काळ्यापैशातून दहशतवाद (भाग-२)१४.५.२०२०

गुन्हेगारांना त्यांच्या पैशापासून तोडा तर गुन्हेगारी संपुष्टात येईल, हे तत्त्व जगाच्या पाठीवर अनेकदा चर्चेत आले आहे. जगातील सर्वात महत्त्वाची संघटना युनोमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात गुन्हेगारी आणि ड्रग्सची तस्करी नष्ट करण्याविषयी ठराव झाले आहेत.  पण संघटित गुन्हेगारी आणि ड्रग्सची तस्करी वाढतच चालली आहे. ८०च्या दशकापासून पूर्ण जगात अनेक माफिया किंवा संघटित गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या.  त्याचे प्रमुख किंवा डॉन जगातील सर्वात श्रीमंत लोक झाले.  दक्षिण अमेरिकेतील कोलंबियातिल मेडीलीन कारटेल (मेडिलीन या शहरातील माफिया) चा डॉन पाबलो एक्सोबार झाला. Forefs मासिकांनी जगातील ७वा श्रीमंत म्हणून जाहीर केले. या पाबलोने कोलंबियातील सरकारला आपल्या पायाखाली तुडवले. ३००० पोलिसांचे खून केले.  अनेक खासदार, न्यायाधीश, मिलेटरीचे अधिकार्‍यांना कंठस्नान घातले.  गंमत अशी आहे की ९० साली आपण सरकारकडे आत्मसमर्पण करत असल्याचे जाहीर केले. पण आत्मसमर्पणाच्या काही शर्ती घातल्या.  त्यातील सर्वात हास्यास्पद शर्त म्हणजे तो स्वत:चे तुरुंग स्वत:च बांधणार.  त्यात सरकारी अधिकारी किंवा पोलिस येऊ शकणार नाहीत.  ही शर्त देखील कोलंबिया सरकारने स्विकारली.  पाबलोने स्वत:चे पंचताराकींत तुरुंग बांधले.  त्याला नाव दिले ‘ला-कटेद्रल’ हे तुरुंग सर्व सोईनी युक्त होते.  पाबलोने आपला ड्रग्सचा कारभार या तुरुंगातूनच चालू ठेवला.  कोलंबियन सरकारच्या होकारामुळे अमेरिकन सरकार काहीच करू शकले नाही.  कारण दक्षिण अमेरिकेतून सर्व ड्रग्स विशेषत: कोकेन USA ला जायचे व तेथील तरुण पिढीला नशेमधून नष्ट केले.  

              नंतर पाबलोने आपल्याच हस्तकांचा ला-कटेद्रलमध्ये खून केला.  तो उघडकीस आल्यामुळे कोलंबियन सरकारने तुरुंगावर हल्ला केला.  पण हल्ला करणार्‍या सैनिकांनी पाबलोला पळून जायला मदत केली.  पण त्यानंतर पाबलोचे अनेक हस्तक त्याच्या विरोधात गेले.  पाबलो हा मेडिलीन शहरामध्ये अत्यंत लोकप्रिय होता.  कारण ड्रग्स स्मगलिंगमधून मिळणार प्रचंड पैश्याचा थोडासा भाग लोकांवर खर्च केला.  त्याने लोकांसाठी घरे बांधली, हॉस्पिटल बांधले, रस्ते, पाणी, वीज अशा सुविधा निर्माण केल्या.  लोकांना वाटले की सरकार पेक्षा पाबलो बरा.  पाबलो कोलंबियाच्या लोकसभेमध्ये एकदा निवडून सुद्धा आला.  शेवटी १९९३ साली काही धाडसी अमेरिकन गुप्तहेरांनी आणि काही सैंनिकांमुळ पाबलो मारला गेला. 

            पाबलोप्रमाणे मेक्सिकोमध्ये ड्रग्सची तस्करी करणारे अनेक डॉन आहेत.  ते कोलंबियातील कोकेन अमेरिकेत नेतात.  त्यातील सिंहोला माफियाचा डॉन अलचाको हा खतरनाक आहे. त्याने मेक्सिको सरकारवर आपला पूर्ण दबाव ठेवला.  हजारो सैनिक, पोलिस, सरकारी अधिकारी, न्यायाधीश यांचे खून केले आणि आपली रक्तरंजित सत्ता १९८० पासून २०१७ पर्यन्त मेक्सिकोत राबवली.  २०१७ ला अमेरिकन गुप्तहेर आणि मेक्सिकोच्या सैन्याने त्याला पकडले.  आता तो अमेरिकेत तुरुंगात आहे, पण त्याचा धंदा बंद झाला नाही.  जगातील पहिल्या १०  श्रीमंत व्यक्तिमध्ये तो गणला जातो.  आता त्याचा मुलगा त्याची रक्तरंजित सत्ता चालवत आहे.  

            आपल्या घराजवळ दाऊद इब्राहीम सर्वश्रूत आहे.  १९८० मध्येच दाऊद मुंबईहून फरार झाला. पोलिस त्याला अटक करणार होते, याची माहिती दाऊदला एका मंत्र्याने दिल्याचे कळते.  सुरुवातील दाऊद दुबईला गेला.  तिथून त्याने अफगाणीस्तानमध्ये मध्ये निर्माण होणारी अफुची तस्करी सुरू केली.  अफगाणिस्तान मधून पाकिस्तानमध्ये अफुचे रूपांतर हेरॉईन मध्ये व्हायचे.  मुंबईच्या बाजारपेठेत १किलोला १कोटी रुपये किंमत असायची. लंडनमध्ये तिची किंमत २ कोटी व्हायची.  त्याकाळात पाकिस्तानमध्ये अमेरिकेने व पाकिस्तानने प्रचंड दहशहतवादी गट जगातून आणले व जिहाद जाहीर करायला लावले व अफगाणिस्तानमधील कम्युनिस्ट सरकार विरोधात लढायला लावले.  ओसामा-बिन-लादेन, लष्कर-ए-तोयबा आणि जैस-ए-मोहम्मद सारखे अनेक दहशतवादी गट निर्माण करण्यात आले.   साहजिकच या गटांचा उपयोग पाकिस्तानने भारताविरुद्ध केला.  १९९३ला याच दहशतवादी गटांची मदत घेऊन मुंबईमध्ये दाऊदने बॉम्बब्लास्ट केले. एका तष्करी माफियाचे रूपांतर दहशतवाद्यात झाले.  पाकिस्तानने दाऊदला कराचीमध्ये बसवले व आशिया आणि आफ्रिकेतील सर्वात मोठे ड्रग्स तस्कर केले.  पाकिस्तानच्या मदतीमुळे दाऊद इब्राहीम अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतामध्ये प्रचंड शक्तीशाली झाला.  तो आज जगातील पहिल्या १० श्रीमंत व्यक्तिमध्ये गणला जातो. 

            जगातील या तीन गुंडांची गोष्ट तर आम्ही सांगितली.  यांच्याकडे एवढा पैसा आहे की जगातील अनेक सरकारे हे विकत घेतात.  त्यामुळे त्यांना कुणीच हात लावत नाही.  छोट्या मोठ्या गुंडांना मारले जाते. डॉनच्याच मदतीने काही माल पकडला जातो.  पण यांचा अंमली पदार्थांचा आणि दहशतवादाचा धंदा कुणी बंद करत नाही.  निवडणुकीमध्ये प्रचंड पैसा लागत असल्यामुळे या डॉन लोकांनी अनेक आमदार, खासदारांना आपले गुलाम केले आहे. म्हणूनच सत्ता जी आहे ती श्रीमंतांकडे आहे व आपले दिसणारे सरकार या कटपुतळया बाहुल्या आहेत.  या डॉनचेच हस्तक आजचे बरेच उद्योगपती आहेत.  याची खरी सत्ता पैसा असते.  पण हा पैसा काळा पैसा असतो.  या काळ्यापैशाला पांढरा करण्याच्या प्रक्रियेला मनीलॉडरिंग म्हणतात.  मी १९९१  ला खासदार झाल्यानंतर याच्या विरुद्ध कायदा करण्यासाठी आग्रह धरला. पण त्याला विरोध झाला.  तोच १५ वर्षांनंतर कमकुवत कायदा बनविण्यात आला आहे.

            काळ्यापैशाचे हे विदारक सत्य आहे.  आज जास्तीत जास्त काळा पैसा ड्रग्स आणि हत्याराच्या तस्करीतून निर्माण होतो. त्याशिवाय भ्रष्टाचार, वेश्या व्यवसाय, जुगार अशा अनैतिक धंद्यामधून निर्माण होतो. भारतामध्ये काळ्यापैशाचा उपद्रव सर्वात जास्त आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत जाहीर केले होते की हा काळा पैसा परदेशात ९० लाख कोटी रुपये आहे तो मी परत आणणार त्यामुळे प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येतील.  लोक अजून वाट पाहत आहेत.  हा पैसा रोकड असतो.  तो पैसा मग स्वित्झर्लंड आणि तत्सम जगातील काही देशामध्ये गुंतवला जातो.  काळापैसा हा रोकडमध्ये असतो.  त्याला बँकेत ठेवता येत नाही.  नोटबंदीतून त्याला बाहेर काढण्याचे एक नाटक झाले. २०१६ मध्ये नोटबंदी करण्यात आली. त्या पाठीमागे सरकारने आपले उद्दीष्ट जाहीर केले.  त्यात काळा पैसा बाहेर काढणे, तसेच दहशतवाद्यांचा पैसा काढून घेणे. बँकामध्ये पैसा जमा झाल्यास स्वस्त व्याज दरात कर्ज दिले जाऊ शकते.  पण नोटबंदी मधून फक्त १५ लाख कोटी रुपये RBI मध्ये जमा झाले.  बाकी पैसे गेले कुठे?  तर परदेशी बँकामध्ये ठेवण्यात आले होते.

            २०१२ला CBI चे प्रमुखानी जाहीर केले की, ५०० अब्ज डॉलर  हे परदेशी बँकामध्ये आहेत. आपण बघितले आहे की काळ्यापैशाचे लाभधारक हे श्रीमंत लोकच असतात.  राजकीय नेते, सिनेतारक, क्रिकेटर, उद्योगपती आणि भ्रष्ट अधिकारी हे या टॅक्स फ्री पैशावर मजा मारतात.  त्यातल्या त्यात उद्योगपती हे काळ्यापैशाला पांढरा करण्यामध्ये सर्वात मोठे योगदान देतात.  नुकत्याच उघडकीस आलेल्या पनामा आणि पॅराडाईस कागदपत्रामध्ये जवळ जवळ २००० भारतीय लोकांची नावे आली आहेत. यांच्या परदेशामध्ये बेकायदेशीर कंपन्या आहेत.  जसे मॉरेशियसमध्ये १५००० खोट्या कंपन्या आहेत.  ज्यांचे मालक साधारण ड्रायव्हर, क्लार्क आहेत. खरे मालक पडद्याआड लपलेले आहेत.  त्यांची नावे सरकारला माहिती आहेत.  पण कॉग्रेस सरकार असो किंवा भाजप सरकार असो यांनी ही नवे लपवून ठेवली आहेत.  यावर रामजेठमलानी व इतरांनी याचिका दाखल केली ती चालू आहे. सर्वोच्च न्यायालयांनी SIT पण गठीत केली आहे.  म्हणजे विशेष चौकशी दल गठीत केले आहे. पण २०१२पासून आजपर्यंत ही नावे बाहेर जाहीर करण्यात आली नाहीत.  त्याउलट पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांचे नाव आले.  त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.  पण भारत सरकार कुणावरही कारवाई करायला बघत नाही व आपण भ्रष्टाचार विरोधात लढत असल्याचे सोंग करते.  त्यामुळे नोटबंदीची कारवाई असो किंवा इतर कुठली कारवाई असो भारत सरकारचा प्रामाणिकपणा परदेशातून पैसे परत आणण्याबद्दल दिसत नाही.  नरेंद्र मोदीने कॉग्रेस सरकारवर या विषयावर प्रचंड टीका केली पण स्वत: अनेक वर्ष सत्तेवर राहुन सुद्धा काही केले नाही. 

            कोविड-१९ आतंकाच्या काळात याचा सर्वात मोठा फटका गोरगरिबांना सहन करावा लागत आहे.  जर हा पैसा तुम्ही परत आणला तर भारताच्या आर्थिक विकासासाठी, गोरगरिबांच्या कल्याणसाठी तुम्ही निर्णायक पाऊल उचलल असे ठरेल. पण उगाच २० कोटीचे थातुरमातुर कार्यक्रम जाहीर करून फार मोठे काम केल्याचे दाखवू नका. लॉकडाऊन करा, पण गोरगरिबांच्या पोटापाण्याचा विषय देखील हाताळा. नाहीतर हा देश फक्त श्रीमंतासाठी आहे असे ठरेल.

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाईट  :  www.sudhirsawant.com

मोबा ९९८७७१४९२९

Please follow and like us:

Author: Brigadier SS