अनेक महिने चाललेले करोना कांड आता भारतात पोहचला. १७ मार्चला एकूण १५३ भारतीयांना करोनाने पछाडले होते. आता पुढे किती वाढत होत जाईल यावरून पुढची दिशा ठरेल. चीनच्या वूहान प्रांतात याची सुरुवात झाली आणि ती झपाट्याने पसरत गेली. थोड्याच काळात पूर्ण जगात पसरली आणि आता भारतात करोना लोकामध्ये पसरू नये म्हणून भारत लढत आहे. भारतात आघाडी घेतलीय महाराष्ट्राने. १७ मार्चला ४५ करोना रुग्ण होते. ते किती वाढतील हे काळच ठरवेल. आतापर्यंत भारताने दूसरा टप्पा गाठला आहे. म्हणजे परदेशातून लोक आल्यामुळे भारतात उपद्रवीत रुग्ण निर्माण होतात. तिसरा टप्प्यात स्थानिक रुग्णामुळे आजार पसरत जातो. आपण आज तिसर्या दर्जावर जाऊ नये म्हणून संघर्ष करत आहोत. त्यात सरकार, प्रशासन व जनतेचा सहभाग महत्वाचा असेल.
जगात करोनामुळे २ लाख २० हजारपेक्षा जास्त लोक करोना रुग्ण आहेत. त्यात ९००० पेक्षा जास्त लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यात ८५ हजार लोक बरे झाले आहेत. ह्याचाच अर्थ करोनामुळे बहुतेक लोक दगावत नाहीत. ज्यांची प्रतिकारक शक्ती विकलांग असते तेच दगावतात. त्यामुळे, मानवाची रोग प्रतिकारकशक्ती महत्वाची ठरते. ही प्रतिकार शक्ति चांगली असेल तर करोनामुळे कुणीही दगावत नाही. पण भारतात ही प्रतिकार शक्ती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. त्याला आरोग्य विषयक जागरूकता जबाबदार आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, सरकार आणि लोकांचे लक्ष केवळ उत्पादन वाढीवर केंद्रित आहे, आरोग्यावर नाही. मानव कल्याणासाठी सर्वांगीण विकासाचा प्रयत्न झालाच नाही. सर्वांगीण विकासासाठी, आरोग्य, शिक्षण, निवारा आणि पाणी हे महत्वाचे विषय ठरतात. त्यासाठीच संविधानात लोककल्याण ही सरकारची जबाबदारी ठरवली गेली आहे. कारण कुठलाही श्रीमंत माणूस ही जबाबदारी घेणार नाही. त्याचबरोबर संविधानाच्या मुलभूत हक्कात त्या जबाबदारीची जाणिव सरकारला करून देण्यात आली आहे. घटना कलम २१ म्हणते कि, प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. सन्मानाने एक व्यक्ती तेव्हाच जगू शकतो ज्यावेळी त्याला आरोग्य, शिक्षण, निवारा, पाणी मिळेल.
भारतात बहुतेक नागरिकांना सन्मानाने जगण्याची स्थिती निर्माण करण्यास भारत सरकार अपयशी ठरले आहे. त्यात भारतीय जनतेचे आरोग्य कमकुवत झाले आहे. बहुतेकांच्या शरीरात विटामीन ‘सी’, आयर्न/लोह आणि अनेक धातूंची कमतरता आहे. त्याला मुख्य कारण पहिलं म्हणजे आहार आणि दूसरा म्हणजे व्यायाम. आनंदाने जगण्यासाठी शरीर मजबूत पाहिजे. पूर्वीच्या काळात आहारमध्ये विष नव्हते. आज रासायनिक खते आणे कीटकनाशकांमुळे आपले अन्न विषमय झाले आहे. त्याचबरोबर शरीराला लागणारे पौष्टिक तत्त्वे मिळेनासे झालेत. जसे आम्ही काही गावात चाचणी केली, त्यावेळेस आढळून आले की ७०% लोकांच्या रक्तात लोह कमी आहे. म्हणजेच ते अॅनॅमिक आहेत. अशा महिला सुदृढ बाळाला जन्म देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेक गरोदर महिलांना गोळ्या घ्याव्या लागतात. पूर्वी तसे नव्हते. त्याचबरोबर शरीरामध्ये विटामीन ‘सी’ ची कमतरता असते. एकंदरीत चांगल्या आहारापासून वंचित राहिल्यामुळे व विषारी अन्न सेवनामुळे शरीराचे अंतरंग ढासळून चालले आहेत. म्हणून ज्यावेळेत करोनाचा हल्ला होतो, त्याला प्रतिकार करण्याची शक्ती नष्ट झालेली असते. त्यामुळेच लोक मरण पावतात. जर रोगप्रतिकारकशक्ती मजबूत असेल, तर करोना किंवा कुठल्याही जंतूचा हल्ला झाल्यामुळे लोकांचे जास्त नुकसान होत नाही. म्हणूनच राष्ट्रीय धोरणात पोषक आहाराला प्राथमिकता दिली पाहिजे. त्याचबरोबर रासायनिक खते आणि कीटकनाशकांना बंदी घातली पाहिजे. आजकालच्या वाढत्या आजारांना तोंड द्यायचं असेल तर ही कठोर भूमिका घ्यावीच लागेल. विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी आता अनेक चळवळी उभ्या राहीलेल्या आहेत. शेतकर्यांनी पुढे येऊन आपल्या जमिनीची सेवा करण्यासाठी या नवतत्रांचा वापर केला पाहिजे.
पर्यावरणाचे संरक्षण हे आनंदी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी हे अनेक ठिकाणी उपलब्ध नाही. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते. झाडे कापून पृथ्वीचे वाळवंट करण्याची जी पद्धत चालू आहे ती लोकांच्या आरोग्याला घातक आहे. जर श्वास घेणारी हवाच दूषित असेल तर करोनासारखे रोग वाढतच जाणार. त्याचबरोबर अशुद्ध पाणी पिल्याने शरीराची प्रचंड हानी होते आणि मनुष्याला अनेक रोगापायी जिवंत यातना भोगाव्या लागतात. पुर्वीच्या काळात नैसर्गिक पाणी आणि नैसर्गिक हवा सुद्धा शुद्ध होती. त्यामुळे आजाराचा प्रसार एवढ्या जलदगतीने होत नव्हता. पण अलिकडच्या काळामध्ये असा प्रसार झपाट्याने होतो. त्याला कारण आपली आधुनिक जीवनशैली. भांडवलशाही, उद्योगपती आणि त्यांच्या तावडीतील सरकारे याची अजिबात पर्वा करत नाहीत. औद्योगीकरणाच्या नावाखाली निसर्गाला उद्ध्वस्त करण्याची परंपरा दृढ झाली आहे. पण अंतिमत: या अनेक वर्षाच्या अत्याचारामुळे मानवी जीवन हे पूर्ण यातनामय होऊ शकते. त्यामुळेच जगातील सरकारांने याच्यावर वेळीच उपाययोजना केली पाहिजे. नाहीतर मानवी जीवन हे भययुक्त आणि आजारयुक्त होईल.
करोना व्हायरसमुळे थेट होणार्या आजारपणापेक्षा जागतिक आर्थिकव्यवस्थेवर होणारे परिणाम आणखी भयानक आहेत. शाळा, कॉलेज तर बंद व्हायला लागलेच आहेत, त्याबरोबर कारखाने सुद्धा बंद होत आहेत. नव उदारमतवादी आर्थिकधोरणामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेवर झालेले दुष्परिणाम आता प्रकट होऊ लागले आहेत. स्वस्थमजुरीवर आधारीत उत्पादन क्षमता चीन सारख्या देशांनी निर्माण केली. त्याची निर्यात केली आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये चीनने आपले प्राधान्य नोंदवले. त्यामध्ये श्रीमंत आणि अति श्रीमंत लोकांची निर्मिती झाली. हे लोक मोठ्या प्रमाणात ग्राहक झाले. करोनासारखा धक्का बसल्यावर त्याची अर्थव्यवस्था कोलमडून पडायला लागली. जगातील अनेक शहरे बंद झाली आहेत. उत्पादन संपले आहे. त्यामुळे रोजगार ही संपत चालला आहे. विमानसेवा, रेल्वे, एस.टी., बंद पडत चालल्या आहेत. तेलाची मागणी कमी झाली आहे. मोटारगाड्या, मोबाईल, टीव्ही, या सर्व वस्तूंची मागणी खाली गेल्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. चीननंतर, यूरोपियन राष्ट्र, अमेरिका येथे प्रचंड हानी होत आहे. बँकेने आणि सरकारने दिलेला स्वस्त कर्जामुळे लाखो लोकांनी बँकेतून कर्ज घेऊन शेअर मार्केटमध्ये गुंतवले व प्रचंड पैसा कमावलेला आहे. करोनामुळे जगातील शेअर मार्केट गडगडले व आता अनेक राजाचा रंक झाला. भांडवलशाहीमुळे निर्माण झालेला कृत्रिम विकासाचा डोलारा उद्ध्वस्त होत आहे. पण हे होत असताना सर्वात जास्त परिणाम हा गरिबांवर होणार. ही अत्यंत दु:खाची गोष्ट आहे. कारण आजची अर्थव्यवस्था ही खर्या विकासावर आधारीत नव्हती. ती सट्ट्यावर आधारीत होती आणि आहे. इथे खर्या उत्पादनाला पैसा मिळत नाही. जसे शेतकर्यांच्या मालाला देशात कितीही पैसा निर्माण झाला तरी भाव मिळत नाही. पण कृत्रिम शेअर बाजारात शेअरची किंमत १० रुपयांनी वाढली तर अनेक लोकांचा लाखोंचा फायदा होतो.
करोना विषाणूमुळे आज मानवतेला एक धक्का बसला आहे. त्यातून योग्य बोध घेऊन आपल्या आर्थिक, सामाजिक व्यवस्थेला या धक्क्यांना तोंड देण्याची ताकद आणि व्यवस्था निर्माण करावी लागेल. नाही पेक्षा लोकांना प्रचंड धोक्याला सहन करत रहावे लागेल. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी आपल्याला निकराने प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत विमान प्रवास केलेल्या लोकांनी आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना आजार सहन करावा लागत आहे. साधारणत: ही मोठ्या घरात राहणारी लोक आहेत, त्यामुळे आपल्या घरात ते राहू शकतात. पण ८५% लोक हे एका खोलीत किंवा दोन खोलीत राहतात. गरीब वस्तीत जर करोना पसरला तर त्याला बंदिस्त ठेवणे शक्य होणार नाही, म्हणून लोकांना सरकारला स्वत:हून सहकार्य करणे आवश्यक आहे. आपण सर्व लोकांनी मिळून या आव्हानाला तोंड देऊया. आणि करोनाचा प्रसार थांबवूया. ही विनंती.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९.