आधुनिक स्त्री

११ एप्रिलला महात्मा फुले जयंतीनिमित्त आम्ही  ‘महिला सुरक्षा दिन’ म्हणून आम्ही  पाळला. महात्मा फुलेनी हिंदुत्ववादाची चिरफाड करून स्त्रीला समान हक्क मिळवून देण्याची सुरुवात केली. तत्कालीन हिंदुत्ववादी समाज म्हणजे चातुर्वर्णावर आधारीत समाज नव्हता.  पण २ वर्णावर आधारीत समाज होता. एक बाम्हण आणि दुसरे सर्व क्षुद्र. म्हणूनच मनुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला महाराष्ट्रातील पुजाऱ्यांनी नकार दिला. शिवाजी महाराजांनी रयतेचे लोककल्याणकारी राज्य स्थापन केले होते. ते पेशवे काळात नष्ट करण्यात आले. पुन्हा वर्णावर आधारीत राज्य चालू लागले. पेशवाईत हिंदुत्व प्रस्थापित झाल्यामुळे क्षुद्रांनी पेशव्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्याचाच परिणाम म्हणजे भीमा कोरेगाव युद्ध.  ज्यात सर्व भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूनी लढून  पेशव्यांचा पराभव  केला. असे का झाले?  पेशव्यांपेक्षा इंग्रज बरे, म्हणण्याची पाळी भारतीय सैनिकांवर का आली? कारण पेशव्यांच्या राज्यात साऱ्या जनतेचा आणि विशेषत: दलित समूहाचा इतका छळ  झाला कि लोक म्हणाले कि पेशव्यांपेक्षा इंग्रज बरे. त्या युद्धातून निर्माण होणाऱ्या वैमनस्यामुळे एकबोटे आणि भिडेनी ह्या वर्षी भीमा कोरेगावला  दंगल घडवली. ह्याचा अर्थ कि तो पाशवीपणा, क्रूरपणा, जाती-द्वेष आज पुन्हा  उफाळून आला  आहे. अशाप्रकारे आधुनिक भारतात मनुवादी शक्तींनी हिंदुत्वाचे राजकारण सुरु  करून धर्म आणि जातीच्या नावावर  द्वेष भावना पेटवली आहे. धार्मिक द्वेषाच्या आड प्रचंड पैसा हे गोळा करत आहे

म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधून काढली आणि शिवरायांच्या आदर्श राजवटीची आठवण करून समाजाला दिली. त्यात हिंदुत्वातील स्त्री शोषण मोडून काढण्याचे ज्योतीबानी ठरवले. स्त्रियांनी शिकले पाहिजे असा यल्गार त्यांनी दिला. तथाकथित हिंदुत्वात स्त्रियांनी शिकू नये हा अट्टाहास हिंदुत्वच्या पुजाऱ्यांनी का घेताला? कारण माणसाला अशिक्षित ठेवता आले कि त्याला गुलामीची जाणीव होत नाही. दुसरीकडे छत्रपती शिवरायांनी स्त्रियांना योद्धा बनवलं. २५ वर्षांची विधवा स्त्री ताराराणी घोडयावर बसून थेट औरंगजेबच्या छावणी वर हल्ला करते, किल्ले जिंकते, मुंडकी उडवते हे हिंदुत्वच्या ठेकेदारांना अजिबात सहन झाले नाही.  ताराराणीचे  नाव इतिहासातून मिटूवून टाकले. अशी योद्धा स्त्री या देशामध्ये झाली नाही. ही अनेक लढाया जिंकणारी ताराराणी ७ वर्ष औरंगजेब बरोबर लढली आणि मोगलांचा निर्णायक पराभव केला. मराठयांच स्वातंत्र्य युद्ध तिने यशस्वीरित्या जिंकले. अशा स्त्रीला महाराष्ट्राच्या इतिहासच्या पुस्तकात स्थान का मिळाल नाही? ताराराणीने केलेली सगळी कामे हिंदुत्ववादी पेशवाईने संपून टाकली, त्याचाच परिणाम म्हणून पेशव्यांचे राज्य नष्ट झाले. शिवरायांनी जे शिवराज्य स्थापन केले त्यात त्यांनी जातीपाती मधले भेद नष्ट केले. दलितांच्या हातामध्ये तलवार दिली म्हणूनच महाराष्ट्राच्या  तलवारीला धार आली.  शहाजी महाराजांच्या सैन्यातही हजारो मुस्लीम सैनिक, शिवरायांच्या सैन्यामध्ये मर्दुमकी गाजवली. ज्या राजाचे सैनिकच अंगरक्षक मुसलमान होते तो राजा मुसलमाना विरोधात कसा ? मदारी मेहतर याने आग्राहून सुटकेच्या वेळेस शिवाजी राजांना साथ का दिली? काझी हैदर अफझल खान भेटीत शिवाजी राजांसोबत वकील होता.  कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफझल खानचा वकील होता त्या काळात समाजाची फाळणी हिंदू विरुद्ध मुसलमान असती तर असे घडले नसते.  सिद्धी हिलाल आणि त्यांचे पुत्र वाह वाह  हे अनेक लढाया महाराजांबरोबर लढले. नूरखान बेग हा महाराजांचा सरनोबत हे हिंदुत्ववादी पुजाऱ्यांना अजिबात मान्य नव्हते, म्हणून त्यांनी राज्य अभिषेकला विरोध केला.

महाराजांच्या स्त्री विषयक धोरणाला पुर्नस्थापित करण्यासाठी महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिकविण्याचा विडा उचलला . म्हणून आज स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या राहू लागल्या.  एकंदरीत हजारो वर्ष मानवी मूल्यांसाठी संघर्ष चालू आहे. एका बाजूला समतावादी लोक असतात आणि दुसऱ्या बाजूला विषमतावादी लोक असतात.  हा मानवतेमधील संघर्ष कायम सुरु आहे.  शिवाजी महाराजानी समतावादी राज्य बनवले ते पेशवाईने नष्ट केले आणि विषमतावादी राज्य घडवलं, हे पेशव्यांच्या प्रत्येक विधानातून स्पष्ट होते.  पेशव्यांनी हिंदुत्ववाद आणला आणि समाजाला उच्च आणि क्षुद्र ह्या दोन जातीत विभागून टाकले. स्त्रियांना पुरुषाच्या उपभोगाच केंद्र करून टाकले.  त्या सर्वांनी प्रश्न विचारू नयेत म्हणून क्षुद्र समाज आणि स्त्रिया ह्या अशिक्षित राहिल्या पाहिजेत याची खबरदारी घेतली

म्हणूनच महात्मा फुले हे युगपुरुष ठरले त्यांनी सावित्री बाईना शिकवले आणि सावित्री बाईनी असंख्य अबला स्त्रियांना शिक्षित केले. त्यानंतर सामाजिक चळवळ सातत्याने समतेचा सिद्धांत यशस्वी करण्यासाठी चालूच आहे.  याला विरोध  करण्यासाठी धार्मिक कट्टरवादी लोक आपले  श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी समतावादी प्रवाहाला विरोध करत आहेत. त्यातूनच राष्ट्रीय सेवा संघाचा जन्म झाला ज्याने हिंदुत्व वादाला पुन्हा भारताच्या छाताडा वर बसवला. बाबासाहेबांनी मोठ्या कष्टानी भारताचे संविधान बनवून समतावादाची चळवळ कायदेशीररीत्या संविधानात रुजवली. पुढे हिंदू कोड बिल आणून स्त्रियांना द्विभार्या पद्धतीतून मुक्त केले. पण आज पुन्हा हिंदुत्ववादाचा म्हणजेच विषमतेचा विजय झाला. अशा परिस्थितीत प्रत्येक क्षेत्रात विषमता स्पष्ट दिसत आहे. विषमता म्हणजे एकाने मजा करायची आणि हजारोंनी यातना सहन करायच्या. गेल्या २५ वर्षात हा विषमता मूलक समाज भ्रष्ट होत चाललाय. त्यात महिलांवर अत्याचार  मोगलाई प्रमाणेच वाढला आहे.

हे बघूनच आम्ही स्त्री संरक्षणाची चळवळ सुरु केली. ११ जानेवारीला जवळ जवळ ४०० पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले . त्यात स्त्री सुरक्षा ही जन चळवळ बनवण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा आहे. पण हे नेहमी शक्य नसेल तर समाजातील लोकांनी पुढे आले पाहिजे. प्रथमत: प्रत्येक गावात स्त्री सुरक्षा दल ग्रामसभेने गठीत केले पाहिजे. त्याला पंचनाम्याचा अधिकार पाहिजे. ह्या दलाला प्रशिक्षित केले पाहिजे.  सामुहिक बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, यांसाठी पोलिसांनी पण कसून चौकशी केली पाहिजे. पण असा कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडावे लागेल. जिथे सामुहिक बलात्काराला फक्त मृत्युदंड शिक्षा असावी. दुसरी शिक्षा देण्याची सुट  न्यायालयाला नसावी. त्याचबरोबर, प्रत्यक पोलीस स्टेशनमध्ये स्त्री पोलीस असल्याचं पाहिजेत आणि बलात्कारित स्त्रीला खटल्यासाठी विशेष सरकारी वकील दिला पाहिजे. नाहीतर आजकाल सरकारी वकील ११ महिन्याच्या कंत्राटावर असतो. ह्यात नागरिकांचे दल सर्वात महत्वाची भूमिका निभावू शकते. बलात्कारीत स्त्रियांचे संरक्षण तिला आधार देण्याचे काम नागरिक दलांनी करावे. तिचे मेडिकल करणे, चार्ज शिट पर्यंत संरक्षण करणे व  त्यांना आधार देणे. अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील. नाहीतर बलात्कार झाल्यावर स्त्रीला जवळ जवळ वाळीत टाकल्याप्रमाणे वागवले जाते. तिला आधार दिला पाहिजे.  स्त्रीला सन्मानाने जगण्यासारखी परिस्थिती समाजालाच निर्माण करावी लागणार आहे.  ह्या प्रसंगी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला व समाजाला ह्या बाबतीत सहकार्य करायची ग्वाही दिली. आता पुढे जाऊन आपण स्त्री सुरक्षा दल निर्माण करण्यासाठी पुढे येऊ व हे काम सुरु करू. हे पहिले पाऊल असेल. फक्त सरकारवर अवलंबून राहून हे चालणार नाही. तर आपल्या संरक्षणासाठी स्वत: तयारी केली तर त्यातूनच एक खरी नवीन स्त्री निर्माण होईल.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS