आरोग्य धनसंपदा_१५.७. २०२१

दीड वर्ष झाले, करोनाच्या सापळ्यात देश अडकलेला आहे. ५ लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे.  १९२० नंतर अशाप्रकारचे संकट देशावर पुन्हा आले आहे. या हल्ल्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ज्यांचे शरीर कमजोर असते त्यांना अशा प्रकारचे आजार होतात. ज्यांच्या शरीरामध्ये विटॅमिन ‘सी’ कमी असते आणि अनेक धातु कमी असतात त्यांना करोना सारखे रोग होतात आणि बरेचसे मृत्युमुखी पडतात. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे सिद्ध झालेले आहे.  वडापावच्या संस्कृतीमध्ये आपण भाजी भाकरीची चव विसरलो की काय असे जाणवते.  दुसरीकडे आपली पाश्चिमात्त्य संस्कृतीतून प्रभावित झालेली मुलं मॅकडोनाल्ड, सँडविच आणि बर्गर किंग सारख्या आहाराला बळी पडलेली आहेत.  अमेरिकेत हे दिसून आले की अशाप्रकारच्या आहारामुळे मुलं कमकुवत होतात. जी मुलं कष्ट करत मोठी होतात, व्यायाम करतात, आहार चांगला ठेवतात, ती मुलं सक्षम राहतात.  दैनंदिन जीवनामध्ये पोषक आहार, व्यायाम व क्रीडा हे आयुष्य सुखी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. शाळा महाविद्यालयामधून आणि जनतेमध्ये आरोग्याचे महत्त्व प्रसारीत होणे अत्यंत आवश्यक आहे. जर देशामध्ये राहणीमान हे आरोग्य पोषक असते तर करोनामुळे इतकी हानी झाली नसती. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त महत्त्व आरोग्याला दिले पाहिजे. कारण आरोग्य हीच धनसंपदा आहे. सुख आणि समृद्धीचे आरोग्य हे एकमेव वाहन आहे.

            हिच शिकवण भारतीय संस्कृतीने आपल्याला दिली आहे. ‘योग आणि आयुर्वेद’ हे भारतीय संस्कृतीचे आधारस्तंभ आहेत आणि त्यामुळे आजार बरे करण्यापेक्षा रोग होऊ नये, याकडे आपल्या संस्कृतीचे लक्ष होते.  त्यातून आयुर्वेद प्रसारित झाला. स्वतःला पुढारलेले म्हणणारे, पुरोगामी म्हणणारे लोक हे सायन्सवर जास्त भर देतात व परंपरेवर टिका करतात.  त्यामुळे भांडवलशाही आणि साम्यवाद मानणारे लोक अशा प्राचीन शास्त्रापासून दूरच राहिले.  त्यामुळे ह्या शास्त्रांची वाढ खुंटली.  आयुर्वेद हे अतिशय प्राचीन शास्त्र आहे.  याचा उगम कसा झाला हे कुणालाच माहीत नाही, पण हे शास्त्र आहे आणि त्याचा वापर केला पाहिजे, असे डॉ. पि. के. वारियर यांनी म्हटले.  डॉ. पि. के. वारियर यांचे वडील पि. जी. वारियर यांनी १९०० साली केरळात आर्य वैद्य शाळा निर्माण केली.  पुढे ती डॉ. पि. के. वारियर यांचे बंधूनी चालवली, त्यांच्या मृत्यूनंतर पि. के. वारियर यांनी पुढे चालवली व आयुर्वेदाला शास्त्रीय रूप दिले. त्यांनी नुकतीच ‘फ्रंटलाईन’ या मासिकाला आपली मुलाखत दिली.  १०० वर्ष आयुष्य पार केल्यानंतर ही मुलाखत अत्यंत चांगली आहे आणि त्यांच्या ७० वर्षाच्या कार्यकाळाची आपल्याला माहिती मिळते.  त्यात हे दिसून येतं की आयुर्वेदाचे खरे निर्माते आधुनिक जगामध्ये वारियर आहेत.

            कारोना प्रसारित झाल्यावर त्याचे निदान करण्यासाठी व त्यावर उपाययोजना शोधण्यासाठी जगामध्ये प्रचंड हालचाली झाल्या. पण आयुर्वेदिक असे शास्त्र आहे की त्याला माहीत नाही असं काहीच नाही.  नवीन रोग असा आयुर्वेदाला माहित नाही. निदान करण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत आहे.  त्यातून कुठला रोग झाला आहे हे कळते आणि मग उपाययोजना करण्याचे औषध देण्याची पद्धत निर्धारित करण्यात येते. आयुर्वेदाने अनेक रोग नष्ट झाल्याचे बघितले आहे आणि अनेक रोग नव्याने निर्माण झाल्याचेही बघितले आहे.  आयुर्वेदाचा त्रिदोष सिद्धांत या सगळीकडे लक्ष घालतो.  आयुर्वेद रोगाचाही अभ्यास करतो आणि शरीराचाही अभ्यास करतो. करोनाशी मुकाबला करण्यासाठी आयुर्वेदाचा प्रचंड उपयोग होऊ शकतो.  याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. अनेक सिद्धांत पुढे आलेले आहेत.  पण ह्या सर्व सिद्धांतांचा आपण एकत्रितपणे विचार करून समाजासाठी काय चांगले आहे, हे निर्धारित करू शकलो नाही.  ही प्रक्रिया आयुर्वेदिक व्यवस्थेमध्ये असली पाहिजे होती.  बऱ्याच शास्त्राप्रमाणे आयुर्वेदाची उत्क्रांती ही आजारपणाचे निरीक्षण करून झाली आहे. पण दुर्दैवाने समाजाचा व सरकारचा देखील आयुर्वेदावर विश्वास नाही.  आयुष मंत्रालयाकडून काही प्रयत्न करण्यात आले आहेत, पण आयुर्वेद हे आपल्या आरोग्य व्यवस्थेत एक मुख्य भाग आहे, हे मानायला कुणी तयार नाही.

            अर्थात ज्याची जास्त मागणी असते त्याच्या पाठीमागे सरकार, उद्योगपती व लोक धावत आले.  मी सैन्यात गेल्यानंतर मला जाणीव झाली. शरीरामध्ये केमिकल घेतले तर शरीराची हानी होऊ शकते आणि म्हणून मी तेव्हापासून आयुर्वेदाला अंगीकारले आहे.  आमच्या कोकणामध्ये भाता शिवाय काहीच मिळायचं नाही.  मी लहान होतो.  तेव्हा नाश्ता म्हणजे उकड्या तांदळाची पेज आणि जेवण म्हणजे फक्त भात आणि कुळीथाचे पिठले.  भाजीपाला आम्ही बघितला नाही, कारण सह्याद्रीच्या कुशीत राहणारे आम्ही लोक समुद्रापासून सुद्धा दूर होतो.  म्हणून जे पारंपारिक पदार्थ आहेत.  जसे की नारळ, आंबा, आमच्यापासून दूर होते.  अलीकडे काजूची संस्कृती वाढली आहे.  खायचा भात पॉलिश केलेला  नसायचा आणि म्हणून भातामध्ये जी गुणवत्ता होती, ती पूर्णपणे कोकणी माणसाला मिळाली.  नारळाचा जेवणामध्ये भरपूर उपयोग व्हायचा.  त्यामुळे बुद्धी पण कुशल राहिली. शेतात जायचो म्हणून शारीरिक कष्ट जास्त असायचे. रस्ते नव्हते, म्हणून चालायला लागायचं. नैसर्गिक व्यायाम होत असे व शरीर मजबूत होत. त्यामुळे आजारापासून कोकणी माणूस दूरच राहिला.  सगळीकडे तसेच आहे.  समाजामध्ये अंग मेहनत प्रचंड असायची व आहार सुद्धा साधा जरी असला तरी तो पौष्टिक असायचा. त्यात भेसळ नसायची.   आज भारताच्या शहरांमध्ये पौष्टिक आहार दूर गेला. रासायनिक खत आणि कीटकनाशकांमुळे विषारी अन्न आपण खायला लागलो. भाताचे पॉलिश राईस झाल्यामुळे पोषणही नष्ट झाले. म्हणून नैसर्गिक  पोषण आहार निर्माण करण्यासाठी आता चळवळ झाली पाहिजे.

            ह्या पार्श्वभूमीवर आपण चर्चा करताना अलीकडेच एक आयुर्वेदाचे महर्षी पि. के. वारियर यांचे वय १०० असताना ते आपल्यातून निघून गेले.  डॉ. पि.के.वारियर यांचा इतिहास फार रोमांचक आहे.  १९००  साली पी.जे.वारियर यांनी आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला व आयुर्वेदाला शास्त्रीय जडण-घडण देण्याचा प्रयत्न केला.  त्याच्यानंतर यांचे चिरंजीव वारियर यांनी आयुर्वेदा वेधशाळा चालवायला घेतली आणि आयुर्वेदाचा शास्त्रीय अभ्यास सुरू केला.  ते वारल्यानंतर त्यांचे बंधु पी.के. वारियर यांनी शास्त्रीय पद्धतीने आयुर्वेदाचा अभ्यास सुरू केला. प्रत्येक औषधाची गुणवत्ता त्यांनी लिहिली.  त्याच्यावर संशोधन केले.  त्याकाळी व नंतर कम्युनिस्ट पक्षाचे थोर नेते नंबुद्री पाद यांनी वारियर यांच्या संशोधनाला पूर्ण पाठिंबा दिला.  वारियर यांनी देखील कम्युनिस्ट पक्षाची साथ धरली आणि कोठेकल येथे महान वैद्य शाळा निर्माण झाली. हॉस्पिटल बनली, संशोधन केंद्र बनले आणि पहिल्यांदाच इतिहासात आयुर्वेदाला राजश्रेय मिळाला.

            १९१४ ला आयुर्वेदिक पाठशाला किंवा पहिले आयुर्वेदिक कॉलेज सुरू करण्यात आले.  ह्या बरोबर ‘धन्वंतरी’ या मासिकाचे प्रकाशन सुद्धा सुरू झाले.  एक सेवाभावी हॉस्पिटल सुरू करण्यात आले.  त्यानंतर अनेक वर्षांनी आयुर्वेदिक फॅक्टरी निर्माण करण्यात आली.  त्यामधून आयुर्वेदिक औषध बनवायला सुरुवात झाली.  त्याच बरोबर पारंपारिक औषधांचाही प्रसार करण्यात आला.  कोठेकल येथेच संशोधन करण्याचे एक डिपार्टमेंट उघडण्यात आले. त्यामध्ये आयुर्वेदाचे प्रत्येक प्रकाराचे संशोधन करून अगदी सूक्ष्म नियोजन करून पुस्तके तयार करण्यात आली.  

            वारियरने आयुर्वेद हे सर्व धर्मांसाठी निर्माण केले.  ते म्हणतात धार्मिक संघर्ष हा नैसर्गिक नाही.  पण काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी धर्म द्वेष निर्माण केला आहे.  त्याला निरपराध लोक बळी पडतात.  सामाजिक ऐक्याचे अनेक प्रकार आहेत, पण त्याचा प्रसार केला जात नाही. त्यांना प्रसिद्धी दिली जात नाही.  पण देशातील विभक्तपणा, दंगली  याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळते. आयुर्वेदिक शाळा ही सगळ्या लोकांकडे समसमान बघते.  सगळ्या जाती धर्मांसाठी आपण आयुर्वेदिक केंद्र बनवले आहे. त्यामुळे वारियर कुटुंबाने मुसलमानांमध्ये आणि हिंदूमध्ये आयुर्वेदाचा प्रसार करून धार्मिक एकता निर्माण केली.

            १ जूनला पि. के. वारियर यांना १०० वर्षे झाली व  जुलैमध्ये त्यांचा देहांत झाला.  पि. के. वारियर स्वतः एक उत्तम डॉक्टर होते.  त्यांनी आयुर्वेद शास्त्र बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.  त्यांनी भारतीय औषधी वनस्पतींचे ४ खंड बनवले आणि ५०० वनस्पतींचे पूर्ण ज्ञान समाजाला दिले.  हजारो लोकांना त्यांनी ७० वर्षांमध्ये आयुर्वेदिक उपचाराचा फायदा मिळवून दिला, पण कुणाकडूनही एक पैसा सुद्धा घेतला नाही.

            त्यांनी अनेक आजारावर उपचार केले. राष्ट्रपती गिरी वाजपेयी साहेब, प्रणव मुखर्जी, मनमोहन सिंग, श्रीलंकेचे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, माजी मुख्यन्यायाधीश, लोकसभेचे अध्यक्ष अशा अनेक नेत्यांचे उपचार केले. केरळचे महान नेते नंबुद्री पाद यांनी वारियरना संशोधन करून त्याचं शास्त्र बनवण्याचा सल्ला दिला.  वारियर यांनी स्वातंत्र्य चळवळीत सुद्धा भाग घेतला.  कॉलेज सोडून ते कम्युनिस्ट पार्टीमध्ये सामील झाले.  वारियर यांनी औषध उत्पादनामध्ये तंत्रज्ञान आणले. बरोबर औषधी वनस्पतींची लागवड मोठ्या प्रमाणात केली व त्यावर त्यांनी एक केंद्र बनवले.  दरवर्षी ८ लाख लोकांना हॉस्पिटलचा फायदा होतो.  आयुर्वेद आणि योगाचे शास्त्र देशामध्ये आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणात स्वीकारले जात आहे. त्याला आपण सर्वांनी स्विकारून आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये अंगीकृत केल पाहिजे. आधुनिक जगामध्ये जे अनेक आजार निर्माण झाले आहेत त्याच्यावर योग्य उपाय नाहीत.  एका आजारावर औषध दिल्यास दुसरे आजार निर्माण होतात. आजारी माणसे आणखी आजारी पडतात.  त्यामुळे जीवनपद्धती नवीन जगात आपल्याला बदलावी लागणार व समृद्ध आणि आनंदी जीवन जगण्यासाठी वारियर यांचे छात्र पुढे न्यावे लागेल.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट: www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS