करोनाची त्सुनामी_२२.४.२०२१

वर्तमान पत्र उघडल्याबरोबर सगळीकडे करोना.. करोना..करोना…  जणू जगामध्ये आणि देशांमध्ये दुसरे काहीच होत नाही. सगळीकडे होणारे हे मृत्युचे तांडव लोकांना भयभीत करणारे आहे.  एकविसाव्या शतकामध्ये जगामध्ये जो प्रचंड बदल झाला, त्यात करोना एक असाच विषय आहे. त्याचबरोबर अनेक पर्यावरणवादी संघटनांनी सुचवल्याप्रमाणे ‘ग्लोबल वार्मिंग’ म्हणजे जगामध्ये उष्णता वाढल्यामुळे निर्माण होणारे गॅस.  त्यातून एक दिवस असा प्रसंग येईल की जगामध्ये मनुष्यजीवन नष्ट होऊन जाईल.  यातला खरा खोटा भाग पडताळून बघता येईल, पण एक गोष्ट सत्य आहे की मानव तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगतीकडे झेप घेत असताना, नव्या प्रकारे संपत्ती निर्माण करत असताना, तो अनेक संकटाला ही सामोरे जात आहे.  त्यातील करोना हा एक भाग आहे

आज ३.२५ लाख नवीन करोना रुग्ण देशांमध्ये निर्माण झाले.  एका दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढवण्याचा हा जगात एक विक्रमच आहे. त्याचबरोबर २१०२ रुग्णांचा मृत्यू झाला.  त्याच्या पूर्वी अमेरिकेमध्ये सर्वात जास्त ८ जानेवारीला नवीन करोना रुग्ण निर्माण झाले होते. ३ लाख ७ हजार रुग्ण होते.  त्यामुळे भारताचा विक्रम हा जगातील सर्वात मोठी करोना रुग्णांची संख्या जाहीर करतो. १ एप्रिलला १ लाख रुग्ण होते.  तिथून १७ दिवसात, दिवसा ३ लाखाचा आकडा भारताने ओलांडला.  रोज काही टक्के रुग्णांमध्ये वाढ होत आहे.  आपण रुग्णांच्या बाबतीमध्ये अमेरिकेच्या फार पुढे गेलो आहोत.

एक वर्षापूर्वी जेव्हा करोना सुरू झाला, त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं की, हा करोना संसर्ग आहे आणि लगेचच आटोक्यात येणार नाही.  त्यामुळे निर्णायक पावले उचलण्यात यावी व करोनाला भारतातून हाकलून द्यावे व त्यानंतर नैसर्गिक जीवनाला सुरुवात करावी.  लॉकडाऊन कडक करावा, पण झाल दुसरच.  सणासुदीला गणपतीला जाण्यासाठी लोकांनी आग्रह केला आणि सरकार नमले व मुंबईतील करोना रुग्ण गावाकडे झेपावले. अंतिमत: मोठ्या संख्येने करोना ऋग्ण ग्रामीण भागात निर्माण झाले. त्यामुळे पहिला लॉकडाऊन हा परिणामकारक ठरला नाही. करोना कधीच आटोक्यात आला नाही. मास्क घालणे, एकमेकापासून अंतर ठेवणे या गोष्टी पाळण्यात आल्या नाहीत.  सरकार देखील सतर्क नव्हते.  परिणामत: आता दुसरी लाट निर्माण झाली आहे. ती  भारतात जलदगतीने पसरत आहे.  तसेच मी आग्रह केला होता की करोना ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि त्या दृष्टिकोनातून आणीबाणीची परिस्थिती आहे.  म्हणून आणीबाणी जाहीर करावी व भारतीय सैन्याला सुद्धा करोनाच्या विरोधातील लढ्यामध्ये सामील करून घ्यावे.  महाराष्ट्रात भारतीय सैन्याचा फार मोठा संच आहे. सर्वात जास्त आरोग्यसेवा संबंधात हॉस्पिटल आहेत व हजारो सैनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे आहेत. भारतातील सर्वात मोठे दोन सैनिकी हॉस्पिटल आहेत.  एक कमांड हॉस्पिटल, पुणे व  अश्विनी हॉस्पिटल, मुंबई येथे आहे.  त्याशिवाय देवळालीला तोफखान्याचे हॉस्पिटल, पुण्याला बॉम्बे इंजिनिअरचे हॉस्पिटल, अहमदनगरला चिलखती दलाचे हॉस्पिटल, औरंगाबाद, नागपूर, फुलगाव, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी सैनिकी वैद्यकीय सेवा आहेत.  या वैद्यकीय सेवा करोना काळामध्ये का उपयोगात आल्या नाहीत? त्याचबरोबर भारतीय सैन्याचे सर्वात मोठे कौशल्य आहे की, कुठेही सैन्याला फिल्ड हॉस्पिटल बनवता येते. म्हणून सैन्यदलाची मदत करोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला मिळू शकली असती.  त्याचबरोबर सैनिकांचा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी करता आला असता.

जेव्हा पूर किंवा कुठली नैसर्गिक आपत्ती येते किंवा टेररिस्टचा हल्ला होतो, तेव्हा भारतीय सैन्याला पाचारण केले जाते.  मग गेली एक वर्ष भारतीय जनता तडफडत असताना सैन्याला न बोलण्याचे कारण काय आहे? सेनादलाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची शिस्त आहे.  कुठलेही काम सैन्यदलाला दिल्यावर, ते कधीही आजपर्यंत अपयशी ठरलेले नाहीच आणि म्हणून तिची प्रचंड गरज आहे.  सोशल डिस्टंसिंग ठेवायला,  मास्क  घालायला आणि गर्दी न करण्यासाठी लोकांना प्रशिक्षित करण्यासाठी सैन्यदल फार उपयोगी पडले असते व पोलिसांना देखील प्रचंड मदत झाली असती. तरी महाराष्ट्र आणि भारत सरकारने सैन्याचा वापर टाळण्याऐवजी सैन्याला अनेक ठिकाणी वापरता कसे येईल, याची योजना केली पाहिजे होती.

तसेच महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रशिक्षित निवृत्त सैनिक आहेत.  ते निवृत्त जरी झाले असले तरीही त्यांचा मोठा उपयोग होऊ शकतो.  सरकारने ह्या मनुष्यबळाचा सारासार वापर काही गोष्टीसाठी करायला पाहिजे, पण ते करताना दिसत नाही.  त्याला अनेक कारणे आहेत, त्यातले सर्वात मोठं कारण म्हणजे भ्रष्टाचार. सरकारी खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो हे जगजाहीर आहे. म्हणून सैन्यदल जर सरकारी खात्याच काम करेल तर पैसे खायला मिळणार नाहीत. म्हणून अनेकदा सैन्याला टाळण्यात येते. सैनिक आल्यावर इतर खात्यांच्या लोकांचा पैशावर गदा येते.  मुंबई पावसात बुडाली होती, त्यावेळेला मुंबई कमिशनर जॉनी जोजफ यांनी मला बोलावलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की सैनिकांचा वापर कसा करता येईल? त्याचा एक प्लॅन बनवा.  मी प्लॅन बनवून दिला.  कमिशनरला तो फार आवडला, पण नोकरशाही आणि राजकीय नेतृत्वाने तो हाणून पाडला.

झाडे लागवड करण्यासाठी सैन्याचा आम्ही इकॉलॉजिकल टास्क फोर्स बनवला होता.  त्यावेळी वाळवंटात झाडे लावली.  दिल्ली, मध्यप्रदेश, हिमाचलमध्ये जवळ जवळ पंधरा कोटी झाडे लावून जगविलेली आहेत.  फार मुश्किलीने दोन वर्षापूर्वी  मी एक सैनिकी कंपनी औरंगाबाद येथे मंजूर करून घेतली.  त्यांनी २ लाख झाडं लावली आणि जगवली.  आमची मागणी पूर्ण महाराष्ट्रासाठी चार बटालियन आहे.  ते पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी राबवले जाऊ शकतात, पण फॉरेस्ट खाते त्याला विरोध करते.  कारण सैन्याने झाडे लावली मग फॉरेस्ट खात्याच काय काम राहणार आहे? इकॉलॉजिकल टास्क फोर्स हा वेळोवेळी सगळ्यांनाच उपयोगी पडेल.  दहशतवादी आले तरी त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी सुसज्ज राहील.  नाहीतर २००८ला  दहा दहशतवादी आले तर मुंबई पोलीस जाम झाली.  NSG ला दिल्लीहून बोलवावं लागलं.  अशा प्रकारे ऐनवेळी काम करण्यापेक्षा भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने जे उपलब्ध सैनिक दल आहेत व निवृत्त सैनिक आहेत,  यांचा उपयोग नैसर्गिक आपत्ती विरुद्ध व सुलतानी आपत्ती विरुद्ध वापरण्यासाठी करावा.  असा माझा प्रयत्न गेले २५ वर्षे चाललेला आहे.  पण कुठलेही सरकार त्याला दाद देत नाही.  याचं कारण त्यांनाच माहित. पण आता करोनाच्या काळामध्ये प्रचंड प्रमाणात संकट आलेले आहे.  या संकटामुळे राष्ट्राची सर्व शक्ती आपण वापरली पाहिजे आणि त्यात सैनिक असतील, विद्यार्थी असतील, एनसीसी असेल त्यांचा कसा वापर करायचा हा प्लॅन केला पाहिजे.  सरकार या विषयावर फार खोलवर विचार करताना दिसत नाही आणि सरकार अशा अधिकार्‍यांच्या विचाराने निर्णय घेते की, ज्यांना नैसर्गिक आपत्तीमध्ये काय केले पाहिजे हेच माहीत नसते.  अज्ञानी अधिकार्‍यांच्या जोरावर निर्णय घेणे म्हणजे लोकांना संकटात टाकणे आहे.

आपत्ती आल्यावर त्याला तोंड देण्याचे काम फक्त सैन्य करू शकते, हे आतापर्यंत सिद्ध झालेले आहे.  नवीन गोष्ट मी सांगत नाही तरी मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्री यांना माझी विनंती आहे की, या विषयावर खोलवर विचार करून ताबडतोब सैन्याला उपयोगात आणावे. सैनिक वेगवेळ्या क्षेत्रात मदत करू शकतात. त्याला निवृत्त सैनिकाची जोड दिली तर करोनामध्ये बऱ्याच ठिकाणी यशस्वीपणे आपण काम करू शकतो आणि साखळी देखील तोडू शकतो.  कधी कधी असे प्रसंग येतात की सरकारला काय करावे हेच कळतच नाही.  कारण करोनाची परिस्थिती नवीन आहे. म्हणूनच २२ लोक नाशिकला मृत्युमुखी पडले.  करोना विरुद्ध लढा हा जिल्हावर दिला पाहिजे व एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात जाण्यावर नियंत्रण असले पाहिजे. आता सरकारने लॉकडाऊन केलेच  आहे, तर त्याचे कडक रितीने पालन करावे. नाहीतर हा सगळा खटाटोप अपयशी ठरेल.  कारण करोनाचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार सरकारने केला पाहिजे व ह्यात कुणाचीही गय केली नाही पाहिजे. पूर्ण करोना नष्ट झाल्यावर शिथिलता आणावी. नाहीतर पुन्हा येरे माझ्या मागल्या … करोना वाढतच जाईल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट : www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९.

Please follow and like us:

Author: Brigadier SS