२१व्या शतकातील भारताचे स्थान_८.९.२०२२

आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची सुरक्षा नीती शेजारी पाकिस्तान सोडला तर रशिया, चीन,  अमेरिका व युरोप यांच्याशी असणाऱ्या भारताच्या संबंधावर अवलंबून राहणार आहे. १९७१च्या युद्धामध्येज्याला आता पन्नास वर्षे पूर्णहोत आहेत, अमेरिकेने पूर्णपणे पाकिस्तानची बाजू घेतली. भारताला धमकी दिली की जर पाकिस्तानवर भारताने हल्ला केला तर अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने लढेल. इंदिरा गांधींनी त्या धमकीला भिक घातली नाही.  रशियाबरोबर वीस वर्षाचा मैत्री करार करून पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तेव्हापासून आतापर्यंत अमेरिकेने पाकिस्तानला प्रचंड मदत केली आहे. आधुनिक हत्यारे दिलेली आहेत. अफगाणिस्तान पाकिस्तानच्या ताब्यात दिला आहे व भारताला अफगाणिस्तान मधून दूर केले आहे. त्याचबरोबर पाकिस्तान मध्ये दहशतवादी टोळीचे संकलन करून अफगाणिस्तान मध्ये रशिया विरोधात हल्ले चढवले. पण त्याचबरोबर भारता विरोधात सुद्धा प्रचंड प्रमाणात दहशतवादी हल्ले चढवण्यात आले. भारतावरील झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पूर्ण जबाबदारी अमेरिकेचीच आहे. हा भाग कुणीही कधीही विसरू नये. अमेरिकेने नेहमी जेव्हा कुठल्या देशाला लढायला लावले त्या देशाचा घातच केला आहे.

आता अमेरिका भारताला बरोबर घेऊन चीनबरोबर युद्ध करायला प्रवृत्त करत आहे. नुकताच अमेरिकन लोकसभेचे अध्यक्ष नॅन्सी तलोसी तैवानला गेल्या आणि चाळीस वर्षाचा करार संपुष्टात आला. गेली ४० वर्षे अमेरिकेने आणि जगातल्या सर्व देशानी एकच चीन असल्याचा दावा केला होता. तो मान्य केला होता. पण आता तैवान सुद्धा दुसरा चीन आहे, अशाप्रकारचे वातावरण अमेरिका बनवत आहे आणि दोन चीनची भूमिका रेटून नेत आहे. ते झाल्यानंतर चीनने आक्रमकपणा वाढवला व तैवानच्या आसपास क्षेपणास्त्राचे हल्ले केले. यामध्ये भारताला भूमिका घ्यायला अमेरिका दबाव आणत आहे. पण आतापर्यंत भारताने अशाप्रकारची कुठलेही भूमिका घेतली नाही. दुसरीकडे युक्रेनचे युद्ध चालू आहे.  त्यामध्ये युरोप आणि अमेरिका एका बाजू आहेत. दुसर्‍या बाजूला रशिया आणि चीनची आघाडी आहे. लवकरच शिंघायमध्ये एक संमेलन होणार आहे.  त्याच्यात भारत जाणार आहे.  या संमेलनात मुख्यत:रशिया आणि चीन व पूर्वेकडील देश भाग घेतात. रशिया आणि चीनमध्ये वैमानस्य होतं ते मिटून आता दोन्ही देश एकत्र काम करायला लागलेले आहेत. अमेरिकेने रशियावरच्या तेलावर बंदी आणल्यानंतर भारताने आणि चीनने स्वस्त दरात रशियाकडून तेल विकत घेण्यास सुरुवात केली.  त्यामुळे भारताचा प्रचंड फायदा झाला. रशियाकडून तेल जवळजवळ अर्ध्या किंमतीत आपल्याला मिळते व तेही रुपयांमध्ये आपल्याला घ्यावे लागते.  त्यामुळे ते अतिशय स्वस्त पडतेआणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये केंद्र शासनाने तेलाचे भाव कमी केले त्याचा फायदा भारतीय जनतेला झाला. 

रशियाबरोबर भारताचा संबंध १९७१ पासून अत्यंत जवळचा  आहे. आधुनिक हत्यार भारतामध्ये बनायला लागली त्याचे कारण हत्यार किंवा विमान रशियाने आपल्याला विकली.  त्याचे भारतामध्ये उत्पादनाचे अटी नेहमी असायच्या व त्यामुळे प्रचंड प्रमाणात भारतात हत्यार बनायला लागलेली आहेत. त्या उलट राफेल हे विमान आपण घेतले पण भारतामध्ये उत्पादन करायला परवानगी नाही आणि म्हणून भारताचे प्रचंड नुकसान त्यात होत आहे. दुसरीकडे भारतामध्ये आत्मनिर्भरतेचा प्रयत्न होत आहे.  अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपती असताना जाहीर केले होते की २०२० पर्यंत भारतामध्येच हत्यारांचे ८० टक्के उत्पादन झाले पाहिजे आणि २० टक्के आयात केले पाहिजे.  आज ८० टक्के उत्पादन आयात करावे लागते आणि फक्त २० टक्के उत्पादन भारतात होते. तरी अलीकडे केंद्र सरकारने विक्रांत बनवल्यापासून सर्व हत्यार भारतात बनवण्याचा पुढाकार घेतला आहे.  बिपिन रावत यांनी अतिशय आक्रमकपणे भारतात उत्पादनासाठी मागणी केली होती. भारतामध्ये उत्पादन वाढल्यास भारताला निर्यात सुद्धा करता येईल आणि जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भारताचे शस्त्र घेण्यासाठी लोक पुढे येतील.  त्यामुळे भारताला प्रचंड पैसा मिळेल. आयात कमी झाल्यामुळे भारताचा प्रचंड पैसा वाचेल.

            या सर्व पार्श्वभूमीवर आता सरकारला दूरगामी निर्णय घ्यावे लागतील. अमेरिका सध्या टाकाऊ हत्यारे भारताला विकायचा प्रयत्न करत आहे.  अमेरिकेचे सैनिक औद्योगिक क्षेत्र परदेशात हत्यारे विकण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करते.  जगभर युद्ध निर्माण करून प्रचंड पैसा कमवते. अमेरिकेच्या स्टंटला बळी न पडता आपले स्वतंत्र धोरण भारताने आखले पाहिजे.  चीन बरोबरच्या संबंधात जरी तणाव असला तरी एक गोष्ट स्पष्ट झाली आहे.  किती प्रकारे संबंध बिघडले तरी भारतीय आणि चीनी सेनेने कधीही हत्याराचा वापर संघर्षात केला नाही.  हा संयम अतिशय महत्त्वाचा आहे. युद्धाची भाषा करायला फार सोपे असते पण युद्ध करणे आणि ते तारुण नेणे हे अतिशय कठीण असते आणि त्यामध्ये कितीही संघर्ष झाला तरी दोन्ही देशांचे नुकसानच होते. मी चीनचे राष्ट्रपती जियांग जमीन यांना भेटलो असता त्यांनी स्पष्टपणे चीनचे धोरण आमच्यासमोर मांडले. भारत आणि चीन हे जगातील दोन बलाढ्य राष्ट्र आहेत आणि म्हणून दोघातले संबंध फक्त दोन देशांना महत्वाचे नाही तर मानवतेला महत्त्वाचे आहेत.  म्हणून दोन्ही देशांनी सहकार्य करावे आणि आपल्या लोकांचे कल्याण करावे.  अशा प्रकारचे धोरण चीनच्या  राष्ट्रपतींनी सातत्याने जाहीर केले होते आणि आताही जाहीर करत आहेत. दुसरीकडे अमेरिकेने एक मिलिटरी गटबंधन करायचा प्रयत्न केला आहे.  त्याचे नाव ‘क्वाड’ आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका आणि भारत हे चार देशाचे सुरक्षा गटबंधन करायचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. मधल्या काळात भारत तिथे झुकताना दिसत होता.  पण अलीकडे भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करतेवेळी रशिया, चीन बरोबर संबंध सुधारण्याची भूमिका घेतली आहे.

            नुकतेच मोदी साहेबांनीत्यांनी पुतीन आणि चीनच्या राष्ट्रपती यांच्याबरोबर व्हिडिओ वर चर्चा केली व त्यात भारत आणि रशियाने ठरवले की अमेरिकेचा किती विरोध असला तरी भारत रशियाकडून तेल घेणार आहे.  त्याचबरोबर अनेक क्षेत्रांमध्ये एकमेकाला मदत करणार आहे. चीनने सुद्धा अशाच प्रकारची भूमिका घेतली आहे. आता पुढच्या महिन्यामध्ये यांची शिखर परिषद होणार आहे त्यामध्ये भारत चीन आणि रशियाचे काय संबंध निर्माण होतात आणि एकमेकाला सहाय्य करण्यासाठी काय करतात ते ठरणार आहे. ही चांगली घटना आहे कारण अमेरिकेच्या दबावाला बळी पडून जर आपण अमेरिकेचा गोटात गेलो. तर अमेरिका निश्चितपणे आपला घात करणार व पाकिस्तानला मदत करणार हे ठरलेले आहे. आताच अमेरिकन संसदेने ठरवले आहे की चीन हा नंबर एक शत्रू आहे. हे शत्रुत्व निर्माण कसे झाले? १९८० च्या दरम्यान अमेरिकेने चीनला मदत करून मोठे करायचे ठरवले. त्यांना रशियाला उखडून काढायचं होतं. आणि चीनने सुद्धा एक डाव टाकला. प्रचंड उत्पादन करायचे, व स्वस्त माल जगभर विकायचा.  आता चीन जगाची फॅक्टरी झाली आहे. स्वस्त कामगार मिळाल्यामुळे सर्व प्रकारचे उत्पादन केले जाते. लवकरच चीन अमेरिकेच्या पुढे जाणार आहे. आणि म्हणून काही लोक म्हणतात की २१ वे शतक हे आशिया खंडाचे आहे.  भारताचे हीत हे शांतता प्रस्थापित करण्यात आहे.  चीनला जर अमेरिकेला टक्कर द्यायची असेल तर त्यांना रशिया आणि भारताबरोबर मैत्री करावीच लागेल. याची जाणीव भारत आणि चीनला आहे. आणि चीनबरोबर जर चांगले संबंध निर्माण झाले तर पाकिस्तानला नेस्तनाबूत करायला वेळ लागणार नाही.  म्हणून या शतकातली राजकारणामध्ये भारत, चीन आणि रशिया यांनी एकसंघपणे काम करावे व अमेरिकेची दादागिरी मोडून काढावी. 

Please follow and like us:

Author: Brigadier SS