अमेरिकन राष्ट्रपती निवडणूक व भारत_31.12.2020

अमेरिकन राष्ट्रपतींची निवडणूक ही जगभर आकर्षणाचा एक भाग आहे. अमेरिका हा जगात एखाद्या दादा सारखा वागतो. सर्व देशांच्या राज्यकर्त्यांना आपल्या मुठीत ठेवतो. एवढेच नव्हे तर सर्व देशात आपल्याला सोईचे सरकार निवडून आणतो किंवा हुकूमशहाला आणतो. भारत-पाक संघर्षात अमेरिकेने नेहमी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि देत राहणार. पण भारत सरकार नेहमी १९९१ पासून अमेरिकेच्या दबावाखाली वावरत आहे.  मग ते कुठल्याही पक्षाचे सरकार असो. दुर्दैवाने भारतीय मतदार परराष्ट्र धोरणात रस घेत नाही. त्यामुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे.

जगात फक्त चीन आणि रशिया हे अमेरिकेच्या विरोधात उघडपणे काम करतात.  म्हणून चीन आणि रशियाने भारत, द. आफ्रिका आणि ब्राझिलला घेऊन ‘ब्रिक्स’ नावाची संघटना केली. त्याचा उद्देश अमेरिकेपासून मुक्त होऊन एक वेगळे सत्ताकेंद्र निर्माण करणे.  ब्रिक्समुळे अनेक देश अमेरिकेच्या मक्तेदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अमेरिकेने भारताला चीन विरुद्ध उभे करून आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न केला आहे आणि अलिकडेच QUAD नावाची सुरक्षा संघटना बनविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात  अमेरिका, भारत, जपान व ऑस्ट्रेलिया हे चार देश आहेत.  ही सुरक्षा संघटना आहे. अमेरिकेचा मुख्य उद्देश भारत आणि जपानला वापरुन चीनवर दबाव आणायचा व आपला फायदा करून घ्यायचा.  यामुळे चीनसुद्धा भारताविरोधात सीमेवर कारवाई करत आहे व पाकिस्तानला आणखी जोमाने मदत करत आहे.  गंमत अशी की पाकिस्तान हा चीन आणि अमेरिकेचा पुर्ण फायदा उचलत आहे. त्यामुळे भारत कात्रीत अडकला आहे.  मला ठाम विश्वास आहे की अमेरिका भारत-पाक विषयात संपूर्णपणे पाकलाच मदत करणार. त्यामुळे सुरूवातीला मोदी सरकारने जे धोरण घेतले होते कि अमेरिका आणि चीनला समसमान वागणूक द्यायची ते योग्यच होते. पंतप्रधान मोदींनी चीनच्या राष्ट्रपतींचा मोठा सन्मान केला.  गुजरात आणि तमिळनाडूला बोलावून मैत्री दृढ करण्याचा प्रयत्न केला.  त्यामुळे अमेरिकेच्या पोटात दुखले आणि भारतावर चीन विरुद्ध भूमिका घेण्याचा दबाव आणला.  त्याचे परिणाम आपण बघितलेच आहेत.

 सर्व उद्योगपतींच्या नाड्या अमेरिकेच्या हातात आहेत. कारण जागतिक उद्योग डॉलरवर चालतो.  अमेरिकेने अनेक उद्योगपतींना आपल्या खिशात कोंबले आहे. हे सर्व उद्योगपती भारताचे हीत न बघता स्वतःचे हीत साधण्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव आणतात आणि देशाला अमेरिकेला विकून टाकतात.  भारतीय उद्योग हे अमेरिकन उद्योगाबरोबर भागीदारी करण्याचा सतत प्रयत्न करत असतात.  त्यात चीनचे उद्योग हे झपाट्याने प्रगती करत असताना अमेरिकन उद्योग क्षेत्राला भारतावरचा आपली पकड सैल होताना दिसली आणि त्यांनी भारतावर अनेक निर्बंध आणायला सुरू केले. त्याचा परिणाम भारत चीन संबंधात वितुष्ट वाढण्यात झाले.  दुसरीकडे हेच अमेरिकन उद्योग चीनमध्ये महाकाय उद्योग उभे करत आहेत.  ट्रम्पच्या धोरणाचा हा भाग आपण लक्षात घेतला पाहिजे कि भारताला चीन सोबत भांडायला लावायचे आणि स्वत: अमेरिकन कंपन्यांना चीन बरोबर व्यापार करण्यास निर्बंध आणायचा नाही.  नवीन राष्ट्रपती बायडन आल्यामुळे यात काही फरक पडणार नाही.  भारत, पाकिस्तान, चीन व रशिया बरोबर ट्रम्पचे धोरण चालू ठेवणार.   सुदैवाने अमेरिकेने प्रचंड प्रयत्न करून सुद्धा भारत रशिया संबंध चांगलेच राहिलेले आहेत.  

ट्रम्प हा कट्टर वर्णवादी आहे. काळ्यांचा, पिवळ्यांचा, कट्टर दुश्मन म्हणून ४ वर्ष राज्य केले. त्यात अनेक भारतीय लोकांवर सुद्धा हल्ले झाले. जसे भारतात मुस्लिम द्वेष हा राजकीय पक्षांचा हुकमी एक्का आहे. तसेच अमेरिकेत ट्रम्पने गोऱ्या वर्णाचे श्रेष्ठत्व आपल्या राजकारणाचा केंद्रबिंदू केला. म्हणूनच करोडो लोकांना कोरोना झाला.  ३ लाख लोक मृत्यू पावले तरी ट्रम्पला अमेरिकेच्या इतिहासातील दोन क्रमांकाची म्हणजे ४.५ कोटी  मते मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त आता निवडून आलेले बायडन ह्यांना मिळाली आहेत. जे ट्रम्प विरोधात निवडणूक लढले व जिंकले आणि आता २० जानेवारी २०२१ ला राष्ट्रपतींची सूत्र हातात घेणार आहेत. ट्रम्पला इतकी मते कशी मिळाली? अमेरिकेची त्याने वाट लावली तरी तो जवळ जवळ जिंकतच होता. त्याचे एकमेव कारण म्हणजे, अमेरिकेत वाढणारा काळया वर्णाच्या लोकांचा द्वेष. त्यातून भारत सुटला नाही. अलिकडच्या काळात लोकांच्या प्रमुख मागण्या पुर्ण करता येत नसतील, तर त्या जाती, धर्म व वर्ण ह्याचे राजकारण करून लोकांना झुलवत ठेवायची चाल प्रचंड यशस्वी झाली आहे. म्हणून सत्ताधार्‍यांना काम न करण्याची सवय झाली आहे. निवडणूक आली की दंगली घडवायच्या, कुठेतरी शत्रूवर लुटूपुटूचे हल्ले करायचे आणि वेळ मारून न्यायची फॅशन झाली आहे. 

ट्रम्पने सामाजिक द्वेष इतका वाढवला आहे कि त्याचा एक वेगळा मतदार तयार झाला आहे.  जो गोर्‍यांच्या श्रेष्ठत्वाचा गुणगान करतो आणि काळ्यांचा द्वेष करतो.  याचा एक वेगळा इतिहास आहे. अमेरिकेचे मूळ निवासी हे रेड इंडियन आहेत.  गोरे अमेरिकेत आले तेव्हा या रेड इंडियन लोकांना संपविण्याचे काम केले.  पुढे जाऊन शेती करण्यासाठी आफ्रिकेतून काळे लोक आणले.  ते गुलाम होते. अब्राहीम लिंकंनने जेव्हा गुलामगिरी नष्ट करण्याचा ठराव आणला त्यावेळी यादवी युद्ध झाले.  १८६१ – १८६५ यादवी युद्ध झाले. त्यात गुलामगिरीला पाठिंबा देणार्‍या राज्यांचा पराभव झाला. हे गोरे लोक विसरलेले नाहीत.  ही जखम अजूनही वाहत आहे.  म्हणून काळ्यांचा द्वेष हे अमेरिकन राजकारणाचा भाग राहिलेला आहे.  या द्वेषाला ट्रम्पने फुंकुर घालून गोर्‍यांना पेटवले.  ते लोक आज पुर्णपणे ट्रम्पच्या बाजूने आहेत. उद्या बायडन राष्ट्रपती झाले तरी दुभंगलेला अमेरिकन समाज हा एकत्र येणे कठीणच आहे.  म्हणून पुढच्या काळात अमेरिकेमध्ये दंगली आणि हिंसा वाढतच जाणार.  हे सर्व लोक हत्यारबंद आहेत, कारण अमेरिकेतील एक मुख्य विषय हत्यार बाळगण्यावर आहे.  सर्व लोकांना कितीही हत्यारे बाळगण्याची परवानगी आहे.  येथे भारतामध्ये हिंदू मुस्लिम द्वेष पेटवण्याचा सतत प्रयत्न होत आहे.  तसेच अमेरिकेत देखील वर्ण द्वेष भडकत आहे.

अमेरिकन CIA या प्रमुख गुप्तचर यंत्रणेने जगातील प्रत्येक देशात भांडणे लावून दिली आहेत व स्वतः मध्यस्थाची भूमिका वठवण्याच नाटक केले जाते.  शिय्या- सुन्नी, हिंदू-मुस्लिम, काळे-गोरे, सवर्ण-दलीत व भाषा अशा प्रत्येक विषयाचा वापर करायचा व लोकांना तोडून प्रत्येक देशात राज्य करायचे कारस्थान चालू आहे. अमेरिकन कंपन्यांना पूर्ण जगात मोकळे रान आहे. इंग्रजांनी ज्या प्रमाणे जगाला लुटले त्याच प्रमाणे, जगाची लूट चालू आहे. ह्या कंपन्या मध्ये CIA चे हेर अधिकारी बनून येतात.  त्या देशामध्ये व्यापाराचे नाटक करून हेरगिरी करत आहेत. अनेक भारतीय अधिकारी आणि राजकारणी सुद्धा अमेरिकेसाठी हेरगिरी करत आहेत. CIA ने काश्मिरी दहशतवाद्यांना आणि भारतातील अनेक दहशतवादी संघटनांना पाक तर्फे प्रचंड मदत केली आहे. २००८ च्या दहशतवादी मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड डेविड हेडली आणि राणा यांना माफीचे साक्षीदार करून संरक्षण दिले आहे आणि भारत सरकारने काही केले नाही. एकट्या कसाबला फासावर लटकवून भारतीय नागरिकांचे समाधान केले आहे.

या पार्श्वभमीवर अमेरिकन राजकारण बघितले पाहिजे. ट्रम्प हा रिपब्लिकन पक्षाचा आहे. तो  गेला आणि बायडन आला म्हणून भारताला आनंद होण्याचे काहीच कारण नाही. दोन्ही पक्षात मुख्यतः श्रीमंतांना व उद्योगपतींना खुश करण्याची चढाओढ असते. त्यातल्या त्यात रिपब्लिकन पक्ष भारताला अधिक सोईचा ठरला आहे.  यांनी काश्मिरमध्ये लुडबुड करण्याचे टाळले आहे. त्याउलट बायडनचा डेमोक्रेटिक पक्ष मानवी हक्काचे कारण सांगून काश्मिरमध्ये भारताविरोधात भूमिका घेत राहिला आहे.  अमेरिकन राष्ट्रपती बदलला म्हणून भारताचा काही फायदा होईल असे समजणार्‍या लोकांना मला एकच सांगायचे आहे कि प्रत्येक राष्ट्र हे आपले हित साधण्यासाठी राजकारण करते. भारताने सुद्धा आपण कुणाच्या आहारी न जाता आपल्या स्वत:च्या हिताचे राजकारण केले पाहिजे. त्याबद्दल आणखी पुढील भागात चर्चा करू.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS