एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाचा वर्धापन दिन_15.6.2023

शिंदे सरकारचा पक्षाचा वर्धापन दिन उत्साहाने साजरा केला जात आहे.  शिंदे सरकार कसे बनले? व का बनले? हे सगळ्यांसमोर आहेच.  पण आश्चर्याची गोष्ट ही आहे कि ठाकरे सरकार राज्य करत होते व त्या राज्यांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे विचित्र त्रिकूट एकत्र येऊन राज्य सरकार चालवत होते.  यात विचित्र असं काही म्हणायची गरज नाही.  कारण कुठलाही पक्ष कुणाबरोबर जाऊन सत्ता स्थापन करतो हे अलिकडे देशभरात सिद्ध झालेले आहे.  इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणि त्यानंतर राजीव गांधी पर्यंत एक काळ असा होता की जनता पार्टी बनली होती.  या जनता पार्टी मध्ये भाजप, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि अनेक पक्ष एकत्र येऊन काँग्रेस विरोधी आघाडी बनवून राजकारण करत होते.  १९७७ ला हे विचित्र गटबंधन सत्तेवर आले.  मोरारजी देसाई पंतप्रधान झाले त्याच काळात शरद पवारनी  एक नवीन आघाडी बनवली व राष्ट्राचे आणि राज्याचे तरुण मुख्यमंत्री झाले.  लोक म्हणतात की शरद पवारनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला व काँग्रेस तोडून समाजवादी काँग्रेसचे मुख्यमंत्री झाले.

या सर्व घटना आणि गडबडी पक्षाला उखडून काढण्याचे धंदे हे त्या काळात मोठ्या प्रमाणात घडू लागले होते.  पण हे सर्व जे घडत होतं, त्यात आजचे सर्व पक्ष हे काँग्रेसच्या विरोधात होते आणि आज ते भाजपच्या विरोधात आहेत. त्यामुळे कुठला पक्ष कुठे गेला ह्याला तत्व प्रणाली कधीच जबाबदार नव्हती.  केवळ होती ती सत्तेची भाकरी.  जी शरद पवार यांनी अनेक वेळा परतली आणि आज इतक्या वर्षांनी एक विचित्र गटबंधन जन्माला आलेले आहे.  या सर्व पार्श्वभूमीकडे जनतेने बघितले पाहिजे.

जनता पार्टीचे सरकार १९७७ साली रुजू झाले आणि राजकारणाला एक नवीन कलाटणी मिळाली.  सर्व पक्ष काँग्रेसच्या विरोधात म्हणजे इंदिरा गांधीच्या विरोधात उभे राहिले. त्याचे कारण काय आहे.  इंदिरा गांधीची प्रतिमा आज मोदी सारखीच झाली होती. कारण सत्तेच्या सर्व दालनामध्ये त्यावेळेला काँग्रेस पक्ष घुसला होता व राजकारभार एक छत्री चालवत होता.  त्याचप्रमाणे आज देशात असेच वातावरण चालू आहे.  हे मोदी सरकारने सर्व ताब्यात घेतले आहे व हे राज्य करत आहेत.  दुसऱ्यांना संधी नाही आणि सर्व दुसरे पक्ष आपल्याला धोका निर्माण झाला म्हणून एकत्र आलेले आहेत मोदी सरकारला पाडण्यासाठी.

यात काय वावगे असण्याचे कारण नाही. कारण जो शक्तिशाली पक्ष आहे त्याला विरोध करणे व त्याला चित करून त्याच्या छाताडावर बसून आपले राज्य स्थापन करणे, हे प्रत्येक पक्षाचे उद्दिष्ट असते.  आज देखील ते उद्दिष्ट बऱ्याच पक्षाचे आहे. म्हणून एका काळची कट्टर विरोधक शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला, काँग्रेस पक्षाला, काय काय म्हणाली हे लोकांना माहीत आहे.  भाजप शिवसेना गेल्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन निवडणूक लढले हे जरी खरं असले तरी काही ठिकाणी शिवसेना आणि भाजप हे वेगळेच लढले.  जसे सिंधुदुर्ग मध्ये सर्व जागांमध्ये शिवसेना आणि भाजपने बंडखोर उभे केले.  तरी दीपक केसरकर आणि नितेश राणे हे निवडून आले. फक्त तिसरा मतदारसंघ कुडाळ मालवण येथे सालाबाद प्रमाणे वैभव नाईक निवडून आले.  त्यामुळे ही युती पवित्र होती असे नाही. युती आणि आघाडी करून बरेच पक्ष एकमेकांच्या विरोधात लढतात.  किंबहुना आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांमध्ये प्रचंड विरोध आहे.  त्यामुळे त्यांची आघाडी जरी आपल्याला दिसते तरी प्रत्यक्षात निवडणुकीत हे एकमेकांच्या विरोधातच उभे राहणार आहेत.  त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही देखील जागांसाठी आग्रही राहणार आहे.  त्यामुळे ही आघाडी निवडणूक काळामध्ये कशी वागणार आहे आणि त्याचा काय फायदा कुणाला होणार आहे हे आपल्याला कळेलच.

त्याचप्रमाणे भाजप आणि शिवसेना यांच्यातले संबंध निवडणुकी पर्यंत कसे राहतात हे निश्चित नाही.  आताच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव निवडून आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघावर भाजप दावा करू लागली आहे.  त्याचबरोबर अनेक वक्तव्य केली जातात.  ज्याच्यातून वितृष्ट दिसते आणि अनेक मतदार संघात जिथे नैसर्गिकरित्या शिवसेना या पक्षाने लढवली पाहिजे, तिथे अनेक जागांवर भाजप आपला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दावा सांगत आहे.  तसेच आपला पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेला कापण्याचे काम सुद्धा सहजपणे आपल्याला दिसते. आता सुद्धा ग्रामपंचायत मध्ये अनेक ठिकाणी एकमेकाला शह देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जिल्हा परिषद नगरपालिकेला सुद्धा तशीच कहाणी दिसणार आहे.  याने एक सिद्ध होतं ही युती आणि आघाड्या या सोयी करता केल्या जातात आणि या सगळ्यांमध्ये स्वार्थ हा प्राधान्याने येतो.  प्रत्येक पक्ष आपला पक्ष मजबूत करायचा प्रयत्न करतो ते साहजिकच आहे.  पण हे करत असताना आपल्यातल्या वितुष्ठामुळे आपापल्या पक्षातील स्वार्थीपणामुळे आपण आपल्या पक्षाचा सत्यानाश करत आहोत.  आघाडीचा सत्यानाश करत आहोत आणि आपल्या शत्रूला बळकट करत आहोत याची जाणीव कुणालाच नाही.

युती/ आघाडीचे जे राजकारण आहे, हे काय आनंदाने नाही आहे.  हे राजकारण केवळ आपण कमजोर आहोत आणि म्हणून आपल्याला जर निवडून यायचे असेल तर दुसऱ्या पक्षाची साथ घ्यावी लागेल, या जाणिवेतूनच युती आणि आघाड्या होतात.  १९९९ साली शरद पवारांनी सोनिया गांधीला परदेशी म्हणून त्यांना राजकारणात कुठलाही हक्क नाही असे स्पष्ट केले होते.  त्यावेळी आम्ही पुढाकार घेऊन शरद पवार यांना पक्षातून काढून टाका अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांना काढून टाकण्यात आले.  त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला आणि निवडणुकीची जय्यत तयारी केली. १९९९ ला मी तर कारगिल युद्धावर गेलो होतो.  त्याच वेळेला निवडणूक जाहीर झाली होती व दोन्ही पक्ष एकमेका विरुद्ध ठामपणे उभे राहिले होते. त्यावेळेस शिवसेना आणि भाजपा यांच्या युतीचे सरकार होते.  या भक्कम युतीसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे स्वतंत्रपणे लढले होते, त्यावेळी गावागावात जाऊन मी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून पक्षाला बळकट केले होते आणि निवडणुकीच्या काळामध्ये पैसा अडका नसताना देखील आम्ही जिंकून आलो होतो. पण त्यावेळी सर्वच पक्षांना पूर्णपणे बहुमत मिळाले नाही. काँग्रेस पक्षाला ८५ जागा मिळाल्या होत्या व राष्ट्रवादी काँग्रेसला ५० जागा मिळाल्या होत्या. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष विसरला की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने सोनिया गांधीला परदेशी म्हणून राजकारणात कुठलाही अधिकार नाही असे जाहीर करून देखील सरकार बनवण्यासाठी एकत्र आले व सरकार बनवले.  विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले व त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव भोसले यांना बाजूला करण्यात आले आणि आमच्यासारखे लोकांना सुद्धा बाजूला करण्यात आले.  त्याचं कारण एवढेच होतं की शरद पवारांना नाराज करायचं नाही.  म्हणून काँग्रेसने असे निर्णय घेतले की जे शरद पवारला कट्टर विरोध करत होते त्या लोकांना लपवून ठेवायचे.  अर्थात पुढे जाऊन आमच्यासारखे लोक शरद पवार बरोबर युती करायला अजिबात तयार नव्हते आणि सरकार बनवण्यासाठी आघाडी बनवू लागली तरी चालेल पण निवडणुकीमध्ये जसे आम्ही भाजप शिवसेना युती समोर लढा दिला आणि पराभव करून सरकार बनवले तसेच पुढच्या काळामध्ये सर्व निवडणुकीमध्ये आघाडी करू नये.  आपापल्या ताकदीवर निवडणूक लढवावी अशी मागणी आम्ही सातत्याने करत होतो ते काही काँग्रेसने केले नाही. म्हणून त्यांची आजची गत काय झाली आहे हे सर्वांना माहीत आहे.

आता पुढे काय होईल याची चिंता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. त्याचे कारण कोण कुठे जाईल आणि निवडणूक लढवेल याचा अंदाज कुणालाच नाही.  नारायण राणे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये येणार असे २ वर्षा आधी मी म्हणालो होतो.  त्यावेळी माझ्यावर राजपूरच्या कोर्टामध्ये हल्ला केला.  पण २ वर्षानी ते काँग्रेसमध्ये आले, म्हणून मी काँग्रेसमधून बाहेर गेलो. म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडली होती.  त्यानंतर थोड्याच काळामध्ये नारायण राणेने देखील काँग्रेस सोडले आणि भाजपामध्ये त्यांना घेऊन मोदी सरकारने त्यांना मंत्री केले.  त्यामुळे कोण कुठे जाईल याचे काही अंदाज करता येत नाहीत.  कारण आजचे राजकीय पक्ष हे आया राम आणि गया राम पक्ष झालेत.  आणि पक्ष सुद्धा असे विचित्र झालेत की कुणालाही घ्यायला तयार असतात.  मग ते चोर असू देत का लुटारू असू देत.  नित्तीमता ही राहिलीच नाही.  म्हणून आज राजकीय पक्षामध्ये पैसे खायची स्पर्धा सुरू आहे. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांनी तत्त्वाला धरून एक नवीन पक्ष बनवला.  ते तळागाळातील कार्यकर्ते असल्याने जवळ जवळ ४० आमदार बरोबर घेऊन त्यांनी नवीन पक्ष बनविण्याचा विक्रम केला. एका वर्षात त्यांनी प्रचंड काम केले व तळागाळातील लोकांचे हृदय जिंकले.  त्यांनी प्रचंड अडचणीतून मार्ग काढत गरीब लोकांना आधार दिलेला आहे. पुढे त्यांना यश यावे व त्यांनी मुख्यमंत्री व्हावे यावर त्यांच्या कारकीर्दीचे भविष्य अवलंबून आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. न. ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS