माहुल ; मुंबईतील एक “गॅस चेंबर”_20.12.2018

पूर्ण भारतात वेगवेगळ्या आजाराने लाखो जनता  हैराण झाली आहे. डायबिटीस, हृदय विकार, कर्करोग, चिकन गुनिया हे रोग झपाट्याने वाढत चालले आहे हे कशामुळे वाढले. दोन बाबी प्रकर्षाने समोर येतात. पहिली बाब प्रदूषित हवा, पाणी, अन्न. दुसरीकडे जमिनीत रासायनिक खते कीटकनाशके औद्योगिक  रसायने आणि मल मुत्र सोडल्यामुळे सर्व जमीन आणि पाणी  वातावरण (इकोलोजी) विषारी झाले आहे. त्यामुळे आज मनुष्याच्या नसानसात वेगवेगळ्या मार्गाने विषाचा संचार होत आहे. मानवच जेनेटीकली मोडीफाईड (जैविक परिवर्तन होत आहे.) त्यातच मानवाचे राहणीमान ऐषआरामी झाले आहे.  लहान लहान मूलं मोबाईलच्या  डब्यात डोळे खुपसून दिवस दिवस गुंतून पडले आहेत. मैदानी खेळ नाहीत, व्यायाम नाही, अवयवांची हालचाल नाही.  त्यामुळे मानवी जमात शाररीक दृष्ट्या प्रचंड कमकुवत होत चालली आहे. ह्यात सरकार आगीत तेल ओतत आहे.  भांडवलशाही संस्कृतीत तत्कालीन  फायद्यासाठी जल, जंगल, जमीन आणि मानवी जीवन उध्वस्त केले जात आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्याने लोंढेच्या लोंढे शहराकडे धावत आहेत.  पूर्ण जगात काही माणस गोऱ्यांच्या देशात घुसखोरी करत आहेत.  ह्याच गोऱ्यांनी पूर्ण जगावर राज्य करून वसाहतींना लुटून जगातील संपत्ती आपल्या देशात नेली.  ह्या संपत्तीचा भोग घेण्यासाठी काही माणस गोऱ्यांच्या देशात स्थायिक होत आहेत.  त्यामुळे स्थानिक लोक विरोध करत आहेत.  यातूनच वर्णद्वेष, जाती द्वेष , धार्मिक द्वेष फोफावला आहे.  हे जगभर संघर्ष सुरु आहे.  दहशतवाद, गुन्हेगारी वाढत चालली आहे. भारतात चोहीकडे आपल्याला हा संघर्ष जाणवत आहे.  ह्यातून निर्माण झालेल्या शहरीकरणामुळे आधुनिक शहर म्हणजे उकिरडा झाला.  जसे मुंबईमध्ये राजकीय नेते बिल्डर व माफिया यांच्या अघोरी  युतीने शहरातील जमीन हडपण्याची परंपरा अविरत चालू आहे.

उदाहरणार्थ २०१५-१६ मध्ये मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनवर राहणाऱ्या या आणि रस्त्याच्याकडेला झोपडीमध्ये राहणाऱ्या गोर गरिबांना जबरदस्तीने उचलून माहूल या चेंबूर शेजारी गावात फेकले.  सुमारे ३०,००० लोकसंख्येला साक्षात मृत्यूच्या खाईत ढकलले आहे.  प्रचंड प्रदूषणग्रस्त माहुल परिसर हा आधुनिक युगातील गॅस चेंबर म्हणण्याजोगा आहे.  या परिसरात विषारी बेन्झोईन ह्या रसायनद्वारे प्रदूषणामुळे जवळपास २०० लोकांचा मृत्यू झाला आहे.  याला राज्य सरकार आणि भ्रष्ट मुंबई महानगर पालिका प्रशासन कारणीभूत आहे.  या परिसरात रस्ते रुंदीकरण आणि तानसा जलवाहिनी प्रकल्पग्रस्त जनतेला  विस्थापित करण्यात आले आहेत.

या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला डावलून विद्याविहार परिसरातील प्रकल्पग्रस्तांना माहुल परिसरात विस्थापित करण्यात येत आहे.  वास्तविक २०१५ मध्ये राष्ट्रीय हरित लवाद द्वारे माहूल हे ‘’अत्यंत प्रदूषित क्षेत्र”’ म्हणून घोषित केले आहे.  मनपाने हे पुनर्वसन करताना या जनतेला विश्वासात न घेता हा प्रकल्प रेटला.  ही जागा राहण्याला लायक नाही, असे सरकारी प्राधिकरणाचे निर्णय असताना सरकार आणि मनपाने  जबरदस्तीने माहूल मध्ये रहायला लावले आहे.  तेथील जनता नरक यातना भोगत आहे.  हे पाहून असे म्हणता येते कि ‘’भारत माँ के बच्चे है, गॅस चेम्बर मे मरते है|’’

केवळ रासयनिक प्रदुषणाचा मुद्दा नाही तर, माहूल परिसरात तेल शुद्धीकरण प्रकल्प आहेत.  विविध रासयनिक द्रव्य साठवणूक साठे आहेत.  भाभा आटोमिक रिसर्च संस्था येथून काही अंतरावर आहे.  त्यामुळे हा परिसर दहशतवादी यांच्या नजरेस पडू शकतो असे सरकारी प्राधिकरणाच्या अहवालात नमूद आहे.  तसेच माहूल मध्ये आत्ता जे हजारो लोक राहतात. त्यांच्या मुलांना शाळा देखील जवळ नाही.  रोज ८ कि.मी. अंतरावर आपल्या जुन्या मनपा शाळेत भाडे खर्चून खाजगी  वाहनाने त्यांना जावे लागते. अनेक लोकांना रोजगारापासून वंचित राहावे लागले.

मुंबई आय.आय.टी. या देशातील अग्रगण्य संस्थेने दिलेल्या अहवालात देखील नमूद आहे कि, माहूल ही जागा मानवास राहण्यालायक नाही. मुंबई उच्च न्यायालयाने ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत माहूल मधील ह्या जनतेचे दुसऱ्या ठिकाणी उचित पुनर्वसन व्हावे; असे निर्देश सरकारला दिले आहेत.  मात्र हे सरकार अमल करत नाही.  ह्या  नागनाथ भाजपा सरकारचे हितसंबंध आहेत.  मोठ्या मोठ्या बिल्डर लोकांना फुकटात जमीन देण्यासाठी जनतेला  हक्काची घरे न देता त्यांना गॅस  चेम्बरमध्ये टाकण्यात आले आहे.  हे सर्व का होत आहे याचा विचार केला पाहिजे.  सरकार सापनाथ कॉंग्रेसचे असो नाहीतर नागनाथ भाजपाचे असो फरक काहीच पडत नाही .

भांडवलशाहीचे सूत्र अमर्याद फायदा आहे. त्याचा परिणाम म्हणजे ९९ टक्के जनतेची संपत्ती १ टक्का मुठभर  श्रीमंत लोकांकडे आहे.  शासन यांच्या हिताचे निर्णय करून जनतेला देशोधडीला लावते.  मात्र ह्या मुठभरांचा विकास करणाऱ्या नीतीला दिल्लीच्या सरकारने चाप लावला.    दिल्लीत जसे विकासाचे मॉडेल उभे राहिले आहे.  ते डोळ्यासमोर ठेवून ह्या गुजरात सारख्या खोट्या विकास मॉडेलला उघडे पाडले पाहिजे. जेव्हा माफिया,  भ्रष्टाचारी लोक यांची सत्ता जाईल आणि तुमच्या आमच्या सारखे प्रामाणिक लोक निवडून येतील.  तेव्हा जसे दिल्लीत झाले, तसे आपल्या गावात, गल्लीत व राज्यात देखील होवू शकते.  एवढे मी खात्रीने तुम्हाला सांगू इच्छितो.  माहुलसह  सर्व जनतेला जगण्याचा समान अधिकार मिळाला पाहिजे. हा राज्य घटनेने दिलेला मुलभूत अधिकार आहे . ह्याचे उल्लघन सरकारला करता येणार नाही .

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS