भारत बचाव_29.09.2018

राफेल विमान खरेदीमध्ये षडयंत्राचा वास पूर्ण भारतात पसरला आहे. साम दाम दंड भेद हे राजकारणाचे मुख्य तंत्र राफेल   बाबत चर्चा बंद करण्यसाठी  वापरण्यात येत आहे. पण भाजप जसा चौकशील विरोध वाढवत आहे तसा राफेल  हे भाजपच्या नरडीचा घोट घेत आहे. संरक्षण खरेदीत भ्रष्टाचार हा नियमच  झाला आहे. अशी अनेक उदाहरणे मला देता येतील. बोफोर्स मध्ये रु ६० कोटीचा भ्रष्टाचार झाला हा आरोप राजीव गांधींवर झाला. आरोप करणारे अनेकदा सत्तेवर आले पण बोफोर्स भ्रष्टाचार सिद्द करू शकले नाहीत. पण भ्रष्टाचार वाढतच आहे. संरक्षणातील भ्रष्टाचार हा देश द्रोहाचे कृत्य आहे. हे सर्वांनाच माहित असून देखील आपले नेते, अधिकारी, देशद्रोह करायला मागे पुढे पाहत नाहीत. तसेच देशातील पैसा परदेशात घेवून जाणे म्हणजे राष्ट्रीय संपत्ती कमी करणे आहे. हे देश द्रोहाचे कृत्य आहे. मल्ल्या, निरव मोदी सारखे लोक देशाला लुटून पळाले. परदेशात मजा मारत आहेत. पण त्यांच्यावर काही कारवाई होताना दिसत नाही.

नेते अधिकारी माफिया यांचे अतूट नाते आहे. हे गुप्तहेर खात्यातील प्रमुखांच्या वोरा समितीने, १९९३ मध्ये स्पष्टपणे मांडले आहे. राजकारण्यांच्या पैशाचे संरक्षण माफिया करतो. तो काळ्या धनाचा पोलीस आहे. जे गुप्त करार कंत्राटदार आणि सरकारमध्ये होतात त्याची अंमलबजावणी माफिया करतो. जसे एक धरण बनवायचे कंत्राट झाले कि नेते आणि अधिकाऱ्यांची कंत्राटदाराबरोबर बोली होते. साधारणत: २५ % पैसा नेत्यामध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये वाटून खाल्ला जातो.  हे सगळे व्यवहार माफियाच्या दलाला करवी केले जातात. हे दलाल फार मोठे आहेत. सर्व मंत्र्यांबरोबर घनिष्ट संबंध असतात. नेहमी तीच माणसे वेगवेगळ्या सरकारांच्या मंत्र्यांबरोबर दिसतात. सत्ता बदलली तरी काही फरक पडत नाही. मंत्र्यांचे दलाल बदलत नाहीत. पैसे खाण्याचा उत्तम मार्ग बांधकाम आणि सिंचन आहे. त्यामुळेच पक्षातील उच्च मंत्रीपदे ह्या खात्याची असतात. सरळ सरळ भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार समोर आले तरी कारवाई काहीच झाली नाही. कारण सत्ता बदलली तरी दलाल बदलत नाहीत. मग नवीन सरकार आल्यावर नवीन मंत्री आल्यावर जुन्या मंत्र्यांना ते कसे विसरणार. मंत्री गेले तर दलाल पण  तुरुंगात जातील. आताच अजित पवार यांचा सिंचन घोटाळ प्रकरण बघा. भाजप मुख्यमंत्री फडणवीस गप्प आहेत. बांधकाममध्ये असणारे भुजबळ यांना तुरुंगात टाकले. पुढे काहींच चौकशी किंवा कारवाई नाही. आता पर्यंत किती मंत्री तुरुंगात गेले आहेत? सगळेच  एकमेकाला साथ देतात. मॅच फिक्सिंग हे भारताच्या राजकारणाचे मुख्य सूत्र आहे. सकाळी एकमेकाला शिव्या द्यायच्या व रात्री ताजमहाल हॉटेल मध्ये दारू प्यायची.

राष्ट्रवादीने भाजपला पाठींबा दिला म्हणून भाजप सरकार गठीत झाले. तो पाठींबा  आजपर्यंत काढला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष हा भाजप युतीचा घटक पक्ष  आहे. कधीतरी विरुद्ध बोलतात आणि दाखवतात कि ते भाजप विरोधी आहेत. मोदी  शरद पवारना  गुरु मानतात. इथेच सगळी मेख आहे.  मुस्लिम मते मिळवण्यासाठी भाजप विरोधाचे नाटक वठवीत आहेत. कॉंग्रेस पण मुग गिळून गप्प आहे. भाजप विरोध फक्त नावाला आहे. कॉंग्रेस आता भाजप विरोधाचे नाटक वठवीत आहे. सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येवून भाजपला विरोध करूया असा आभास निर्माण करते. म्हणजे आम्ही सर्वांनी फक्त धर्मासाठी एकत्र यायचे. रोटी कपडा मकान साठी एकत्र यायचे नाही. पुन्हा  कॉंग्रेस सत्तेवर आले, तर भाजपला शिव्या देत राज्य करायचे. रोटी कपडा मकान विसरून जायचे. शेवटी सापनाथ कॉंग्रेस आणि नागनाथ भाजप हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आर्थिक तत्व ह्या सगळ्यांचे  एकच आहे. दोघांच्या राज्यात, उद्योगपती मजा मारतात, माफिया मजा मारतात. मारतो तो गरीब. दोघे माफिअयाला हाताशी धरतात. माफिया, मंत्र्यांचा व अधिकार्‍यांचा काळा पैसा परदेशात नेतात आणि खोट्या कंपन्यामध्ये ठेवतात. जसे मॉरीशिसमध्ये १५००० खोट्या कंपन्या आहेत. त्यात चोरीचा पैसा ठेवला जातो. तो पैसा भारतात मनमोहन सिंघच्या थेट परदेशी गुंतवणूक (FDI) आणि मोदींच्या ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमातून गुंतवणूक म्हणून भारतीय उद्योगामध्ये पेरले जातो व काळा  पैसा  पांढरा  होतो. यालाच कदाचित मोदी म्हणाले असतील कि परदेशातून पैसा परत आणणार.

चोरीचा पैसा पांढरा करणे ह्याला money laundering (पैसे धुणे ) म्हणतात. ह्या संबंधित कायदा करण्याची मागणी लोकसभेत पहिल्यांदा मी १९९२ ला केली. कायदा होण्यास १५ वर्ष लागली व आता कमजोर कायदा बनवण्यात आला आहे कि कुणाला शिक्षाच होत नाही. दरम्यानच्या काळात निरव मोदी, ललित मोदी पैसा लुटून फरार झाले. पैसा धुण्याचे काम माफियाच्या आश्रीत व्यापारी करतात. हा व्यवहार गुप्त असतो. कुठेही लेखी करार नसतो. माफिया म्हणजेच करारचा जिल्हा अधिकारी. काळा  व्यवहार अगदी चोख चालतो. जगभरात रोख रक्कमांचा  व्यवहार हवाला पद्धतीने चालतो. जसे अमेरिकेत माफियाने १०० किलो गांज्या पुरवला तर त्याचे भारतात कसे पैसे येतात. माफिया अमेरिकेत छोट्या छोट्या रक्कम बँकेत घालतात मग त्या बँकेतून आफ्रिकेत पाठवतात. तिथून मॉरीशिस येथील खोट्या कंपनीत जातो व भारतात येतो. अशाप्रकारे अफू, गांजा, हत्यारे,कोकेनचा व्यवहार होत आहे. सर्वात जास्त काळा पैसा हत्यारांच्या तस्करीतून होतो. त्यानंतर, ड्रग, मुली पुरविणे, क्रिकेट मधील मॅच फिक्सिंग. त्यामुळेच ह्या जगात माफिया आहे, दहशतवाद आहे. गेल्या १० वर्षात अनेक प्रकार उघडकीला आले पण सरकारनी ते दाबले. काश्मीर मध्ये एकही राजकारणी नेत्यांची कधीच हत्या झाली नाही का? कारण दहशतवाद हा हत्यार आणि ड्रगची तस्करी करण्यासाठी गरजेचे आहे. त्यातून प्रचंड पैसा निर्माण होतो. मी आफुच्या शेती अनेकदा जाळल्या आहेत. पण त्या वाढतच राहिल्या. काश्मिरी दहशतवादी त्याच्यावर पैसा उभा करतात. त्यात आमदार, खासदार, अधिकारी भागीदार आहेत. मग दहशतवादी त्यांना कशाला मारतील. मारतात ते आमचे सैनिक. २०१४ ला मी निवृत्त झालो तेव्हा काश्मीर मध्ये पूर्ण शांती प्रस्थापित झाली होती. आता प्रचंड हिंसाचार आहे . कारण मोदि – मुफ्ती सरकारलाच दहशतवाद पाहिजे होता.

जागतिक हत्यार व्यापार जगातील सर्वात मोठा व्यापार आहे. मौत का सामान बेचंनेवालों की कमी नही. पंतप्रधानाच्या घरात चंद्रास्वामी जर राहत होता तर कोण देशाला वाचवणार. जागतिक हत्यार खारीदारीत भारत सर्वात श्रेष्ठ आहे. सर्व जग भारताला शस्त्र विकण्यासाठी चढा-ओढ करत आहे. भारतात कुठलेच हत्यार बनू नये हा  प्रयत्न बहुराष्ट्रीय कंपनी करत आहेत. त्यात फ्रांसने विमान विक्रीत बाजी मारली. भारताने शेवटी राफेल  विकत घेतले. त्यात ही अंबानीची भागीदारी करून. मोदि सरकार म्हणते कि अंबानीची  राफेल  उत्पादक dasault कंपनीचा भागीदारी हे खाजगी प्रकरण आहे. पण  फ्रांसचा राष्ट्रपती माक्रोन म्हणतो कि अंबानीला त्याने राफेल  मध्ये आमंत्रित केले नाही. हा सरकार ते सरकार व्यवहार आहे. खाजगी नाही. हे संशयास्पद वातावरण दूर करण्यासाठी संसदीय समितीकडून चौकशी होणे गरजेचे होते. कारण त्यात सर्वपक्षीय खासदार असतात. भाजपला सगळे लपवायचे आहे. नुकतेच  दिसून येते कि अंबानी आणि फ्रांसचे माजी राष्ट्रपती ह्यांच्यात खाजगी संबंध होता. ६०००० कोटीचा राफेल  व्यवहार पूर्ण महाराष्ट्र तारू शकतो. ३६ विमानासाठी आपण किती लोकांचे भविष्य वेठीस धरत आहोत आणि त्यात घोटाळा. देश यामुळे भयानक धोक्यात आहे. राफेल मुळे मोदींचे भविष्य धोक्यात आहे तो विषय वेगळाच.

नितीमत्ता राजकारणापासून दूर गेली आहे आणि तिची जागा विकृती आणि धोकादडीने घेतली आहे. एकमेकावर आरोप प्रत्यारोप करत राजकीय पक्षांनी आपले चरित्रहीन स्वरुपाचे चित्रण लोकांसमोर येऊ दिले. राजकारणात वाटेल ते शस्त्र वापरायचे व फक्त सत्ता आणि संपत्ती मिळवायची हा एकमेव उद्देश राजकारणात प्रचलित झला  आहे. म्हणतात युद्धात, राजकारणात व  प्रेमात सर्व काही माफ आहे. आपल्या कृत्याचे समर्थन करतात. अंतिमत: राष्ट्र उभारणी साठी पारदर्शकता प्रत्येक क्षेत्रात असली पाहिजे. राफेल  घोटाळ्यासारखे अनेक घोटाळे राष्ट्र कमकुवत करत आहेत. लाखो कोटी रु. भ्रष्टाचारामुळे लुटले जातात. ते परदेशी बँकामध्ये सुरक्षित असतात. देशाची संपत्ती परदेशात आहे असे मोदिनी गळा फाटेपर्यंत ओरडून सांगितले. ती परत आणण्याचे वचन दिले. तो गरीबाचा पैसा आहे. हजारो लोक उपाशी पोटी झोपत आहेत. भ्रष्टाचार उखडून काढल्याशिवाय हा देश शक्तिशाली आणि समृद्ध बनणार नाही. लोकांना काहींच मिळणार नाही. माझ्या देश्वसियानो हे काम जो करू शकतो त्याच्या पाठीमागे उभे राहा. देशाला वाचवा.  हीच विनंती.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS