१३० कोटीचा भारत आता जागतिक क्रीडा स्पर्धा ऑलम्पिक मध्ये भाग घेत आहे. या वेळेला बरेच खेळाडू ऑलम्पिक मध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी व जिंकण्यासाठी गेलेले आहेत. पण १३०कोटी लोकसंख्येचा भारत असून देखील आपल्याला साधे एक सुवर्ण पदक मिळवण्यासाठी मारामार करावी लागत आहे. ह्या वेळी सगळ्यांना मोठी आशा होती. कारण ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाण्याअगोदर भारत सरकारने त्याला प्रसिद्धी भरपूर दिली होती. अमिताभ बच्चन पासून सेना दल प्रमुख पर्यंत अनेक लोकांच्या शुभेच्छा टीव्हीवर आपल्याला दिसल्या. चियर्स इंडिया.. इंडिया.. आपल्याला ऐकायला मिळाली. एकंदरीत सरकारने खेळाडूंना शुभेच्छा देताना असा आव आणला की या खेळाडूंना प्रशिक्षण त्यांनीच दिले आहे, तयार केले आहे. पण झाले उलटेच. आपल्या हातात विशेष काहीच लागलं नाही. पण ४० वर्षानंतर हॉकीमध्ये कांस्य पदक मिळवून भारतीय हॉकीने भारताची लाज राखली.
भारतीय हॉकीचा इतिहास वेगळाच आहे. ब्रिटिश काळामध्ये आणि त्यानंतर देखील भारत हॉकीमध्ये जगामध्ये अव्वल दर्जाचा देश होता. ती स्थिती खालावत आली. ऑलम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळविल्यानंतर शेवटचे पदक १९७१ला मिळाले. त्यानंतर भारत पहिल्या चार मध्ये कधीच नव्हता. यावेळेला मात्र भारतीय हॉकीने प्रचंड उचल घेतली आहे. पुरुष हॉकीमध्ये आपल्याला कास्य पदक मिळाले. भारत जगात तिसरा आला, तेही इंग्लंड, जर्मनी, स्पेन सारख्या बलाढ्य देशांना हरवून. खरोखर ही भारताच्या दृष्टीने लांब उडी आहे. त्याच बरोबर महिला हॉकी संघाने देखील अत्यंत कडवी झुंज देत उपांत्य फेरीची कसोटी जवळजवळ जिंकली होती. पण आता महिला संघ कास्यपदासाठी लढत देणार आहे म्हणजे महिला हॉकी संघ देखील पहिल्या चार मध्ये गेला आहे, हा खऱ्या अर्थाने भारतीय संघाचा एक मोठा विजय आहे. कारण क्रिकेटच्या भोवती फिरणारी भारतीय जनता आता तरी यातून काही तरी बोध घेईल व हॉकीसारख्या खेळांना प्राधान्य देईल. सुवर्ण पदक मिळवणारा भारताचा कर्णधार लक्ष्मण हा महाराष्ट्रातला होता. पण आताच्या हॉकीसंघामध्ये मात्र महाराष्ट्राला कुठे स्थान नाही, ही दु:खाची बाब आहे. महाराष्ट्रात ही दुर्दशा क्रीडा क्षेत्रात झळकते आहे. किंबहुना १३० क्रीडापटूच्या ऑलम्पिक संघामध्ये महाराष्ट्राला स्थान मिळाले नाही. जाधव हा एकमेव धनुर्धर आला. एक जागा मिळाली पण ती सैन्यामधून मिळाली. यावरून महाराष्ट्राला सुद्धा क्रीडा क्षेत्राकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवावे लागणार आहे, हे काही वेगळे सांगायला नको. क्रिकेटच्या पाठीमागे पळणार्या महाराष्ट्रातल्या युवाला कळलं पाहिजे क्रिकेटला ऑलम्पिक मध्ये प्रवेश नाही. क्रिकेट ऑलम्पिकचा खेळ नाही. त्याच्या पाठीमागे आपले खेळाडू आपले आयुष्य बरबाद करत आहेत. त्यापेक्षा मैदानी खेळ सहजपणे गावात खेळता येतात. त्याच्याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. सैन्यात गेलो तेव्हा मी सुद्धा एक क्रिकेटवीर होतो. खेळ खेळायची मला संधी मिळाली. अनेक खेळामध्ये मी प्राविण्य मिळवले. यावरून एक लक्षात येतं खेळ खेळायला संधीच आपल्या मुलांना मिळत नाही आणि ती संधी आपल्या मुलांना मिळाली तरच आपली मुलं ऑलम्पिक मध्ये आपला प्रभाव दाखवतील. भारत कमजोर नाही हे सिद्ध होईल. नाहीतर १३० कोटीच्या देशांमध्ये आम्ही विकलांग आहोत की काय? अशा प्रकारचे प्रदर्शन जगात होत आहे. चीन सुद्धा आपल्या बरोबरच स्वतंत्र झाला. अगदी बुरसटलेल्या मागासलेला देश होता, पण त्याच्या विरोधात बोंबलत असताना आपल्या लोकांना लक्षात आले पाहिजे. चीनने सिद्ध केले आहे की ऑलम्पिक मध्ये जगात पहिले येऊन त्यांनी आपल्या लोकांची काळजी घेतली आहे. आपल्या लोकांना सक्षम बनवलेले आहे आणि उद्योग क्षेत्रात तर त्यांनी लांब उडी मारलीच आहे. पण क्रीडा क्षेत्रात चीन मागे राहिला नाही आणि जर खरी स्पर्धा चीनबरोबर करायची असेल तर आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये चीनला मागे टाकल्या वरच आपण ते सिद्ध करू शकतो की आपण चीनच्या पुढे आहोत.
बऱ्याच खेळाडूंनी आपल्या मेहनतीने ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्थान मिळवले. यश कमावले. पी.व्ही.सिंधू सुवर्णपदक जिंकून आणेल अशी सर्वांची आशा होती. कारण तिने अनेक वर्ष अथक प्रयत्न केलेले आहेत, प्रशिक्षण घेतलेले आहे. पण दुर्दैवाने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तरी आपल्या सर्वांनाच आशा की एक ना एक दिवस पी.व्ही.सिंधू सुवर्णपदक जरूर आणेल. तिकडे मीराबाई चानूने रौप्यपदक मिळवून भारतीय महिलांचे कर्तुत्व दाखवलं. ही पण एका खोलीत राहणारी गरीब कुटुंबातील आहे. तिला कसलीच सरकारी मदत मिळाली नाही. उलट ऑलिम्पिक पथकात तिला घेत नव्हते. क्रीडा क्षेत्रात प्रचंड भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी चालते. मेरी कोमची देखील अशीच परिस्थिती होती. तिला बॉक्सिंगमध्ये भारत संघात येण्यासाठी प्रचंड त्रास निवड समितीतील लोकांनी दिला. शेवटी कशीबशी ती आशिया खेळात आली. तिथे ती पहिली आली. पण संघर्ष संपला नाही. १० वर्षाच्या प्रयत्नानंतर ती २०१२ ला म्हणजे वयाच्या ३२व्या वर्षी ती ऑलिम्पिकमध्ये येऊ शकली. नंतर विश्वविजेती झाली. ती बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक जिंकेल अशी आपल्या सगळ्यांनाच आशा होती. चाळीस वर्षे वय असताना देखील त्यांनी ऑलम्पिकमध्ये अत्यंत धडाडीने काम केले. दुर्दैवाने तिचे स्वप्न हे स्वप्नच राहिले. पण ज्यावेळी त्यांनी मुष्टियुद्ध सुरू केले, त्यावेळी स्त्री मुष्टियुद्धाला भारतात वाव न्हवता. पण तिने जिद्दीने आपले स्थान मिळवले. नाहीतर, सरकारी लांडग्यांनी तिला खेळूच दिले नसते. एकंदरीत मुष्टियुद्धामध्ये भारत पूर्वीपेक्षा पुढे गेला आहे. मेरी कोम मणीपुर सारख्या छोट्या राज्यातील असून तेथे महिला मुष्टियोद्ध्या तयार होत आहेत.
अनेक खेळामध्ये भारताला पहिल्यांदाच प्रवेश मिळाला. जसे नौका शर्यत आहे, घोडेस्वारी, गोल्फ आहे. भारत अजूनही ऑलम्पिक मधील अर्ध्यापेक्षा जास्त खेळात भाग घेऊ शकत नाही. पोहणे आहे त्यात मेडलचे ५० प्रकार आहेत आणि एक ही भारतीय त्यात नाही. डायविंग खेळामध्ये नाही. जिम्नॅस्टिक्स मध्ये नाही. बॉक्सिंग, कुस्ती यामध्ये अर्ध्या भागात आपण भाग घेत नाही. बास्केटबॉल नाही, फुटबॉल नाही, टेनिस नाही, अॅथलेटिक्स नाही अशा अनेक खेळात आपण भाग घेत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. एवढा प्रचंड किनारपट्टा असून, हजारो तलाव असून आपण पाण्यामधील शर्यतीत कुठेच नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. याची भारत सरकारने नोंद घ्यावी आणि आपल्या मुलांना पाण्यात पोहण्याच्या सुविधा मिळवून द्याव्यात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये क्रीडासंकुल आहेत पण तिथे जलतरण तलाव म्हणजे एक हास्यास्पद गोष्ट आहे. क्रीडा संकुलावर लाखो कोटी रुपये खर्च झाले, पण त्यात खेळाडू निर्माण नाही झाले, कारण महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारचे क्रीडा विभाग म्हणजे एक विनोद आहे. जो क्रीडा अधिकारी असतो त्यालाच खेळ काय माहित नसतो.
अशा परिस्थितीत देखील बरेचसे भारतीय खेळाडू आपल्या स्वतःच्या हिम्मतीवर प्रयत्न करून पुढे मजल मारतात. अॅथलेटिक्स सारख्या सोप्या खेळात सुद्धा भारत कुठेच दिसत नाही. १०० मीटर, २०० मीटर, १५०० मीटर, १०००० मीटर या सर्व शर्यतीत भारत कुठेच नाही. पण सुदैवाने काही गोष्टींमध्ये भारताने आपले स्थान मिळवले. जसे पंजाबच्या कमलप्रीत कौरने डिस्कस फेकी मध्ये पहिल्या सहामध्ये स्थान मिळवलं. धीरज चोप्रांनी भाला फेकित अंतिम सामन्यात स्थान मिळवले. आर्चरी व्वा नेमबाजीत आपली घोर निराशा झाली. शेवटी भारताला जर क्रीडा स्पर्धेत यश मिळवायचे असेल तर लहान मुलांपासून सुरू केले पाहिजे. प्राथमिक शाळेला जास्त महत्व दिले पाहिजे. शिक्षणातील खेळाला महत्व दिले पाहिजे. अॅथलेटिक्स म्हणजेच धावणे, लांब उडी, उंच उडी ह्याला काही विशेष क्रीडांगण लागत नाही. तरी प्रत्येक गावात, मैदान असेल पाहिजे. अनेक खेळ तिथे खेळता येतील. बॉक्सिंग, कराटे, कुस्ती तर आहेच. सर्व सैनिक शाळा ही क्रिडेची केंद्र झाली पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात खेळाडूंना वस्ती शाळा निर्माण केली पाहिजे. त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. १८ वर्षाची मुले ज्यावेळी ऑलम्पिकमध्ये जातील, त्यावेळेला भारत खेळामध्ये पुढे जाईल. चीन बरोबर स्पर्धा करील. क्रिडा म्हणजे आरोग्य, जर भारताचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर लहान मोठ्या सर्वांनी खेळामध्ये भाग घेतला पाहिजे. ही जीवन पद्धत भारतामध्ये रोज झाली तरच आपल्याला यश आहे.
लेखक : ब्रिगेडीयर सुधीर सावंत
वेबसाईट: www.sudhirsawant.com
मोबा. नं. ९९८७७१४९२९