इमरान खान अमेरिकेला गेले. ट्रम्पला भेटले. भारतीय मीडिया ने प्रचार केला की अमेरिका इमरानचा अपमान करेल. त्यांना दहशतवाद विरूद्ध कारवाई करायला सांगेल. पण झाले वेगळेच. ट्रम्पने भरभरून पाकला मदत केली, हत्यारे दिली. ट्रम्प म्हणाले की अफगाणिस्तान मध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी व अमेरिकन सैन्य परत आणण्यासाठी पाकची मदत महत्वाची ठरेल. पाकला तालिबान आणि अफगाण सरकार बरोबर बोलण्याचे पूर्ण अधिकार दिले. भारताचा अफगाणिस्तान मधील सहभाग बंद केला. पाकला भरघोस आर्थिक मदत जाहीर केली. पाक अनेक वर्ष अमेरिकेचा हुकमी मित्र असल्याचे जाहीर केले. ट्रम्पने दाखवून दिले की भारताने कितीही चमचेगिरी केली व पाकने भारताविरुद्ध कितीही दहशतवाद केला तरी अमेरिका हा पाकला मित्र मानतो. अमेरिकेचा दुष्टपणा नेहमीच पुढे आला आहे. स्वातंत्र्यापासून अमेरिका भारताविरुद्ध पाकला मदत करत राहिली आहे. हे प्रकर्षाने १९७१ च्या भारत पाक युद्धात स्पष्ट झाले. भारताचे सैन्य वेगाने पाकवर चाल करून जात असताना अमेरिकन नौदलाचा सातवा बेडा पाकच्या मदतीला धावून गेला. रशियन नौदलाने त्याला अडवले. नाहीतर अमेरिकेने भारतावर हल्लाच केला असता. १९७९ मध्ये रशियन सैन्य अफगाणिस्तान सरकारला मदत करायला अफगाणिस्तान मध्ये घुसले. तेंव्हा अमेरिकेने पाक मध्ये रशिया विरूद्ध, जगातील जेहादी टोळ्या गोळा केल्या. पाकला प्रचंड मदत दिली. पाकने ह्या टोळ्या भारताविरुद्ध वापरल्या, त्या आतापर्यंत पाक वापरत आहे. अमेरिकेने ह्यावर पाकलाच पाठिंबा दिला. २००१ मध्ये ओसामाने अमेरिकेवर हल्ला चढवला. त्यानंतर अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध लढा जाहीर केला व अमेरिकन सैन्य अफगाणिस्तान घुसवले. त्यात पाकची अमेरिकेला प्रचंड मदत झाली. आतादेखील अफगाणिस्तानमध्ये तालिबान बरोबर बोलणी करण्यासाठी पाकची मदत होते. भारताने अमेरिकेला पाठिंबा दिला. म्हणून पण अमेरिकेने आत्तापर्यंत पाकलाच मदत केली आहे.
मधल्या काळात अमेरिकेने भारताला मदत करण्याचे सोंग केले. दावूद इब्राहिम, हाफिज सय्यद, आझर मसूदला जागतिक आतंकवादी घोषित केले. पाकला दम देण्याचे नाटक केले. भारतीय उद्योगपतींना आपलेसे केले. सर्व पक्षांना विकत घेतले. पाकला हत्यार फुकट देत असतानाच भारताला हत्यारे, तिही जुनाट विकत राहिले. असे करत असताना रशियाकडून आम्ही हत्यार विकत घ्यायची नाही म्हणून भारताला दम देत राहिले. आमचे सरकार देखील अमेरिकेला दबून राहीले. पाकला सर्वोतकृष्ट मदत करत असताना, भारताला चीन आणि रशियाविरुद्ध वापरले.
वास्तविक चीनने भारताविरुद्ध आक्रमक पवित्रा कधीच घेतला नाही. सीमावाद आहेच. पण १९६२ नंतर तो चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. चीन विरूद्ध युद्ध भारताला किंवा चीनला परवडण्यासारखे नाही. मी स्वतः भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करून चीनचे राष्ट्रपती व अनेक नेत्यांना भेटलो आहे. त्यात चिनी नेत्यांनी आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली की, भारत आणि चीन हे दोन शेजारी राष्ट्र आहेत त्यात जगातील २/३ लोकसंख्या राहते. म्हणून चीन आणि भारताचे संबंध हे फक्त भारत चीनला महत्वाचे नसून जगाच्या शांततेला महत्वाचे आहेत. चीनला भारताशी व्यापार वाढवायचा आहे. संघर्ष नाही. चीन सुद्धा इस्लामिक दहशतवादाशी मुकाबला करत आहे. तरी आपले संबंध कसे सुधारतील हे पाहिले पाहिजे. अमेरिकेची चमचेगिरी करत असताना चीनशी पण संबंध भारताने पूर्ण बिघडू दिले नाहीत हे चांगले झाले. ब्रिक्स ह्या देशांच्या समूहात (चीन, भारत, रशिया, ब्राजील, दक्षिण आफ्रिका) भारत- चीन बरोबर आघाडीची भूमिका घेत आहेत.
अमेरिकन चमचेगिरीचां कहर भारताने इराणवर बहिष्कार टाकून केला. पाक विरुद्ध भारताला १९९१ पासून मदत करणारे एकमेव राष्ट्र इराण आहे. भारताचे २०% स्वस्त तेल इराणकडून येत होते. अमेरिकेने इराणवर भारताला बहिष्कार घालायला लावला. स्वस्त तेलाला आपण मुकलो, पाकविरुद्ध आमच्या हुकमी मित्राला आपण नाराज केले.
अलीकडे अमेरिकेने भारताविरुद्ध अनेक पावले उचलली आहेत. भारतीय मालावर कर वाढवून भारतीय मालावर जवळजवळ बंधीच घातली आहे. त्यामुळे भारतातील अनेक उद्योग बंद पडले व अनेक लोक बेकार झाले. भारताने रशिया कडून हत्यारे विकत घेवु नये म्हणून प्रचंड दबाव अमेरिकेने आणला. अमेरिकेत स्थायिक भारतीय लोकांवर भारतात परत जा म्हणून अनेक हल्ले झाले. ट्रम्पने भारतात येण्याचे नाकारले. आतातर इमरान खानला मदत करून भारताला उघडपणे विरोध केला आहे.
जागतिक राजकरणात भारत हा G-20 देशात चीन आणि रशिया बरोबर एक महत्वाचा देश ठरतो. जगातील अनेक गरीब राष्ट्र आज भारताकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. भारत कोणाचाही निंधा राहू शकत नाही. कारण भारत हा एक खंडप्राय देश आहे. भारताने १९९१ पर्यंत आपले सार्वभौमत्व टिकवले होते. मनमोहन सिंग अर्थमंत्री झाल्यानंतर मात्र आपण अमेरिकेच्या दावणीला बांधले गेलो. ते आतापर्यंत परिस्थिती तशीच आहे. अमेरिकेने भारतीय भांडवलदारांना जगाच्या पाठीवर अनेक गोष्टीत फायदा करून दिला. पण भारतीय भांडवलदार अमेरिकेचे निंधे झालेत. या भांडवलदारांनी भारत सरकारवर दबाव आणून भारताला अमेकिरा पोषक धोरण घ्यायला लावले. अमेरिकेने पाकलाच आपला मित्र मानले. ते इमरान खानच्या यशस्वी अमेरिकन दौर्या नंतर सिद्ध झाले आहे. कारगिल युद्धात देखील भारतीय सेना LOC पार करून पाकच्या आत
घुसायची मागणी करत राहिली. पण अमेरिकेने भारतीय सेनेला परवानगी दिली नाही. पाकीस्तनाला धडा शिकविण्याची संधी गेली. व भारतीय सैन्याला समोरून उंच डोंगरांवर हल्ला करायला लागला. त्यात भारताचे प्रचंड नुकसान झाले. केवळ भारतीय सैनिकांच्या दृढ निश्चयामुळे व शौर्यामुळे आपण यशस्वी झालो. सुदैवाने भारत सरकारने चीन व रशियाच्या बरोबर मैत्रीची पावले उचलली आहेत. यामुळे आपले स्वतंत्र अस्तित्व दाखवायला सुरुवात केली आहे. हे पुढे जावून भारत सरकार काय करते हे महत्वाचे राहील. २०१९ हे वर्ष भारताच्या दृष्टीकोणातून अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. भारत अमेरिकेचे निंधे राष्ट्र होणार आहे. हा एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून जगात आपले स्थान ठरवणार आहे. अमेरिकेला भारताच्या बाजारपेठेवर कब्जा करायचा आहे व आपला माल भारतात विकायचा आहे. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी प्रमाणे भारताला पुन्हा आर्थिक दृष्ट्या गुलाम करायचे आहे. या षडयंत्राला पण कसे उत्तर देतो हे पुढील ५ वर्षात कळेल. त्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.