देशाचे गठबंधन हे जगाला अत्यंत गरजेचे आहे. त्यातूनच अमेरिकन दादागिरीला आपण तोंड देवू शकतो. त्यात चीनने पुढाकार घेतला आहे. आता हे गठबंधन टिकवण्यासाठी, डोक्लाम प्रकरणात चीनने माघार घेतली. आपले सैन्य मागे घेतले. दोन्ही देशांनी शहाणपणा दाखवला. भावनात्मक विरोध न करता; सत्य परिस्थितीवर निर्णय घेतला. बोलणी करुन विषय संपवला व ब्रिक्स शिखर परिषद यशस्वी झाली. ह्या परिषदेत पाचही देशांनी पहिल्यांदाच पाक विरुद्ध भारताला भक्कम पाठींबा दिला. त्यात पाकस्थित दहशतवादी गटांची नावे जाहीर करण्यात आली. जैश–ए-महमद, LETआणि हक्कानी गट जाहीरनाम्यात शामिल करण्यात आले. ही घटना चीनच्या पूर्वीच्या विरोधावर पाहता एक मोठी कलाटणी आहे. पाकसाठी हा मोठा धक्काच आहे. पाक जगात एकटा पडला आहे.
हा भारताचा प्रचंड विजय आहे. पाक हा दहशतवादी देश आहे हे जगाच्या नेत्यांच्या मनात ठासून घेण्यात भारत यशस्वी झाला आहे. दहशतवादापासून भारताची जगात सर्वात जास्त हानी झाली आहे.हे पहिल्यांदाच चीनने पूर्णपणे स्विकारले आहे.
पाकचे भारतावर हजार वार करण्याचे मनसुबे आता उघड झाले. जगाच्या नजरेत आले. पाकवर आता त्यांच्या देशातून जगात हल्ले करणाऱ्या गटांना रोखण्याचे काम करावेच लागेल. त्याचबरोबर दहशतवादाला निपटून काढण्यासाठी ब्रिक्स देश एकत्र काम करतील हे सुद्धा जाहीर झाले. म्हणून भारतातील परिसरात चीन भारत एक होण्याची पुन्हा संधी निर्माण झाली. त्याचा भारताला प्रचंड फायदा शेजारच्या देशात होणार आहे. नेपाळ, भूतान, श्रीलंका हे देश भारताविरुद्ध फक्त चीनच्या मदतीनी उभे राहू शकतात. ब्रिक्स परिषदेत चीनने स्पष्ट केले कि भारत-चीन संबंध हे चीनला अति महत्वाचे आहेत. फक्त भारताने अमेरिकेची चमचेगिरी करून चीन विरुद्ध उभे राहू नये. तसे चीनने पाकला भारताविरुद्ध काहीच मदत केली नाही. १९७१ च्या युद्धात अमेरिकन राष्ट्रपती निक्सन याने चीनला भारताच्या सीमेवर सैन्य जमवायला सांगितले तेव्हा देखील चीनने नाकरले होते.
चीन आता स्पष्टपणे आशिया खंडात संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच त्याने अनेक देशांबरोबर तणाव कमी करण्याची भूमिका घेतली आहे. अमेरिका जपान युतीला तोंड देण्यासाठी, भारत तसेच इतर देशांचे संबंध चांगले ठेवणे त्यांना गरजेचे आहे. तसेच भारत चीन हे शेजारी राष्ट्र आहेत. दोन तृतीयांश जगातील लोक ह्या दोन देशात राहतात. त्यामुळे दोन्ही देशाचे संबंध हे दोन देशासाठीच नाही तर मानवतेसाठी महत्वाचे आहेत. ज्यांग जमीन हे चीनचे तत्कालीन राष्ट्रपती मला म्हणाले होते याची मला आज आठवण झाली. पूर्वी चीन आंतरराष्ट्रीय नियमांना जुमानत नव्हता. पण त्याला बदलावे लागले आहे. चीनचा आर्थिक उदय, आणि भारत तसेच जगाशी व्यापारी संबंध चीनला त्यांच्या आक्रमकतेपासून दूर नेत आहे. चीन पाक संबंध यामुळे धोक्यात आले आहेत. पण तो धोका स्विकारण्याची तयारी चीनने दाखवली आहे. आता याचा फायदा घेऊन भारताने पाक-चीन संबंधावर कायमचा घणाघाती हल्ला करावा लागेल. शेवटी पाक आपला घोषित शत्रू आहे. रोज या संघर्षात आपले लोक मारले जात आहेत. आता पाकला ब्रिक्स शिखर परिषदेतून धडा शिकावा लागेल. अन्यथा जगाच्या नकाशावरून त्याला लुप्त व्हावे लागेल. हे सत्य भारताकडून पाकला पटवून द्यावे लागेल.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट: www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९