एक नवीन चळवळ_१.९.२०२२

अमृत महोत्सव वर्षांमध्ये भारतात सर्वात दुःखाची बाब आहे की बळीराजा दु:खी आहे. त्याचबरोबर या देशाचे संरक्षण करणारा सैनिक. हा सुद्धा दु:खी आहे. लालबहादूर शास्त्रींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला, त्याच्या पाठीमागे फार मोठा विचार होता. कारण सैनिक हा कोणा श्रीमंत बापाचा मुलगा नसतो, कोणा आमदार खासदार अंबानी अडाणीचा मुलगा नसतो. बहुसंख्य सैनिक हे शेतकऱ्याची मुले असतात. वयाच्या ३३व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर सैनिक परत आपल्या शेतात जातो. परत तो दु:खी होतो. मग तो नोकरीसाठी दर दर भटकतो. नोकरी काही मिळत नाही. सैनिक हा सरकारी कर्मचारीच असतो. फक्त त्याचा रोल वेगळा असतो. सैन्यातले खडतर जीवन जगून सैनिक कुठल्याही आव्हानाला तोंड द्यायला सज्ज असतो. मग तो भूकंपअसू दे, पूर असून दे किंवा दहशतवादी असू दे. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा समाजाला उभे करण्याचे, वाचवण्याचे काम हे सैनिक करू शकतात.  म्हणूनऐन उमेदीच्या काळात त्यांना निवृत्त न करता ५८ वर्षांपर्यंत योग्य सरकारी नोकरी दिलीच पाहिजे अशी आमची स्पष्ट मागणी राहिलेली आहे.  किंबहुना सरकारी नोकरीत ४ वर्ष सैन्यात नोकरी केलेल्या लोकांना घेतले पाहिजे. मग तो आयएएस असुदे किंवा शिपाई असू दे.  आता अग्निवीर पद्धत आल्यानंतर ४ वर्ष सैन्यात नोकरी केल्यानंतर त्यांना बाहेर न फेकता पोलिस दल, बीएसएफ, सी आर पी फ, सारख्या सशस्त्र निम सेनादलमध्ये घेण्यात यावे. जो घोर अन्याय शेतकर्‍यांवर व सैनिकांवर होत आहे त्याच्या विरुद्ध आमचा लढा नेहमी राहिलेला आहे.

नुकतेच मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी हे विषय अति महत्त्वाचे ठरवले व बळीराजाचे संरक्षण करून हा महाराष्ट्र आत्महत्या मुक्त महाराष्ट्र बनवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतला या महाराष्ट्रातल्या सैनिकांना एक सन्मानाचे जीवन मिळाले पाहिजे.  म्हणून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करून त्यांना सन्मानित करून चांगले जीवन मिळवून देण्याचं निर्धार देखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे. परिणामत: मी, माझ्या असंख्य सैनिक आणि शेतकरी मित्रांनी शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे. २००४ नंतर सैनिकांच्या प्रश्नावर कुठल्याची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही व त्यांचे प्रश्न नजरेआड केले. उद्धव ठाकरेंना गेली १० वर्ष आम्ही पाठिंबा दिला, पण मुख्यमंत्री म्हणून ते आम्हा सैनिकांना एकदाही भेटले नाहीत.  दादासाहेब भुसे सैनिक मंत्री म्हणून आमचे काम करत होते. 

नारायण राणे यांना सोनिया गांधींनी पक्षात घेतले आणि सर्व मोठी पदे दिलीआणि आम्हा निष्ठावंत लोकांना त्यांनी बाजूला केले. म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन मी काँग्रेस पक्ष सोडला व कुठल्याही मोठ्या पक्षात न जाता आम्ही छोट्या पक्षांना उभे करायचा प्रयत्न केला. त्यात आम आदमी पार्टी यांच्या आमंत्रणावरुण अरविंद केजरीवाल बरोबर गेलो. एक नवीन पक्ष म्हणून आम्ही अरविंद केजरीवालकडे बघत होतो,पण आमचा अपेक्षा भंग झाला. नुकतेच अण्णा हजारेनी त्यांना पत्र लिहिलेले आहे. त्यावरून त्यांच्या कारभाराची कल्पना येते आणि आम्ही आम आदमी पार्टीतून बाहेर का निघालो, ते स्पष्ट होते.  केजरीवालने‘स्वराज्य’ या आपल्या पुस्तकात अनेक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात ग्रामसभेचा ठराव झाल्यावरच दारूच्या दुकानाला परवानगी द्यावी असं म्हटले होते आणि अण्णा हजारेंनी तोच मुद्दा उचलला की तुमच्या दारू विक्रीचे धोरण हे स्वराज्याच्या विरोधात जाते. अण्णा हजारे म्हणतात की खरंतर दारूबंदी हे आपले धोरण होते, पण आता तुम्ही असे धोरण जाहीर केलं की कुणालाही दारूचे दुकान घालायचे असेल तर त्याला दुकान घालण्यास परवानगी देण्यात यावी. यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचे लोकांचे मत आहे.  अण्णा म्हणतात की तुम्हाला सत्तेची धुंदी चढली आहे आणि तुम्ही वाटेल ते करत आहात.तुमच्या शराब नीतीचे वृत्तांत ऐकल्यावर मला फार दुःख होत आहे.  गांधीजींचा गावाकडे चला हा विचार घेऊन मी माझं पूर्ण जीवन गाव, समाज आणि देशासाठी अर्पण केले आहे. मागील ४७ वर्ष मी ग्रामविकास आणि भ्रष्टाचारा विरोधात लढत आहे. महाराष्ट्रामध्ये संघटन बनवून भ्रष्टाचारा विरोधात लढा दिला, त्या लढ्यातून दहा कायदे निर्माण झाले. तुम्ही ‘स्वराज्य’नावाचे पुस्तक लिहिलं त्यात प्रस्तावना माझ्याकडून करून घेतली. या स्वराज्यनामक पुस्तकात जे लिहिले आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे. आमदार, खासदार यांच्या शिफारशीवर आपण दारूचे लायसन्स देता आणि त्यातून बर्‍याच समस्या निर्माण होत आहेत आणि लायसन देताना पैसे घेतले जातात असे म्हटले जाते. ग्रामसभेमध्ये मंजुरी देण्यासाठी ९०% महिलांनी शिफारस केली पाहिजे आणि महिलांना हे लायसन्स रद्द करण्याचे अधिकार असले पाहिजेत असे आपण चांगले मुद्दे स्वराज्यमध्ये लिहिले आहेत. “एक बडे आंदोलन से बनी हुई पार्टी बाकी पार्टी की तरह ही काम कर रही है| पैसे से सत्ता और सत्ता से पैसा ये राजनीतिक पार्टी का जो चरित्र है,उसी मुताबिक आप भी कर रहे हो|ये दुःखदायी है|” असे अण्णा म्हणतात.

२०११ ला जनलोकपाल आंदोलन सुरू झालं. २०१२ ला अरविंद केजरीवालने पक्ष स्थापन केला. जन लोकपाल बिलामुळे मनमोहन सिंग सरकारची प्रचंड बदनामी झाली. खरं म्हणजे अण्णा हजारे ने अनेक कार्यक्रम करून एक नाव कमावलं होतं, भ्रष्टाचाराविरुद्ध उभे राहणारे अण्णा हजारे केजरीवालना पाहिजे होते.  अण्णाचे सैन्यातले काम आणि त्याच्यानंतर ग्रामविकासाचे काम करणारे अण्णा हजारे अरविंद केजरीवाला पाहिजे होते आणि म्हणून केजरीवालनेमयंक गांधीचा वापर करून अण्णा हजारेंना आपलं केल.  त्यांचा वापर केला, राजकारणात जाणार नाही असं केजरीवालने शपथ घेतली होती. अनेक राजकारणी लोकांना चळवळीत घेण्यापासून रोखले होते.  अत्यंत कारस्थान करून अण्णा हजारेना केजरीवालने आपल्याबरोबर घेतले. स्वतः अण्णांचा वापर करून केजरीवाल यांनी राजकारण केले. २०१२ मध्ये स्वच्छ कारभाराचे आश्वासन देऊन केजरीवाल निवडणुकीत उतरले. २०१३ मध्ये २८ आमदार निवडून आले व काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा घेऊन सरकार बनले.

२०१५ ला आम आदमी पार्टीला यश मिळालेव ते अण्णाना विसरले. अण्णा हजारेच्या पहिला आंदोलनापासून मी व माझे सहकारी त्यांच्या पाठीशी उभे आहोत. सुरुवातीला शरद पवार यांच्या भ्रष्टाचारा विरोधात त्यांनी आंदोलन केले. मी काँग्रेस पक्षाचा खासदार असून देखील त्यावेळी अण्णा हजारेना पाठिंबा दिला.  सुधाकर नाईक यांनी मुख्यमंत्री झाल्यावर गुन्हेगारी विरुद्ध प्रचंड मोहीम सुरू केली.  दाऊद गॅंगला सळोकी पळो करून टाकले. काँग्रेसच्या आमदारांना आणि नगरसेवकांना तुरुंगात ताडामध्ये घालण्यात आले. बाबरी मस्जिदच्या दंगलीचा फायदा घेऊन मुंबईत प्रचंड दंगल निर्माण करण्यात आली व सुधाकर नाईक यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आलेआणि शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात येऊन बसले व त्यातच खैरनार आणि अण्णा हजारे यांची जबरदस्त चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली. १९९५ ला निवडणुकीचे निकाल आले आणि त्यात काँग्रेस पक्षाला शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली फक्त ८५जागा मिळाल्या व युतीचे शासन आले.

मी सोनिया गांधी यांचा सचिव झालो. शरद पवार यांना पक्षातून काढून टाकण्यासाठी सुद्धा मोहीम झाली, त्यात पक्ष फुटला आणि कारगिल युद्धाला सुरुवात झाली. निवडणुका लागल्या पण कारगिल युद्धात मला पाचारण करण्यात आल्यावर मी कारगिल युद्धात सहभागी झालो. युद्धावरून परत आल्यावर आम्हाला निवडणुकीला सामोरे जावे लागले आणि फुटलेल्या पक्षाला घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रचंड काम केले व काँग्रेसला बहुमत मिळवून दिले. पण निवडणुकीनंतर सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करावी लागली.  आम्ही संघर्ष करत असल्यामुळे आम्हाला दूर करण्यात आले. मी वेळोवेळी प्रयत्न केला की सरकार बनवण्यापुरतं ठीक आहे, पण निवडणुका एकत्र लढू नये. पण नेतृत्वाचा निर्णय निवडणुका एकत्र लढण्याचा झाल्या व हळूहळू काँग्रेस पक्ष मागे होत गेला आणि राष्ट्रवादी त्याच्या पुढे गेली. त्यातच नारायण राणे यांना पक्षात घेण्यात आले. म्हणून मी आमदारकीचा राजीनामा देऊन पक्ष सोडला.त्यानंतरच्या काळात कुठल्याही मोठ्या पक्षात जायचे नाही असे ठरवले. कारण घराणेशाहीचा एक वाईट परिणाम असतो की निर्णय हुकूमशाहीचा असतो. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला बाजूला फेकेले जाते याचा अनुभव मला आला. पण छोट्या पक्षात देखील नेतृत्वाचा अहंकार मोठा दिसला.  बसपा, शिवराज्य पक्ष आणि आम आदमी पार्टीच्या निमंत्रणवरून मी त्या पक्षाचा अध्यक्ष झालो. पण तिथेही केजरीवाल म्हणाले की,भ्रष्टाचार हा विषय नाही. अण्णा हजारे ना भेटायचं नाही. निवडणूक महाराष्ट्रात लढायच्या नाहीत. सर्वात मोठा धक्का मला बसला की केजरीवालने सांगीतले की शरद पवार यांच्याबरोबर जमून घ्या. ज्यावेळी मी फडणवीस विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावेळी हे सगळे आम आदमी पार्टीचे लोक खवळले आणि विरोध केला. त्यामुळे या सर्व छोट्या पक्षांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आम्ही राजकीय पक्षाच्या बाहेर राहिलो.

आता अचानक मला दिसले की एकनाथ शिंदेच्या रूपात कर्तुत्वान आणि धाडसी नेता उभा राहत आहे.  कुठल्याही घराण्याचा पाठिंबा नसताना पन्नास आमदार त्यांच्या नेतृत्वाखाली जातात. मागील अनेक वर्षात त्यांनी आम्हाला अनेक काम करण्यामध्ये मदत केली.  सैनिकांना मदत केली.  शेतकऱ्यांसाठी काम केले. हे बघून एका कर्तव्यतत्पर माणसाच्या पाठीशी उभे राहून त्यांना मदत करावी ह्या भावनेतून शिंदे साहेबांबरोबर आम्ही काम करत आहोत. शिंदे साहेबाची भूमिका एका चळवळीत रूपांतर होत असताना दिसत आहे. त्यामुळे एक नविन आशा निर्माण झाली आहे.  कुठल्याही नेत्याने कार्यकर्त्याच्या निष्ठेची चेष्टा करू नये. मग निष्ठावंत कार्यकर्ते देखील नेत्याची चेष्टा करतात. त्यामुळे खोटे-नाटे आरोप करून बदनाम करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे, तो सर्वस्वी निषेधार्य आहे.

लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS