हिंदुत्व म्हणजे काय?_७.७.२०२२

हिंदुत्व म्हणजे काय? हा प्रश्न नेहमीच मला पडलेला आहे. आता तर हा प्रश्न अग्रस्थानावर गेला आहे. त्याचे कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे ५०आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले आणि शिवसेना फोडली. त्यानंतर ते मुख्यमंत्री देखील झाले. हे सर्व करताना त्यांनी जाहीर केले की शिवसेनेने भाजपबरोबर आपली युती तोडली आणि आघाडी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर केली. ते परंपरेने त्यांच्या विरोधात होते. त्यामुळे शिवसेनेने हिंदुत्व सोडून दिले की काय?असा प्रश्न उपस्थित झाला. म्हणून हिंदुत्व टिकवण्यासाठी शिवसेनेने भाजपबरोबर युती करावी ही काळाची गरज आहे. या कारणास्तव त्यांनी बंड करून शिवसेना सोडली. आता तर ते मुख्यमंत्रीच आहेत. अर्थात पक्ष फोडताना काहीतरी कारण लागते. हिंदुत्व हे कारण नक्कीच नव्हते. नेहमीप्रमाणे हिंदुत्वाचा वापर राजकारणात लोक आपल्याबरोबर जोडण्यासाठी होतो. त्या बदल्यात लोकांना काय मिळते? त्यामुळे प्रत्यक्षात हिंदुत्वामध्ये केवढे तथ्य आहे हे बघितले पाहिजे.  

            एकनाथ शिंदें यांच्या बंडाचा झेंडा हिंदुत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी झालेला आहेक का?उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा हिंदुत्व राखण्यासाठी शिवसेनेबरोबर युती करण्याची तयारी होती आणि त्या अनुषंगाने आता फुटीर लोकांना बरोबर घेऊन त्यांनी एक हिंदुत्ववादी सरकार बनवले आहे. हा विषय जर सत्य असेल तर गेल्या काही वर्षांमध्ये अनेक राज्यांमध्ये भाजपचे सरकार होतं व केंद्रात ही भाजपचे सरकार बरीच वर्षे आहे. यामध्ये हिंदुत्वासाठी सरकारने काय केले आहे व त्याचा लोकांना काय फायदा झाला आहे. सामान्य लोकांना साधारणतः रोटी, कपडा, मकान वशिक्षण याची अपेक्षा असते. हे सर्व साध्य करण्यासाठी हिंदुत्वाची गरज नाही. ते सर्वांनाच मिळू शकते. कुठल्या दुसऱ्या धर्माच्या लोकांनी हिंदू लोकांचा रोजगार हिरावून घेतला आहे का? या प्रश्नाचे उत्तर कोणी देणार नाही. पण जातीय आणि धार्मिक अनुषंगाने आरक्षण विरोधात सर्व लोक बोलतात. म्हणून हिंदुत्ववादी तत्त्व एकंदरीत आरक्षणा विरोधात आहे, पण ते उघडपणे तसे बोलत नाहीत. मुसलमानांना आरक्षण नाही आहे. त्यामुळे मुसलमानामुळे हिंदू लोकांचे रोजगार कमी होत नाहीत. तसे बघितले तर सरकारी नोकरीमध्ये मुसलमानांची संख्या अतिशय कमी म्हणजे तीन टक्के पेक्षा कमी आहे. त्यामुळे मुसलमान तुमचा रोजगार खात नाहीत.  आरक्षणामुळे तुमच्या नोकऱ्या कोण कमी करत असतील तर हिंदू समाजातलेच लोक कमी करतात असं म्हणू शकाल.  कारण दलित, आदिवासी, सैनिक यांना आरक्षणाचा फायदा होतो मग रोजगारांमध्ये तुमच्यावर कुठलाही परिणाम होत नसताना हिंदूंचं काय नुकसान होतं?. 

            त्यानंतर आपण येतो कपडा आणि मकान वर. याबाबतीत सुद्धा अल्पसंख्याक समाज जास्त करून झोपडपट्टीत राहतो आणि म्हणून हिंदूंच्या मकान व कपड्यावर काहीच परिणाम होत नाही. सरकारने हिंदूंसाठी मकान आणि कपडा निर्माण करण्यामध्ये कुठले बंधन कोणी आणलेले आहे. पण सर्व हिंदूना रोटी,कपडा, मकान देण्यामध्ये सरकार पूर्णपणे अपयशी आहे. म्हणून हिंदुत्व म्हणजे अर्थात रोटी, कपडा, मकान नव्हे. शिक्षणात देखील अल्पसंख्याकांना फार कमी जागा आहेत. खाजगी नोकरीत सुद्धा अल्पसंख्याक अतिशय कमी नोकरीत आहेत.  म्हणून त्यांच्यामुळे हिंदूंना काही त्रास होत नाही. पण सरकारच नोकऱ्या देऊ शकत नाही किंवा रोजगार पुरवू शकत नाही. मुसलमाना मारून काय जास्त नोकऱ्या तुम्ही देऊ शकणार आहात का? हा माझा प्रश्न हिंदुत्ववादी लोकांना आहे. 

            यावरून स्पष्ट होते की हिंदुत्ववादी धोरणामुळे कुणालाही रोटी, कपडा, मकान, शिक्षण मिळत नाही. मग हिंदुत्वाचा अर्थ काय आहे. किंवा हिंदुत्व मधून लोकांना काय फायदा आहे. त्याचं स्पष्टीकरण फडणवीस आणि शिंदे यांनी करावे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. कारण ह्या हिंदुत्वाचा गमजा पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी उघडपणे करत नाहीत. मग गुप्तपणे करत आहेत का? तसे असेल तर त्यांचे विचार काय आहेत हे पण जाणून घेण्याची मला तीव्र इच्छा आहे आणि त्यानुसार मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आग्रह केला आहे हे हिंदुत्व म्हणजे काय? याचे मार्गदर्शन आम्हाला करावे.  त्याचे फायदे काय आहेत याचेही मार्गदर्शन आम्हाला आणि जनतेला करावे म्हणजे एक पक्ष तोडून दुसऱ्या पक्षाबरोबर जाऊन सरकार बनवण्याचा अर्थ आम्हाला कळेल. 

            त्यातच नुपूर शर्माने पैगंबरा विरोधातव्यक्तव्य केले. भाजपने त्यांना पक्षातून काढून संविधानाचे संरक्षण केले. पण ह्याचा फायदा पाकिस्तानला झाला. कट्टरवादी लोकांची डोकी भडकवायला त्यांना संधी मिळाली. दुर्दैवाने परिणामतः दोन लोकांची हत्या झाली. एक उदयपूर मध्ये आणि एक महाराष्ट्रात अमरावती मध्ये. हिंदू मुसलमान द्वेष आणखी वाढला. पाकिस्तान याचा फायदा घेऊन कट्टरवादी संघटनांना आणखी जोरात मदत करणार आणि भारतामध्ये कुठेतरी हत्याकांड घडवून आणायला मागेपुढे पाहणार नाही. अर्थात राजकीय लोकांना हे पाहिजेच असते. कारण विकासापासून लोकांना दूर ठेवण्यासाठी अशा घटना फार उपयोगी पडतात. कुणाचा फायदा होतो की नाही होत याचा अंदाज जनतेने घेतला पाहिजे. पण अशा घटना जर वाढत गेल्या तर यादवी युद्धापासून भारत दूर नाही. अशाच प्रकारे काश्मिरमध्ये १९८७ सालापासून दहशतवाद सुरू झाला आणि आजतागायत तो चालू आहे. याचा फायदा घेऊन पाकिस्तानने आणखी जोमाने भारतावर दहशतवादी हल्ले चढवले. त्यात अनेक लोक मारले गेले. मारले गेलेले लोक हिंदू होते आणि मुसलमान ही होते. पण अशाप्रकारचा सामाजिक द्वेष निर्माण करून तो मिटवण्यासाठी जवळजवळ १०००० सैनिक मारले गेले आहेत. आणखी किती मारले जातील हा काळच ठरवेल. पण या सर्व दहशतवादा पाठीमागे लोकांचे लक्ष पूर्णपणे द्वेष भावनेने पेटलेले आहे. म्हणून विकासाकडे लक्ष नाही. त्यात श्रीमंतांनी आपला प्रचंड फायदा करून घेतलेला आहे. आज अंबानी जगातील १० श्रीमंतांमध्ये पोहचला आहे आणि भारतीय जनता दारिद्र्याच्या खाई मध्ये लोटली जात आहे.

            त्यामुळे परदेशी राष्ट्रांचे कारस्थान यशस्वी होताना दिसत आहे. १९९१ला मी लोकसभेत म्हटलं होतं की ज्या दिवशी तामिळनाडूमध्ये बंड होईल तेव्हा भारताचा अंत असेल. आता नुकतंच तामिळनाडूचा राजकीय लोकांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे की ते भारतापासून स्वतंत्र होण्यासाठी लढा देऊ शकतात. अशाप्रकारे जर भाषेवर, धर्मावर, जातीवर भारतीय लोक एकमेका विरोधात उभे राहिले तर त्या देशाचे भवितव्य अत्यंत संकटात आहे असे मी समजतो. म्हणून सामाजिक सामंजस निर्माण व्हायला पाहिजे. धर्म, जाती आणि भाषेमध्ये जे आंतरिक वेगळेपण आहे ते दूर करावे लागणार आहे आणि सर्व धर्म जातीच्या लोकांना एकमेकांना समजून एक ‘आनंदी आणि समृद्ध भारत’ निर्माण करावा लागणार आहे. तो द्वेषाच्या आधारावर होऊ शकत नाही. म्हणून सर्व राजकीय पक्षांनी संवेदनशील झाले पाहिजे व लोकांना एकत्र आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. नाहीतर भारताचे अत्यंत नुकसान होणार आहे आणि त्यात गरीब किसला जाणार आहे.

            जगामध्ये औद्योगीकरण झाल्यानंतर शेतकरी आणि कामगारांचे शोषण करून श्रीमंत प्रचंड श्रीमंत होत गेले.  त्याला विरोध करण्यासाठी डावी चळवळ उभी राहिली.  आर्थिक समता हे उद्दिष्ट समोर ठेऊन प्रचंड संघर्ष झाला.  परिणामत: याला विरोध करण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाखाली श्रीमंतांची उजवी चळवळ उभी राहिली.  १९४५ ते १९९१ जगभर प्रचंड संघर्ष झाला व त्यात अमेरिकेचा विजय झाला.  तेव्हापासून पूर्ण जगावर ताबा ठेवण्यासाठी अमेरिकेने त्यांच्या मालकीची जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला वापरले.  त्यातूनच १९९१ ला भारताचे अर्थमंत्री मनमोहन सिंग झाले.  त्यांनी भारतात भांडवलशाही लागू केली.  खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण (खाउजा) धोरण अंमलात आणले.  हे कॉंग्रेसपासून भाजपापर्यंत सर्वांनी लागू केले.  याला होणारा विरोध मोडून काढण्यासाठी बाबरी मस्जिद पाडण्यात आली.  तेव्हापासून भारताचा अजेंडा हा धार्मिक कट्टरवादावर नेण्यात आला.  त्यामुळे वर सांगितलेले सर्व विषय निर्माण झाले आहेत.  यातून जनतेची सुटका कोण करणार? हे आपल्याला पुढच्या काळात दिसेलच.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS