कोको कोलाचा कर्दनकाळ_31.1.19

कोको कोलाला देशातून तडीपार करणारे जॉर्ज फर्नांडीस काळाच्या पडद्यामागे गेले.कोको कोला हे अमेरिकन साम्राज्यवादाचे एक प्रतिक आहे. १९७० ते १९९१ ह्या कालखंडात समाजवादी विचार सरणी देशाचे प्रमुख धोरण अमेरिके विरुद्ध संघर्षाचे होते. अमेरिका आणि पश्चिम युरोप पाकिस्तानचे पाठीराखे होते. १९७१ च्या पाकिस्तान विरुद्ध युद्धात अमेरिकेने पाकिस्तानला पूर्ण मदत केली. भारताने रशिया बरोबर २० वर्षाचा मैत्री करार केला व पाकिस्तानचे २ तुकडे केले. ह्याच दरम्यान कॉंग्रेस विरुद्ध सर्व पक्ष एक झाले. जनता दल बनला व जनता दलाचे सरकार १९७७ ला स्थापन झाले. त्यावेळी जॉर्ज ने साम्राज्यवादी देशाविरुद्ध मोहीम सुरु केली. त्याचाच भाग म्हणून कोको कोलाला भारतातून तडीपार केले. अमेरिकेचे पूर्ण जगावर प्रभुत्व करण्यासाठी जंगी प्रयत्न सुरु होते. अमेरिकन कंपन्या भारतात घुसून आपला माल भारतात विकण्याचा प्रयत्न करत होत्या. त्याला इंदिरा गांधीनी आणि जॉर्ज यांनी विरोध केला. त्यावेळी डॉलरचा दर भारत सरकार ठरवत होते. आयात निर्यातीत सरकारचे नियंत्रण होते. एकंदरीत आपल्या अर्थ व्यवस्थेवर आपलाच ताबा होता.

हे सर्व १९९१ ला बदलले. मनमोहन सिंह  ह्यांनी नवीन आर्थिक धोरण भारतात आणले. अमेरिकन भांडवलशाहीने हळू हळू भारताच्या अर्थव्यवस्थेचा कब्झा घेतला. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) देशात लागू झाले. मी लोक सभेत आमच्याच सरकारच्या धोरणा विरुद्ध मोहीम उघडली, तेव्हा जॉर्ज देखील आघाडी वर होते. त्यांच्या कडून मला अनेकदा मार्गदर्शन घेण्याची संधी मिळाली. वेगळ्या पक्षात असलो तरी देशाचे हित समोर ठेवून आम्ही काम केले.

मी खासदार म्हणून निवडून गेलो तेंव्हा जॉर्ज फर्नांडिस यांचा दिल्लीत प्रचंड दबदबा होता, पण तरीही माझ्यासारख्या नवीन खासदारांना ते मार्गदर्शक म्हणून लाभले. सर्वांशी त्यांचे चांगले संबंध होते. माझ्या लोकसभेतील पहिल्या भाषणाचे त्यांनी स्वागत केले,कौतुक केले. कोकण रेल्वे प्रश्नावर त्यांनी केलेल्या कामात माझा हातभार लागला. कोकण रेल्वेसाठी जेंव्हा निधीचा प्रश्न उभा राहिला,तरतूद नव्हती,  रेल्वे-बोर्डाला मंजुरी मिळत नव्हती, तेंव्हा मी आणि जॉर्ज फर्नांडिस तात्काळ तत्कालीन रेल्वेमंत्री जाफर शरीफ यांना भेटलो. त्यावेळी देशावर सोने विकण्याची वेळ आली होती. आम्ही दोघांनी पंतप्रधानांची भेट घेतली. त्यांनतर  संयुक्तपणे २० डिसेंबर १९९१ रोजी लोकसभेत आक्रमकपणे हा विषय मांडला. पुढे जाऊन अनेक प्रयत्ना नंतर २० जून  १९९२ ला बोर्डासाठी परवानगी मिळाली आणि कोंकण रेल्वेचे काम पुन्हा सुरु झाले.

अनेक विषयांमध्ये मला जॉर्ज फर्नांडिस यांचे मार्गदर्शन लाभले. महिलांना सैन्यात आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरु होते, तेंव्हा विरोधी पक्षात फक्त जॉर्ज फर्नांडिस यांची  मदत मिळाली. त्यामुळे सैन्यात महिलांना घेण्याचा निर्णय झाला व १९९२ पासून महिला सैन्यात येऊ लागल्या. अशा प्रकारे अनेक विषयात जॉर्ज बरोबर काम करण्याची संधी मिळाली. जॉर्ज मला नेहमी तिबेटला मदत करण्यासाठी पाचारण करायचे. ह्या मुळे चीन विरुद्ध भूमिका घ्यावी लागली. माझ धोरण वेगळ होत. चीन बरोबर भारताने संबंध सुधारावे व अमेरिका पाकिस्तानच्या विरोधात आपण एकत्र काम केल पाहिजे अशी माझी ठाम भूमिका होती. त्यात जॉर्ज बरोबर मतभेद असून देखील त्यांना मी पाठींबा देत होतो. पाकिस्तानचा पाया नष्ट करण्यासाठी भारताने इराण बरोबर मैत्री केली पाहिजे अशी ठाम भूमिका मी मांडत असे. त्याला जॉर्ज पुर्णपणे पाठींबा देत असत. एकदा अमेरिकन नागरिक म्हणजे पत्रकार दनिएल पेअर्ल ह्यांचे दहशतवाद्यांनी अपहरण केले. त्या वेळी अमेरिकेने भारतात त्यांच्या गुप्तहेर खात्याला FBI ला पाठवण्याच ठरवले. भारत सरकारने परवानगी दिली. जॉर्ज/ अडवाणी ह्यांनी कडाडून विरोध केला. त्या वेळेस मी जॉर्जना कॉफी पिण्यास आमंत्रित केले. मी त्यांना विनंती केली कि त्यांनी ह्या गोष्टीला विरोध करू नये. कारण भारतीय नागरिकांचे अपहरण अमेरिकेत कधी झाले आणि आम्हाला आमचे लोक पाठवायचे झाले तर त्यालाही विरोध होऊ शकतो. दहशतवाद्यांच्या बाबतीमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य असणे गरजेचे आहे हे जॉर्जना मी पटवून दिले. सर्वात मोठा पाठींबा जॉर्जनी मला १९९२-९३ च्या मुंबई दंगली बाबत दिला. मी राजकीय नेते, माफिया व भ्रष्टा अधिकाऱ्यांच्या संगन मताने असे हल्ले होतात त्याची चौकशी व्हावी अशी मागणी करत होतो. त्यासाठी एक निवेदन बनवून खासदारांच्या सह्या घेत होतो. सुरवातीलाच मी जॉर्ज कडे गेलो. त्यांनी ताबडतोप सही केली व त्या मुळे १०० खासदारांनी सह्या केल्या. त्यातून भारताच्या इतिहासातील पहिली गुप्तहेर संगठना आणि पोलिसांची संयुक्त  वोरा समिती गठीत करण्यात आली. पुढे जाऊन वोरा समितीने भ्रष्टाचार गुन्हेगारी तस्करी थांबवण्याचा एक दिशा दर्शक अहवाल दिला. लोकसभेत त्यावर चर्चा झाली तेव्हा जॉर्जनी आणि सर्व पक्षाच्या अनेक खासदारांनी त्याची अमल बजावणी करण्याचा आग्रह धरला. पण सर्व सरकारांनी हा अहवाल दाबून टाकला. त्या वर जर काम झाले असते तर भारतात गुन्हेगारी आणि दहशदवाद कायमचा संपवता आला असता.

संरक्षण मंत्री असताना १९९८ च्या डिसेंबर मध्ये काश्मिरमध्ये भारतीय सैन्य धोक्यात आहे, सैन्याला पाठीमागे हात बांधून लढायला लागत आहे, हे मी त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता ताबडतोब बैठक घेऊन सैन्याला मदत करण्याची भूमिका त्यांनी घेतली. कारगिल युद्ध पेटण्याआधी मी त्यांना भेटलो, सैन्याच्या अडचणींची त्यांना पूर्ण कल्पना दिली व सैन्याला कारवाई करण्याची पूर्ण मोकळीक असावी, अशी सूचना दिली होती. पाकिस्तान सैन्याने घुसखोरी केली आहे, त्यामुळे पाकिस्तान हद्दीत जाण्याची परवानगी भारतीय सैन्याला देणे गरजेचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी त्याच वेळी श्रीनगर दौरा केला, त्यावेळी तिथेच त्यांची भेट घेऊन त्यांना सत्य परिस्थितीची माहिती दिली कि, भारतीय सैन्याला एकही चौकी सर करता येत नाही, त्यामुळे अन्य भागातून पाकमध्ये घुसण्याची परवानगी द्यावी, असे आग्रहाने मांडले, पण त्यावेळी ते हतबल दिसत होते. अमेरिकेकडून पाकिस्तानवर हल्ला न करण्याचा व सबुरीने घेण्याचा प्रचंड दबाव त्यावेळी येत होता. प्रत्यक्ष युद्ध काळात कारगिल मध्येच त्यांची पुन्हा भेट झाली आणि भारतीय सैन्य आक्रमक होईल तेव्हाच भारताची सरशी होणार म्हणून सैन्याला पाकिस्तान मध्ये घुसण्याची परवानगी द्यावी असा मी आग्रह केला. जॉर्जपण अनुकूल होते. पण अमेरिकेच्या दबाव खाली हे घडू शकले नाही.  या सर्व आठवणी आजही ताज्या आहेत.

जॉर्ज फर्नांडिस यांचे क्रांतिकारी काम हे दहशतवादाला बळी पडलेल्या युवकांना सैन्यात घेणे हे होते. कारगिल युद्धानंतर ज्या दहशतवाद्याना आम्ही सैन्यात असताना आत्मसमर्पण करायला लावलं. त्यांचे जगण कठिण झाल होतं. मी जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे आग्रह धरला ह्या आतंकवादयना सैन्यात घेण्यात यावे. ह्या विषयावर निर्णय होताना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले. तरीही जॉर्ज मुळे वाजपेयीनी मंजूर केले. त्या नंतर आम्ही ८००० काश्मिरी तरुण व आतंकवादी यांच्या ८ फलटणी बनवल्या. याद्वारे २०१४ पर्यंत काश्मिरमधील दहशतवाद संपवला. ह्या पार्श्वभूमीवर असा निर्णय फक्त जॉर्ज फर्नांडिसच घेवू शकतात हे प्रकर्षाने जाणवते. कारण जॉर्ज हे प्रथम मानवतावादि  होते. जॉर्ज यांचे देशाच्या राजकारणातील स्थान सर्वव्यापी होते. कामगार,  रेल्वे, उद्योग, संरक्षण मंत्रालय त्यांनी उत्कृष्ठतेने सांभाळले.  सर्वांचा त्यांच्याशी सलोख्याचा संबंध होता. राष्ट्रीय कामात त्यांनी पक्ष कधीच बघितला  नाही. ते गेल्याने मी हळहळलो. जीवनामध्ये काही माणसे अशी येतात आणि जातात; राहतात  फक्त आठवणी. त्यांचीच शिदोरी घेवून पुढे जाताना उरतात त्यांचे आदर्श. त्याच  आपल्याला सदैव प्रेरणा देतात आणि हिम्मत सुद्धा मिळते.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS