काश्मिरचा इतिहास हा रक्तरंजितच आहे. त्याची सहज आणि सोपी कारणे मिळू शकत नाहीत. पण बहुसंख्य मुस्लिम असलेला हा प्रांत भारतामध्ये विलीन होण्यापासून आजपर्यंत कुठल्या ना कुठल्या अडचणीमध्ये सापडला आहे. मोहम्मद अली जिनाने मुसलमानांसाठी वेगळा पाकिस्तान निर्माण करायची मागणी घेतली. वेगळा पाकिस्तान त्यांनी मुसलमानांसाठीच मागितला नाही, तर वेगळा पाकिस्तान जो असेल तो सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर चालणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं होतं. मूळ जिना हे काँग्रेसचे नेते. गांधीजींच्या गटाबरोबर त्यांचे वितृष्ट आल्यामुळे त्यांनी मुस्लिम लीगची स्थापना केली. याच मुसलमानांसाठी एक वेगळा प्रांत असावा अशी मागणी झाली. त्यातूनच भारताच्या फाळणीचा प्रश्न निर्माण झाला. ज्याला मूळ विरोध काँग्रेस नेत्यांचा होता. पण स्वातंत्र मिळवण्याची घाई झाल्यामुळे सर्वांनी मान्य केले. त्यावेळी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्वतंत्र राजे होते. त्या सर्व राज्यांना निर्णय स्वतंत्र देण्यात आले. ते भारतामध्ये किंवा पाकिस्तान मध्ये जाऊ शकत होते किंवा स्वतंत्र राहू शकत होते. काश्मिरचे राजे महाराजा हरी सिंह यांनी स्वतंत्र राहायचा निर्णय घेतला. त्यांचे पुत्र करण सिंह म्हणतात ‘निर्णय क्षमता नसल्यामुळे हरी सिंह वेळ काढू धोरण करत होता’. जून १९४७ ला भारताचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन श्रीनगरला गेले असता महाराज हरी सिंहने त्यांना मासे पकडायला पाठविले. त्यांना स्वत: भेटलेच नाहीत. अशाप्रकारे अनेक इंग्रज अधिकारी त्यांना भेटायला गेले असता, हरी सिंह चर्चाच करायचे नाहीत.
बऱ्याच लोकांनी पाक प्रधानमंत्रीना सुचविले की, पाकिस्तानी काश्मिर घेऊन टाकावा व हैद्राबाद देऊन टाकावा. पण पंडित नेहरूंनी जिद्द धरली की आम्ही काश्मिरच घेणार. १२ ऑगस्ट १९४७ ला पाकिस्तानी महाराजांबरोबर करार केला, पण भारताने केला नाही. पाकिस्तानला वाटत होतं की माऊंटबॅटन आणि नेहरूच्या मैत्रीमुळे माउंटबॅटनची बाजू भारताबरोबर आहे. त्यावेळेस काश्मिरला जाण्याचे तीन मुख्य रस्ते होते. पहिला रस्ता रावळपिंडी येथून बारा मनातून श्रीनगर, दुसरा रस्ता सी.आर.कोड जम्मू आणि बनियान पास मधून श्रीनगरकडे, तिसरा रस्ता अमृतसर गुरुदासपूर आणि पठाणकोट होऊन श्रीनगर. पंडित नेहरूंनी मुस्लिम बहुसंख्य असलेला गुरुदासपूर घेण्याचा हट्ट धरला. कारण तेथून काश्मिरला सैन्य पाठवायला सोयीचे होतं. ऑगस्ट १५ पासून ऑक्टोबर २६ पर्यंत काश्मिर स्वतंत्र होते . त्या दरम्यान जम्मू पासून कटवा आणि पुढे जांभळी रस्ता बनवण्याची सुरुवात झाली. कारण तिथूनच काश्मिरमध्ये सैन्य पाठवता येत होते. नेहरूंनी जिद्द केली होती की, कुठल्याही परिस्थितीत काश्मिर घ्यायचा आणि वेळ पडल्यास सैन्य सुद्धा पाठवायचे. त्या काळात डोंगरा आणि पंडित हे राजकर्ते होते. त्यांच्याकडे प्रचंड संपत्ती होती. त्या उलट मौसम के मुस्लिम हे गरीब होते आणि अन्नधान्य घेऊन काम करायची. मुसलमानांची ओढ पाकिस्तानकडे होती. १४, १५ ऑगस्ट, १९४७ ला पाकिस्तानचा झेंडा काश्मिरमध्ये सर्व पोस्टांवर लागला होता. अशा परिस्थितीत नेहरूंना कोणाची तरी साथ पाहिजे होती आणि म्हणून पंडित नेहरू यांनी शेख अब्दुल्लाला बरोबर घेतले. त्यावेळी शेख अब्दुल्ला हा सर्वधर्म समभाव मांडणारा व समाजवादी नेता होता. तो राजेशाही विरोधात होता आणि सामान्य जनतेला न्याय मिळवण्यासाठी काम करत होता. म्हणूनच शेख अब्दुल्ला जेव्हा इंग्रजांनी तुरुंगात घातला होता, तेव्हा पंडित नेहरूनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला होता. जर भारत महाराजा हरिसिंगवर अवलंबून राहिला असता आणि शेख अब्दुल्लाला बरोबर घेतले नसते तर निश्चितपणे काश्मिर पूर्णपणे पाकिस्तानला गेला असता. पण त्या काळात हैद्राबादच्या निजामने स्वतंत्र राहण्याचा निर्णय केला होता आणि काश्मिरची पण तीच गत झाली असती. जुनागडबाबत सुद्धा तसेच झाले असते. पुढचा इतिहास सर्वांनाच माहित आहे. ज्या पाकिस्तानी टोळ्या काश्मिरमध्ये घुसल्या आणि जवळजवळ श्रीनगर कब्जाच करणार होत्या. त्यावेळी महाराजांनी काश्मिर भारताला देण्याचा निर्णय घेतला आणि मग भारतीय सैन्य विमानाने श्रीनगर मध्ये घुसले व सुरुवातीला श्रीनगर विमानतळाचा कब्जा घेतला आणि नंतर पूर्ण श्रीनगरचा कब्जा घेऊन पुढे १२ मुल्ला उरीपर्यंत धडक मारली. जम्मू भागात राजुरी पुंच या विभागाचा कब्जा केला. म्हणून जम्मू आणि काश्मिर वाचला.
तत्कालीन विषयाशी संबंधित नसणारे लोक आजकाल बरेच तर्कवितर्क करतात की, भारत यूनोकडे का गेला? आणि युद्धबंदी का केली? अर्थात माझं वैयक्तिक मत आहे की, ती मोठी चूक होती. पण आता बोलणे फार सोपे आहे. भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यामध्ये अपुऱ्या सैन्यानिशी युद्धामध्ये उडी मारावी लागली होती. भारतीय सैन्यांनी मोठ्या शिताफीने युद्ध केले व बराच काश्मिरचा भाग परत मिळवला. त्यावेळी सैन्याची परिस्थिती काय होती, हे आता सांगणे कठीण आहे. पण काश्मिर सारख्या डोंगराळ प्रदेशात हल्ला करून बराचसा भाग घेतल्यानंतर आपली परिस्थिती पुढे जाण्याची होती की नाही हे इतिहासालाच माहित आहे. म्हणून माझी नम्र विनंती आहे की, कोणी या विषयावर कोणाला दोष देण्याचा प्रयत्न करू नये. त्यावेळच्या नेतृत्वाने जे केले ते त्यावेळच्या परिस्थितीला अनुसरून केलेले आहे. नंतर इतिहासाच्या पानावर रेखा ओढण्याचे काम करण्याची काही गरज नाही.
त्यावेळी परिस्थिती अशी होती की शेख अब्दुल्ला आणि पंडित नेहरू एक होते. त्यामुळे पंडित नेहरूने मतदान घेण्याचे कबूल केले. त्यात भारत निश्चितपणे जिंकला असता. पण मतदान घ्यायला दोन्ही सैन्य आणि काश्मिर सोडून जायला पाहिजे असे नियम ठेवले होते . त्यामुळे मतदान होऊ शकले नाही व ती परिस्थिती आजपर्यंत चालू आहे. ७१च्या युद्धामध्ये भारतीय सेनेने काश्मिरचा आणखी बराच भाग कब्जा केला. त्यात काही कारगिलच्या डोंगरावर कब्जा केला तुरटुक वर कब्जा केला आणि ते आपल्याकडेच ठेवले.
आज दुर्दैवाने काश्मिरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मी गुप्तहेर संघटनेमध्ये असल्यापासून पूर्ण काश्मिर भारतात घेण्याबद्दल स्वप्न बघत होतो. त्यावेळी कारगिल क्षेत्रामध्ये मोठं काम आम्ही केलं. एकूण ग्रुपचे सात आतंकवादी आम्ही पकडले होते. ही सगळी मुलं १९८७ च्या निवडणुकीमध्ये पराजित झाली होती. त्यावेळी पूर्ण इलेक्शन आम्ही कब्जात आणले होते. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या उमेदवारांना जिंकण्यामध्ये सरकारचा मोठा वाटा होता. सर्व तरुण त्यावेळी रागाने पाकिस्तानमध्ये गेले आणि भारताविरुद्ध प्रचंड मोठी दहशतवादी चळवळ उभी राहिली. पण हळूहळू पाकिस्तान जास्त कट्टरवादी हिज्बुल मुजाहिदीन या वाहब्बी आतंकवादी संघटनेला वाढवू लागली होती आणि इक्वान गटाला सपत्नीक वागणूक देत होते. उलट आम्हालाच पाकिस्तान इक्वान गटाची माणसे पकडायला देत होता. ही बाब आम्ही इक्वान कैद्यांच्या निदर्शनास आणली. हळूहळू इक्वान गटाला ती पटू लागली.
त्याचा फायदा घेवून आम्ही लोकांनी इक्वान ग्रुपला आपल्याकडे घेण्यासाठी डाव टाकला. ५ वर्ष प्रयत्न करून अनेक लोकांना एकत्र केले. त्यांचा प्रमुख कुका पेरेला घेवून मी, राजेश पायलट आणि गृहमंत्री शंकरराव चव्हाणकडे नेले. शेवटी त्यांना १९९५ मध्ये आत्मसमर्पण करायला लावले. २४६७ आतंकवाद्यांनी आत्मसमर्पण केले. पुढे जावून कारगिल युद्धात मी गेलो असता ते मला भेटले. त्यांना प्रचंड त्रास भोगावा लागला होता. मी मागणी केली की ह्या आत्मसमर्पित दहशतवाद्यांना सैन्यात घ्यावे. या मागणीला प्रचंड विरोध झाला. शेवटी तत्कालीन संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस मला प्रधानमंत्री वाजपेयीकडे घेवून गेले. त्यांनी मला विचारले की यातले किती पळून जातील? मी म्हणालो की जसे सैन्यात काही पळून जातात तसेच २ ते ३ पळून जातील. वाजपेयी साहेबांनी लगेच आदेश दिले आणि सैन्यात होम आणि हर्थ बॅटलियन बनल्या. आज ८०९९ सैनिक काम करत आहेत. अनेक लोक लढले शहीद झाले. सेना मेडल, कीर्ती चक्र, अशोक चक्र मिळाली आहेत. राष्ट्रीय एकात्मतेचे हे खरे प्रतिक आहे. दहशतवादाला बंदुकीच्या गोळीने संपवता येत नाही. ‘दिल और दिमाग को जीत के आतंकवाद खत्म कर सकते है |’
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट : www.sudhirsawant.com
मोबा. न. ९९८७७१४९२९