गटबंधन

 कर्नाटक मध्ये कुमारस्वामीने मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कॉंग्रेस जनता दल सरकार स्थापन झाले. देशातून प्रत्येक राज्यातून सर्व पक्षाचे नेते बंगलोरमध्ये अवतरले. विरोधी पक्षाची एक अद्भूतपूर्व एकी स्थापन होताना दिसली. एकमेकाचे शत्रू एकमेकाच्या गळ्यात पडताना दिसले. मायावती आणि अखिलेश यादव, ममता, कॉंग्रेस आणि साम्यवादी  हे बेंगालमधील मुख्य शत्रू एकत्र येत आहे. आंध्र मध्ये चंद्राबाबू नायडू आणि कॉंग्रेस एकत्र दिसले. अशी अघोरी एकी ही किती टिकेल हीच शंका सर्वांच्या मनात येत आहे. दुसरीकडे, पालघर येथील प्रचार सभेत सेना प्रमुख उद्धव ठाकरे भाजप विरुद्ध कडाडले. सर्व पक्षांनी भाजप विरुद्ध एक व्हावे असे आव्हान केले. एका काळचे साप मुंगुस एकत्र येणार का? कॅमुनिस्ट आमदार कृष्णा देसाईच्या हत्त्येच्या पार्श्वभूमीत उभ्या राहिलेल्या शिवसेनेबरोबर युती होणार का?

उद्धव म्हणाले कि कॅमुनिस्टपासून कॉंग्रेसपर्यंत सर्वांनी एकत्र यावे आणि भाजपचे देशावर आलेले संकटाला तोंड द्यावे. आपण जर ह्यावेळी एकत्र आलो नाही तर देशाचे फार मोठे नुकसान होईल. ह्याचा अर्थ कॉंग्रेस आणि शिवसेना महाराष्ट्रात एकत्र येणार. मग राजकारण कसे चालणार? हिंदुत्ववादी आणि त्याचे विरोधक एकत्र येणार, असे संकेत तर ठाकरेनी दिले आहेत. अशा परिस्थितीत भाजपचे धूळधान होणार ह्यात एकही शंका नाही. सर्व भारतात भाजप विरोधात विरोधक एकत्र येताना दिसतात. युपीमध्ये तर अखिलेश आणि मायावती एकत्र आल्यामुळे, मुख्यमंत्र्याची लोकसभेची जागा गेली. तसेच सर्व निवडणुकीत धूळधान झाली. भाजपाला सर्वांचा विरोध का? शिवसेनेने तर भाजप महाराष्ट्रात उभी केली, पण आज शिवसेने सकट सर्व केवळ भाजपच्या भीतीमुळे एकत्र येत आहेत.  ही अस्तित्वाची लढाई आहे.

भाजपची भीती सर्वांच्या मनात निर्माण झाली आहे. ते साहजिक पण आहे. कारण साम, दाम , दंड, भेद, ह्या तत्वाची Ph.D केलेले मोदी –शहा जोडगळीने देशात दहशत निर्माण केली आहे. EVM घोटाळ्यामुळे, लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. बरेच लोक म्हणतात निवडणूक लढवून काय उपयोग आहे? शेवटी सरकार घोटाळा करणार. सर्व जगात विशेषत: प्रगत देशात EVM वापरले जात नाही. मग भारतातील पक्ष ह्यावरच आग्रह का धरत नाहीत? सरकार हे का बदलत नाही? माझी भीती वेगळी आहे. EVM चा सर्वात मोठा धोका हा आहे कि प्रत्येक बूथवर पडणारे मतदान उघड होते. पैश्याने मजबूत असणारे पक्ष मतदारांना विकत घेतात आणि धमकी देतात कि जर ह्या बूथवर सर्व मत मिळाली नाहीत तर याद राख. दुर्गम भागात तर ही दहशत प्रचंड आहे. त्या बूथ वरील अधिकारी आणि पोलीस सुद्धा विकत घेतले जातात. भाजपकडे पाण्यासारखा पैसा आहे. बूथवरील १००० मतासाठी १० लाख ते २० लाख खर्च करायला देखील ते तयार असतील. पण निवडणूक आयोग त्यावर काहींच करत नाही.

२००४ च्या माझ्या निवडणुकीत सोनिया गांधींची सभा लावण्याची मी चूक केली. जंगी सभा झाली. गाव खेड्यातून प्रत्येक वाडीतून लोक आले. विरोधकांनी लोक कुठून आले ह्याची नोंद घेतली. निवडणुकीच्या दिवशी विरोधकांनी त्या लोकांना मतदान करण्यापासून रोखले. मुंबईचे गुंड प्रत्येक बूथ वर नेमले गेले. मी त्या दिवशी फिरताना हेच बघितले. पोलीस तक्रार केली, गुंड पकडून दिले. पण प्रचंड दहशत निर्माण करण्यात आली होती. बुथवर कुणाला किती मत मिळाले ते कळत असल्यामुळे, ज्यांनी पैसे घेतले असतात ते गुंडांना भीत असतात, म्हणून मत त्या पक्षाला देतात. त्याचबरोबर एक सत्य सिद्ध झाले आहे कि कुठल्याही उपकरणाने घोटाळा करता येतो. त्यामुळे EVM हे लोकशाहीला धोकादायक आहे. म्हणून ते रद्द करून मतदान मतपत्रिका द्वारे निवडणूक घ्यावी. तसेच झालेले मतदान मिसळून एकत्र मतमोजणी करावी. १९९१ चे असेच मतदान झाले. त्यावेळी मी पहिल्यांदा निवडून आलो होतो.  म्हणून मतपत्रिकेवरच मतदान घ्यावे असा सर्व पक्षानी आग्रह धरला पाहिजे.

दुसरा मुद्दा आहे द्वेषभावना.  आजचे राजकारण जातीय आणि धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा आहे.  ज्यामुळे देश स्वतंत्र होवून इतकी वर्ष झाली तरी जातीचा अंत होण्याऐवजी त्या वाढत गेल्या. म्हणूनच बाबासाहेब म्हणाले होते “जाती राष्ट्र विघातक आहेत. बंधुत्त्व हे समाजावर अमृतसिंचन करणारे तत्त्व आहे.  जोपर्यंत जातीचा अंत होत नाही, तोपर्यंत भारत राष्ट्र म्हणून उभे राहू शकत नाही.”  त्याच्या उलट जाऊन सर्व पक्ष जातीय द्वेष निर्माण करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात.  १९९२ साली माझ्या गावातील पंचायत समितीच्या निवडणुकीत मी कॉंग्रेसमधून नादीरशहा पटेलला उभे केले.  ५००० मतदार संख्येत केवळ ५०० मतदार मुस्लिम होते.  सगळ्या कार्यकर्त्यांनी नादीरशहाच्या उमेदवारीला विरोध केला.  पण मी म्हणालो कि, मी आधी सैनिक आहे. जातीय सलोखा निर्माण करणे माझ कर्त्यव्य आहे.  मी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी जगभर फिरतो  आणि मी आपल्याच गावात त्याच पालन करत नाही.  मी जात आणि धर्म बघून उमेदवारी दिली, तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. जैसे बोले तैसे चाले हा सुधीर सावंतचा ठाम निर्धार आहे.  नादीरशहाला निवडून आणा आणि जगाला दाखवा कि जेथे मुसलमान नाहीत तेथे मुस्लिम निवडून येतो  आणि जेथे हिंदू नाहीत तेथे हिंदू निवडून येतो.  ज्या दिवशी काश्मिरमध्ये मराठी हिंदू निवडून येईल त्याच वेळेला भारत एक राष्ट्र बनेल.  अनेक मोठ्या नेत्यांनी माझी टिंगल केली. हा मिलेटरीवाला आहे.  त्याचे सर्व डोके गुडघ्यात आहे.  पण गाववाल्यानी मला साथ दिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाच्या मतांनी नादीरशहाला निवडून दिले.   मी बोलतो ते करतो अशी माझी ख्याती म्हणूनच निर्माण झाली.  माझ्या देशाबंधावानो जर भारताला सुजलाम सुफलाम करायचे असेल तर भारतीय समाज एकसंघ झाला पाहिजे.  नाहीतर अजून १५० वर्षाच्या गुलामगिरीत आपण प्रवेश केलेला आहे.

ठळकपणे सांगायचा मुद्दा हाच आहे कि जात धर्म विरहित राजकारण झाले पाहिजे.  त्यामुळे जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण करणाऱ्या पक्षाना गाडून टाकले पाहिजे  आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणाऱ्या पक्षांना निवडून आणले पाहिजे.  कारण सत्तेची चावी ही लोकांकडे आहे.  दुसरीकडे या देशामध्ये मोठमोठे उद्योगपती आणि गुन्हेगारी डॉन हे बहुतेक पक्षाना विकत घेतात आणि श्रीमंतीकडून अति श्रीमंतीकडे जातात.  त्यांना पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर काहीच वाटत नाही.  शेतकरी – कामगार मेले तरी काहीच वाटत नाही. बलात्कार झाले तर पुरुषप्रधान मनूस्मृतीच्या कायद्यामुळे स्त्री ही उपभोगाची साधन असते म्हणून दुर्लक्ष करतात.  त्यामुळेच बलात्काराच्या घटना वाढत चालल्या आहेत.  हे भारतातील १ टक्के लोक राजकीय पक्षाना वापरून देशाला लुटत आहेत आणि रखरखत्या उन्हामध्ये कष्टकरी लोक मरत आहेत.  सर्वच पक्ष पैशेवाल्यांचे गुलाम झालेले दिसतात.  सामान्य लोकांनी जायचे तरी कोठे?  त्यामुळे विरोधी पक्षानी आघाडी करून भाजपला नेस्तनाबूत करणे हे एकीकडे साध्य होईल व दुसरीकडे तुम्ही लोक सत्तेवर येवून काहीच फरक पडणार नाही. कारण तुम्ही देखील त्या अतिश्रीमंत लोकांचे गुलाम आहात.

 

लेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत

वेबसाइट : www.sudhirsawant.com

मोबा. नं. ९९८७७१४९२९

 

Please follow and like us:

Author: Brigadier SS