हेरगिरी (भाग -३)_८.१०.२०२०

रियाला जामीन मिळाली. कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. रियाने कुठल्याही ड्रग माफियाचे ड्रग्स विकले ही माहिती धादांत खोटी होती. त्याचप्रमाणे तिच्याकडे अल्पसंख्येत देखील ड्रग्स मिळाले नाहीत. म्हणून तिला जामीन मिळाला.  Narcotics Control Bureau (NCB) ने अनेक सिनेतारकांना असेच चौकशीसाठी बोलवल.  ड्रग्स घेतल्याचे आणि इतरांना ड्रग्स घेण्यास प्रवृत्त केल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवले आहेत. वास्तविक NDPS ACT मध्ये DRUG घेणाऱ्यांसाठी शिक्षा सौम्य आहे. ड्रग्स विकणार्‍यांसाठी जन्मठेपची शिक्षा आहे.  NCB नेहमी ड्रग घेणाऱ्या किंवा छोट्या विक्रेत्यांना शिक्षा करते. ड्रग्स डॉनला किंवा मोठ्या विक्रेत्यांना व तस्करांना काहीच होत नाही.

            १९८० च्या काळात संघटित गुन्हेगारी अल्प प्रमाणात होती. मुंबईत हजी मस्तान करीम लाला यांच्या टोळ्यांनी सोने आणि  चांदी तस्करीचा आपला धंदा चालवला. पण १९८० नंतर सर्व बदलले.  दाऊद इब्राहीम, अरुण गवळी, छोटा राजन असे अनेक नवीन डॉन निर्माण झाले. मुंबई नगरी गुंडांच्या हातात गेली.  अनेक राजकीय पक्ष माफियाला सहकार्य करू लागले.  त्याचबरोबर अमेरिकेने आणि पाकने जोरदार दहशतवादी हल्ले चढविले. दहशदवादाला पैसे पुरविण्यासाठी ड्रग्सचा व्यापार सुरु झाला आणि बहुतेक सर्व डॉन सोन्या-चांदी ऐवजी ड्रग्सच्या धंद्यात गुंतले. ड्रग्सचा प्रसार बहुतेक सर्व देशात वाढू लागला.  त्यातून प्रचंड पैसा निर्माण झाला व ड्रग्स डॉन जगातील पहिल्या दहा श्रीमंत लोकांमध्ये झळकू लागले. आज ड्रग्सचा प्रसार इतका झाला आहे की संघटित गुन्हेगारीचा पाया बनला आहे.

            वास्ताविक माफिया आणि दहशतवादी यांचे उद्देश वेगळे असतात.  माफिया हा फक्त पैशाच्या मागे असतो, त्यासाठी त्याला सरकारी यंत्रणेवर आपला प्रभाव पाहिजे असतो. पण दहशतवादी हे पैशाच्या पाठीमागे नसतात.  ते सरकारी यंत्रणेला उद्ध्वस्थ करायला बघतात.  पण होताहोता अनेक गुप्तचर संघटनांनी माफियाचा उपयोग करायला सुरू केले व माफिया दिवसेंदिवस शक्तीशाली होत गेली. आज माफियाला कुठल्याही सरकारची गरज नाही, कारण सर्वच सरकार मधील मंत्री, संत्री आणि अधिकारी त्यांचे हस्तक झाले आहेत.  पण माफिया आपला ड्रग्सचा व्यापार वाढविण्यासाठी दहशतवाद्यांना मोठ्या प्रमाणात वापरू लागले. हळूहळू दहशतवादी आणि माफियामध्ये एक अति सूक्ष्म फरक राहिला.  दोन्ही पैशाच्या पाठीमागे आहेत व आताच्या काळामध्ये जगातला काळा पैसा हा पुर्णपणे माफियाच्या नियंत्रणामध्ये आहे.  पैसा आहे म्हणून माफिया आहे. माफियाला जर पैशापासून तोडले तर माफिया नष्ट होईल.  पण मुळात तेच करायला कुठले सरकार तयार नसते.  मी खासदार असताना मनी लॉड्रिंग अॅक्ट आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काळा पैसा धुऊन पांढरा करण्याच्या विरूद्ध कायदा करण्याचा प्रयत्न केला. पण तो सर्वांनी हाणून पाडला.  त्याबद्दल पुढच्या भागात सविस्तर लिहिणार आहे.

            NDPS  ACT 1985  हा ३ वेळा  बदलला गेला.  ड्रग्सच्या विरोधातील हा कायदा आंतरराष्ट्रीय कराराची अंमलबजावणी करण्यासाठी केला गेला. पण त्याच्या अंमलबजावणीसाठी फार प्रयत्न केले गेले नाहीत.  हा कायदा फार कडक आहे, ज्यांनी मालमत्ता ड्रग्सच्या आधारे निर्माण केली, पैसा कमावला हे सारे जप्त करण्याचे आदेश ह्या एनडीपीएस अॅक्ट मध्ये आहे. या कायद्यानुसार कुणालाही मुक्त केले जाणार नाही तर प्रत्येकाला शिक्षा असे त्यात लिहिले आहे.  पुढे जाऊन काही बदल घडले ज्यांच्याकडे थोडीच ड्रग्सची मात्रा सापडते त्यांना कमी शिक्षा आहे.  ज्यांच्याकडे व्यापारासाठी लागणारे ड्रग्स आहेत त्यांना जास्त शिक्षा सुनावली जाते आणि ज्यांच्याकडे मोठ्या संख्येने ड्रग्स आहेत त्यांची शिक्षा वेगळी आहे.  आता रियाच्या केसमध्ये हे कोर्टाने म्हटले की तिच्याकडे व्यापारासाठी नव्हते, किंबहुना कमी संख्येने ड्रग्स सापडल्याचे पुरावे नाहीत.  तसेच ज्या चौकशीसाठी सिनेतारकांना पाचारण करण्यात आले आहे त्यांच्यावर देखील व्यापारासाठी ड्रग्स सापडल्याची पुरावे नाहीत.  कदाचित सेवनासाठी असतील हेही अजून आपल्याला माहीत नाही,  कायद्याप्रमाणे पूर्वी कुणाला जमानत मिळतच नव्हती.  पण नंतर सुधारणा करून ज्यांच्याकडे छोट्या प्रमाणात ड्रग्स आहेत त्यांना जमानत देण्याची प्रथा सुरू झाली आणि त्यानुसारच रियाला मुक्त करण्यात आलेले आहे.  शिक्षा किती प्रमाणात तुमच्याकडे ड्रग्स आहेत ह्यावर ठरली जाते. जसे २ ग्रॅम कोकेन किंवा ५ ग्रॅम हेरोईन असेल तर कमी ड्रग्स मानले जातात. शिक्षा १ वर्षापर्यंत सक्त मजुरी किंवा रु.१००००  दंड किंवा दोन्ही. कमी संख्येपेक्षा जास्त पण व्यापारी संख्येपेक्षा कमी ड्रग्स असले, तर सक्त मजुरी १० वर्षापर्यंत असू शकते आणि दंड १लाखापर्यंत असू शकतो. जिथे गुन्हा व्यापारी संख्येपेक्षा जास्त असेल म्हणजे कोकेन १०० ग्रॅम आणि हेरोईन २५० ग्रॅम असेल तर कमीतकमी १० वर्ष शिक्षा जी २० वर्षापर्यंत देता येते. दंड कमीतकमी १लाख व जास्तीत जास्त २ लाख पर्यंत वाढवू शकला जाऊ शकतो.

            रियाच्या केसमध्ये ड्रग्स कमी प्रमाणात देखील सापडलेले नाहीत. त्यामुळे रिया सुटली पण मिडियाकडून तिच्यावर जी मारझोड झाली ती अक्षम्य आहे.  छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रात जिथे स्त्रियांना सन्मानाने वागवण्याची छत्रपतींची शिकवण आहे, पण सत्ताधाऱ्यांकडून ह्या गोष्टीची काळजी घेतली नाही.  केंद्र सरकारने याच्यात हस्तक्षेप करायची आणि CBI चौकशी मागायची काही गरज नव्हती.  जिथे साप नाही तिथे दोरीला साप साप म्हणून झोडपायची सवय यांना लागली आहे.  येथे कोविड सारखे गंभीर प्रश्न उपस्थित झाले असताना अनेक दिवस सुशांत सिंग, रिया, कंगना, दीपिका पादुकोण यांचे टेलिव्हिजनवर नाटक गाजत आहे.  हिंमत असेल तर दाऊदचा पर्दाफाश करावा,  हे यांच्याकडून होत नाही आणि छोट्या छोट्या लोकांना त्रास देण्याची जी किमया आहे ती मिडियामध्ये आणि सरकारी यंत्रणेत भरपूर आहे.  ती थांबली पाहिजे.  आता रिया एक महिना तुरुंगात होती ती कुठल्या गुन्ह्यासाठी हे माहित नाही.  वास्तविक CBI जेव्हा चौकशी करते ते गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय अटक करत नाही, पण भारतात हे प्रचलित झालेले आहे.  कुठल्यातरी आरोपावरून कुठल्यातरी प्रसिद्ध व्यक्तीला पकडायचे मिडिया ट्रायल करायची आणि मग सोडून द्यायचं.  जे चाललेले आहे ते लोकशाहीला लाजवणारे आहे.

            असो, १९८० पासून मोठ्या प्रमाणात दहशतवाद वाढू लागला.  भारतात पहिला दहशतवाद पंजाबमध्ये खालिस्तानी लोकांकडून सुरू झाला. या दहशतवादाला पैसा लागत होता तो पैसा मिळवण्यासाठी दहशतवादी अफू आणि हिरोईनची तस्करी भारतात करू लागले.  सर्वात जास्त परिणाम पंजाब आणि जम्मूवर झाला, त्याचबरोबर राजस्थानच्या बॉर्डर मधून ड्रग्स येऊ लागले.  १९९१च्या माझ्या अडीच तासाच्या भाषणांमध्ये लोकसभेत मी ठामपणे सांगितले कि भारताच्या सुरक्षेला सर्वात मोठा धोका हा दहशतवादापासून आहे आणि दहशतवादाला पुरवणारा पैसा हा ड्रग्स मधून उभा राहत आहे.  त्यामुळे ड्रग्स विरोधी हल्ला भारत सरकारने केला पाहिजे.  माझ्या भाषणला धरून केंद्र सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली त्यात मी पण होतो.  आमच्या समितीचा कार्यभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने झाला, पण भारत सरकारला जेव्हा तो अहवाल कळला तेव्हा आमच्या समितीचा अहवालच गाडला गेला.  तो आजपर्यंत आपल्याला मिळालेला नाही.  त्यानंतरच्या काळामध्ये दहशतवाद वाढत गेला आणि त्याबरोबर भारतात प्रचंड प्रमाणात ड्रग्स येत  गेले.  अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतातील धंद्यावर दाऊदची एक छत्री हुकूमत सुरू झाली.  आज तिकडे प्रचंड पैसा आहे मग त्यांनी अनेक लोकांना उद्योगपती केले पूर्ण बिल्डर व्यवसायावर दाऊद इब्राहिमची पकड आहे.  बॉलिवूडवर दाऊद इब्राहिमची पकड आहे.  या टोळ्यांच्या हातात बारबाला आणि वैश्या व्यवसायाची इंडस्ट्री आहे.  सगळे अनैतिक गुन्हेगारी धंदे आता माफीयाच्या हातात आहेत.  त्याच्या हातात बहुतेक सर्व उद्योगपती आहेत.  राजकारणात सुद्धा माफियांनी गरुड झेप घेतली आहे.  अनेक गुन्हेगारात खासदार, आमदार आहेत त्यांना काही होत नाही. काश्मिरमध्ये १०००० सैनिक मारले गेले, पण एक आमदार किंवा खासदार मारला गेला नाही. हे काय गोडबंगाल आहे?

            बहुतेक देशात ड्रग्स माफियाच्या हातात पूर्ण अर्थव्यवस्थाच गेली आहे.  मुख्य उद्योगपती, राजकारणी अधिकारी माफियाच्या हातात आहेत.  त्यामुळे सरकारवर माफियाचे याचे पूर्ण नियंत्रण आहे. हे मी म्हणालो नाही तर गुप्तहेर खात्याच्या प्रमुखांच्या व्होरा समितीने म्हटले आहे. याबद्दल सविस्तर माहिती पुढच्या भागात.

…. क्रमश

                                                                                                लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

                                                                              वेबसाईट : www.sudhirsawant.com

                                                                  मोबा ९९८७७१४९२९.

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS