काबुलचा आणि बॉलिवूडचा काय सबंध आहे? सर्व सिनेतारका आज काबुलचे शिकार झाल्या आहेत. सुशांत सिंहच्या मृत्यू नंतर बॉलिवूड आज पर्यंत प्रसिद्धीच्या झोतात आहे, ते ही सिनेतारकांवर ड्रग्स सबंधांवरून आहे. दिपिका पदुकोण पासून श्रद्धा कपूर आणि अनेक सिनेतारकांना चौकशीसाठी बोलावले. नारकोट्रिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले ते सिनेतारकांना चौकशीसाठी बोलवल्यामुळे NCB ची प्रसिद्ध झाली. म्हणून NCB आणखी मजा लुटू लागले. रोज एका नवीन तारकेंला चौकशीसाठी बोलवायचे आणि प्रसिद्धी मिळवायची. वास्तविक ह्या नटयांवर किंवा रियावर ड्रग्सचा व्यापार केल्याचा काही आरोप नाही. ड्रग्स सेवन केल्याचा असू शकतो. ह्या NCB ने ड्रग्स तस्करावर किंवा व्यापारावर काही कारवाई केल्याचे दिसत नाही. पण छोट्या चुकांना मोठे करून दाखवायचे आणि मूळ गुन्हेगारांना मोकळे सोडायचे हे तंत्र आहे.
पण मूळ प्रश्न हा उद्भवतो की ड्रग्स बॉलिवूडमध्ये किंवा मुंबईत कसे आले? भारतात जगातील २ महत्वाच्या केंद्रातून ड्रग्स येत राहिले आहेत. म्हणजे Golden Crescent ज्यात अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान आहेत. दुसरे, Golden Triangle ह्यात म्यानमार, लाओस आणि थायलंड आहे. भारताच्या पूर्वेकडील देशाच्या सीमा Golden Triangle शी निगडीत आहेत. तसेच भारताच्या पश्चिमेकडील सीमा Golden Crescent ला लागून आहेत. हे दोन्ही विभाग ड्रग्स म्हणजे अफू व त्यातून तयार होणारी हिरोइन उत्पादक आहेत. या दोन्ही भागातील शेतकर्यांचे मुख्य पीक म्हणजे अफू आहे. १९८० पासून दहशतवाद, युद्ध आणि राजकारण हे ड्रग्सवर अवलंबून आहेत. ड्रग्समुळे प्रचंड पैसा संघटित गुन्हेगाराला मिळाला. त्यातील डॉन जगातील पहिले १० श्रीमंत लोकात आले. भारत या दोन्ही ड्रग्स उत्पादन केंद्राच्या मध्ये दाबला गेला आहे आणि दोन्ही कडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स भारतात येतात. त्यातून निर्माण होणार प्रचंड पैसा डॉन लोक रोकड ठेवू शकत नव्हते, म्हणून डॉन लोक आणि त्यांचे मुख्य सरदार उद्योगात पैसे गुंतवू लागले. लाखो कोटी रुपयाची गुंतवणूक डॉन लोकांनी उद्योगात केली. ड्रग्सचा पैसा सर्वात प्रथम बॉलिवूडमध्ये गुंतवला गेला. त्यात दाऊद ग्रुपचा ड्रग्सचा सर्वात जास्त पैसा सिनेमात गुंतवण्यात आला. माफियाचे पाय धरल्याशिवाय सिनेमात कुणालाही काम मिळायचे बंद झाले. बॉलीवुड मधील जवळ जवळ सर्व नट-नट्या, सिनेमातील निर्माते, दिग्दर्शक दुबई आणि सारजाला गुन्हेगाराबरोबर दिसू लागले. त्यांना डॉनचा पाय धरल्याशिवाय काही पर्याय नव्हता. बॉलीवुड मध्ये सेक्स आणि शरब किती मोठ्या प्रमाणात चालतो हे सर्वश्रूत आहे. म्हणूनच काबुल किंवा अफगाणिस्तान मधून येणारे ड्रग्स पाकिस्तान मधून मुंबईत धडकतात व नटनटयांच्या सेवनासाठी वापरात येतात. बरेच लोक ड्रग्सचे गुलाम होऊन जातात. किंबहुना त्यांना गुलाम केले जाते. त्यामुळे त्यांना जे ड्रग्स पुरवू शकतात त्यांचे ते गुलाम कायमचे होऊन जातात. हा काबुल ते बॉलीवुडचा प्रवास आहे.
बॉलीवुडमुळे ड्रग्सचा प्रसार तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात झाला. युनोच्या अहवालाप्रमाणे भारतात जवळ जवळ २५लाख लोक ड्रग्सवर अवलंबून आहेत. खरे आकडे किती असतील ते कुणालाच माहिती नाही. ड्रग्सचे तस्कर झोपडपट्टीत राहणार्या गरीब मुलांना वापरतात. अत्यंत गरीब परिस्थितीत राहत असणार्या लोकांना ड्रग्समुळे चटकन पैसा मिळायला लागतो. या मुलांकरवी शाळा, महाविद्यालांमध्ये प्रचंड प्रमाणात ड्रग्स पुरविले जातात. बॉलीवुडच्या जीवन पद्धतीने प्रभावी झालेले तरुण ड्रग्सचे सेवन सुरुवातील एक फॅशन म्हणून करतात व त्याच्या नशेत जखडले जातात. ड्रग्स मिळविण्यासाठी वाटेल ते करू लागतात. खून-खराबा, आत्महत्या ड्रग्समुळे अनेकदा होतात. एकंदरीत विद्यार्थीदशेमध्ये मुलं ड्रग्सच्या आहारी जातात व त्यातून सुटू शकत नाहीत. त्या नशेतून निर्माण होणार्या उत्साहामध्ये फार गुंतून जातात व त्यातून काहीच सुटका नसते. जीवन बरबाद होऊन जाते. प्रचंड प्रमाणात भरतात ड्रग्सचे सेवन होत आहे. ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने हे भयानक चित्र लोकांसमोर आणले आहे.
८० च्या दशकात भिंदरनवालेच्या नेतृत्वामुळे पंजाबमध्ये खालीस्तान देश बनविण्यासाठी प्रचंड दहशतवाद झाला. त्या खालीस्तानी दहशतवाद्यांनी आपल्या लढ्यासाठी पैसा पाकिस्तानमधून भारतात ड्रग्सची तस्करी करून केला. तेव्हा पासून पुर्ण जगामध्ये दहशतवादासाठी पैसा ड्रग्स मधून उभा करण्यात आला आहे. जर आपण जगातील ड्रग्स नष्ट करू शकलो तर दहशतवाद देखील नष्ट होईल. आज अफगाणिस्तानमध्ये जगातील ९०% अफुचे उत्पादन होते. अफुच्या उत्पादनात पूर्वी म्यानमार किंवा Golden Triangle अग्रेसर होता. पण अलिकडच्या काळामध्ये तेथील ड्रग्स डॉन खुन-शा याने आत्मसमर्पण केले आहे व एक उद्योगपती म्हणून मिरवत आहे. म्हणून तेथील ड्रग्सचे उत्पादन घसरले व Golden Crescent मधील अफगाणिस्तानमध्ये प्रचंड वाढले. तालिबानने सुरुवातील ड्रग्सला विरोध केला. पण नंतर पैसे मिळविण्यासाठी त्याचा पुरस्कार केला व आज अफगाणिस्तानमध्ये तालिबानची ताकद ड्रग्सचा पैसा आहे. त्याचबरोबर भारताविरुद्ध लढणारे दहशतवादी गट लष्कर-ए-तोएबा, जैस-ए-मोहम्मद, हिजबुल- मुजाद्दीन आणि अनेक टोळ्या अफगाणिस्तानमधून ड्रग्स आणून भारतात विकत आहेत आणि त्यातून त्यांना प्रचंड पैसा मिळत आहे. त्यातून हत्यारे आणि बॉम्ब विकत घेत आहेत व भारतामध्ये दहशतवाद निर्माण करत आहेत.
ड्रग्सचा परिणाम किती भयानक होत आहेत ते बघा. ड्रग्समधून प्रचंड मोठे उद्योगपती निर्माण झाले. ते समाजात प्रतिष्ठीत व्यक्तींचा मुखवटा धारण करत आहेत. बॉलीवुड माफियाच्या ताब्यात आहे आणि म्हणून बॉलीवुड मध्ये काम करणारे लोक माफियाला जास्त मानतात आणि सरकारला कमी. अनेक ड्रग्स तस्कर रिक्षावाले, टॅक्सीवाले, दुकानदार हे देखील ड्रग्सच्या तस्करीमध्ये सामील आहेत. भ्रष्टाचारामुळे सुरक्षा यंत्रणा ड्रग्स गॅंगला सामील आहे. या गॅंगकडे प्रचंड पैसा असल्यामुळे आणि गॅंगची ताकद असल्यामुळे हळूहळू ते राजकारणामध्ये वरचढ होऊ लागले, आता जवळ जवळ अर्ध्या खासदारांवर गुन्हेगारीच्या केसेस आहेत. निवडणुकामध्ये ते पैशाचा महापुर आणतात, परिणमत: राजकारणामध्ये सच्च्या इमानदार देशभक्तांना जागा उरली नाही.
ड्रग्स बद्दल सरकारला बर्यापैकी माहिती सुरुवातीपासून होती. पोलिस यंत्रणेने बर्यापैकी ड्रग्स विरोधात काम केल. पण हळूहळू ड्रग्स मधून प्रचंड पैसा सर्वांना मिळायला लागला. त्या पैशातून अनेक लोक उद्योगपती, फिल्मस्टार आणि मोठमोठ्या व्यवसायात घुसले, श्रीमंत झाले. या विरोधात उपाय सुचवण्यासाठी मी सरकारकडून एक समिती बनवून घेतली व पूर्ण अहवाल बनवला पण सरकारने तो अहवाल दाबून टाकला. त्याचबरोबर ड्रग्स तस्करांनी मुंबईत दंगल घडवली, बॉम्ब ब्लास्ट केला. त्यांच्या विरुद्ध काही कारवाई झाली नाही. त्यामुळे ड्रग्स माफिया प्रचंड शक्तीशाली झाली आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये ड्रग्सचा प्रसार मोठ्या प्रमाणात करत आहे. काबुल ते बॉलीवुड असा प्रवास करून सर्व क्षेत्रावर आपला प्रभाव निर्माण केला आहे. ड्रग्स विरोधातील युद्ध हे केवळ एका नशेविरुद्ध युद्ध नव्हे, तर तो राष्ट्रीय सुरक्षेचा सर्वात मोठा पैलू आहे. पूर्ण देशामध्ये जी घाण पसरली आहे ती ड्रग्सच्यामुळे आहे. ती साफ करण्यासाठी जनतेला उठाव करावा लागेल, नाहीतर आमच्या मुलांचे भविष्य प्रचंड अधोगतीकडे जाताना दिसत आहे.
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा ९९८७७१४९२९