कारगिल युद्ध हे भारतीय सैन्यासाठी एक भयानक आव्हान होते. १५००० पासून १८००० फूटावरील असंख्य गगनचुंबी शिखरांचा कब्जा करायचा होता. वर वाजपेयी सरकारने निर्बंध लावले होते. एल.ओ.सी. पार करायची नाही, वायु दलाचा वापर करायचा नाही. ही खंत तत्कालीन वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली की, वायुदलाला पाक एल.ओ.सी. वर देखिल हल्ला करू दिला नाही. इकडे पाक सैन्यांनी मुसंडी मारून श्रीनगर लेह रोडवर कब्जा मिळवला. भारतीय सैन्याला एल.ओ.सी. पार करायची नाही हा वाजपेयींचा आदेश देश विघातक होता. सैन्याचे अतुलनीय शौर्य आणि राजकीय नेत्यांचा षंडपणा हा भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा कारगिल युद्धातील मुख्य स्थायीभाव राहीलेला आहे. भारतीय पंतप्रधान वाजपेयी हे अमेरिकेच्या आदेशावरून नवाज शरीफला मीठया मारायला लाहोरला गेले. त्याचवेळी पाकिस्तान सैन्य कारगिलक्षेत्रामध्ये घुसले व द्रास शहरापर्यंत मुसंडी मारली. वाजपेयींच्या पाकिस्तान भेटीच्या धोरणामुळे भारतीय सैन्य गाफील होते. उलट एल.ओ.सी. वरून सैन्याला मागे ओढण्यात आले. त्यामुळे एकही गोळी न झाडता पाकिस्तानने कारगिल वर द्रास क्षेत्राचा कब्जा केला. त्यामुळे लदाख विभागात असलेले भारतीय सैन्य संकटात आले. त्यावेळी मी सोनिया गांधीचा सचिव होतो. त्या नात्याने मी डिसेंबर १९९८ ला प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिले होते कि, भारतीय सैन्याचे हात पाठीमागे बांधून काश्मिर, लदाख क्षेत्रामध्ये लढायला लावू नका. त्याचवेळी सोनिया गांधीनी मी असे पत्र लिहील्या बद्दल नाराजी व्यक्त केली होती.
भारतीय राजकारणात दुर्देवाने आमच्या सारख्या सैन्यामध्ये काम केलेल्या लोकांचे संरक्षण विषयात अजिबात मत घेतले जात नाही. आता देखिल मेजर जनरल खंडोरी, पूर्व सेना प्रमुख जनरल व्ही.के.सिंग यांना छोट्याश्या खात्याचे राज्यमंत्री करून टाकले. अनुभवी सैनिक खासदार असताना त्यांना संरक्षण खात्याकडून दूर ठेवले जात आहे. याचे मुख्य कारण म्हणजे शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत काय चालले आहे ते कुणालाच कळू नये. अंबानी सारख्या माणसाला राफेल विमानाचे कंत्राट देण्यात आले. व सरकारी कंपनी HAL ह्याला काढण्यात आले. अंबानीचा विमान क्षेत्रात कुठलाही अनुभव नाही. 40 हजार कोटीचे कर्ज बुडालेले आहे. कायद्याप्रमाणे मोदी त्याला कंत्राट देऊच शकत नाही. त्याबद्दल पैशाचा व्यवहार मोदी साहेब लपवत आहेत. विमानाच्या तंत्रज्ञाना बद्दल गुप्तता बाळगली पाहिजे. पण कंत्राट दार्याची गुप्तता बाळगण्याचे काय कारण आहे? म्हणूनच माझ्या सारख्या सैनिकांना संरक्षण क्षेत्रापासुन दूर ठेवण्यात येते. उलट अमेरिकेत अर्धे मंत्री आणि अधिकारी हे सैन्यात काम केलेले असतात. कारगिलच्या युद्धात या निर्दयी राजकर्त्यांनी सैनिकांच्या शव पेटी मधून सुद्धा पैसे खाल्ले होते.
अमेरिकेने पाकिस्तानचे संरक्षण करण्याचा जणू ठेकाच उचलला आहे. कारगिल मध्ये भारतीय सैन्याला सीमा पार करून पाकिस्तानला धडा शिकविण्याचा प्रयत्न अमेरिकेने हाणून पाडला. आपले नेते ही अमेरिएकचे गुलाम असल्या सारखे वावरतात. त्यामुळे सैन्याला समोरून उंच डोंगरावर हल्ला करावा लागला. त्यात प्रचंड जीवित हाणी झाली. अमेरिका म्हणते ‘एकसंघ आणि मजबूत पाकिस्तान हा आंतरराष्ट्रीय सुरक्षेला गरजेचा आहे.’ त्यामुळे पाकिस्तानला सर्व प्रकारची मदत केली पाहिजे. इंदिरा गांधीनी १९७१ ला पाकिस्तानचे दोन तुकडे केले. त्यावेळी अमेरिकेने आपले सैनीक पाकिस्तानच्या मदतीसाठी पाठवले. पण इंदिरा गांधीने अमेरिकेला जुमानले नाही. भारताच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीकोनातून आज पाकिस्तानचे चार तुकडे केले पाहिजेत. कारण पाकिस्तानचे तीन प्रांत म्हणजे पेशावर भागातले पठाण, बलुचिस्थान आणि सिंधमधील लोक पाकिस्तानपासून स्वतंत्र मिळविण्यासाठी बंड करत आहेत. त्यामुळेच भारताने जर हल्ला केला तर पाकिस्तानचे चार तुकडे होऊन जातील. पाकिस्तान मधील दहशतवादाला नेस्तनाबूत करण्यामध्ये भारत यशस्वी होऊ शकतो. आजपर्यंत दहशतवादाविरुद्ध लढताना भारताचे ८००० सैनिक मारले गेले. कुठल्याही युद्धामध्ये ३००० पेक्षा जास्त सैनिक मारले गेले नाहीत. ही परिस्थिती अशीच चालली तर आणखी ८००० सैनिक मारले जातील. काश्मीरमध्ये पण आपले राजकीय पक्ष राष्ट्रहिताचा विचार न करता क्षणिक फायद्याचा विचार करतात. मुफ्ती महमंद सय्यद मोदीच्या पाठींब्याने काश्मिरचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी मोदी समोर त्यांनी भाषण केले व निवडणुकी शांततेने होऊ दिल्याबद्दल पाकिस्तानचे व दहशतवादी गटांचे आभार मानले. मोदींनी ‘ब्र’ सुद्धा काढला नाही. दहशतवाद्यांच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या मुफ्ती महमंद व मेहबूबा सरकार यांनी भाजप बरोबर राज्य केले. त्यामुळे दहशतवाद आणि दगडफेक जोमाने सुरू झाले. शांत झालेला काश्मीर मुद्दामहून न पेठविण्यात आला. त्यात आमचे अनेक सैनिक मारले गेले. हे भाजपच्या रक्षण धोरणाचे मोठे अपयश आहे.
निवडणुकीच्या अगोदर मी ‘फोकनाड मोदी’ हा लेख लिहिला होता. त्यात मी लिहिले होते की, मोदी पाकिस्तानला धडा शिकविण्याची वलगणा करत आहेत. पण ते भारताचे पंतप्रधान झाल्यावर काहीच करणार नाहीत. हे निवडणुकीनंतर सिद्ध झाले. कारण मोदींना शपथविधीला अमेरिकेच्या आदेशावरून नवाज शरीफला बोलावले. जसे वाजपेयीं देखिल कारगिलचा मारेकरी जनरल परवेज मुशारफ यांना घेऊन ताजमहाल बघायला गेले होते. आता मोदीही तेच करीत आहे. उगाच सर्जिकल स्ट्राइक पाकिस्तानवर हल्ला केल्याचा स्टंट केला. त्यात आमच्या जवानांचा राजकरणासाठी वापर केला. मोठ मोठे पोस्टर यूपीच्या निवडणुकीमध्ये लावले. मोदी रामाच्या अवतारात दाखवले. भारतीय सैन्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली ह्यात वाद नाही. तेव्हा मी म्हटले होते सर्जिकल स्ट्राइक हा फक्त स्टंट असेल तर पाकिस्तान ४० सर्जिकल स्ट्राइक करेल. आता तसेच झाले. पाकिस्तानने अनेक हल्ले केले. त्यात आमचे अनेक जवान मारले गेले. मारले गेलेले जवान हिंदू पण होते मुसलमान पण होते. पाकिस्तान आणखी मुजोर झाला. कारण त्याला माहित आहे की, भारताचे नेते नुसते धमकी देण्यापलीकडे काही करणार नाहीत. कारण पाकिस्तानला अमेरिकेचे पुर्ण सरंक्षण आहे. मोदीने अमेरीकेबरोबर गुप्त करार देखिल केला, पण इतिहास साक्षीदार आहे की, अमेरिकेला भारतावर पुर्ण नियंत्रण करायचे आहे.
कारगिल युद्धामध्ये आमचे असंख्य सैनिक नाहक मारले गेले, याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे, कारण मी पुन्हा सैन्यात दाखल झालो होतो. त्यावेळी जर भारतीय सैन्याला एल.ओ.सी. पार करायला दिली असती तर एका आठवडयात पाकिस्तान गुढग्यावर आला असता, पण भारतीय सैन्याला रोकण्यात आले. परिणामतः ४ मे पासून २६ जुलैपर्यंत कारगिल युद्ध चालू राहिले. ही खरी कारगिल युद्धाची शोकांतिका आहे. जवानांनी देशासाठी आपले रक्त दिले. अत्यंत कठीण परिस्थितीत अनेक युद्धामध्ये विजय मिळविला. पण, राजकीय नेतृत्वानी देशाचा घात केला. मोदी आणि त्यांचे सहकारी पोकळ राष्ट्रवादाची घोषणा करतात. भारतासाठी निर्णायक विजय मिळवू शकत नाहीत. कारण गोऱ्या माणसांच्या काळ्या सावलीखाली आमचे नेते लाचार झाले. माझ्या मते खऱ्या अर्थाने २१ व्या शतकामध्ये भारताला सुरक्षित करायचे असेल तर पाकिस्तानचे चार तुकडे करावेच लागतील. नाहीतर काश्मिर, पंजाब, आसाम हे पेटतच राहतील व भारतीय सैनिकांचे रक्ताचे शोषण होतचं राहील. आणि पुन्हा अनेक कारगिल निर्माण होतील.
कारगिल मध्ये लढलेल्या वीर जवानांना माझा सलाम !
लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९