औरंगझेबचा काश्मिर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदीसाहेब शेवटी भाजपला काश्मिर सरकारमधून काढले. ३ वर्षांचे पाप लपवण्यासाठी काश्मिर बरबाद करून तुम्ही सरकारमधून बाहेर पडला. तुमच्या राजकारणामुळे काश्मिरमध्ये औरंगजेब सकट अनेक हिंदू मुस्लिम सैनिकांना शहीद व्हावे लागले. त्यांच्या कुटुंबियाचा आक्रोश तुमच्या उशिरा आलेल्या शहाणपणातून मिटणार नाही. मी एक सैनिक होतो राजकारणी नाही. प्रत्यक्ष काश्मिरमध्ये राहणे आणि दुरून अनुमान लावणे ह्यात मोठा फरक आहे. काश्मिर धोरणाचे सर्वात मोठे अपयश आहे कि सैनिकांना त्या धोरणापासून दूर ठेवणे. त्यामुळे राजकीय निर्णय हे बेजबाबदारपणे घेण्यात आले. मग ते पंडित नेहरू असो व आता मोदींचे आत्मघातकी धोरण असो. सर्व पक्षांनी सैनिकांना संरक्षण खात्यापासून दूर ठेवले आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा सल्ला देखील घेत नाहीत. भाजपच्या खासदारात माजी सैन्यदल प्रमुख  जनरल व्ही. के. सिंघ आहेत. पण त्यांना राज्यमंत्री करून खालच्या पदावर ठेवून अडगळीत टाकले आहे. खासदार जनरल  खंडुरी आहेत. ते उत्तरखंडचे मुख्यमंत्री होते. भ्रष्टाचारी नव्हते. म्हणून त्यांना काढून टाकण्यात आले. आता तर मंत्री देखील केले नाही.

मला एकदा नरसिंह रावने  विचारले होते कि तुला कुठले मंत्रीपद पाहिजे. मी म्हटले कि, सध्या मी नवीन आहे म्हणून मला मंत्रिपद नको, पण देणारच असाल तर defence द्या. त्यावर ते म्हणाले, “आताच तू सैन्यदलातून आला आहेस. तर संरक्षण राज्यमंत्र्याचे पद ठीक राहणार नाही. सर्व पक्षांनी असाच सैनिकांचा अपमान केला आहे. मोदीने तर अपमान करण्यात विक्रम गाठला आहे. सेना दल प्रमुखालाच नगण्य असे राज्यमंत्री पद देऊन कोनाड्यात बसविले आहे. मी कमांडो प्रशिक्षक असताना जनरल व्ही. के. सिंघ हे माझे वरिष्ठ अधिकारी. काश्मिरमध्ये  अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे. त्यांना मोदी ‘काश्मिर’ हा शब्द सुद्धा उच्चारू देत नाही. त्याउलट अमेरिकेत अर्धे मंत्री आणि अधिकारी सैन्यात नोकरी केलेले असतात. म्हणूनच इतक्या धाडसाने अमेरिका जगभर आपले प्रभुत्व ठेवते. जर देश बलवान करायचा  असेल तर रक्ताशी आणि लोखंडाशी खेळावेच लागते. फोकनाड मारून कधी देश प्रगती करू शकत नाही. जसे संघ प्रमुख भागवत वल्गना करतात कि, त्यांचे सैनिक ३ दिवसात युद्धाला तयार करतील. म्हणजे भारतीय सैनिक अहोरात्र प्रशिक्षण  करतो तो मूर्ख ठरतो. साप खाल्यानंतर उलटी करत करत ४० कि.मी. दौड करणारे आम्ही मूर्ख ठरतो. ह्या संघ परिवारातील लोकांना कधी मी काश्मिरमध्ये बघितले नाही. बंदूकीचा आवाज ऐकला तर धूम पळत सुटतील. हिंमत असेल तर लाल चौकात जाऊन भागवत साहेब तिरंगा फडकावून दाखवा. बरोबर प्रणव मुखर्जीना घ्या. सैन्यदलाचे ते सरसेनापती  होते आणि कॉग्रेसमधील तुमचे गुप्तहेर होते.

गल्लीतील दादा आपल्या गल्लीत शेर असतो. भाजप आणि संघपरिवाराचे असेच आहे. मोठ मोठे फोकनाड मारायचे. मोदी काश्मिर प्रश्न सोडवणार,पाकिस्तानला धडा शिकवणार असे गरजायचे आणि शपथविधीलाच नवाज शरीफला बोलवायचे. वाढदिवसाला जाऊन मिठ्या मारायच्या. काश्मिरमध्ये तर तुम्ही घात केला. मुफ्ती मोहमद सय्यदला मुख्यमंत्री केले. तो  तर दहशतवाद्यांच्या  आधारावर निवडून आला आणि भाजपने त्यांच्याबरोबर सरकार बनवली. काश्मिर हा शहीद औरंजेबचा आहे. बहुतेक मुस्लिम दहशतवाद्यांना विरोध करतात. काश्मिर खोट्या हिंदुत्वाचा नाही. हिंदू शेतकरी, कामगार, युवक,महिलांना तर तुम्ही उद्ध्वस्त केले. तुमचे हिंदुत्व फक्त वर्ण श्रेष्टत्वासाठी आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला नकार दिला त्यांचीच अवलाद आज हिंदुत्व म्हणून टाहो फोडत आहेत.  दंगली घडवायच्या, समाज फोडायचा आणि सत्ता काबीज करायची. घर, वीज, पाणी, रोजगार द्यायच नाही. इसिस आणि पाकिस्तानचा झेंडा फडकविणाऱ्या एकाच्या छाताडावर तरी तुम्ही गोळ्यांनी चाळणी केली का? उगाच फोकनाड राष्ट्रप्रेमाचे दाखवता. मोदीसाहेब माझे अनेक साथीदार शहीद झाले. त्यात औरंगजेब ही होता. त्याचे पूर्ण घराणे सैन्यात होते आणि आहे. ते काय हिंदुत्वासाठी शहीद झाले.

शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना काश्मिरमध्ये मला बरीच कामगिरी करण्याची संधी मिळाली. त्यावेळी काश्मिरचे आजचे राज्यपाल एन.एन.वोरा गृहसचीव होते. ह्या दोघांमुळे दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे धोरण बनले. मी इखवान दहशतवादी गटांच्या नेत्यांना घेवून त्यांना भेटलो आणि २५०० काश्मिरी दहशतवादी लोकांनी आत्मसमर्पण  केले. त्यांना हत्यारे देण्यात आली. पण नंतर त्यांची कत्तल करण्यात येत होती. म्हणून मी आग्रह धरला कि त्यांना सैन्यात घ्या. अखेर मंजुरी मिळाली. २००३ पासून ८ पलटणी तयार करण्याचे काम सुरु झाले. प्रत्येक पलटणीत  १००० काश्मिरी मुस्लिम सैनिक घेण्यात आले. असे ८००० सैनिकांची फौज २००६ पर्यंत उभी करण्यात आली आणि काश्मिर मधील दहशतवाद संपुष्टात आला. हे केवळ सैन्याचे काम होते. म्हणूनच खासदार झाल्यानंतर मला सैन्यात पुन्हा घेण्यात आले होते.  दहशतवाद्याना काश्मिरच्या गावात प्रवेश बंद केला. त्यांना टिपून काश्मिरच्या जंगलात मारण्यात आले.

हिंदीत एक म्हण आहे. ‘जो गरजते है, वो बरसते नही|’. भाजपच्या बाबतीत हे सत्य आहे. मेहबूबा सरकार हे दहशतवाद्यांनी निवडून आणले. काश्मिरमध्ये फक्त ४ जिल्ह्यात वेगळा काश्मिर मागणारे लोक आहेत. बाकर्वाल,गुज्जर, राजपूत लोक जे सीमेवर आहेत ते कधी वेगळा काश्मिर मागत नाहीत. त्यातीलच शहीद औरंगजेब आहे. हजारोनी  मुस्लिम सैनिक देशासाठी काश्मिरमध्ये शहीद झाले आहेत, होणार आहेत. मग ह्यात हिंदुत्व कुठे बसते? सैन्यात शिकवण आहे कि दहशतवाद कधी बंदुकीच्या गोळीने जिंकता येत नाही. हृदय आणि मन जिंकून दहशतवाद संपवता येतो. भारतीय सैन्याने ते अनेक ठिकाणी करून दाखविले आहे. पण सत्ताधीशांना वेळ कुठे आहे. दहशतवाद म्हणजे पैसे खाण्याचे कुरण आहे. म्हणूनच गडचिरोलीत देखील दहशतवाद फोफावत आहे. हिंदू-मुसलमान वाद बंद करा. शेवटी हिंदू असो कि मुसलमान प्रत्येकाला घर पाहिजे. शेतमालाला भाव पाहिजे. कंत्राटी नोकऱ्या बंद करून कायमच्या नोकऱ्या पाहिजेत. मोफत आणि चांगली आरोग्य सेवा पाहिजे, शिक्षण पाहिजे, पाणी पाहिजे. ते देण्यात मोदीसाहेब तुम्ही पूर्णपणे नापास आहात. म्हणूनच तुम्ही गाई बैलाचे राजकारण करता,  मुफ्तीला मिठ्या  मारून सैनिकांचा बळी घेतलात. तुम्हाला माफी नाही. सर्जिकल स्ट्राईक करून मिरवता. पाकिस्तान ४९ सर्जिकल हल्ले करतो. हिंमत असेल तर पाकिस्तानला जगाच्या नकाश्यावरून नाहीसे करा; नाहीतर घरी जावून झोपा.

१ मार्च २०१५ ला मोदीनी मुफ्ती मोहम्मद साय्येदला मिठी मारली आणि मुख्यमंत्री बनवला. पहिल्याच सभेत मोदी  समोर मुफ्तीनी निवडणूक शांततापूर्ण वातावरणात होऊ दिल्याबद्दल पाकिस्तानचे आणि दहशतवाद्यांचे आभार मानले. मोदी गप्प बसले. ह्या दरम्यान सैन्याला highway आणि मुख्य ठिकाणावरून काढण्यात आले. त्याजागी BSF किंवा CRPF ला लावण्यात आले. दगड फेक वाढत गेली. सैनिकी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पण भाजप मेहबूबा सरकारनी काहींच कारवाई केली नाही. उलट दगडफेक करणाऱ्यांना माफ केले. आता भाजप मेहबूबा सरकारमधून बाहेर पडले. पण दरम्यान काश्मिर अस्थिर करून टाकला. सैन्याला हात बांधून तुम्ही इतकी वर्ष लढायला लावले. त्यात औरंगजेबसारखे अनेक जवान मारले गेले. मोदीसाहेब तुम्ही त्यांना परत आणु शकता का?  कणाहीन राजकारणाला नेहमीच अपयश आले आहे. जर तुम्ही पक्षहितापेक्षा देशहित श्रेष्ठ मानले असते तर तुही  मेहबूबाबरोबर कधीच सरकार बनवले नसते. राज्यपालाचे राज्य असते तर एवढा भयानक कांड  झाला नसता. ह्या दरम्यान एकही आमदार किंवा खासदार किंवा राजकीय नेत्यांची हत्या का झाली नाही? कारण मोदीसाहेब  काश्मिरचे राजकारण मॅच फिक्सिंगचे राजकारण आहे.

सैन्यांनी काश्मिरमध्ये शांती आणली. तुम्ही फोकनाड मारले. सैन्याचा घात केला. त्यांना लढायला लावून स्वत: सर्व पक्ष सुरक्षित आहेत. पैसे खाण्याचे प्रमाणात तर भाजप मेहबूबा युतीनी विक्रम केला पैसे खर्च झाले पण कामच नाही. रस्ते, पाणी, वीज शिक्षण नाही. पूर्ण सरकार अपयशी ठरले. तुमचे काहींच गेले नाही, मेली ती फक्त जनता आणि शहीद झाले ते फक्त सैनिक.  त्या वीरमाता व पत्नींचा आक्रोश त्यांना श्रद्धांजली देवून थांबवता येत नाही. त्यांच्या अश्रूंची किंमत तुम्हाला द्यावी लागेल. औरंगझेबसारख्या शहिदानी, माझ्या देश बांधवानो तुम्हाला संदेश दिला आहे. तुम्ही एक व्हा आणि सत्तेच्या राजकारणासाठी देशाला विकणाऱ्या आणि समाजाला फोडणाऱ्या  ह्या राजकीय पक्षांना कुठेतरी नेऊन गाडा.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS