साधारणतः सामान्य माणसाला जगात काय चालले आहे ते कळतच नाही. जागतिक घडामोडी सामान्य माणसाच्या जीवनावर सर्वात जास्त परिणाम करतात. उदा. अमेरिकेने तेलाचे भाव वाढवले तर सर्वच वस्तू महाग होतात आणि गरिबांचे प्रचंड हाल होतात. डॉलरची किंमत रुपयाच्या मानाने वाढली तर देशात येणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किंमती वाढतात. टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मोटार गाड्या, मोबाईल, कोका- कोला वगैरे या सर्वांचीच किंमत वाढते. कारण या सर्वात परदेशातून आयात केलेले भाग असतात. आज अमेरिका हा जागतिक माफिया टोळीसारखा वावरत आहे. जगातील सर्व देशांच्या तेल साठ्यावर कब्जा करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ला केला. नंतर कारण नसताना इराकवर हल्ला केला. अल कायदाबरोबर सिरीयामध्ये यादवी युध्द निर्माण केले. आता त्याला इराणवर हल्ला करायचा आहे. दुसरीकडे, दक्षिण अमेरिकेत तेल संपन्न वेनेझुवेलामध्ये सरकार चालूच देत नाही. तेलावर कब्जा केला तर जगावर कब्जा करता येतो.
इराण हा पूर्वी पाकिस्तानचा समर्थक होता. १९८८ साली मी पहिल्यांदा एक प्रस्ताव गुप्तहेर खात्यात मांडला कि पाकिस्तानचा आधार नष्ट करण्यासाठी इराणला भारताबरोबर आणावे लागेल. हा प्रस्ताव थेट राजीव गांधीकडे पोहचला. १९९१ला मी खासदार झाल्यावर सातत्याने पाठपुरावा करून इराणची भारताबरोबर मैत्री घडवून आणली. त्याबरोबर पाकिस्तानचा मुख्य आधार नष्ट झाला . तेव्हापासून भारत इराणची मैत्री एवढी वाढली कि भारताला आता तेल साठा कमी पडण्याची भीतीच नाही. भारत ८०% तेल आयात करतो. जरी थोडी किंमत वाढली तरी भारताला हजारो कोटी मोजावे लागतात. इराणने देखील विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये मोठी मजल मारली, त्यात भारतीय शास्त्रज्ञांचा मोठा वाटा आहे व इराणने देखील अणु अस्त्र बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. त्याबरोबर अमेरिकेने सौदी अरेबिया व इस्राईलला जवळ केले. सौदी अरेबिया सातत्याने इराणला ठेचायला अमेरिकेला आग्रह करत होते आणि इस्राईल देखील इराणवर हल्ला करायला नेहमीच उत्सुक राहिले आहे. अमेरिकेने इराण विरुद्ध जागतिक बंदी घातली. भारतासकट सर्व जगातील राष्ट्रांना बजावले कि इराणशी कुठलाही संबंध ठेवायचा नाही. इराणवर पूर्ण बहिष्कार घातला. त्यावर तोडगा काढण्यासाठी इराणनी अणु हत्यार बनवणे बंद करण्याचे ठरवले. मग अमेरिका आणि इराण मध्ये ओबामाने २०१५ ला करार केला. इराणवरचा बहिष्कार मागे घेतला.
नुकतेच ८ मे ला अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने हा करार रद्द केला आणि पुन्हा इराणवर बहिष्कार टाकण्याचा जगाला आदेश दिला. ट्रम्पला इराणवर हल्ला करायचा आहे आणि तेथील तेलसाठा आपल्या कब्जात आणायचे आहे. पण युरोप, चीन, रशिया या बाबतीत अमेरिकेला विरोध करत आहेत. जर्मनी, फ्रांस आणि इंग्लंडच्या नेत्यांनी इराणला आग्रह केला आहे कि त्यांनी कराराचे पालन करत राहावे. फ्रांस राष्ट्रपती माक्रोन म्हणाले कि ट्रम्पच्या भूमिकेमुळे सर्वच अनुअस्त्र बंदीचा करार धोक्यात आलेला आहे. जगामध्ये अणु हत्यारे निर्माण होऊ नये म्हणून IAEA ही आंतरराष्ट्रीय स्वायत्त संघटना आहे. त्यांनी १० अहवाल प्रकाशित केले आहेत. त्यात स्पष्ट म्हटले आहे की इराण कराराचे पालन करून अनुअस्त्र निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही. ज्यामुळे इराण वरील बंदी मिटवली पाहिजे. IAEA ची जवाबदारी अनुअस्त्रचा प्रसार बंद करण्याची आहे. कुठलाही देश अनुअस्त्र बनवणार नाही ह्याचा प्रयत्न ती करते. भारत तिला जुमानत नाही. जगाच्या विरुद्ध जावून भारताने अनुअस्त्र बनवले. म्हणून अमेरिकेने भारताविरुद्ध बहिष्कारही टाकला होता.
रशिया आणि चीनचा इराणला पूर्ण पाठींबा आहे. त्यांनी अमेरिकेच्या निर्णयाला पूर्ण विरोध केला आहे. युनोचे प्रमुख एंटोनियो गुटेरेस यांनी ट्रम्पला निर्णय रद्द करण्याचा आग्रह केला आहे. भारत, इराणच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात आयात करतो. अमेरिकेने भारतीय कंपन्यांना आदेश दिला आहे की इराण बरोबर कुठलाही संबंध ठेवायचा नाही. भारत इराणमध्ये सर्वात मोठे बंदर छबार बंदर बांधत आहे. अनेक प्रकल्पातून भारताला इराणकडून पैसे मिळत आहेत. शिवाय पाकिस्तानला शह देण्यासाठी इराण भारताला मदत करत आहे. त्यामुळे अमेरिकेचा हुकुम मानायचा का भारताची राष्ट्रीय सुरक्षा अभादीत राखायची?, हा प्रश्न मोदींना सोडवावा लागणार आहे. ट्रम्पने आधीच भारतावर रशियाची हत्यारे घेतल्याबद्दल बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. आता चीन आणि भारताने या धमकीला मोडून घालण्याचे ठरविले तर काय होईल. ट्रम्पने नुकतेच मंत्रिमंडळ बदलेले आणि इराण द्वेष्टे लोकांना मंत्रिमंडळात घेतले. मंत्री झाल्याबरोबर विदेश मंत्र्यांनी सौदी अरेबिया आणि इस्त्राईलला इराण विरुद्ध सगळ्यांनी एकत्र येण्याचे आव्हान केले आहे.
एकंदरीत ट्रम्प राष्ट्रपती झाल्यानंतर गोऱ्या माणसाच्या प्रभुत्वाचे पुन्हा एकदा बीजारोपण झाले. देशाचे राजकारण ढेपाळले. कृष्ण वर्णाच्या लोकांना अमेरिकेतून हाकलण्यात येते. अनेक भारतीय भारतात आले. तुमच्या देशात परत जा असे म्हणत गोऱ्या टोळ्या अमेरिकेत फिरत आहेत. जसे भारतात धार्मिक युध्द पेटवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जातो. हिंदुत्वाच्या नावावर हिंदू शेतकऱ्यांना मृत्युच्या दरवाज्यातून हाकलण्यत येते आणि निर्लज्जपणे अश्लील श्रीमंतीचा देखावा उभारला जातो. कोट्यावधी रुपये खर्च करून लग्न केली जातात व दुसरीकडे अर्ध पोट जेवून आपल्या तान्ह्या मुलाला दुध पाजण्याचा प्रयत्न हिंदू माऊली करते. हा खरा प्रश्न जगासमोर आहे. युध्द श्रीमंत आणि गरीबात आहे. १% लोक पृथ्वीचा पूर्णपणे उपभोग घेत ऐशो आरामात जगत आहेत. ९९% लोक गरिबीत जगत आहेत. ही विषमता नष्ट करण्यासाठी सर्व देश निर्माण झाले. पण अमेरिकन भांडवलशाही व्यवस्थेने पृथ्वी पादाक्रांत केली व त्यांच्या आदेशावर जगण्याची पाळी स्वतःला स्वतंत्र म्हणणाऱ्या देशांना भोगावी लागत आहे.
बाबासाहेब म्हणाले होते कि गुलामांना गुलामीची जाणीव करून दया. ही जाणीव भारतीयांना करून देण्याचा प्रयत्न मी केला आहे. भारताच्या बाजारपेठेवर कब्जा करण्याचा प्रयत्न अमेरिका आणि चीन देखील करत आहे. गोऱ्यानी अनेक वर्ष देशाला लुटले आता आपलेच सत्ताधीश अमेरिकन षडयंत्राचा भाग झाले आहेत. आधी मनमोहन सिंघ, नंतर भाजप या सापनाथ /नागनाथ जोडगोळीने देशाचे सार्वभौमत्व गहाण ठेवले आहे. म्हणूनच शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागत आहेत. कंत्राटी कामगार कायदा, कर्जमाफी करण्यास विरोध, परदेशी शेतमाल आयात करायला भारताला आदेश देणे, पाकिस्तानची साखर आयात करणे, असे अनेक प्रकार अमेरिकेचे हत्यार जागतिक व्यापार संघटना करायला लावत आहे. ह्याला विरोध करून हिंदू शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न भाजप करत नाही. फक्त हिंदुत्व म्हणण्याचे नाटक करते. जातीद्वेष निर्माण करून सत्तेवर राहते. अमेरिकेची दादागिरी नष्ट करण्यासाठी भारताला संघर्षाला तयारी करावी लागेल. नाहीतर आणखी २०० वर्ष गुलामाचे जीवन जगावे लागेल.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाइट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९