कोरोनाचा वाढता प्रसार_१७.९.२०२०

भारतात कोरोना बाधित आकडा ५० लाखाच्या वर गेला आहे. अमेरिकेत हाच आकडा ८० लाखांच्या वर आहे. भारत अमेरिकेलाही लवकरच मागे टाकेल असे दिसते. कारण भारतात दहा दिवसाच्या पाठीमागे दहा लाख कोरोना बाधित लोकांची संख्या वाढते. मार्च मध्ये जेव्हा सुरुवात झाली आणि आपण लॉकडाऊन केलं त्यावेळेस करोनाबाधित लोकांची वाढ फार हळूहळू होत होती.  सांगायचं म्हणजे भारतात कोरोना बाधित लोकांची वाढ सरकारच्या नियंत्रणात होती.  पण असं काय झालं की कोरोना बाधित लोकांची वाढ झपाट्याने व्हायला लागली.  मे पासून कशी वाढत गेली. सप्टेंबर मध्ये दहा दिवसात दहा लाख लोक वाढले. पुढे ती वाढत जाणार.  कदाचित दहा दिवसात ३० लाख लोक सुद्धा वाढतील आणि यावर नियंत्रण ठेवणे फारच कठीण झालेले आहे.  कारण सरकारने काय केलं माहीत नाही पण नंतर लॉकडाऊन शिथिल करत गेले.  मला माहिती आहे कि मे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित एकही केस नव्हती.  अचानक एवढी का वाढली? याचे आत्मपरीक्षण सरकारला करावे लागेल.  एवढे भयानक संकट या देशावर आलेले आहे, त्याच्याबद्दल लोक काय करत आहेत आणि सरकार काय करत आहे, ही एक चिंतेची बाब आहे.

            मार्च मध्ये मी राज्य आणि केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं की, आता सरकारने सर्व गोष्टींचा वापर केला पाहिजे. ही प्रचंड नैसर्गिक आपत्ती आहे.  तिला तोंड द्यायला आपल्याकडे जे काही असेल त्याचा वापर आपण केला पाहिजे आणि मी शिफारस केली होती की आपण सैन्याला देखील या युद्धा मध्ये सामील करून घेऊया.  एवढ्या लोकांना हानी पोहचल्यावर ही राष्ट्रीय आपत्ती आहे असे स्पष्ट होते.  इतर कुठल्याही युद्धा पेक्षा ही मोठी आपत्ती आहे.  मी कालच मुंबईच्या वेगवेगळ्या बस स्टॉपवर फेरफटका मारला. बस स्टॉपवर लोक हवालदिल झाले आहेत. मे पासून ऑफिस सुरू झाली. लोकांना ऑफिसला जायचे असते. फार कमी लोकांकडे स्वतःचे वाहन आहे. ट्रेन बंद आहेत.  कामासाठी येण्यासाठी फक्त बस आहेत. म्हणून बस पकडायला लांबच्या लांब रांगा लागत आहेत.  त्यात सोशल डीस्टनसिंगचे बारा वाजले.  लाईन मध्ये एकमेकाला चिकटून लोक उभे राहत आहेत. जर तुम्ही आता ऑफिस चालू केली आहेत तर लोकांना सार्वजनिक प्रवासाची व्यवस्था केली पाहिजे.  

            भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कोरोनाचे नियंत्रण करणे अशक्य होऊन जाईल आणि म्हणूनच सैन्याला सुद्धा पाचारण करायची विनंती मी मार्च मध्ये केली आहे.  कारण सैन्याकडे महाराष्ट्रात देशपातळीवरचे दोन मोठी हॉस्पिटल आहेत.  तसेच अनेक ठिकाणी अनेक शहरांमध्ये सैन्यदल जिथे जिथे आहे तिथे तिथे आरोग्य सेवा अत्यंत चांगली आहे. डॉक्टर, नर्सेस मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांची मदत घेतली पाहिजे. दुसरी बाब म्हणजे, सोशल डिस्टनसिंग. शिस्त अजिबात नसल्यामुळे नियम पाळले जात नाहीत.  बर्‍याच ठिकाणी मास्क लावले जात नाहीत आणि नियम शिथिल केल्यावर सोशल डिस्टसिंग पाळले जात नाही या दोन कारणामुळे कोरोना वाढत आहे. जर नियम शिथिल करायचे असतील तर लोकांनी स्वयंस्फूर्तीने शिस्त पाळली पाहिजे आणि ही शिस्त पाळायला मदत करण्यासाठी पोलिस आणि सैन्यदलाने एकत्र येऊन काम केले पाहिजे.  सैन्यदल कुठेही काम करत असताना नियम कसोशीने पाळते.  हाच फरक इतर दलापेक्षा मोठा आहे.  त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने आता जराही वेळ न घालता सैन्यदलाला पाचारण केले पाहिजे असे माझे स्पष्ट मत आहे.

            कोविड-१९ ने भारताला जबरदस्त धक्का दिला आहे. खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरणाच्या नावावर १९९१ पासून भारताची आरोग्य व्यवस्था उखडून काढण्यात आली आहे. GDP च्या १.२% आरोग्यावर खर्च करून सरकार कोरोनावर मात करण्याची भाषा करत आहे. आपण विसरतो कि भारतीय आरोग्य व्यवस्था कोरोनाच्या आधीच उदध्वस्त झाली आहे. आता कोरोना गाव-खेड्यात पोहोचला आहे.  लोक हवालदिल झाले आहेत. त्यात सडलेल्या आरोग्य व्यवस्थेचे दर्शन होत आहे. सरकारी अहवालाप्रमाणे, भारत १८५ देशात १५४ व्या जागेवर आरोग्य व्यवस्थेत आहे. भारताच्या सरकारी क्षेत्रात १ डॉक्टर सरासरी ११००० लोकांच्या पाठीमागे आहे.  खाजगीकरणाला पुष्ठी देऊन गेल्या २५ वर्षात सरकारी आरोग्य सेवा कमकुवत करण्यात आली आहे.  सुमारे ६० टक्के भारतीय आरोग्य सेवा ही खाजगी नफा मिळविणार्‍या लोकांच्या हाती आहे, जे लोकांच्या आजारांपासून फायदा घेत आहेत.  त्यामुळे गरीब मारला जात आहे. कुणी आजारी पडला तर कुटुंब उद्ध्वस्त होऊन जाते.  अशा स्थितीमध्ये कोरोना काळात सरकारी सेवा मजबूत करणे आवश्यक आहे.

          जगातील लोकसंख्येच्या  २५% गरीब भारतात राहतात. त्याचबरोबर, जागातील सर्वात जास्त अति भूकेलेले लोक भारतात राहतात.  यामुळे रोगराई पसरायला वेळ लागत नाही.  जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या अंदाजाप्रमाणे १४.५% म्हणजेच १९.५ कोटी लोक भारतात कुपोषित आहेत.  आरोग्य सेवा ही भारतात गरीब, श्रीमंत, मध्यम यांना वेगवेगळ्या स्वरूपात मिळते. त्यात प्रचंड विषमता आहे. गरिबांच्या घरात एक मोठा आजार झाला तर ते खाजगी रुग्णालयात जातात, कारण सरकारी हॉस्पिटलात सुविधा नसते. मी साधारणत: सरकारी दवाखान्यातच जातो. पण जे.जे. रुग्णालयाने  मला खाजगी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. कारण ती शस्त्रक्रिया सरकारी हॉस्पिटलात होत नव्हती. त्याला रु.३ लाख खर्च आला.  माझा विमा होता म्हणून मी वाचलो. सामान्य माणसाला हे कसे परवडणार?  आजारी पडणे म्हणजे कर्जबाजारी होणे. श्रीमंताना घरात आणि घरभर चांगल वातावरण आणि आरोग्य सोयी मिळतात. श्रीमंत नैसर्गिक अन्न महागडे असले तरी वापरतात. गरीब रस्त्यावरचा वडापाव, पोळीभाजी खाऊन जगतो. त्यामुळे, गरिबांची रोग प्रतिकार शक्ती नष्ट होते. भारतीय महिला ८०% अॅनमिक आहेत. म्हणून मुलाला जन्म देताना अत्यंत त्रास होतो.  मुल सुद्धा कुपोषित जन्मतात. त्यात अनेक औषधे घ्यावी लागतात तो खर्च वेगळाच.

            सरकारी हॉस्पिटल खूपच गलिच्छ आहेत.  तिथे लोकांना जनवरांसारख वागवल जात. बहुतेक इमारती पडायला आलेल्या आहेत. भ्रष्टाचारामुळे सरकारचा पैसा पोहचत नाही. ८०% प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रशिक्षित डॉक्टर नाहीत.  ग्रामीण भारतातील लोकांना मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी गेल्याशिवाय उपचार होत नाहीत. तिथे लोकांचे किसे कापले जातात. भारतातल्या १० लाख डॉक्टर पैकी फक्त १ लाख डॉक्टर सरकारी क्षेत्रात काम करतात. 

          अंबानी, टाटा, बिर्ला, अडाणी सारख्या लोकांनी धर्मादाय कामाच्या नावावर सरकारी जमीन ताब्यात घेऊन हॉस्पिटल उघडली आहेत.  पण गरीबांवर क्वचितच तेथे  उपचार होतात.  त्यातल्या त्यात आंतरराष्ट्रीय व राजकीय स्थरावर अनेक संस्था या औषधांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करत भारतात घुसल्या आहेत आणि प्रचंड पैसा कमवत आहेत. आताच कोरोनाकांडात अनेक खाजगी हॉस्पिटल लोकांना लुटत आहेत.  खाजगी आरोग्य माफियाला नियंत्रित ठेवणे सरकारला शक्य होत नाही.  औषधामध्ये प्रचंड काळाबाजार होत आहे.  गरीबांना औषधे फुकट मिळाली पाहिजेत, पण ती कधीच मिळत नाहीत.  हॉस्पिटलच्या बाजूला खाजगी औषधांची दुकाने असतात.  लोकांना औषधे तिथून विकत घ्यावी लागतात. 

          एकंदरीत परिस्थिती भयानक आहे. म्हणून कोरोनावर नियंत्रण करण्यास आपण साफ अपयशी ठरलो आहोत.  १९९१ नंतर सरकारी धोरणातून गरीब, शेतकरी, कामगार, सैनिक यांना बाजूला काढण्यात आले व भारताला पुन्हा ‘शायनिंग इंडिया’ म्हणजेच ‘श्रीमंतांची इंडिया’ बनविण्यात आले.  मोफत आणि चांगली आरोग्य सेवा हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. कोरोनाच्या कचाट्यात सापडलेला भारतीय नागरिक हा उभा राहू शकणार नाही.  कोरोनाबरोबर बेकारीची कुर्‍हाड गरिबांवर इतक्या तिव्रतेने पडली आहे की अनेक लोक त्यात नष्ट होत आहेत. यातून देशाला वाचवायचे असेल तर राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी एकसंघपणे या आव्हानाला तोंड दिले पाहिजे.

                                                                                    लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

                                                                                    वेबसाईट : www.sudhirsawant.com

                                                                        मोबा ९९८७७१४९२९.

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS