संकटात भारत_6.12.2018

भारतात चोहीकडे अराजकता नांदत आहे. महिलांवरचे अत्याचार, भ्रष्टाचार, जातीयवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आर्थिक गुन्हेगारी, माफिया राज, महागाई.  सामान्य माणसाला दिवसेंदिवस जगणे कठीण झाले आहे. माझ्या देशाची ही अवस्था कुणी केली आणि का झाली? ह्याचे व्यापक विश्लेषण करणे आवश्यक आहे. १९९२च्या बॉम्बस्फोट आणि दंगली नंतर मी १०० खासदाराच्या सह्या घेवून मागणी केली होती कि हे विश्लेषण करण्यासाठी गुप्तहेर संघटना,पोलीस आणि सुरक्षा दलांची एक समिती नेमण्यात यावी. त्यानुसार, एक उच्चस्तरीय समिती, तत्कालीन केंद्रीय गृहसचिव आणि बरेच काळ राज्यपाल असलेले श्री एन.एन.वोरा यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख गुप्तहेर खाती आणि ४ राज्याचे पोलीस प्रमुख यांची वोरा समिती स्थापन झाली.  अशी समिती कधीच गठीत करण्यात आली नव्हती व पुन्हा कधी गठीत करण्यात येणार नाही.  पहिल्यांदाच  RAW आणि IB चे अधिकृतपणे नाव सरकारने घेतले. माफिया, राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगणमताबद्दल  चौकशी करण्यासाठी ही समिती नेमण्यात आली. एकंदरीत भारतीय लोकशाहीतील विकृतीवर प्रकाश टाकण्यासाठी ही समिती नेमण्यात आली.  मी काही वर्ष सैन्यदलाच्या गुप्तहेर खात्यात काम केले होते. त्यातील माझ्या अनुभवातून मला स्पष्ट दिसत होते कि ह्या देशात गुंडाराज्य स्थापन होत आहे.

१९९१ला खासदार झाल्यानंतर मी ह्या गुंडाराज्य विरुद्ध संघर्ष सुरु केला होता. त्यात तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक व केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण  यांनी पूर्ण साथ दिली. माफिया विरुद्ध जोरदार मोहीम सुरु झाली. टाडा कायद्याअंतर्गत अनेक राजकीय नेते तुरुंगात जेरबंद झाले. त्यामुळे, अनेक आमदार खासदार सरकारला विरोध करू लागले. देशातील गुन्हेगारी आणि दहशतवाद संपुष्टात येत होता. मुंबईतील आक्रमक हल्ल्यामुळे सिख दहशतवाद संपुष्टात आला.  कारण मुख्य पैसा मुंबईतून पुरवला जायचा. आजदेखील भारतातील दहशतवादाला पैसा मुंबईतूनच जातो.  कारण दहशतवादाचे आर्थिक सूत्र, अफू आणि हत्यार तस्करीत असते. काश्मिरमध्ये इतका खून खराब झाला. पण एकाही हिंदू किंवा मुस्लिम खासदाराला मारण्यात आले नाही. ह्याचे सर्वाना नवल वाटले पाहिजे.  ह्याचे कारण सर्वच अफूच्या तस्करीला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ देतात. त्यातूनच हत्यारे विकत घेतली जातात आणि देशद्रोह्यांच्या हाती प्रचंड पैसा जातो.

वोरा समितीने स्पष्ट अहवाल दिला कि भारतात माफिया,राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे एक समांतर सरकार राज्य करत आहे. सडलेले सरकार कुणाचे काम करेल? अर्थात पैश्याचे. त्यात १९९१ ला मनमोहन सिंघ अर्थमंत्री झाले आणि भारताची लोककल्याणकारी व्यवस्था बदलून भांडवलशाही व्यवस्था बनली. खाजगीकीकरण, जागतिकीककरण आणि उदारीकरण (खाउजा) धोरण भारतात प्रस्थापित झाले.  या धोरणाला कॉंगेस मध्ये बराच विरोध झाला आणि त्यातच बाबरी मस्जिद कांड झाले. दंगली झाल्या.  सुधाकर नाईक यांना काढण्यात आले. जनतेचे पूर्ण लक्ष हिंदु मुस्लिम संघर्षाकडे वळवण्यात आले.  त्यापाठी माफिया पुन्हा महाराष्ट्रात आणि देशात प्रस्थापित झाला. दुसरीकडे मनमोहन सिंगचे खाउजा धोरण लागू करण्यात आले  व तेच धोरण आता भाजप आक्रमकपणे राबवत आहे व त्यातूनच आजची अराजकता भारतात निर्माण झाली.  संविधानाला गाडून लोककल्याणकारी राष्ट्र नष्ट झाले. शेतकरी, कामगार, कष्टकरी आज हवालदिल झाले.

हे धोके डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी त्यावेळीच सूचित केले होते. डॉ. आंबेडकरांनी सर्व जनतेला उद्देशून रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया  बनवण्यासाठी जनतेला उद्देशून १ खुले पत्र लिहेले होते. त्यात स्पष्ट लिहिले होते ज्या देशात समता नसेल त्या देशात लोकशाही नांदू शकत नाही. नैतिकता हा लोकशाहीचा मूळ पाया असला पाहिजे. असे मत मांडले होते.  जिथे वशिलेबाजी असेल तिथे न्याय सामान्य माणसाला मिळणार नाही. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपण युगपुरुष म्हणतो. त्यांनी हजारो वर्ष भरकटलेल्या भारताला स्थिर केले. आपल्या प्रचंड इच्छा शक्तीने अशक्य ते शक्य केले. त्यांनी भारताला सर्वमान्य भारतीय संविधान दिले. सम्राट अशोकांचा आनंदी, एकसंघ आणि संपन्न भारतानंतर देश भरकटत गेला. सामाजिक, राजकीय  आणि धार्मिक अराजकता हा भारताच्या इतिहासाचा  स्थायीभाव झाला. देश फुटला, भारताचे तुकडे तुकडे झाले. मनुवाद्याच्या बडग्यात छोट्या छोट्या राजांनी आणि पुजाऱ्यांनी समाजाला गुलाम करून टाकले. चातुवर्णाच्या ओझ्याखाली भारतीय समाज दाबला गेला. स्वातंत्र्यानंतर भारताचे संविधान लागू झाले व देश समतेच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला.  त्यामुळे श्रीमंत, जमीनदार व उद्योगपती चवताळले. संविधानाचे मूळ तत्त्व समता, न्याय व बंधुत्व हे त्यांना मान्य नव्हते.  माणसाने माणसाचे शोषण करण्याची पद्धत बदलून फायद्याचे राज्य म्हणजेच संविधानाचे राज्य हे धन दांडग्याना मान्य नव्हते.  त्यातूनच जनसंघ आणि नंतर भाजप निर्माण झाले ते सुद्धा हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली आज लोकांचे लक्ष मंदिर मस्जिदवर केंद्रित करून भारताला लुटण्याचे काम करत आहे.

बाबासाहेबांनी मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयकरण करण्याचा निर्णय घेतला होता.  त्याप्रमाणे अनेक उद्योगांचे राष्ट्रीयकरण झाले.  त्यांनी मोलाचे योगदान भारताला दिले.  १९९१ नंतर मात्र खाजगीकरणाचा बडगा उगारण्यात येवू लागला.  जसे आज हिंदुस्थान एरोनॉटीक लिमिटेड (Hal) ला बाजूला टाकून राफेलचे कंत्राट अंबानीला देण्यात आले.  रेल्वे, बससेवा, पाणी, वीज, शिक्षण या सर्वांचे खाजगीकरण झपाट्याने चालू आहे.  त्यातून लाखो सरकारी नोकऱ्या नष्ट झाल्या.  त्यामुळे आरक्षण सुद्धा प्रचंड प्रमाणात कमी झाले.  पुढच्या ५ वर्षात ५० लाख नोकऱ्या कमी होतील.  १९९१ ला मनमोहन सिंगचे खाऊजा धोरण आल्यापासून केवळ १ टक्का नोकऱ्या वाढल्या.  सरकारी रुग्णालये, शाळा भकास झाल्या.  घर नाही, पाणी नाही, अशा स्थितीत खाऊजा धोरणाने भारतीय जनतेला आणून ठेवले आहे.  कंत्राटी कामगार धोरणांमुळे कमालीचे शोषण वाढले. कामगारांचा अर्धा पगार हे कंत्राटदार खावून टाकतात.  विषारी रासायनिक खत आणि किटकनाशकामुळे कॅन्सर, डायबिटीस, हृदयविकार प्रचंड वाढले.

सरकार हे लोककल्याणासाठी असते, हे संविधानातील वचन लुप्त झाले.  मल्ल्या, निरव मोदी, चौक्शी सारखे लोक देशाला लुटून फरार होतात. सरकार त्यांना फरार व्हायला मदत करते आणि इकडे शेतकरी आत्महत्या करतात.  हे सर्व संविधानाला तुडवल्यामुळे झाले आहे. बाबासाहेबांनी लोकशाही आणि संविधानाला गाडण्याचे परिणाम यावेळी त्यांच्या लिखाणातून अनेकदा सांगितले.  पण सत्ता, संपत्ती आणि प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आजच्या प्रचलित पक्षानी लोकशाहीला पैशाचे बटिक बनविले.

पूर्वी राजकीय पक्षांना माफिया आणि भांडवलदार  पैसे पूर्वत असत. आता माफिया आणि भांडवलदारांनी सर्व पक्षांना विकत घेतले आहे. त्यांच्या आदेशावर आज सरकारी धोरणे बनविली जातात. म्हणून बुलेट ट्रेनला प्राधान्य दिलं जात व शेतकऱ्यांना नगण्य गणल जात. अंबानी आज देशाचे राष्ट्रपती बदलू शकतात. त्यासाठी बाळासाहेब ठाकरे सारख्या नेत्याला  काँग्रेसच्या राष्ट्रपतीच्या उमेदवाराला मदत करायला भाग पाडतात. शरद पवारांना फडणवीस सरकारला पाठिंबा द्यावा लागतो.

हे सर्व बदलाव लागेल.  माफिया, राजकीय नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या समांतर सरकारला नष्ट करावं लागेल. हे काम सोपे नाही. त्यासाठी पुन्हा एकदा नवीन स्वातंत्र्य लढा उभा करावा लागणार आहे. बघता काय शामिल व्हा. “निकलो बाहर मकानोसे, जंग लढो बेईमानोसे|”

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS