अफगाणी (भाग -३)_२.९.२०२१

गेली १०० वर्ष अफगाणिस्तान मधील जनतेमध्ये व समाजामध्ये प्रचंड संघर्ष चालू आहे.  एक गट आहे जो आधुनिक जीवन स्विकारणार व स्त्रियांना पुरुषांसारखेच हक्क देणारा आहे.  दुसरा गट कट्टरवादाकडे झुकलेला आहे.  शतकाच्या संघर्षानंतर आज अफगाणिस्तानचे राज्य तालिबानच्या हातात गेले आहे. ते स्वत:ला इस्लामिक राष्ट्र म्हणतात.  गेले अनेक वर्ष गुंडाराज अफगाणिस्तानमध्ये प्रस्थापित झाले होते आणि या गुंडा राजाची आर्थिक शक्ती ही ड्रग्स मध्ये होती.  सर्व सरकारने त्या ड्रग्सपासून मिळणाऱ्या पैश्यावर लक्ष केंद्रित केले होत.  तालिबानने त्याच्यावर बंदी आणली होती.  म्हणून तालिबान्यांच्या विरोधात लोक गेले होते आणि अमेरिकन सैन्याने तालिबानला अफगाणिस्तान मधून हुसकून लावले.  मागील  २०  वर्षाच्या युद्धानंतर अमेरिकेला पळून जाव लागल, ही अत्यंत शरमेची गोष्ट आहे. नवीन परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानचा समाज हा कट्टरवादी होईल व स्त्रियांचे हक्क नष्ट होतील. पुरुषांना दाढी लागणार.  त्याच बरोबर ५  वेळा नमाज करायला लावणार. जे काही निर्बंध असतील ते लोकांवर निश्‍चितपणे लागू करण्यात येतील.  स्त्रियांच्या बद्दल तालिबानचे धोरण काय विशेष बदलणार नाही. स्त्रियांनी शिक्षण घेऊ नये, काम करू नये अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये काही बदल दिसणार नाहीत.

 
१९११ ला मोहम्मद बेग तार्झीने ‘शिराज-अल-अकबर’ असे मासिक सुरू केले.  हा आधुनिक टर्कीच्या राजेशाही वातावरणात वावरला होता आणि म्हणून त्यांनी एक आधुनिक समाजाची रचना व्हावी असा प्रसार केला.  त्याच वेळी राजा हबिबुल्लाह यांनी ब्रिटिश प्रभावाखाली सामाजिक परिवर्तनाला पुरस्कृत केले. समाजाची प्रगती महिलांच्या प्रगती शिवाय होणार नाही आणि महिलांना शिक्षण असलेच पाहिजे असा समाज निर्माण करण्याचे हबिबुल्लाहने जाहीर केले. तार्झीची पत्नी अस्मा खानुन हिने सुद्धा तार्झीचा प्रभाव समाजावर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.  १९२१ ला  वर्तमानपत्र सुरू केले, ज्याचे  नाव ‘इर्शाद अल निस्वन’ देण्यात आले.  म्हणजे स्त्रियांचे मार्गदर्शन.  तार्झी  आणि अस्माच्या मुलीचे नाव सोरीया तार्झी होते.  तिने तेथील राजा अमानुल्लाह खान बरोबर लग्न केल.  १९२१ ला अफगाणिस्तानला महिलांची पहिली शाळा सुरू केली.  त्याचं नाव ‘मगतब आय-मस्तुरत’ असे होते आणि शासनाच्या प्रभावाखाली राजा अमानुल्लाह खान यांनी सामाजिक परिवर्तन करण्यासाठी मोहीम सुरू केली.  १९२८ साली अमानुल्लाच्या  एका बहिणीने एक संस्था काढली तिचं नाव ‘अंजुमन’ म्हणजे स्त्रियांचे संरक्षण.  दुसऱ्या बहिणीने स्त्रियांचे हॉस्पिटल सुरू केले. या सगळ्या सुधारणावादी गोष्टी राजे राजवाड्यात प्रसारित झाल्या.   त्यावेळी जवळजवळ ८००  मुलींनी शाळेमध्ये शिक्षण घेतले.  समाजात याचे विपरीत परिणाम सुद्धा झाले.  मुफ्ती मोहम्मद रफीक यांनी तार्झीला पत्र लिहिले आणि विचारले.  तुम्ही स्त्री शिक्षणावर जोर का दिला? आणि पुरुषांवर आणि मशीनवर जोर का नाही दिला? तार्झी म्हणाले, “देशात अनेक वर्तमान पत्र आहेत ते सगळ्या विषयावर लिहित आहेत आणि स्त्रियाचे विषय समोर आणण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”  तार्झी कडून प्रेरणा घेऊन अमानुल्लाह खान याने सामाजिक चळवळ सुरू केली आणि काही हुकुम त्यांनी काढले. बालविवाह रद्द केले. एका पुरुषाने एका पेक्षा जास्त स्त्रीयांशी लग्न करण्यास बंदी आणली.  विधवांना पुनर्विवाह करायला परवानगी दिली आणि बुरखा वगैरे या प्रथा मोडकळीस आणण्याचा प्रयत्न केला.
 
यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमानुल्लाने तिसऱ्या ब्रिटीश-अफगाण युद्धात ब्रिटीशांचा १९१९ मध्ये पराभव केला.  म्हणून ब्रिटन अमानुल्लाला विरोध करण्यात फार रस घेऊ लागला. १९२७-२८  युरोपच्या दौऱ्यावर अमानुल्लाह खान व सोरीया गेल्या.   ह्या दौर्‍यामध्ये सोरीयाने बुरखा घेतला नाही आणि फोटोग्राफ काढले.  फ्रान्सच्या राष्ट्रपतीने तिच्या हाताचे चुंबन घेतल्याचे फोटो प्रसारित झाले आणि ब्रिटनच्या गुप्तहेर खात्याने फोटो अफगाणिस्तानमध्ये प्रसारित केले. त्यामुळे कट्टरवादी लोक हे अमानुल्ला यांच्या  विरोधात जायला लागले.  एक मोठा गुंडा राजा हभिबुल्ला कनकनी याने कट्टरवादी मुल्लांना मदत केली व काबुल वर चालून गेले.  कनकनीने काबुल वर कब्जा केला.  मुल्लांनी शाळा बंद केल्या, बुरखा पद्धत परत आणली आणि सर्व सुधारणा ज्या मान्यवरांनी केल्या होत्या त्या रद्द करून टाकल्या.
 
१९१९ पासून ते आजपर्यंत हा संघर्ष चालू आहे.  एकीकडे सुधारणावादी आहेत, एकीकडे कट्टरवादी आहेत. कट्टरवादी लोकांनी राजघराण्याचा उपयोग केला आणि ब्रिटिशांचा उपयोग केला आणि अफगाणिस्तानला कमकुवत करून टाकले. अमानुल्लाच्या सामाजिक चळवळीला ब्रिटिश लोकांनी विरोध केला आणि अफगाणिस्तानात सामाजिक प्रगती थांबवली.  १९५३ पासून १९९२ पर्यंत सुद्धा सामाजिक सुधारणेचे पर्व होते, १९९२ नंतर अंधकार होता.  यावेळी अमेरिका, सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तान यांनी अफगाणिस्तानचे राज्य चालवण्याचा प्रयत्न केला आणि येथील सामाजिक घडी उलथून टाकण्याचा प्रयत्न केला.  
 
अफगाणिस्तानमध्ये चार संविधान निर्माण झाले.  १९२३, १९६४, १९७६ आणि १९८७ या सर्व घटनांमध्ये पुरुष आणि स्त्री समानतेचा प्रामुख्याने प्रसार करण्याचा प्रयत्न झाला.  हे समतेचे पर्व तार्झी आणि कम्युनिस्ट सरकारने केलं.  १९७९ पर्यंत साधारण २०% लोक शिक्षित होते.  १९७० च्या दशकामध्ये कम्युनिस्ट राजवट येणे आणि प्रधानमंत्री दाऊद यांनी या सामाजिक परिवर्तनामध्ये लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता.  १९७७  साली अनन्विता राटेझाड यांच्या विचारसरणीतून एक नवीन कायदा बनवला.  त्यात अनेक सामाजिक सुधारणा करण्यासाठी कायदे बनविण्यात आले. अनन्विता १९६५  ला पार्लमेंटमध्ये निवडून आली होती.  तिच्याबरोबर आणखी तीन मुली होत्या आणि लोकशाही आणण्याचा प्रयत्न या स्त्रियांनी केला आणि आंदोलनात सुद्धा मोठ्या प्रमाणात यांनी भाग घेतला.  कायदा सुधारण्याचा प्रयत्न केला.  १९७७च्या कायद्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे. “अफगाणिस्तान येथील सर्व लोक स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क आहे.  या कायद्यावर कम्युनिस्टांनी पुढे बरीच सुधारणा केली.” एक प्रचंड शिक्षणाचा कार्यक्रम कम्युनिस्टांनी देशांमध्ये आणला.  १९७८ साली कम्युनिस्ट क्रांतीच्या वेळेला शिक्षणाचा दर १८.६ टक्के होता.  जवळजवळ २०००० शिक्षक ग्रामीण आणि शहरी भागात गेले आणि प्रचंड शिक्षणाची क्रांती केली.  कारण शिक्षणा शिवाय सामाजिक क्रांती होऊ शकत नाही.  हजारो स्त्रियांनी कॉलेज सोडून शिक्षणाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेतला.  उदारमतवादी संस्कृती निर्माण होत होती.  ती पूर्ण अफगाणिस्तान मध्ये पसरली.  त्याला  मुल्लांनी आणि जमीनदारांनी सरळ सरळ आव्हान दिले.  शिक्षणाचा प्रसार आणि जमीन महसुलाच्या कायद्यामधील बदलाकडे बघताना जमीनदाराने आणि मुल्ला-मौलवीना हे परदेशी आक्रमणासारखे वाटू लागले आणि त्याच्या विरुद्ध काही करून लढलं पाहिजे अशाप्रकारे त्यांनी निर्णय घेतला.
 
सुरुवातीपासून या सर्व सुधारणाना कट्टरवाद्यांचा विरोध होता.  जमीनदारांचा आणि जमातीच्या मुल्लांचा त्यांना विरोध राहिला.  अमेरिकेने आणि सौदी अरेबियाने कट्टरवाद्यांना प्रोत्साहन दिलं.  नादरशहा आणि नझीबउल्लाला ठार मारण्यात आले.  तसेच कट्टरवाद्यांचे नेते निर्माण झाले, त्यात बुरहानुद्दिन रब्बानी हा एक होता. तो अत्यंत कट्टरवादी होता.  त्याला अमेरिकेने आणि सौदी अरेबियाने मदत केली. रब्बानी पाकिस्तानला पळून गेला.  तेथे त्यांनी अफगाणिस्तानमधील दहशतवादी गट बनवायला सुरू केले.  ज्याला ते मुजाहिद्दीन म्हणू लागले. अमेरिकेने आणि सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या मदतीने लोकांना तरबेज केले, युद्धसामुग्री दिली आणि पाकिस्तानमध्ये कट्टरवाद्यांचे सैन्य बनवले.
 
साहजिकपणे हळूहळू दहशतवाद्यांच्या मोठ्या टोळ्या बनू लागल्या.  रब्बानीने पाकिस्तान मध्ये बहुपत्नी विवाह व बालविवाह यांचे फायदे सांगायला सुरु केले आणि जे बदल अफगाणिस्तानमध्ये  अमानुल्लाह पासून ते कम्युनिस्टांनी घडवले होते त्याला उलट फिरवायला सुरू केले. रब्बानीने गुलमउद्दीन हिकमतयार ह्याला पाकिस्तानमध्ये बोलवले.  हिकमतयारने १९६९  साली बुरखा न घातलेल्या मुलींच्या तोंडावर अॅसिड फेकले होते आणि २० वर्षानंतर त्याचे चाहते हे स्त्री शिक्षकांचा आणि कार्यकर्त्यांचा तोंडावर अॅसिड फेकण्याचे काम करू लागले.  हे लोक अत्यंत कट्टरवादी होते आणि सामाजिक चळवळीचे विरोधक होते.  सर्व मुजाहिद्दीन अमेरिकेचे चमचे होते आणि त्यांनी पाकिस्तानमधील कॅम्पमध्ये कट्टरवादी इस्लामचा प्रसार करायला सुरु केला. त्यातच ओसामा बिन लादेन आणि अलकायदा निर्माण झाली. १९९०  साली २००  मुल्ला आणि मौलवीनी एक आदेश जाहीर केला की स्त्रीने शिकायचं नाही.  ते म्हणाले की हे योग्य वेळ नाही.  रशियन पळून गेल्यानंतर तिथे ३ वर्ष नजिबुल्लाहच्या कम्युनिस्ट सरकारने मुजाहिद्दीन विरुद्ध लढा दिला.  त्यात  राष्ट्रपती नजिबुल्लाहला भर चौकात फासावर लटकवण्यात आले आणि खऱ्या अर्थाने अफगाणिस्तानवर गुंडाराज स्थापन झाले. म्हणजेच अफगाणिस्तानाचे वाटप रब्बानी, हिकमतयार आणि अनेक टोळ्यांमध्ये झाले.  या गुंडाराज मध्ये लाखो स्त्रियांवर बलात्कार झाले.  अनेक खून झाले.  ड्रग माफिया वाढत गेले व पूर्ण अराजकता निर्माण झाली.  या विरोधात कंधारमध्ये तालिबान हे धार्मिक विद्यार्थी उठाव करू लागले  व सुरुवातीला कंधारचा कब्जा घेतला.  सामान्य माणसाने त्यांचे स्वागत केले.  कारण तालिबान कट्टरवादी जरी असले तरी त्यांनी कायद्याचे राज्य स्थापन करायला सुरुवात केली.  अर्थात कायदा हा सोरीयाचा होता.  हळूहळू त्यांनी पूर्ण अफगाणिस्तान वर कब्जा केला व १९९६ साली तालिबानचे सरकार प्रस्थापित झाले. ते आता पुन्हा स्थापन होत आहे.  अर्थात सद्या तालिबान हे आपला सौम्य चेहरा दाखवत आहे आणि पाकिस्तान हे तालिबान बरोबर जोडलेले आहे.  आता पुढे काय होते हे बघूया.
 
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९
Please follow and like us:

Author: Brigadier SS